असा एकही विषय दिसत नाही जिथे नियम, कागदपत्रे, कायदे, नियंत्रण, अंमलबजावणी यात सतत वाढ होत आलेली नाही. विषय जमिनीचा असो, विवाहाचा असो, शिक्षणाचा असो; की अगदी कोणताही. दुर्दैव म्हणा की आणखीन काही; पण प्रत्येक विषयात गोंधळ, गैरवापर आणि असमाधान हेही वाढतेच आहे. गंमत ही की, असे असूनही आम्ही त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. मानवी जीवनाचा सुमेळ केवळ एवढ्याने घालता येत नाही, हे अजून हवे त्या प्रमाणात लक्षात घेतले जात नाही. मानवी जीवन अधिक सुकर होण्यासाठी आजच्या या प्रयत्नांना कोणत्या गोष्टींची जोड देता येईल, देण्याची गरज आहे; याचा विचार होत नाही. तसा तो व्हायला हवा. माणूस फक्त नियम, भय, दंड, सजा, धाक, लोभ, मोह; यांनीच काम करतो, जगतो असं नाही. त्याच्या कार्याच्या, जगण्याच्या अन्य प्रेरणांचा विचार व्हायला हवा. त्या प्रेरणा व्यवस्थांचा आणि रचनांचा भाग व्हायला हव्या.
दगड आणि गुल्हेर या प्राथमिक शस्त्रांपासून अणुबॉम्बपर्यंत आणि टोळीपासून साम्राज्यापर्यंत पोहोचूनही, माणूस ना समस्या सोडवू शकला ना सुखी समाज उभा करू शकला. काही झालेच असेल तर ते एवढेच की, आपण किती महान आहोत, हा दंभ फक्त वाढला. असे असूनही नवीन चिंतनाची गरज जाणवत नाही, हेही एक आश्चर्यच आहे.
- ९ डिसेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा