शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

सहिष्णुता अन रा. स्व. संघ - २

महात्मा गांधींच्या हत्येनंतर लादलेल्या पहिल्या बंदीनंतर देखील रा. स्व. संघाच्या सहिष्णूतेची परीक्षा होतच राहिली. सरकारनेच संघावरील आरोप मागे घेऊनही तेच आरोप उगाळणे सुरूच राहिले. क्षुद्र राजकारणासाठी असत्य उगाळत राहून समाजात तट निर्माण करण्याचे उद्योग सुरु झाले. प्रसार माध्यमांनी त्यात भर घातली. परिणामी मोठ्या सामाजिक असहिष्णुतेचा सामना संघाला करावा लागला. विविध जातीपंथांनी, व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनी, सरकारने संघाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे, तुच्छ लेखण्याचे, हेटाळणी करण्याचे, बदनामी करण्याचे, गैरसमज पसरवण्याचे उद्योग सुरूच ठेवले. संघाने मात्र याबद्दल तक्रारीचा, निषेधाचा सूर कधीही काढला नाही. कधी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. धीम्या गतीने, पण निश्चितपणे संघ आपले काम करीत राहिला. जातायेताना स्वयंसेवकांना त्रास देणे, शिवीगाळ करणे, संघस्थान खराब करून ठेवणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार तर असंख्य म्हणता येतील. स्वयंसेवकांनी आपापल्या स्तरावर त्याचा धैर्याने सामना केला. अनेकदा स्वयंसेवकांचा संयम संपलाही. अशा वेळी संतप्त प्रतिक्रिया उमटत. पण संघाने आपली भूमिका कायम ठेवली. हा आपला समाज आहे. त्याचे शिव्याशाप सहन करायचे पण त्याच्याचसाठी काम करत राहायचे. खुद्द स्वयंसेवक सुद्धा कधीकधी या भूमिकेमुळे संघापासून दुरावले. मात्र संघाची सहिष्णूता कायम राहिली.

महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यासारखी नावे आधी प्रात:स्मरण व नंतर एकात्मता स्तोत्रात समाविष्ट करतानाही, स्वयंसेवकांनी सोसलेल्या असहिष्णुतेची प्रतिक्रिया उमटली. नाही असे नाही. पण संघाने त्यांचीही समजूत काढली. आपण समाज जोडायला निघालो आहोत, समाज तोडायला नाही; ही भूमिका अन भावना कायम राहिली. प्रसार माध्यमांनी कधी खोटे, कधी विपर्यस्त, तर कधी गैरसमज पसरवणारे वृत्त वा विश्लेषण प्रसिद्ध केले तरीही संघाने त्यांना जाब विचारला नाही किंवा त्यांच्यावर बहिष्कार घातला नाही. शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना संघाच्या कामात सहभागी होण्यास बंदी घातली, तरीही संघाने सहिष्णूता सोडली नाही.

केरळ, पश्चिम बंगाल या प्रांतात तर स्वयंसेवक व कार्यकर्त्यांवर प्रत्यक्ष हिंसक हल्ले झाले. अनेक जण त्यात मारल्या गेले. त्रिपुरातून संघाच्या तीन प्रचारकांचे अपहरण झाले. त्यांचे पुढे काय झाले ते कोणालाही माहीत नाही. संघाने निषेध नोंदवला, तक्रार वगैरे केली, निवेदने दिली. परंतु व्यक्ती वा गटांविरुद्ध भूमिका घेतली नाही, भावना बाळगल्या नाहीत. पंजाबात हिंदू (सहजधारी) विरुद्ध शीख (केशधारी) असा संघर्ष उत्पन्न करण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. दहशतवाद तर टोकाचा होता. संघाने समन्वयाची भूमिका घेतली. त्याचे परिणाम संघाला भोगावे लागले. संघावर प्रहार झाले. पण तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी खणखणीत भूमिका घेतली- no retaliation. प्रत्याघात नाही.

स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात पुकारलेली आणीबाणी हा तर जगजाहीर काळा अध्याय आहे. त्यावेळी अनेकांसोबत, पण अनेकांपेक्षा खूप अधिक असहिष्णूता संघाने झेलली. सरसंघचालकांसह हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, अधिकारी तब्बल दीड वर्ष कारागृहात होते. काहींना तर आपले जीवही गमवावे लागले. अट्टल गुन्हेगार कैद्यांना देखील, कौटुंबिक सुख-दु:खाच्या प्रसंगी मिळणारी पेरोल सुविधा अनेकांना नाकारण्यात आली. तरीही आणीबाणी उठल्यावर सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ठाम भूमिका मांडली- forget and forgive. विसरा व क्षमा करा. सहिष्णुता यापेक्षा वेगळी काय असू शकते?

संघाची `हिंदू राष्ट्र' भूमिका तर त्याच्या स्थापनेपासून आजवर प्रचंड टीकेचा विषय राहिली आहे. त्यावरून त्याला किती अन काय काय ऐकावे अन सहन करावे लागले, संघाचे संघालाच ठाऊक. काहीही कर्तृत्व, ज्ञान, अनुभव, आवाका, चिंतन नसलेले; ज्यांच्या पाठीशी कदाचित घरचे सदस्य सुद्धा उभे राहणार नाहीत; असे पत्रकार-संपादक वगैरे जेव्हा या विषयावरून संघाला वाट्टेल तसे बोलतात, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात; तेव्हा असहिष्णुतेच्या त्या बीभत्स प्रकाराला सुद्धा संघ शांतपणे सहन करतो. सहिष्णुतेचे यापेक्षा अधिक मोठे उदाहरण कदाचित शोधूनही सापडणार नाही.

पाच-दहा माणसांच्या पुंजीवर सुरु झालेला संघ, काहीही साधने हाताशी नसणारा संघ, समाजाचा मोठा भाग विरोधात आणि गैरसमज बाळगणारा; अशा परिस्थितीत आज एक मोठी शक्ती झाला आहे, हे असहिष्णू वृत्तीने होऊ शकते किंवा सहिष्णुतेच्या अभावी होऊ शकते; असे ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल तसे म्हणावे. जग वाटण्या न वाटण्याने चालत नसते याची मात्र खात्री बाळगावी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १८ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा