स्टार माझा' wallmart ने विकत घेतलं आहे का? कशासाठी एवढी भाटगिरी?
काल (गुरुवार, १ डिसेंबर) संत्र्यावरील रिपोर्ट पाहिला. दलाली वगैरे असेलही. पण आज कोणत्या व्यवहारात दलाली नाही? त्याचे भलेबुरे परिणाम, त्यावर नियंत्रण हे विषय असू शकतात. पण शेतमालाच्या व्यवहारात दलाली आहे त्यामुळे भाव वाढतात आणि ही दलाली नष्ट झाली की ग्राहकांना योग्य भावात माल मिळेल आणि शेतकर्यांना चांगला भाव मिळेल. त्यासाठी wallmart आवश्यक आहे, असे सरधोपट विश्लेषण हे गाढवाला ताप आणणारे आहे. ज्या कोणाचे हे डोके असेल त्याला कशातलंही काही कळतं का? असा प्रश्न पडतो. `ठेकेदार' ही एक वेगळी जमात आहे. सरकार दरबारी तर त्याशिवाय पानही हालत नाही. हे `ठेकेदार' आणि `दलाल' यात तत्वत: काय फरक आहे? योजनांचा खर्च अवाढव्य वाढणे आणि भ्रष्टाचार यासाठी हे सरकारी दलाल किती मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत? आणि कोणते क्षेत्र असे आहे जेथे दलाली नाही?
दुसरा मुद्दा, या दलालीमुळे वाढणार्या भावाचा. औद्योगिक (देशी वा विदेशी) मालाच्या किमती हा किती मोठा विषय आहे? पण आम्ही ते डोळे मिटून स्वीकारतो. खूप खोलात न जाताही, एकच मुद्दा मांडतो. लाखो करोडो रुपयांच्या जाहिराती केल्या जातात आणि तो सारा पैसा ग्राहकांच्या माथी मारला जातो. त्या जाहिराती किती आवश्यक, अनावश्यक असतात याचा विचार कधी केला आहे का? त्यातील दावे किती खरे असतात? त्या दाव्यांना आव्हान देण्यासाठी अजून पुरेशी तरतूद आम्ही केलेली नाही, ग्राहक धोरण अजून आम्ही केलेले नाही. या कोट्यवधींच्या जाहिराती ही दलाली नव्हे का? एखाद्या वस्तुसाठी जाहिरात करणारा नट, नटी वा खेळाडू हे दलाल नव्हे तर काय? शिवाय हे स्थानिक दलालांपेक्षा खूप महागडेही आहेत. स्थानिक दलाल चालत नाहीत पण हे दलाल चालतात?
स्थानिक दलालांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही, पण अन्य दलालांपेक्षा ते बरे. हे दलाल अवास्तव (?) पैसा कमावतात असे क्षणभर मान्य केले तरीही ते अडल्या नडल्याला शेतकर्याला मदतही करतात. संबंध चांगले असतील तेथे हे पाहायला मिळते. हे दलाल जो काही खर्च करतात तो स्थानिक अर्थव्यवहाराला मदतच करतो. कोणी पैशाच्या जोरावर स्थानिक पुढारीपण गाजवत असेल तर तेही अर्थव्यवहाराला सहायकच ठरते. विदेशी दलाल जो मलीदा कमावतील तो या देशात राहील का? बरे wallmart वा तत्सम कंपन्या आल्या तरीही हे दलाल संपून जातील का? या कंपन्या व शेतकरी यांच्या व्यवहारात दलाल घुसणारच नाहीत असे कशावरून?
किरकोळ व्यापारात थेट विदेशी गुंतवणूक असावी की नसावी याचा स्वतंत्रपणे परामर्ष घ्यावा लागेल. तो या लेखाचा विषय नाही. मात्र, त्या कंपन्या कशा आवश्यक आहेत यासाठी `स्टार माझा' आणि अन्यही प्रसार माध्यमे जी भाटगिरी करीत आहेत त्याचा नक्कीच निषेध व्हायला हवा.
- श्रीपाद कोठे, नागपूर
शुक्रवार, २ डिसेंबर २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा