मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

भूदान यज्ञ : समरसतेचा महाप्रयोग

आचार्य विनोबा भावे हे नाव भारतातच नव्हे तर जगभरात सुपरिचित आहे. महात्मा गांधी यांचे अनुयायीत्व स्वीकारून त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. मुळातच विनोबाजी आध्यात्मिक वृत्तीचे. त्यामुळे लहान वयातच त्यांनी घर सोडले आणि आध्यात्मिक साधनेसाठी भटकंती सुरू केली. नंतर महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. जीवनाचा प्रवाह बदलला तरीही आंतरिक आध्यात्मिक धारणा मात्र कायम राहिली. गांधीजींच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या सत्याग्रहादी कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय सहभागी होते. अन स्वातंत्र्यानंतर राजकारणापासून दूर राहून व्रतस्थपणे समाजाच्या उन्नतीचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना, लेखनाला, वक्तृत्वाला अध्यात्माची बैठक आहे.

त्यांच्या कार्यापैकी भूदान हा सर्वाधिक चर्चित कार्यक्रम होता. संपूर्ण देशभर त्यांनी यासाठी पायी भटकंती केली होती. याच कार्यक्रमानिमित्त विचारविनिमय करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावले तेव्हा विनोबा वर्धेहून दिल्लीलादेखील पायीच गेले होते. आपल्या पायी प्रवासाबद्दल बोलताना एकदा त्यांनी फार मार्मिक विवेचन केले होते. ते म्हणाले, 'पूर्वी स्वयंचलित वाहने नव्हती तरीही; बैलगाडी, घोडागाडी, घोडे, हत्ती, उंट यांचा प्रवासासाठी उपयोग होतच असे. घोड्यांचा उपयोग करून कमी वेळात मोठे अंतर कापता येत होतेच. परंतु महात्मा गौतम बुद्ध, आद्य शंकराचार्य आदींनी पायीच प्रवास केला. कारण कमी वेगाच्या या प्रवासात समाज पाहता येतो, समजून घेता येतो.' त्यांच्या पायी प्रवासाच्या आग्रहामागे ही विशाल दृष्टी होती.

विनोबांनी भूदान यज्ञाद्वारे आर्थिक, सामाजिक, भाषिक, क्षेत्रीय, जातीय दुरावा आणि दरी कमी करण्याचा आणि सांधण्याचा प्रयोग केला. एक प्रकारे तो समरसतेचा महाप्रयोगच होता. एका ठिकाणी ते म्हणतात, 'भूदानासाठी पदयात्रा सुरू आहे. त्याचा एकमेव उद्देश हृदये जोडणे हा आहे.'

स्वातंत्र्यानंतर त्यावेळच्या हैद्राबाद राज्यात कम्युनिस्टांनी हैदोस घातला होता. हिंसेचा वापर करून गरिबांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा दावा होता. ही समस्या सोडवण्यासाठी विनोबा हैदराबादेत गेले होते. तिथे फिरत असताना त्यांच्या मनात हा विचार आला. तेलंगणात फिरत असताना हरिजन लोकांनी त्यांच्याकडे जमिनीची मागणी केली आणि विनोबा गावकऱ्यांशी बोलले. गावकऱ्यांनी त्यांची मागणी मान्य करून त्यांना भूमी दिली. ही घटना २८ एप्रिल १९५१ रोजीची. त्यावरून विनोबांना ही कल्पना सुचली. त्यांनी हा प्रयोग सुरू ठेवला आणि दोन महिन्यात त्यांना बारा हजार एकर जमीन दान मिळाली. त्यानंतर उत्तर प्रदेशात एक लाख एकर जमीन विनोबांना मिळाली. राज्याचा हस्तक्षेप आणि कायदा यांच्याशिवाय अहिंसक मार्गाने जमिनीचा प्रश्न सोडवता येतो हे आश्चर्य जगाने त्यावेळी पाहिलं. देशभरातच भूमीहीनांचा प्रश्न जटील होता. सरकारसमोर देखील ही मोठी समस्या होती. विनोबांच्या या भूदान प्रयोगाने सरकारचेही लक्ष वेधून घेतले आणि त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना विचारविनिमय करण्यासाठी दिल्लीला बोलावले. त्यातून फार काही साध्य मात्र झाले नाही. कारण विनोबांना सरकारी दाव्याला न बांधलेला सर्वोदयी समाज निर्माण करायचा होता. त्यानंतर भूदान यात्रेत, सर्वोदयी संमेलनात आणि अन्यत्रही विनोबांनी भूदान यज्ञाच्या तात्त्विक आणि व्यावहारिक अंगांचे भरपूर विवेचन केले.

२९ सप्टेंबर १९५१ रोजी वारंगल येथील भाषणात विनोबा म्हणाले, 'दरिद्र नारायणाला परिवाराचा भाग समजून जमीन द्यावी. यासाठी विचारक्रांती हवी. लढायांनी जी क्रांती झाली नाही ती बुद्ध, येशू आणि रामानुज यांनी घडवली. यातील एकेकाने जे काम केले ते अनेक राजे मिळून सुद्धा करू शकले नाहीत.' याच भाषणात उत्तर भारत आणि दक्षिण भारत संघर्ष किंवा आर्य आणि द्रविड संघर्ष यांचे समाधान करताना ते म्हणाले, 'सुरुवातीला उत्तरेत पहाडी संस्कृती आणि दक्षिणेत समुद्री संस्कृती होती. दंडकारण्यामुळे आर्य व द्रविड यांचा संबंध आला नाही. नंतर दोहोंचा संबंध आला आणि त्यातून आजचा भारत उभा झाला.' आर्य बाहेरून आल्याचे किंवा द्रविड बाहेरून आल्याचे; आर्य आणि द्रविड परस्परांचे शत्रू असल्याचे; कोणा एकाच्या प्राचीनत्वाचे; आपसातल्या संघर्षाचे; असे सगळे वाद निकालात काढून; आर्य व द्रविड दोघेही याच भारताचे सुपुत्र आहेत आणि त्यावेळच्या परिस्थितीमुळे ते उशिरा एकत्र आलेत; असा निर्वाळा ते देतात.

नंतरच्या एका सर्वोदयी संमेलनात त्यांनी भूदान विचाराचा आणखीन विस्तार केला. दान शब्दाने अस्वस्थ होण्याचे कारण नाही असे स्पष्ट करून 'दान म्हणजे सम्यक विभागणी' या शंकराचार्यांच्या व्याख्येची ते आठवण करून देतात. त्यामुळेच जमीन घेणाऱ्याला ओशाळे वाटण्याचे कारण नाही. कारण तो फुकट खाणार नसून जमिनीवर मेहनत करून खाणार आहे, अशी भूमिका विनोबा मांडतात. भूमीदान घेण्याबद्दल तीन सूत्र सांगताना ते म्हणतात, 'आमची भूमिका समजून जमीन दिली तर आनंद होईल, आमची भूमिका समजून घेऊनही जमीन दिली नाही तर राग येणार नाही, आमची भूमिका समजून न घेता दबावाखाली जमीन दिली तर दु:ख होईल.' श्रीमंत आणि गरीब शेतकरी, सगळ्या जातीधर्माचे लोक, हरिजन बांधव, महिला; सगळ्यांनी दरिद्र नारायणाला आपल्या कुटुंबाचा घटक मानून जमीन दिली आहे, असेही ते त्या संमेलनात बोलताना म्हणाले होते. देशातील जमिनीची समस्या सोडवण्यासाठी पाच कोटी एकर जमीनीची गरज असली तरीही पहिला टप्पा म्हणून २५ लाख एकर जमीन मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

२ ऑक्टोबर १९५१ रोजी सागर येथे सर्वोदय संमेलनात केलेल्या भाषणात, भूदान हे गरीब आणि श्रीमंत दोघांच्याही भक्तीचे काम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.

भूदान यज्ञाच्या संदर्भात विनोबांनी समरसता असा शब्द वापरला नसला तरीही त्यांची तीच भावना आणि दृष्टी होती. मथुरेच्या सर्वोदय संमेलनात १ नोव्हेंबर १९५१ रोजी त्यांनी दिलेले भाषण या अंगाने फार नेमके आणि महत्त्वाचे आहे. या भाषणात ते म्हणतात, 'लोक मला विचारतात की, आपल्या या अभियानात आपण हरिजन सेवेचे काम का करत नाही? हे म्हणजे वाहणाऱ्या गंगेला विनंती करण्यासारखे आहे की, जाताजाता तू झाडांना पाणी देऊन जा. गंगा हे काम करणारच आहे. तिला सांगण्याची काय गरज? तसेच मला मिळणारी जमीन मोठ्या प्रमाणावर हरिजनांमध्येच वाटली जाणार आहे. माझी इच्छा आहे की भंगी लोकांनी शेती करावी. त्यांना जमीन देण्याची माझी इच्छा आहे. आज जे काम ते करतात, ते काम माणसांनी करण्यासारखे नाही. आमच्या समाजात उच्चनीच भावना निर्माण झाली. काही लोक स्वतःला उच्च समजू लागले आणि त्यांनी स्वतःला शरीर श्रमापासून दूर करून घेतले. ज्यांना शरीर श्रम करावे लागतात ते सगळे निम्न समजले जाऊ लागले. चामड्याचे काम करणारा हरिजन. तो निम्न जातीचा. त्याच्यापेक्षा उच्च शेतकरी. कारण तो जमिनीवर काम करतो. हरिजनांपेक्षा भंगी निम्न कारण ते सफाईचं काम करतात. अशा अनेक श्रेणी झाल्या. परिश्रम न करणारे उच्च समजले जाऊ लागले. श्रमाची प्रतिष्ठा राहिली नाही. देशासाठी परिश्रम करणाऱ्यांना निम्न समजलं तर देश अवनतीला जातो. रोमन इतिहासात असं झालं आणि भारतातही असंच झालं. जोवर आर्थिक व सामाजिक जीवन एकरस होणार नाही तोवर समाज शक्तिशाली होणार नाही. प्रत्येक कामाचे आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक मूल्य सारखे असायला हवे. भूमीदानासाठी मी एवढे परिश्रम का करतो आहे? कारण समाजात जो मोठ्या प्रमाणात उच्चनीच भाव आहे तो संपावा आणि सगळ्यांना शारीरिक श्रमाची संधी मिळावी.' विनोबांचे हे प्रतिपादन अतिशय बोलके आहे.

१९५१ च्या नोव्हेंबर महिन्यात विनोबा दिल्ली आणि आसपासच्या परिसरात होते. त्या काळात केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी, 'सगळी जमीन ईश्वराची आहे. त्यामुळेच गावची जमीन सगळ्यांची असायला हवी. कोणाजवळ जमीन आहे आणि कोणाजवळ नाही हे अन्यायकारक आहे' असा विषय मांडला. 'मला भिक्षा म्हणून जमीन नको. त्यामुळे आर्थिक रचना बदलणार नाही. आर्थिक रचना बदलण्यासाठी आंतरिक परिवर्तन हवे. सद्भावना पसरत जाते. हृदय परिवर्तन, जीवन परिवर्तन, समाजरचना परिवर्तन ही माझी पद्धत आहे. कम्युनिस्टांची सुरुवात कत्तलीने होते आणि समाप्ती कायद्याने होते. माझी सुरुवात करुणेने होते आणि समाप्ती कायद्याने होते. मी गरिबांचा एजंट आहे. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत सगळ्यांचे हृदय परिवर्तन हवे'; असे त्यांनी या काळात सतत प्रतिपादन केले.

सर्वसेवा संघाचे सहमंत्री वल्लभ स्वामी यांना लिहिलेल्या पत्रात विनोबा लिहितात, 'माझं आंदोलन कायद्यासाठी नसून नैतिक आंदोलन आहे. अहिंसक समाज रचनेत कायद्याचे स्वरूप ग्रंथाच्या शेवटी लिहिल्या जाणाऱ्या 'समाप्त' शब्दासारखे असायला हवे.' आपल्या कामात फक्त गांधी निधीचे कार्यकर्ते असावेत असं नाही; तर त्यात आपल्या विचारांशी सहमत असलेले काँग्रेस, प्रजा समाजवादी पार्टी, समाजवादी, कम्युनिस्ट सगळे असू शकतात; अशी स्पष्ट भूमिका विनोबांनी मांडली होती. आपल्याला सर्वोदयवाले असा वेगळा गट नको. आपण सगळ्यांमध्ये इतकं मिसळून जायला हवं की, आपण फक्त मानव राहायला हवं, असेही उद्गार १६ मे १९५३ रोजी बोलताना त्यांनी काढले होते.

भूदान समित्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सूचना केली होती की; ज्या प्रांतात हिंदी भाषा व देवनागरी लिपी चालते तिथे त्या पद्धतीने आणि जिथे नाही चालत तिथे एका बाजूला हिंदी भाषा व लिपी आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणची भाषा व लिपी; अशी दानपत्रे असावी. समाजाच्या सामरस्याची सूक्ष्म काळजी विनोबा घेत होते हेच या सूचनेतून दिसून येते.

भूदान यज्ञाच्या काळात विनोबांना अनेक प्रश्न विचारण्यात येत. त्यांना उत्तर देताना ते आपली भूमिका स्पष्ट करीत असत. एकदा त्यांना विचारण्यात आले - 'वर्णव्यवस्था आपण ठीक मानता का?' त्याच्या उत्तरात ते म्हणाले, 'वर्णव्यवस्था अतित्वातच नाही. सगळ्या व्यवसायांना समान मजुरी हे वर्णव्यवस्थेचं सार आहे. आज तसे होत नाही. याचा अर्थ एका वर्णाच्या व्यक्तीने दुसरे काम करूच नये असे नाही. त्याचा अर्थ एवढाच की, परंपरेने चालत आलेले काम केल्यास व्यक्ती लवकर स्वावलंबी होऊ शकते.'

आणखीन एकदा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, भूदानासाठी हरिजन संघटन तयार करणार का? त्यावर ते म्हणाले, 'अशा संघटनेवर आमचा फारसा विश्वास नाही. मानवता वाढायला हवी. भूदान आंदोलन सगळ्या समाजासाठी आहे. ते अमुक एका वर्गासाठी नाही. समाजात जे माघारले आहेत त्यांना उचलून घेणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.'

आज भंगी लोकांची स्थिती फारच खराब आहे. त्यांच्यासाठी आपण काय विचार केला आहे? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, 'एका भंगी व्यक्तीने आम्हाला जमीन मागितली होती. आम्ही म्हटले, तुला शेती येत असेल तर जमीन नक्की देऊ. त्यामुळे तुझा सध्याचा व्यवसाय सुटेल. भंगी मुलांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना शेती करण्याचे शिक्षण देऊ शकतो आणि त्यानंतर जमीन देऊ शकतो. मात्र शेती करता येत नसेल तर जमीन देऊन उपयोग नाही. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे.'

सर्वोदय समाजात हरिजनांचे स्थान काय असेल? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विनोबा म्हणाले, 'सर्वोदय समाज समुद्र आहे. त्यात एकही नदी नाही. समुद्र होण्याआधी नदीनाल्यांचं अस्तित्व असतं. त्यानंतर वेगळं अस्तित्वच नसतं. हरिजन इत्यादी भेद संपतील तेव्हाच सर्वोदय समाज अस्तित्वात येईल. सर्वोदय समाज निर्माण होण्यासाठी सगळे भेद सोडावे लागतील.'

विनोबांची ही निवडक प्रश्नोत्तरे पाहिली तरी लक्षात येतं की, समाजातील कोणत्याही वर्गाबद्दल त्यांना आकस नव्हता. सगळ्यांना सन्मानाचे सुखी जीवन जगता यावे हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी सगळ्या जातीवर्गाच्या माणसांच्या मनाची मशागत करणे हा त्यांचा मार्ग होता. कायद्यावर त्यांचा फारसा भर नव्हता आणि हिंसाचाराला तर त्यांच्या विचारात स्थानच नव्हते.

गरीब-श्रीमंत भेद, भाषा वा प्रांत भेद, जातीभेद यांचा विचार तर त्यांच्या चिंतनात होताच; पण दूर जंगलात राहणारा आदिवासी समाजही त्यांच्या आत्मीयतेतून सुटला नव्हता. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील भिल्ल वस्तीत विनोबा गेले होते. त्यावर आधारित 'आदिवासीयोसे' नावाचे छोटेसे पुस्तक आहे. या भिल्ल लोकांशी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही येथे पुण्य कमावण्यासाठी नाही तर पाप धुण्यासाठी आलो आहोत. आजपर्यंत आम्ही लोकांनी भिल्लांची सेवा केली नाही. देशातील सगळे आदिवासी यांचेच बंधू आहेत. ते जंगलात राहतात. सहनशील आहेत. देशात मोठमोठे महापुरुष झालेत पण आम्ही यांना रामायण, गीता काहीही दिले नाही. जनावरांसारखी तुमची उपेक्षा केली. आजपर्यंतचे पाप धुवायला आम्ही आलो आहोत. हरिजन आणि आदिवासींनी खूप कष्ट सहन करूनही प्रेम सांभाळून ठेवले आहे. आता तुमच्या सेवेसाठी सगळे येतील.' अतिशय भावपूर्ण आणि उत्कट अशी विनोबांची भावना होती.

कुष्ठरोग्यांच्या सेवेबद्दलही त्यांना आस्था होती. कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संमेलनही पवनारला झाले होते. विनोबांनी त्यांना मार्गदर्शनही केले होते. याच क्षेत्रात मोठं काम करणारे बाबा आमटे व शिवाजीराव पटवर्धन यांच्याशीही विनोबांचे आत्मीय संबंध होते.

सामाजिक समरसतेचा विचार करताना मनूस्मृतीची चर्चा स्वाभाविकच होते. विनोबांनी 'मनू शासनम' शीर्षकाने मनूस्मृतीचे संकलन केले आहे. त्याची त्यांनीच लिहिलेली प्रस्तावना मननीय आहे. या प्रस्तावनेत ते म्हणतात, 'मनूच्या आणि आपल्या काळात फरक पडला आहे. जुन्या काळी गीता उपयोगी पडत असे तशीच आजही पडते. कारण तिच्यावर काळाचा परिणाम झाला नाही. ती कालातीत वस्तू आहे. मनूचा ग्रंथ समाजशास्त्राचा आहे. म्हणून मनूची वाक्ये आज जशीच्या तशी चालणार नाहीत. एवढेच नव्हे तर काही विरुद्धही पडतील. म्हणून आम्हाला विवेकाने निवड करावी लागेल.' आपले स्वतःचे उदाहरणही त्यांनी दिले आहे. ते सांगतात, 'ब्रम्हचाऱ्याने जोडा व छत्री वापरू नये, असे मनूस्मृती सांगते. छत्री न वापरल्याने फरक पडला नाही. पण जोडा न वापरल्याने बडोद्याच्या कडक उन्हात डोळे बिघडले. म्हणून जोडा घालणे सुरू केले. ते वाक्य या पुस्तकात घेतलेले नाही. त्यामुळे विवेकाने निवड करावी लागते.'

याच प्रस्तावनेत पुढे विनोबा लिहितात, 'आजकाल मनूवर कैकांचा राग आहे. ते ठीकही आहे. कारण मनूस्मृतीत कैक परस्परविरोधी विचार आहेत. मी मानीत नाही की ते सर्व मनूचे आहेत. तसे पाहिले तर ती भृगु संहिता आहे. परंतु आहे मनूच्या नावावर. आणि त्यातही अनेक प्रकारचे क्षेपक निश्चितच असणार. ज्या वचनांवर राग आहे ती विषमतेची वचने काढून टाकली तरी मनूचे काही बिघडत नाही. कारण मनूला विषमता नको, व्यवस्था हवी आहे. व्यवस्थेसाठी समाजात कामाची विभागणी करावी लागते. अशी विभागणी न केली तर समाजात स्पर्धा होते आणि ज्या कार्यात पैसा जास्त मिळतो तिकडे सगळे जातात. त्याऐवजी सर्व कामांसाठी जवळपास समान मजुरी असली आणि प्रत्येकाच्या शक्ती व वृत्तीनुसार कामाची विभागणी झाली तर हरकत नाही. म्हणून मनूने जी व्यवस्था सांगितली तिला विषमता मानू नये. कारण मनूने सुद्धा शेवटी आम्हाला 'सर्वसमतेत' पोहोचवले आहे. 'मुक्ती' प्रकरणात सांगितले आहे की, जो मनुष्य भगवंताच्या जवळ पोहोचतो, महाज्ञानी होतो, ज्याला ब्रम्हाचे ज्ञान होते तो 'सर्व समतां एत्य' - सर्वांशी समता प्राप्त करतो. म्हणून जी व्यवस्था केली - जरी तीत विषमतेचा प्रवेश झाला आहे, जो व्हायला नको होता आणि त्यामुळे देशाचे नुकसानही झाले - तीत मनूचा उद्देश समतेकडे नेण्याचाच होता. विषमताकारी अंश मी काढून टाकला आहे. फक्त असाच अंश ठेवला आहे जो मनूच्या मूळ उपदेशासाठी अनिवार्य आहे. मनुस्मृती समाजशास्त्र आहे. तिचा आरंभ तत्त्वज्ञानाने होतो आणि समाप्ती मुक्तीत, ब्रम्हविद्येत होते. आदि आणि अंत दोहोतही ब्रम्हविद्येचा निर्देश आहे. समाजशास्त्रावर पश्चिमेतही पुष्कळ ग्रंथ लिहिले गेले आहेत. परंतु त्यात ब्रम्हविद्येचा उल्लेख नसतो. ते तिला आवश्यक मानीत नाहीत.' विनोबा पोथीनिष्ठ नसून प्रागतिक होते हेच या प्रस्तावानेतून दिसून येते.

भगवान बुद्ध आणि बौद्ध तत्त्वज्ञान याविषयीही विनोबांना ओढ होती. त्यांनी धम्मपदाचेही संकलन केले आहे. भूदान यज्ञाच्या प्रवासात ते लखनौला बुद्ध जयंतीच्या दिवशी पोहोचले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, 'भूदान यज्ञाच्या स्वरूपात तेच धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य करण्यात येत आहे जे गौतम बुद्धांनी केले होते.' सारनाथला बौद्ध भिक्षूंनी त्यांना धम्मपद पुस्तक भेट दिले होते. १९२३ साली वयाच्या २८ व्या वर्षी 'उपनिषदांचा अभ्यास' या लिखाणाचा समारोप त्यांनी धम्मपदाच्या एका वचनाने केला होता. तर १९४५ साली स्थितप्रज्ञ दर्शनावरील व्याख्यानांचा समारोप करताना त्यांनी वेदांत आणि बौद्ध दर्शन यांच्या अंतिम ध्येयाची एकरूपता दाखवण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्या साहित्यावरही त्यांनी लेखन केले आहे. ज्ञानेश्वर हिमालयाचे शिखर आहेत तर तुकारामाची वाणी मराठी भाषेची गंगा आहे, अशी त्यांची भावना आहे. जीवनाच्या एकरसतेचा आणि उन्नतीचा विचार करताना उच्चनीच असा विचार त्यांनी केला नाही. म्हणूनच त्यांनी 'कुराण सार'ही लिहिले. या साऱ्याचा मूलभूत विचार विनोबा करतात. ते लिहितात, 'आत्मदर्शन वा आत्मानुभूती ही महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म पंचविध असतो. आत्मदर्शन, नीती, भक्ती, कथा, कायदे ही त्याची पाच अंगे. सर्वच धर्मातील कायद्याचा भाग निरुपयोगी झाला आहे. मनुस्मृती, कुराण, बायबल सगळीकडे कायदेच कायदे आहेत. ते आता उपयोगाचे नाहीत.' विनोबांच्या या भूमिकेवर वेगळ्या भाष्याची गरज नाही.

विनोबांच्या व्यक्तिगत जीवनातही भेदांना तिलांजली देणारे, समाजातील समरसतेचा भाव जागवणारे आणि जोपासणारे पुष्कळ प्रसंग पाहायला मिळतात. विनोबांचे आजोबा शंभुराव हे शिवभक्त आणि धर्मपरायण होते. त्यांचे स्वतःच्या मालकीचे एक मंदिरही होते. शिवाशिव कडक पाळण्याच्या त्या काळात त्यांच्या मंदिरात दलितांना देवदर्शनाची मोकळीक होती. देवळाच्या वार्षिक उत्सवात गावातील भंगी, चांभार या सगळ्यांना ते भोजनाला बोलावीत. अन स्वतः त्यांना वाढत असत. देवाघरी कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही; अशीच त्यांची भावना होती. हीच भावना विनोबांमध्ये सुद्धा पाझरली होती. त्यांच्या आईचेही त्यांच्यावर असेच संस्कार होते. लहान विनूला त्या सांगत, 'अंत्यज काही नीच नसतात. देव नव्हता का विठ्या महार झाला?' आजोबा आणि आईकडून मिळालेली ही शिदोरी विनोबांना आयुष्यभर पुरली. त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक घटनांमधून या संस्काराचे पडसाद पाहायला मिळतात.

साबरमती आश्रमातील एक प्रसंग फार बोलका आहे. विनोबा साबरमती आश्रमात राहायला गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांचे भाऊ बाळकोबा हेही साबरमतीला राहायला आले. आश्रमातील संडास साफ करणारा भंगी एक दिवस तब्येत ठीक नसल्याने आला नाही. त्याचा लहान मुलगा सफाईसाठी आला. बाळकोबांना त्याची धडपड दिसली तेव्हा ते धावून गेले आणि त्यांनी सफाईचे काम केले. हे कळल्यावर विनोबा म्हणाले, 'बाळकोबा हे तू चांगले केले. उद्यापासून मीही तुझ्याबरोबर हे काम करीन.' परंतु यामुळे आश्रमात खळबळ माजली. त्यावेळी गांधीजी बाहेरगावी गेले होते. ते परतल्यावर आश्रमवासीयांनी त्यांच्याकडे तक्रार केली. गांधीजींनी सगळ्यांचे ऐकून घेतले आणि म्हणाले, 'हे काम ब्राह्मणांच्या हातून झाले याच्यापेक्षा आणखीन चांगले काय असू शकते? हे पवित्र काम आहे. आश्रमवासीयांनी हे करायलाच पाहिजे.' त्यानंतर संडास सफाई हे आश्रम जीवनाचे अंग समजले जाऊ लागले. यामुळे अनेक जण आश्रम सोडून निघून गेले ज्यात गांधीजींची बहिणही होती.

साबरमतीहून पवनारला आल्यावरही विनोबांनी सफाईचे काम सोडले नाही. 'सफाईत प्रभूदर्शन आहे' या श्रद्धेने ते रोज पवनारहून सुरगावला सफाईसाठी जात. एक दिवस ते निघाले तेव्हा नदीला पूर होता. आता काय करायचे या विचारात असतानाच त्यांना दुसऱ्या काठावर एक इसम दिसला. विनोबांनी त्याला हाक मारली अन म्हणाले, 'गावात जाऊन विठोबाच्या मंदिरात सांग की, तुमचा भंगी रोजच्याप्रमाणे आला होता. पण पुरामुळे त्याला परत जावे लागले. उद्या येऊन तो दोन्ही दिवसांची सफाई करेल.' आपण सांगितलेले त्याला समजले की नाही म्हणून त्यांनी त्याला विचारले, 'काय सांगशील?' त्यावर तो म्हणाला, 'विनोबा आले होते. पुरामुळे परत गेले.' विनोबा त्याला म्हणाले, 'अरे बाबा, असे सांग की तुमचा भंगी आला होता.'

बिहारच्या पदयात्रेत विनोबा बैद्यनाथ धाम येथे गेले होते. पुजारी परवानगी देतील तर मी दर्शनाला जाईन अन माझ्यासोबत हरिजन बंधूही येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पुजाऱ्यांनी निरोप दिला, 'ठीक आहे.' त्याप्रमाणे १९ सप्टेंबर १९५३ रोजी विनोबा सगळ्यांसह दर्शनाला गेले. पण त्यांच्यावर अनपेक्षित हल्ला झाला. पंड्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या कानाला इजा झाली. त्यांनी ती मारहाण सहन केली आणि ते दर्शन न घेता परतले.

असेच आणखीनही काही प्रसंग आहेत. ओरिसातील पदयात्रेत २१ मार्च १९५५ रोजी ते जगन्नाथ पुरीला गेले. मात्र सोबत एक फ्रेंच महिला आहे म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला. तेव्हा ते म्हणाले, 'मंदिरात हरिजनांना प्रवेश देणे पुरेसे नाही. प्रत्येक श्रद्धाळूला दर्शन घेता यायला हवे. १९५७ च्या मे महिन्यात केरळच्या गुरुवायूर मंदिरात ख्रिश्चन बांधवाला प्रवेश नाकारल्याने ते दर्शन न घेताच परतले. याच मंदिरात हरिजन प्रवेशासाठी यशस्वी सत्याग्रह झाला होता.

काही ठिकाणी याउलट चांगले अनुभवही आले. गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिरात मात्र सोबतच्या मुसलमानाला प्रवेश दिल्याने ते दर्शनाला गेले. १९५८ च्या मे महिन्यात पंढरपूरलाही त्यांना सगळ्या जातीधर्माच्या लोकांसह दर्शनाची परवानगी मिळाली. त्यावेळी त्यांनी सगळ्यांसह आनंदाने पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतले. पदयात्रेच्या काळात सार्वजनिक विहिरीच्या वापराबाबत एक चांगला अनुभवही त्यांना आला. मध्य प्रदेशातल्या दुर्ग जिल्ह्यात पदयात्रेत एक दिवस त्यांना कळले की, पुढील मुक्कामाच्या हलदी या गावात हरिजनांना सार्वजनिक विहीर वापरण्यास बंदी आहे. विनोबांनी दुसऱ्या दिवशी त्या गावी पोहोचल्यावर सांगितले की, हरिजनांना विहीर खुली झाली नाही तर आपण आणि कोणीही पदयात्री या गावात अन्न ग्रहण करणार नाही. समाधानाची गोष्ट ही की, गावकऱ्यांनी बंदी काढून घेतली. विनोबांचा दबाव कामी आला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

(पूर्वप्रकाशित : समरसता साहित्य पत्रिका, दिवाळी अंक २०२१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा