बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

मनोरंजनाचे ठेकेदार

होय, आम्ही बावळटांचे शिरोमणी आहोत आणि राहू. आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत, आम्हाला आमचे अधिकार आणि कर्तव्ये आहेत अन त्यांचा उपयोग करत आम्ही बावळट राहणारच. तो जन्मसिद्ध अधिकार आहे आमचा !!! असा कृतसंकल्प केलेले अनेक जण आजूबाजूला आहेत अन ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपले मनोरंजन करीत असतात. दोन दिवसांपासून त्यांना विषय मिळालाय `श्रीमद भगवद्गीता'. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी `श्रीमद भगवद्गीता' राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावा अशी सूचना केली आणि या मनोरंजनाचा ठेका घेतलेल्यांना कडकडून वृश्चिकदंश झाला. अन एका संस्कृत (म्हणूनच अमानवी, अराष्ट्रीय, जुनाट, मागास, प्रतिगामी) सुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे - आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला आणि वरून वृश्चिक दंश झाला की, जशी अवस्था व्हावी तसे यांचे झाले.

आज राष्ट्रीय पशु, पक्षी, भाषा, गान, गीत, प्रतीके वगैरे घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रीय ग्रंथ मात्र नाही. काय हरकत आहे राष्ट्रीय ग्रंथ असायला? वाचाल तर वाचाल वगैरे पांचट वाचाळपणा करणारेही यावर किंचाळतील- नको, नको. राष्ट्रीय ग्रंथ नको. काय करायचा राष्ट्रीय ग्रंथ? नसला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून काय होते? खरेच आहे त्यांचे. प्रश्न फक्त एवढाच येतो मनात- माणसांना नावेच नसली तरी काय होते? सगळ्यांना एकेक क्रमांक. १२५ कोटींच्या भारतात १२५ कोटी क्रमांक. नवीन जन्मलेल्यांना जुने रिकामे झालेले क्रमांक द्यायचे, गरज पडली तर त्यात भर घालायची. कशाला हवीत नावे तरी? धान्य, खाणेपिणे, स्वयंपाकपाणी, कुपोषण अन अन्य साऱ्या गोष्टी अन झगडे कशाला हवेत? खायला मिळालं तरी माणूस कधी तरी मरणार; खायला नाही मिळालं तरी मरणार. केव्हाही मेलं तरी काय फरक पडतो? असंच सगळ्या गोष्टींचं होऊ शकेल. पण नाही- आम्हाला काही माहीत नाही. राष्ट्रीय ग्रंथ मात्र नको. का नको?

या `का'चे उत्तर हे मनोरंजनाचे ठेकेदार देणार नाहीत. कारण त्यात त्यांचा निभाव लागणार नाही, हे त्यांना पूर्ण ठाऊक आहे. ग्रंथ, पुस्तके, ज्ञान, बुद्धिवाद, तर्क वगैरेची बाजू घेऊन भांडणारे हे लोक राष्ट्रीय ग्रंथ या गोष्टीला विरोध का करतात, याला उत्तर नाही असे मात्र नाही. याला उत्तर आहे की, असा ग्रंथ केवळ आणि केवळ हिंदूंचा ग्रंथ असू शकतो. या विदुषकांना कितीही वेदना झाल्या, कितीही त्यांना त्रास झाला, कितीही त्यांची कोंडी झाली तरीही; येशु ख्रिस्त म्हणजेच ख्रिश्चन पंथ २००० वर्षांच्या पूर्वी आणि इस्लाम १६०० वर्षांच्या आधी अस्तित्वातच नव्हते हे सत्य त्यांना नाकारता येत नाही. अन त्यापूर्वीपासूनचा, किंबहुना त्यांच्या एकूण इतिहासाहून दुपटीहून वा तिपटीहून अधिक काळाचा भारताचा इतिहास ज्ञात आहे आणि तो हिंदूंचा आहे, हेही नाकारता येत नाही आणि पचवता येत नाही. गिळता येत नाही आणि ओकता येत नाही अशी त्यांची स्थिती आहे. उद्या राष्ट्रीय ग्रंथ घोषित करायचा म्हटले तर ज्यांचा जन्मच या भूमीत झाला नाही, त्या बायबल आणि कुराणाला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करताच येणार नाही. आली ना पंचाईत? बरे ही पंचाईत अशी की, श्रीकृष्ण अन त्याने सांगितलेली श्रीमत भगवद्गीता ५१५१ वर्षे आधी का आली (तीही भारतात अन हिंदूंच्या ओठी) आणि बायबल आणि कुराण इतक्या उशिरा का जगात आले, असा सवाल करत; त्या अदृश्य नियतीने केलेल्या या अन्यायाविरुद्ध धाव तरी कोणत्या न्यायालयात घेणार? फारच पंचाईत झाली बुवा विदुषकांची. अगदी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये रे देवा...

विदुषकांचा दुसरा प्रकार आहे, जो श्रीमत भगवद्गीतेच्या गुणात्मक मूल्यांकनाच्या मागे लागतो. गंमत म्हणजे, हा वर्ग एकीकडे गांधीजी, विनोबाजी, ज्ञानेश्वरी वगैरेचे दाखले देणे, त्यांना उचलून धरणे, ते सगळ्या जगाचे मार्गदर्शन करू शकतील वगैरे दावे करीत असतो. ज्ञानेश्वरी हा श्रीमत भगवद्गीतेवरीलच टीकाग्रंथ आहे आणि गांधीजी, विनोबाजींच्या जीवनात गीतेला अनन्यसाधारण स्थान होते; हे लक्षात ठेवण्याची त्याला गरजच वाटत नाही. खरं तर त्याने हे सगळे लक्षात ठेवावे ही आपली अपेक्षाच चुकीची नसते का? विदुषक काय असं लक्षात ठेवून त्याचं विश्लेषण, तर्क वगैरे करत असतो? यातील एक तर अण्णा हजारेंचे उजवे हात समजले जातात. आता त्या अण्णांनी आत्यंतिक निराशेतून बाहेर आल्यावर ज्ञानेश्वरी हाच प्राण मानला आणि त्याच प्रेरणेतून राळेगणसिद्दी घडवली. म्हणजेच या गावाने उभे राहण्यामागे एक प्रकारे गीतेचीच प्रेरणा नाही का? गीताच नसती, त्यावर ज्ञानेश्वरी आकारास आली नसती, तर अण्णा आधारहीन भटकत राहिले असते कदाचित. माणूस उभा होण्यासाठी आणि त्याच्या हातून चांगल्या सृष्टीचे सृजन होण्यासाठी अत्यंत बळकट प्रेरणा लागते. ती प्रेरणा गीता देते याचं हे जिवंत उदाहरण रोज पाहत असतानाच गीतेला गुणात्मक वगैरे विरोध करणे हे विदुषकी नाही तर काय म्हणायचे? केवळ ज्ञानेश्वरी नाही, अण्णांना निराशेतून सर्वप्रथम बाहेर काढणारे होते स्वामी विवेकानंद. त्यांनीही गीतेला जीवनाचा आधार मानलेच आहे. पण असे असले तरीही गीता हिंसेचा पुरस्कार करते, गीता चातुर्वर्ण्याचा म्हणजेच विषमतेचा पुरस्कार करते; वगैरे वगैरे करत आम्ही गळे काढणारच, हा या विदुषकांचा निर्धार अगदी अनुकरणीय असाच आहे. याच गीतामृताच्या आधारे ज्ञानेश्वरांनी सर्वसमावेशक, समतायुक्त भागवत पंथ निर्माण केला. परंतु आम्ही ज्ञानेश्वरीचे गोडवे गात, त्याच गीतेतून विषमतेचे हलाहल काढून दाखवू, हा निर्धार लहानसहान नाही.

भारताची राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ आहे असे म्हणणाऱ्यांनी देखील भावना बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार करायला हवा. राज्यघटना नक्कीच सगळ्यांच्या आदरास पात्र आहे, असायला हवी. परंतु राज्यघटना ही राज्यशकट हाकण्यासाठी सामूहिक चिंतनातून साकारलेला मार्गदर्शक ग्रंथ आहे, तो मानवी गुणावगुण- मानवी प्रेरणा- मानवी अस्तित्व- अशासारख्या भावविषयांचा ग्रंथ नाही. ही मर्यादा लक्षात घ्यायला हवी. एवढेच नाही तर भावविषय मानवी जीवनात सर्वोच्च असतात हे नाकारण्यात हशील नाही. म्हणूनच न्यायालयात न्याय घटनेनुसार होत असला तरीही खरे बोलण्याची शपथ आपापल्या श्रद्धेनुसार घेतली जाते. मंत्री वा लोकप्रतिनिधी म्हणून राज्यघटनेनुसार काम केले जात असले तरीही ते प्रामाणिकपणे करण्याची शपथ आपापल्या श्रद्धेनुसार घेतली जाते. प्रश्न निर्माण होईल, मग फक्त भगवद्गीता का? त्याचे सोपे उत्तर आहे, या देशातील बहुसंख्य लोकांची ती श्रद्धा आहे आणि सगळ्यात प्राचीन आहे. सगळ्या श्रद्धा समान असल्या तरीही व्यवहारात एखादा निर्णय घेताना निवड एकाचीच होणार. त्यात मानअपमान किंवा तशाच अन्य गोष्टी आणणे पूर्णत: चुकीचे आहे.

उरतो मुद्दा श्रीमत भगवद्गीतेतील संकल्पना, तर्क, इहवाद, आध्यात्मिकता, चिंतन, दृष्टीकोन या गोष्टी. त्यावर हजारो वर्षांपासून चर्चा, चिंतन सुरु आहे आणि पुढेही ते सुरूच राहील. त्या साऱ्याची चर्चा इथे करण्याची गरज नाही. मात्र एक नमूद करून ठेवायला हवे की, या पृथ्वीवरील ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनाला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल असेच गीतेचे तत्वज्ञान आहे. अगदी त्यातील हिंसा-अहिंसा, समता-विषमता, इहवाद-आध्यात्म, जन्म-मृत्यू या सगळ्यासह. गेल्या शे-पाचशे वर्षातील कथित जागतिक, ऐहिक, समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, व्यक्तिवादी, स्वातंत्र्य- समता- बंधुता- वादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी वगैरे लोकांनी जो प्रचंड वैचारिक आणि व्यावहारिक चक्रव्यूह निर्माण केला आहे. त्यातून सुटण्याचा मार्गही आधुनिक अभिमन्युंना ठावूक नाही, तो मार्ग दिसत नाही, अन त्यांची ती क्षमताही नाही. त्या मार्गाने दिवस सरतील तसतशी मानवजात अधिकच मोठ्या चक्रव्युहात अडकत जाईल आणि अंती दु:ख- वेदना- हताशा- यांचीच शिकार होईल हे निर्विवाद. इच्छाचिंतन वा मनोभाव म्हणजे जग नाही. या जगातील कितीही मोठ्या आणि कितीही उदात्त माणसाने किंवा विचाराने जगाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे दंभ सोडून देणेच अंती हिताचे ठरेल. अर्जुनाचा हा दंभ मोडून काढण्याचे काम महाभारत युद्धाच्या वेळी याच श्रीमत भगवद्गीतेने केले. आजही एक प्रकारे अर्जुनासारख्याच संभ्रमात सापडलेल्या जगाला त्यातून बाहेर काढण्याचे काम श्रीमत भगवद्गीता करेल. त्यासाठीच तो राष्ट्रीय ग्रंथ व्हायला हवा. मानवी कल्याणाचा तो अंतिम थांबा नव्हे, त्या मार्गावरील तो एक थांबा आहे.

बाकी, विदुषक आणि त्यांचे मनोरंजन चालू राहणारच आहे. आपण चार घटका आनंद घ्यावा. कसे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ९ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा