गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

शनिवारे सर

काही लोक पुस्तके विकत घेतात, वाचत नाहीत. काही पुस्तके वाचतात, विकत घेत नाहीत. काहींना दोन्ही शक्य असतं. काहींना दोन्ही शक्य नसतं. काहींना दोन्ही आवडतं, काहींना दोन्ही आवडत नाही. वडिलांना पुस्तके विकत घेणे आणि वाचणे दोन्हीचा छंद. शिवाय ग्रंथालयातून आणून वाचण्याचाही. आम्ही बहिण भाऊ, जावई, सून, नातवंडे यांच्यातही ते उतरले. शिवाय काका, मामा, चुलत-मामे भाऊ यांच्यातही पुस्तकप्रेम; विकत घेणे आणि वाचणे या दोन्ही अंगांनी बहरलेले. त्यामुळे अनेकदा भेटीही पुस्तकांच्या. भरीसभर मी पत्रकारितेत. त्यामुळे तिकडूनही पुस्तके जवळ येत राहिली. परिणामी घरात भरपूर पुस्तके. आता मात्र माणसे आपापल्या कामाने विखुरली. वडील वृद्धत्वामुळे पुस्तकांपासून दूर, जमलेल्या आणि जमवलेल्या बहुतांश पुस्तकांचे वाचनही झालेले. पुस्तकांची जपणूक हाही मुद्दा ओघानेच आलेला. त्यामुळे मनात विचार आला जेथे वाचले जात असेल अशा ग्रंथालयाला आपल्या संग्रहातील काही भाग द्यावा. मनात विचार असतानाच आमचे मित्र, संघाचे कार्यकर्ते आणि भारतीय विचार मंचाचे पदाधिकारी गिरीश हरकरे घरी आले. सहज बोलताना ते निवासाला असलेल्या नागपूरच्या हनुमाननगरच्या ग्रंथालयाचा विषय निघाला. त्यांना मनातला विचार सांगितला. त्यांनी लगेच होकार दिला. सगळी व्यवस्था केली. योग जुळवून आणला आणि काल एका छोटेखानी, अनौपचारिक कार्यक्रमात जवळपास २०० छोटी-मोठी पुस्तके हनुमाननगरच्या ग्रंथालयाला भेट दिली.

४९ वर्षे पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या या ग्रंथालयाचा इतिहास त्या निमित्ताने समजला. उर्मी, प्रयत्न आणि सातत्य यातून अशा संस्था उभ्या राहतात, टिकतात, वाढतात. समाजालाही त्याचा उपयोग होतो. अन खऱ्या अर्थाने माणसाचे भरणपोषण करणारी अशी लहानलहान कामे करणारी मंडळी अनाम, अप्रसिद्ध असते. धरतीला सुपीक करणाऱ्या मृगधारांसारखी.

ग्रंथालयात बसलो असताना अशीच एक व्यक्ती मनात उगवली. स्व. गो. सी. शनिवारे. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तिका आणि त्यांच्यावरील एक पुस्तिका यांचाही २०० पुस्तकात समावेश होताच. मन थेट ४० वर्षे मागे गेलं. आठवीत होतो. गो. सी. शनिवारे आमचे शिक्षक. मराठीचे. शिक्षक - विद्यार्थी संबंध आजच्यासारखे friendly नसणारा, ७० च्या दशकाचा काळ. असाच २३ डिसेंबर होता. आमच्या शाळेत त्यावेळी पटांगणातल्या फळ्यावर वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव लिहिण्याचा उपक्रम होता. त्या दिवशी माझे नाव फळ्यावर होते. प्रार्थना होऊन तासिका सुरु झाल्या. वर्गात येणारे शिक्षक, शिक्षिका मला शुभेच्छा देऊन शिकवणे सुरु करीत होत्या. त्याचं एक अप्रूप वाटत होतं. तिसरी किंवा चौथी तासिका असेल. ती होती शनिवारे सरांची. ते वर्गात आले. मला शुभेच्छा दिल्या आणि जवळ आले. त्यावेळच्या अनेक शिक्षकांप्रमाणे धोतर, झब्बा असाच त्यांचा वेश. झब्ब्याच्या खिशात त्यांनी हात घातला आणि बंदा रुपया काढला. एक रुपया ही मोठी गोष्ट होतीच. शाळेशेजारीच असणाऱ्या आशियातील मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाहनतळावर; शिकणारे आणि शिकवणारे यांच्या सायकली उभ्या असत. त्याही उंचेल्या, आधी balance घेऊन मग सीटवर बसण्याच्या. अनेक शिकणारे आणि शिकवणारे तर बसने ये-जा करीत. त्यावरून रुपयाची किंमत कळावी. तर शनिवारे सरांनी रुपया काढला आणि म्हणाले- हात पुढे कर. हे अनपेक्षित होते. शुभेच्छा देण्यासाठी फळ्यावर नाव लिहिणे आणि शिक्षकांनी शुभेच्छा देणे; हे उपक्रम शाळेने नुकतेच सुरु केले होते. पण त्याशिवाय अधिक काही नाही. चोकलेट, भेटी वगैरे नाहीच. शिवाय संस्कार आणि वातावरण. मी म्हटले- `नाही सर. मी नाही घेत. घरी आवडणार नाही.' तरीही त्यांनी आग्रह केला आणि मी हात पुढे केला नाही त्यामुळे बेंचवर तो रुपया ठेवून ते शिकवू लागले.

तास संपला. मधली सुटी झाली. काय करावं सुचत नव्हतं. शनिवारे सरांनी शाळेबाहेर, राजाबाक्षा मारुती मंदिराच्या जवळ `आपले दुकान' नावाचं एक छोटंसं दुकान लावलं होतं. शाळेच्या आधी व नंतर थोडा वेळ आणि मधल्या सुटीत ते दुकान उघडीत असत. शालेय साहित्य आणि गोळ्या बिस्किटे दुकानात ठेवत. सुटी होताच, मी त्यांनी दिलेला रुपया घेतला आणि `आपले दुकानात' गेलो. सर म्हणाले- काय रे? म्हटले - `सर, प्लीज हा रुपया परत देतो. तो घ्या.' त्यावर ते हसले. म्हणाले- `कसा रे तू? तुझे वडील मला ओळखतात. आम्ही मित्र आहोत. काही म्हणणार नाहीत ते.' तरीही मी आग्रह केला तेव्हा म्हणाले- बरं. त्यांनी रुपया परत घेतला आणि एक छान शाईचं पेन काढून मला दिलं. म्हणाले- `हे तुझा मास्तर देतो आहे. त्याची ही आज्ञा आहे.' मी ते पेन घेतले. पुष्कळ दिवस ते वापरीत होतो.

दहावीनंतर शाळा सुटली. काही वर्षांनी सर निवृत्त झाले. तरीही कधीमधी घरी येत. वडिलांचे मित्र असले तरीही वडिलांपेक्षा वयाने मोठे होते. त्यामुळे आईला सुनबाई म्हणत असत. आले की सांगत- सुनबाई चहा घेईन किंवा सुनबाई आज चहा नको. कधी सहज भेटायला, कधी स्वत: लिहिलेलं पुस्तक द्यायला. मी पत्रकारिता सुरु केल्यानंतरची गोष्ट. एकदा टायफॉईडने आजारी असताना त्यांना कुठे तरी कळलं. तेव्हा भेटायला आले होते. सर आग्रही वृत्तीचे होते. वाणी खणखणीत होती. स्वभाव सात्विक होता. अभिरुची उत्तम होती. वाचन दांडगं होतं. लेखनकला होती. आचार विचार शुद्ध होते. पूर्णतः निर्व्यसनी आणि मनाने निर्विष होते. पण... ... हा पणच खूप महत्वाचा असतो. हा पणच आयुष्याचं कोडं असतो. सगळं असूनही शनिवारे सरांच्या विशाल भाळावर सुख, शांतता, समाधान लिहिलेले नव्हते. कधी बोलण्यात सहज उल्लेख आला तरच. अन्यथा मुद्दाम कधी बोलत नसत. पण सरांचं व्यक्तिगत आयुष्य फार निराशाजनक आणि करुण गेलं. संसार, मुले, कुटुंब सगळ्याच बाबतीत विफलता. अखेरच्या दिवसात एकाकी. तरीही फिरणे, भेटीगाठी, संबंध, वाचन, लेखन सुरूच. त्यांचीही काही स्वभाववैशिष्ट्ये असतीलच. पण तशी कोणाची नसतात. सरांच्या बाबतीत मात्र विफल जीवनासाठी बोट दाखवायला प्रभूने `स्वभाववैशिष्ट्य' ही एक जागा ठेवली होती. शिक्षक असल्याने निवृत्तीवेतन वगैरे मिळत असणारच. पण `चलनवाढ' नावाच्या पश्चिमेच्या अर्थशास्त्राने दिलेल्या देणगीने जसे जगभरात असंख्यांना भरडून काढले तसेच त्यांनाही भरडले. शिवाय आणखीही काही बाबी होत्याच. तेव्हाचे नागपूरचे खासदार आणि विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित कधीतरी पैसे देत असत. अर्थात स्वत:हून. सरांनी कधीच हात पसरला नाही. कधी श्री. पुरोहित भेटूनही जात. स्वत:चं घरदार, पैसाअडका, माणूस असं काहीही सोबत नसतानाच एक दिवस सरांनी जगाचा निरोप घेतला.

प्रयत्न, परिश्रम, सद्गुण, सचोटी, उपक्रमशीलता, अभिक्रमशीलता इत्यादी इत्यादी असले की; सुख यश पायाशी येतं असं म्हणतात. पण अशा सगळ्या समीकरणांना पार वाऱ्यावर भिरकावून देणारी उदाहरणेही पाहायला मिळतात. स्व. गो. सी. शनिवारे नावाचे आमचे शिक्षक हे तसं उदाहरण. एक मात्र खरं की, रूढ, मनाला बरं वाटणारी समीकरणे भिरकावून देणारा काळही; त्यांच्यातील सत्व, स्वत्व, सदाचार, सुसंस्कृतपणा यांना धक्का लावू शकला नव्हता. त्यांची पुस्तके अन त्यावरील त्यांची छबी नजरेपुढे आली तेव्हा हे सगळं मनात जागलं आणि कडा ओलावल्या.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २४ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा