बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

नाही चिरा, नाही पणती...

डॉ. घनश्यामल प्रसाद राव यांचे आज पहाटे विशाखापट्टणम येथे वृद्धापकाळाने निधन झाले. कोण होते ते? अन मी ही बातमी सगळ्यांना का सांगतो आहे? स्व. राव संस्कार भारती या अखिल भारतीय संघटनेचे पूर्व उपाध्यक्ष होते आणि आज देशभरात संस्कार भारतीचे लाखो कार्यकर्ते जे `संस्कार भारती' गीत प्रत्येक कार्यक्रमात गाऊन लाखो, करोडो लोकांना आनंद देतात, डोलायला लावतात; त्या गीताचे ते रचयिता आहेत. त्यांची बातमी कुठे येणार नाही, त्यांनी रचलेले गीत संस्कार भारती व्यतिरिक्त कुठे ऐकायला मिळणार नाही. पण यामुळे त्या गीताचे आणि त्याची रचना करणाऱ्यांचे महत्व मुळीच कमी होत नाही. लहानमोठा पुढारी किंवा लहानमोठा पुरस्कार मिळवणारे लोक किंवा टीव्हीच्या टुकार मालिकेत टुकार काम करणारी व्यक्ती यांना प्रसिद्धी मिळते, त्यांच्या निधनाच्या बातम्या येतात; पण म्हणून ते महान असतातच असेही नाही. लोकप्रियता किंवा प्रसिद्धी यांचा महानतेशी मेळ घालण्याचा चाळा माणसाच्या मनाला असतो. परंतु तो चाळा बाजूला ठेवून पाहिले तर स्व. राव यांचे महत्व आणि योगदान कळण्यास कठीण नाही. गंमत म्हणजे संस्कार भारतीचे हे गीत गाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या असंख्य लोकांनाही हे ठाऊक नाही की हे गीत घनश्यामलजी यांनी रचले आहे. रा. स्व. संघाने जपलेल्या आणि जोपासलेल्या आत्मविलोपीत्वाचा हा नमुना आहे.

त्यांची एक आठवण सांगण्याचा मोह होतो. माझी लहान बहिण काही काळ विशाखापट्टणम येथे होती. त्यांच्या घराजवळ संघाची शाखा लागत असे. स्व. घनश्यामलजी त्या शाखेत जात असत. त्यांचा बहिणीशी संपर्क आला. असा संपर्क कसा येतो आणि संघाचे लोक एकमेकांशी कसे जोडले जातात हे संघाच्या लोकांना सांगण्याची गरज नाही आणि अन्य लोकांना ते अनुभवल्याशिवाय समजणार नाही. तर संपर्क झाल्याने त्यांचे जाणेयेणे सुरु झाले. त्यावेळी बहिणीची मुलगी तान्ही होती. तिच्याशी चार घटका खेळणे हाही एक भाग. मी संस्कार भारतीचे काम करीत असे तेही बहिणीकडून त्यांना कळले. त्यामुळे त्यांच्या स्नेहाची साखर चमचाभर अधिकच पडत असे. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतेच. फोनही कमीच. त्यामुळे बहीण आली तेव्हा हे समजले. मी तिला म्हटले- `अगं संस्कार भारतीचं सुमधुर गीत त्यांनीच रचलं आहे.' तिला आश्चर्यच वाटलं. तिला काहीही माहिती नव्हतं. त्यांनी कधीही आपल्या तोंडाने सांगितलं नाही की हे गीत त्यांनी रचलं आहे. ते अखिल भारतीय उपाध्यक्ष आहेत हे देखील त्यांनी सांगितले नव्हते.

खूप काही करायचं पण तोंडातून त्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही. कुठून येतो हा गुण? कुठून येतं हे आत्मविलोपीत्व? मला वाटतं ही देवाघरची माणसं असतात. सैनिकाचा पोशाख न घालता मानवी जीवनातील शत्रूंना परास्त करीत, समोर येईल त्याला कुठला ना कुठला आधार देत जगणारे हे सैनिकच असतात. अष्टावधानी, संस्कृत पंडित, सात्विकतेची मूर्ती अशा डॉ. घनश्यामल प्रसाद राव यांना विनम्र भावांजली.

- श्रीपाद कोठे

३० डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा