रविवार, १९ डिसेंबर, २०२१

देवयानी प्रकरण आणि स्वामी विवेकानंद

भारतीय राजनयिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत जी वागणूक मिळाली त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. अत्यंत वाईट, असभ्य, घृणास्पद, लाजीरवाणा असा हा प्रकार आहे. या प्रकरणामुळे नाकाने कांदे सोलणार्या अमेरिकेचा खरा चेहरा उघड झाला आहे. अमेरिकेचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा स्पष्ट झाला आहे आणि त्याची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली आहेत. भारत सरकारने ज्या पद्धतीने हा विषय लावून धरला ते अभिनंदनीय आहे. तपशीलावर चर्चा होऊ शकेल, पण त्यातील भावनेशी सगळेच सहमत होतील.

देवयानीच्या या प्रकरणात वंशवाद, वर्णभेद, उन्मत्तता, अहंमन्यता, पैशाचा माज आणि अर्थधार्जिणी मूल्यव्यवस्था या गोष्टी आहेत. सुमारे १२० वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनाही या गोष्टींचा अनुभव आला होता आणि त्यांनी त्याची हजेरीही घेतली होती. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेपूर्वी मिशिगन सरोवराच्या काठी भरलेले प्रदर्शन पाहायला स्वामीजी गेले असता, काही लोकांनी त्यांची कफनी धरून ओढली होती. वेगळ्या देशातील, वेगळ्या वंशाच्या, वेगळ्या वर्णाच्या, वेगळी वेशभूषा केलेल्या माणसाची मस्करी करणे आणि त्याचा अपमान करणे हाच त्या लोकांचा उद्देश होता. स्वामीजींनी जेव्हा अस्खलित इंग्रजीत, कठोर स्वरात त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. बोस्टन शहरात तर एकदा त्यांच्या मागे मोठा जमावच लागला होता. स्वामीजींना चक्क रस्त्याने पळत पळत जीव वाचवावा लागला होता. असे अनुभव आल्यामुळेच एकदा अमेरिकेतीलच एका व्याख्यानात त्यांनी अमेरिकन श्रोत्यांना थेट भेदक प्रश्न विचारला होता, `केवळ मी हिंदू असल्याने मला अनेकदा बसायला साधी खुर्चीही तुमच्या देशात नाकारण्यात आली आहे. यावर तुमचे काय उत्तर आहे?'

पैशाचा माज आणि पैसा हेच एकमेव मूल्य समजण्याच्या वृत्तीवर तर त्यांनी कडक प्रहार केले. `भारतातील जातीभेदापेक्षाही तुमचा डॉलरवर आधारलेला जातीभेद जास्त घातक आणि वाईट आहे,' असे सडेतोडपणे त्यांनी अमेरिकनांना ठणकावले होते. एकूणच पाश्चात्य, विशेषत: अमेरिकन समाजातील अर्थधार्जीण्या मूल्यव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले होते, `तुमच्या समाजात पैसा हेच सर्वस्व आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तो येथे जगूच शकत नाही. कोणी जर उद्या म्हटले की, मला नाक धरून बसायचे आहे आणि ध्यानधारणा करायची आहे, तर ते येथे होऊच शकणार नाही. भारतात कोणीही अशा तर्हेने आपली साधना करू शकेल. समाज त्याच्या जीविकोपार्जनाची काळजी घेईल.'

`नॉर्दम्टन डेली हेराल्ड' या वृत्तपत्राने १६ एप्रिल १८९४ रोजी स्वामीजींच्या १४ एप्रिल १८९४ च्या एका व्याख्यानाचा वृत्तांत प्रकाशित केला. त्या वृत्तांतात म्हटले होते, `धनासंबंधीचा लोभ, ऐषआरामाच्या मागे लागण्याचा राष्ट्रीय दुर्गुण, स्वार्थपरता, युरोपातील व अमेरिकेतील वर्चस्व गाजविणार्या गोर्या लोकांना नैतिक व सामाजिक दृष्टीने भयंकर धोका निर्माण करणारी त्यांची डॉलरवर आधारलेली जातीभेदाची भावना- या सार्या गोष्टींसंबंधी वक्त्यांनी केलेली कानउघाडणी अगदी ठीकच होती आणि त्यांनी आपले हे विचार अत्यंत प्रभावीपणे पुढे मांडले.' सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी एका अमेरिकन वृत्तपत्राने स्वामीजींच्या या विचारांना दिलेली प्रसिद्धी आणि त्यांनी केलेली कानउघाडणी

ठीक होती; हा व्यक्त केलेला स्वत:चा अभिप्राय, अतिशय बोलका आहे. तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेचे मानस मुळीच बदललेले नाही, उलट त्यातील स्वार्थ आणि दुष्टावा अधिकच पक्का झालेला आहे हे देवयानी प्रकरणाने पुढे आणले आहे. 

स्वामीजींच्या या प्रतिक्रियांमध्ये फार गंभीर व सखोल आशय दडलेला आहे. देवयानी प्रकरणात त्याची प्रचीती येत आहे. पैसा हे जगण्याचे आणि विनिमयाचे साधन न राहता तो जीवनाचा पर्याय झालेला आहे. अन हा अत्यंत चुकीच्या अर्थसंस्कृतीचा आणि अर्थमूल्यांचा परिणाम आहे. चांगले किंवा वाईट, चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य, स्वीकार किंवा नकार, प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठा अशा सगळ्याच गोष्टी कशाच्या आधारावर ठरवायच्या, तर केवळ पैशाच्या आधारावर. सगळ्या गोष्टींचे मापदंड केवळ आणि केवळ पैसा, ही दूषित वृत्तीच यासाठी कारणीभूत आहे. या निमित्ताने जी वेगवेगळी माहिती समोर येत आहे ती या चुकीच्या मार्गाची आणि चुकीच्या विचारांची पुष्टी करणारीच आहे. देवयानीच्या घरी काम करणार्या महिलेच्या डायरीतील जी माहिती आता बाहेर येत आहे ती, मूल्यव्यवस्था आणि मानवीयता या दोन्ही बाबतीतला अमेरिकन व भारतीय दृष्टीकोन किती वेगळा आहे हे अधोरेखित करणारी आहे. हा केवळ दोन दृष्टिकोनातील फरक नाही, तर जगाच्या भल्यासाठी अमेरिकन दृष्टीकोन किती घातक आहे आणि भारतीय दृष्टीकोन कसा लाभदायी आहे याची जाणीव करून देणाराही आहे.

आज सगळे जग तथाकथित अमेरिकन कल्पना, संकल्पना, विचार, राहणीमान, जीवनशैली, सामाजिक- सांस्कृतिक- तर्हा, जीवनमूल्य यांनी भारावून गेले आहे. आपण भारतीयही त्याला अपवाद नाही. विशेषत: ज्यांच्या कुटुंबातील कोणीतरी तिकडे आहे, ते लोक तर अमेरिकेशिवाय श्वासही घेऊ शकत नाहीत. तिकडे राहत असलेले पत्रकार, लेखक, वकील अशी मंडळीही गेले दोन दिवस जी भाषा बोलत आहे, ती विचारहीनतेचा आणि संवेदनाहीनतेचा परिपाकच आहेत. `अमुक तुमचा विचार, अमुक आमचा विचार. आपण आपापल्या विचारानुसार जगू,' असे म्हणण्याचे दिवस केव्हाच मागे पडले आहेत. सगळं जग जवळ येत असताना सर्वसमावेशक, सगळ्यांचे हित जोपासणारी व्यवस्था, कायदे, मूल्य, संकल्पना विकसित करण्याची गरज आहे. `हम करे सो कायदा' ही अहंमन्य वृत्ती; दंभ, सत्तालालसा जोपासणारी वृत्ती निपटूनच काढावी लागेल.

हे जग कोणा एका अमेरिकेची जहागिरी नाही. सत्ता, संपत्ती, सद्गुण, बुद्धिमत्ता, विचार, समजूतदारी, शहाणपण यांचा मक्ता काही जगनिर्मात्याने अमेरिकेला दिलेला नाही. स्वामीजींनी या विषयांवर १२० वर्षांपूर्वीच द्रष्टेपणाने विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे. जगभरातील विविध समाजाचे आदर्श, विविध चालीरीती, विविध समजुती या सार्याकडे कसे पाहावे आणि त्याच्या एकीकरणाची प्रक्रिया काय राहील, त्यासाठी स्वीकार आणि नकाराचा आधार काय राहील वगैरे चर्चा स्वामीजींनी केलेली आहे. त्यांचे ते विश्लेषण आणि मार्गदर्शन समजून घेऊन सगळ्या जगाचे वैचारिक नेतृत्व स्वीकारण्याची तयारी भारताला करायला हवी. जगातील अन्य कोणताही देश हे काम करू शकत नाही.

भारताबाहेर वेगवेगळ्या नावाखाली भारतीयांना ज्या पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो आणि जगभरात विविध देशांच्या लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो ते पाहता, जगाची मानसिकता बदलण्याची गरज आहे हे लक्षात येते. काही दिवसांपूर्वी, आई आपल्या मुलाला हाताने जेऊ घालते म्हणून तिच्या गोंडस बाळाला त्याच्या डॉक्टर असलेल्या भारतीय आईपासून हिरावून घेण्याचे प्रकरण कितीतरी गाजले होते. तेही पाश्चिमात्य देशातच घडले होते. एका भारतीय महिला अधिकार्याची चौकशी आणि तपासणी केवळ ती साडी नेसली म्हणून याच अमेरिकेत करण्यात आली होती. या संबंधात अधिकृतपणे देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात हेच कारण नमूद करण्यात आले होते. आपल्यापेक्षा वेगळी वेशभूषा, वेगळी जीवनशैली, वेगळे खानपान हे सुद्धा सहन न करणारी ही कोणती मानवता? ही अत्यंत असहिष्णू अमानुषता केवळ कायदे, नियम यांचा विषय नाही. तेवढ्याने काहीही होणार नाही.

या संबंधातही स्वामीजींनी वेळोवेळी अत्यंत स्पष्ट मते मांडली. `बाल्टिमोर अमेरिकन' या वृत्तपत्रात २२ ऑक्टोबर १८९४ रोजी `क्रियाशील धर्म' या विषयावरील स्वामीजींच्या भाषणाचा वृत्तांत प्रकाशित झाला होता. स्वामीजी काय म्हणाले ते सांगताना या वृत्तात म्हटले होते, `ज्या क्षणी जग नि:स्वार्थ होईल त्याच क्षणी सारे दु:ख नाहीसे होईल. जोवर कायदे व संस्था यांच्या साहाय्याने समाज अनिष्ट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करतो तोवर अनिष्ट गोष्टी नष्ट होणार नाहीत. गेली हजारो वर्षे जगाने हा उपाय योजून पाहिला. पण तो सफल झाला नाही.' स्वामीजींचा अभिप्राय स्पष्ट आहे. मानसिकता, विचार करण्याची पद्धती, जगण्याचे प्रयोजन या सार्याचा फेरविचार आवश्यक आहे. ही जबाबदारी भारताचीच आहे. तोच भारताचा जीवनहेतू आहे, असेही स्वामीजींनी अनेकदा म्हटले आहे. जोवर या आदर्शाच्या दिशेने मोठी वाटचाल मानवसमाज करीत नाही, तोवर काही गोष्टी तात्कालिक धोरणात्मक बाब म्हणून कराव्या लागतील. त्या करायलाच हव्या. मात्र त्यासोबतच जगापुढील खरा धोका ओळखून दूरगामी दृष्टीने आवश्यक असलेले वैचारिक व नैतिक नेतृत्व भारताने स्वीकारायला हवे. देवयानीला न्याय मिळवून देतानाच भविष्यातील आपली जबाबदारीही भारतीय समाजाने उचलायला हवी. देवयानी प्रकरणाचा हा आशय आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २० डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा