कोणाला वाईट वाटेल, कोणाला पटणार नाही, कोणाला राग येईल कदाचित. पण एक गोष्ट निर्विवाद आहे की, आपण निर्माण न केलेल्या जगाचं आपल्या मनातील, आपल्या भावनांना अनुसरून काढलेलं चित्र समोर ठेवून आपण विचार करीत असतो. आपण या संपूर्ण चराचराचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यापासून वेगळे नाही हे आपण तोंडाने कितीही म्हटलं तरीही त्याची अनुभूती मात्र शून्य असते. मग आपण एकतर या बाजूला झुकतो वा त्या. कालची पाकिस्तानातील घटना वा तशा घटना चांगल्या आहेत का? मुळीच नाहीत. पण त्यांची काही कारणमीमांसा आहे की नाही? नक्कीच आहे. मग केवळ असे काही होऊ नये म्हणून इच्छाचिंतन करून किंवा प्रार्थना करून किंवा कायदा-सुव्यवस्था कुठे आहे; वगैरे भाबडे प्रयत्न वा प्रश्न करून तशा घटना बंद होतील का? मुळात अशा घटना कायमच्या बंद वगैरे होऊ शकतात का? समाज म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय? त्याच्या मर्यादा काय? रोज करोडो नवीन जीव या जगात येतात, ते येताना आपापले संचित- गुणदोष सगळे घेऊन येतात. त्यांची गुणसूत्रे कोणी तिसऱ्यानेच सेट केलेली असतात. अशा जुन्या नव्या अब्जावधी गुणसूत्रांच्या क्रियाप्रतिक्रिया घडत असतात. त्यातून ठळकपणे लक्षात येतील अशा चांगल्या वा वाईट घटना घडतात. या जगातला कोणताही तरंग एकापासून दुसरा वेगळा नाही. जशी समुद्रात निर्माण होणारी सुनामीची एक लाट, समुद्रातील असंख्य लहानमोठ्या तरंगांचा परिणाम असतो, तसेच हे आहे. एकाच वेळी हे सगळे होत असते. अन परत किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा आणि परत जाणाऱ्या लाटा हेदेखील सुरूच असते, सतत आणि एकाच वेळी. मग आपल्या हातात काय उरते? की काहीच नाही? याचे उत्तरही आहे उरते आणि उरत नाही. ही व्यामिश्रता फार विचित्र आहे. म्हणूनच पाचशे वर्षांहून जुन्या काळी मीरा म्हणून गेली होती- `करम की गती न्यारी' अन वर्तमानात आम्हीही तेच म्हणतो. मग काय हातावर हात ठेवून बसायचे, अश्रू गाळत बसायचे, बोटे मोडत बसायचे. नाही. मुळीच नाही. दुध आणि पाणी ओळखायला शिकायचे, दुध आणि पाणी वेगळे करायला शिकायचे, दुध आणि पाणी त्या-त्या वेळी त्या-त्या प्रमाणात प्यायला शिकायचे, अनावश्यक दुधाची अन अनावश्यक पाण्याची विल्हेवाट लावायला शिकायचे. योग्य-अयोग्य चा विवेक अन त्याच्याशी त्या-त्या वेळी वागण्याची दृष्टी आणि शक्ती यांची साधना करणे हे आहे आपल्या हाती. भावनांचा ओलावा, वास्तवाची जाण, विश्लेषणाची प्रखरता, अन व्यवहाराचे कुशल तारतम्य; हे सगळेच हवे.
- श्रीपाद कोठे
१७ डिसेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा