शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

विनोबांचे गांधी - ३

गांधींनी दिलेल्या सर्वोदय कल्पनेबद्दल विनोबा म्हणतात - 'सर्वोदयाचा पुरा अंमल होण्यासाठी परमेश्वर दर्शनाची जरूर आहे.' सर्वोदय हा केवळ नारा नाही, केवळ योजना अन नियोजन नाही; हे त्यांनी अधोरेखित केले आहे. आजकाल सर्वोदय म्हणून जे चालते वा सर्वोदयी किंवा सर्वोदयाचे पुरस्कर्ते म्हणून जे पाहायला मिळतात त्यांनी हा मूळ विषय समजून घ्यायला हवा.

असेच मत विनोबा सत्याग्रहाविषयी व्यक्त करतात. ते म्हणतात - 'सत्याग्रहात समोरच्या मध्ये सद् अंश आहेच अशी श्रद्धा असते.' आज नजरेस पडणारे गांधीभक्त वा सर्वोदय पुरस्कर्ते स्वतःबद्दल अशी खात्री देऊ शकतील का? बंद चौकटीत गृहितकांवर जगणारे हे लोक, विनोबांच्या विचाराने गांधींचे अनुयायी म्हणता येणार नाहीत.

गांधींची भारतावर सत्ता होती पण ती नैतिक सत्ता होती, असे विनोबा म्हणतात. भारतीय लोकांच्या हृदयावर राजे महाराजे नाहीत तर महापुरुष राज्य करत आले आहेत. या भारतीय परंपरेच्या वैशिष्ट्याचा उल्लेख करून विनोबा म्हणतात - 'गांधींचे चरित्र महापुरुषांच्या चरित्रासारखे आहे, त्यांच्या कार्याचा पाया अध्यात्म आहे; हे लोकांनी पाहिले अन त्यामुळेच त्यांनी गांधींचे ऐकले.'

विनोबांचे गांधीप्रेम बाकीच्या गांधी प्रेमींपेक्षा वेगळे आहे. ते समाजाला 'हे गांधींचे' आणि 'हे गांधींचे नाही' असे वेगळे करत नाहीत. आपल्या देशातील सेवाकार्यांबद्दल बोलताना विनोबा रामकृष्ण मिशनला अस्पृश्य समजत नाहीत. ते स्पष्ट शब्दात सांगतात - 'आपल्या देशात रामकृष्ण मिशनने प्रथमच अद्वैतप्रेरित होऊन पूर्ण प्रेममय सेवेचा आरंभ केला.' गांधीजींनी भक्तीमार्गाच्या स्वरूपात समाजसेवा सुरू केली असेही ते नोंदवतात.

गांधीजींची एकादश व्रते ही काही नवी कल्पना नाही तर जुन्या पंचमहाव्रतांचाच तो विस्तार आहे, असे विनोबांना वाटते. व्रतपालन ही कल्पना नवीन नसली तरीही समाजसेवेसाठी व्रतपालन जरूरीचे आहे ही गोष्ट बापूंनी प्रथम मांडली. देशसेवेसाठी सत्य, अहिंसा यांची गरज असल्याचे त्यापूर्वी कोणी म्हटले नव्हते, असा विनोबांचा अभिप्राय आहे. सामाजिक, राजकीय समस्यांची उकल करण्यासाठी त्यांनी आत्मशक्तीचा उपयोग करून दाखवला. व्यक्तिगत जीवनात आत्मबल यशस्वी होते हे समाजाने पाहिलेच आहे, पण सामाजिक क्षेत्रात व्यापक प्रमाणात त्या शक्तीचा वापर करता येतो हे गांधींनी दाखवले असे विनोबा म्हणतात. एखाद्या प्रयोगाची पूर्णता व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनात वेगवेगळी समजून घ्यावी लागते, याकडेही विनोबा लक्ष वेधतात.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ४ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा