गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

शीतलच्या निमित्ताने

शीतल प्रकरणानंतर नेहमीप्रमाणे चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने काही गोष्टी मनात आल्या.

- सकारात्मक राहायला हवे असे सांगण्यापेक्षा मी सकारात्मक अनुभव देईन असा विचार करायला नको का? वेळ, शब्द, पैसा, समजून घेणे; अशा पुष्कळ बाबतीत मी लोकांना, संबंधितांना, जगाला सकारात्मक अनुभव देईन; असा विचार अशा दुर्दैवी घटनांच्या वेळी जागा व्हायला हवा.

- कोणी स्वतःला संपवल्यावर, 'हा दुबळेपणा आहे' अशी प्रतिक्रिया देणे बंद करता येईल का? आपण स्वतःला काय समजतो कळायला मार्ग नाही. आपल्याला सगळं काही समजतं, माहिती असतं, जगातले सगळे बरेवाईट अनुभव आपण घेतलेले असतात; असं गृहित धरूनही; प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्या व्यक्तीची कडेलोटाची मर्यादा वेगळी असू शकते हे ध्यानात घ्यायला आपल्याला आणखीन किती सुशिक्षित व्हावे लागणार?

- आपण तुटूच शकत नाही हे आपण कशाच्या भरवशावर गृहित धरतो?

- सगळ्या प्रश्नांना सारखी उत्तरे नसतात. सारख्या प्रश्नांनाही सारखी उत्तरे नसतात, हे समजायला फार अवघड आहे का?

- विसरून जावं, सोडून द्यावं, सहज घ्यावं; असे निरर्थक उपदेश देण्यापेक्षा; समजून घेण्याची समाजाची एकूणच क्षमता आणि वृत्ती वाढायला हवी असा सूर का ऐकू येत नाही? मार्ग काढणे हा नंतरचा विषय असतो. पहिली गोष्ट असते एखाद्याचं दु:ख, वेदना, वंचना, अभाव, समस्या कोणापर्यंत तरी पोहोचणं. आपलं दु:ख, वेदना, वंचना, अभाव, समस्या समोरच्याला नीट समजली आहे हे समाधानच अर्धी लढाई जिंकून देतं. मात्र, त्या समाधानाऐवजी तुझं दु:ख वगैरेत काही अर्थ नाही असा शौर्यात्मक वगैरे पवित्रा समस्या अधिक जटिल करतो.

- केवळ व्यक्त होणे पुरेसे नसते, आपले व्यक्त होणे योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी पोहोचणे अन समजले जाणे महत्वाचे असते.

- भंपक आदर्शवाद, अर्धवट आशावाद, भाकड प्रयत्नवाद यापेक्षा; संतुलित यथार्थवाद समाजात, माणसांच्या मनात रुजायला हवा आहे.

- श्रीपाद कोठे

३ डिसेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा