एका गृपवर हा मेसेज आला. अन्यत्र चित्रासहितपण हाच मेसेज पाहायला मिळाला. खूप खटकलं. आक्रमकता कमीअधिक असणे, आक्रमकतेबद्दल काही धोरणात्मक मत असणे, धोरणात बदल; हे सगळे समजून घेता येतेच. पण साधेपणा, सरळपणा ही वाईट गोष्ट आहे; असा जो एक subtle सूर या मेसेजमध्ये आहे; त्याचे समर्थन करता येत नाही. 'कोणीतरी असं करतात' असं म्हणून त्याकडे कानाडोळा करणं हे योग्य होणार नाही. स्वामी विवेकानंद असोत की या देशाची संत परंपरा; यांच्याविषयी सुद्धा अशाच हलक्या आणि उपहासपूर्ण पद्धतीने ज्यावेळी बरेच लोक बोलू लागतात, तेव्हा ती गंभीर बाब ठरते. राजकीय फायदातोटा एवढी एकच गोष्ट म्हणजे जीवन असतं का? आक्रमकता वेळप्रसंगी आवश्यक असतेच, पण याचा अर्थ सरलता अन शांत वृत्ती अयोग्य असते का? आक्रमकता डोक्यात का जाते? अन आक्रमकता डोक्यात जाणे योग्य ठरते का? भारत, भारतीय जीवन, हिंदू, धर्म, परंपरा इत्यादींवर जाणीवपूर्वक आघात करणाऱ्यांबाबत आक्रमक होणे, त्यात संतुलन गमावणे; योग्य नसले तरीही समजून घेता येते. पण जेव्हा आपल्याच माणसांची सात्विक वृत्ती आपल्या आक्रमकतेचे अनावश्यक लक्ष्य बनते, तेव्हा ते केवळ आक्षेपार्हच नाही तर धिक्कारार्ह म्हटले पाहिजे. आक्रमकता, संघर्ष हे आपद्धर्म असतात, अनेकदा आवश्यक असतात; पण जीवनाचा प्रधान स्वर हा सात्विकता, समंजसपणा हाच असतो, असायला हवा. आक्रमकता ही त्या त्या वेळची गरज असली तरी, नित्य संघर्षशील जगातून कणाकणाने समंजसपणाकडे जाणे, म्हणजेच मानवी सभ्यता. मनुष्यजात पूर्ण सभ्यतेला पोहोचलेली नाही हे खरे आहेच, पण समंजसपणा वाढवत जाणे हीच त्याची दिशा असू शकते. आजवरच्या मानव समाजाने तेच केलेले आहे आणि भारत हा त्या प्रयत्नांचा मुकुटमणी आहे. आज जर सभ्यतेचा तो प्रवास नाकारला जात असेल, तर तो भारताच्या कण्यावर आघात आहे यात संशय असू नये. कण्यावरचा हा आघात वाढत राहिला, त्याला अटकाव केला गेला नाही; तर भारत तर लयाला जाईलच पण मानवजात भरकटल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट अगदी खूणगाठ म्हणून लक्षात ठेवली पाहिजे की, आक्रमकता फार काही साध्य करू शकत नाही. अनेकांना त्रास होईल, अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, पण एक गोष्ट लक्षात आणून दिलीच पाहिजे की; छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्यानंतरही समस्या संपल्या नाहीत. आजच्यापेक्षा अधिक असलेला दहशतवाद शिवरायांनी मोडून काढला पण तो पुन्हा उफाळून आलाच. संताजी धनाजी घोड्यांना पाण्यात दिसत, पण ते सारेच लयाला गेले. महाभारत युद्धाने सुद्धा मानवजात किती पुढे गेली? शिवराय चुकीचे नव्हतेच. महाभारत युद्धदेखील चूक नव्हतेच. पण शौर्याने बहाल केलेल्या परिस्थितीत कणाकणाने समंजसपणा वाढवायचा असतो. त्याला पर्याय नसतो अन तोच उपाय असतो. भारताने हे भान आजवर जोपासले आणि जगाला देण्यासारख्या ज्या गोष्टी भारताकडे आहेत त्यात हे भान महत्वाचे आहे. आज जर आम्ही हे भान चुकीचे ठरवत असू तर ते दुर्दैवीच ठरेल. आक्रमकता डोक्यात गेलेले लोक हा समाजाचा मुख्य प्रवाह नसेलही कदाचित, पण त्याला मौन संमती देण्याने तो मुख्य प्रवाह होण्याच्या दिशेने जाईल, हे सगळ्याच सुजाण लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.
- श्रीपाद कोठे
शनिवार, २६ डिसेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा