शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

सरकारी खर्च

अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं की, आगामी पाच वर्षात पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी १०० लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतील. चांगली गोष्ट आहे. स्वागतार्ह आहे. पण मोठमोठ्या आकड्यांचे खेळ करण्याची, मोठ्या आकड्यांना भुलण्याची, मोठ्या आकड्यांनी आनंदित होण्याची किंवा मोठ्या आकड्यांनी समाधान मानण्याची जुनी परंपरा शासन आणि समाज पुढे चालवणार नाही, हेही पाहायला हवे. विद्यमान सरकार १०० लाख कोटी रुपये खर्च करणार नाहीच असे नाही, पण त्यासोबत अन्य गोष्टींचा विचारही केला जायला हवा. एक तर एवढा निधी कुठून कसा आणणार? सरकारने कामे करायची म्हणजे जनतेला वेठीला धरायचे, हे समीकरण योग्य नाही. ते बदलायला हवे. ते कसे बदलता येईल आणि बदलू शकते, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

दुसराही एक विषय आहे. तो अधिक महत्वाचा आहे. काल अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा वाचल्यानंतर 'गुराखी पॅटर्न' हा मराठी चित्रपट आठवला. तरुणांच्या गुन्हेगारी वृत्तीवरचा हा चित्रपट आहे. त्यात एक संवाद आहे. सरकारी कामासाठी शेतजमीन विकणाऱ्या एका शेतकरी पुत्राच्या तोंडी. तो म्हणतो - 'पैसा दिला तेव्हा त्याचा उपयोग करण्याची बुद्धीही द्यायला हवी होती.' ती नसल्याने गुन्हेगारीचे दुष्टचक्र कसे तयार होते हा विषय होता. दुसरा एक जुना मराठी चित्रपट आठवला - 'अशी ही बनवाबनवी'. त्यात गावातून रोजगाराच्या शोधात शहरात येणाऱ्या तरुणांची गंमत आहे. त्या गमतीसाठीच तो चित्रपट लक्षात राहतो पण तरुणांनी गाव सोडून येणे लक्षात राहत नाही. ही दोन उदाहरणे फक्त वानगी म्हणून. पण १०० लाख कोटी रुपये खर्च करताना या आणि अन्यही अनेक पैलूंचा एकत्रित, समन्वित सखोल विचार करायला हवा. तसे न करता वरवर काही केले वा करत राहिले तर त्यातून फार काही साध्य होणार नाही आणि अन्य अनेक समस्या जन्माला येतील. केवळ पैसा खर्च करणे किंवा पायाभूत सुविधा उभारणे यावर समाधान आणि आनंद मानणे चुकीचे ठरेल.

- श्रीपाद कोठे

१ जानेवारी २०२०

सहस्रकाच्या प्रारंभी

३१ डिसेंबर २००० - एका सहस्रकाचा अखेरचा दिवस. १ जानेवारी २००१ - एका सहस्रकाचा पहिला दिवस. हे दोन्ही दिवस कन्याकुमारीला घालवावेत म्हणून खूप पूर्वतयारी केली होती. ठरल्याप्रमाणे ३० डिसेंबर २००० ला कन्याकुमारीला पोहोचलो. परंतु मी पाठवलेला धनाकर्ष व पत्र व्यवस्थापकांना मिळालेच नव्हते. कालबंधनात अडकलेला, आपला कालसापेक्ष आनंद, त्या कालातीत श्रीचरणांशी बसून लुटता यावा; या आंतरिक इच्छेला व्यवहाराची अशी ठोकर बसली. पण कन्याकुमारी सोडताना एक जाणवलं की, जे झालं ते योग्यच झालं.

निवासाचं आरक्षण झालं नव्हतं. गर्दीही भरपूर होती. हो-ना करता करता व्यवस्थापकांनी तीन जण राहू शकतील अशा खोलीत माझी व्यवस्था केली. खोलीत तीन बिछाने व तीन कपाटे. प्रत्येकाची स्वतंत्र, वेगळी. खोलीत गेलो तर ती रिकामी होती. सायंकाळी समुद्रावर फिरायला गेलो. त्यावेळी `तो' कोणासोबत तरी फिरताना दिसला. त्याचं नावगाव ठाऊक नव्हतं, पण लक्ष वेधून घ्यावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. सहा फुटापेक्षा काकणभर अधिकच उंची. डोक्यावर विरळ तांबूस केस. विदेशी लालगोरा रंग. जीन्स व टी शर्ट घातलेला. आणि समोरून जाणाऱ्या येणाऱ्याकडे पाहून स्वागताचं स्मित करणारा !!! त्या सायंकाळची त्याची मूर्ती लक्षात राहिली.

भरपूर भटकून, जेवून वगैरे रात्री उशिराच खोलीवर गेलो. बाजूच्या दोन्ही बिछान्यांवर कोणीतरी ढाराढूर झोपी गेले होते. सकाळी उठलो तेव्हा दोन्ही बिछान्यांवर कोणीही नव्हते. लगबग करीत सूर्योदय पाहायला समुद्रावर गेलो. सूर्योदयाचा आनंद घेऊन परतू लागलो तेव्हा तो पुन्हा दिसला. तेच स्वागतशील हास्य ओठांवर खेळत होते. आज मात्र तो एकटाच होता. खोलीवर परतलो. आंघोळ वगैरे आटोपली आणि श्रीपादशिलेवर गेलो. दुपारी जगदंबा कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. जेवलो, गावात भटकलो. संध्याकाळी खोलीवर परतलो तर धक्काच बसला. कालपासून दोनदा भेटलेला तो विदेशी पाहुणा माझ्याच खोलीत राहायला असल्याचे दिसले. तो थोडासा हसला व लगेच बाहेर पडला. त्याच्याशी ओळख करून घेण्याचे राहूनच गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चांगला योग आला. कन्याकुमारीला विवेकानंद केंद्राच्या परिसरात सकाळी, आजूबाजूच्या गावातील बाया दही, दुध, ताक विकायला येतात. हा पाहुणा बाहेरच्या पडवीत एका दहीवालीशी बोलत होता. ग्रामीण तामिळ भाषेपलीकडे झेप नसलेली ती माउली व त्या भाषेचा गंधही नसलेला हा पाहुणा यांचा संवाद व व्यवहार पाहण्यासारखाच होता. त्याने दही घेतले होते. मीही त्याच्याजवळ गेलो. मी ताक घेतले. तो हसला. अन दही ताक प्राशनासोबतच आम्हा दोघातील संवादाची सुरुवात झाली. दीड दिवसापासून मनात रेंगाळणाऱ्या या पाहुण्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मूर्त रूप घेऊ लागली. हा पाहुणा केवळ विदेशी आहे एवढेच त्याचे वेगळेपण नाही, हे एव्हाना लक्षात आले होतेच. तो इतर विदेशी पाहुण्यांसारखाही नव्हता. तो निवांत होता. इथल्या छोट्यामोठ्या गोष्टींशी समरस व्हायचा त्याचा प्रयत्न होता. त्याला सारं जाणून घ्यायचं होतं. oh, marvelous, wonderful अशा शेलक्या प्रतिक्रियांपुरता तो मर्यादित नव्हता. त्याला इथली माणसं, इथलं वातावरण, इथलं जीवन, तऱ्हा, रीती यांच्यातला अशरीरी आनंद त्याच पद्धतीने अनुभवायचा होता.

`तो' एक जर्मन नाट्य दिग्दर्शक होता. २-३ दिवसांपासून कन्याकुमारीत राहत होता. अन आणखीन २-३ दिवस राहणार होता. कन्याकुमारी पाहणं तर एका दिवसात होतं. त्याला ती अनुभवायची होती. आदल्या, म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्री, तेथे फिरायला आलेले पर्यटक गाणीबजावणी करीत होते तेव्हा, हा मात्र गाढ झोपला होता. त्याला त्याबद्दल छेडले तेव्हा मंदमंद हसत तो एवढंच म्हणाला- `मला हे आवडत नाही.' नंतरचे दोन दिवस आम्ही एकत्र खूप हिंडलो, गप्पा मारल्या. त्यातून एक वेगळा माणूस मला भेटला.

संध्याकाळी दोघेही फिरायला एकत्रच बाहेर पडलो. अचानक पावसाची एक सर आली. विवेकानंदपूरमच्या आवारात विवेकानंद केंद्राची माहिती देणारी एक प्रदर्शनी आहे. तेथे आडोशाला गेलो. मग दोघांनी मिळून ती प्रदर्शनी पाहिली. गप्पाही सुरूच होत्या. त्यातून कळलं की, त्याने वयाच्या १७ व्या- १८ व्या वर्षीच रामकृष्ण- विवेकानंद वाचले होते. त्याच्यावर खूप खोलवर परिणाम करून गेलेला श्रीरामकृष्णांच्या जीवनातील एक प्रसंग त्याने सांगितला. तो प्रसंग असा-

`श्रीरामकृष्णांना भेटायला, शंकासमाधान करून घ्यायला, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला, त्यांच्याशी चर्चा करायला कोलकाता शहरातील खूप लोक रोज येत असत. एक दिवस एक प्राध्यापक महाशय आले आणि त्यांनी श्रीरामकृष्णांना खूप प्रश्न विचारले. परमेश्वर, त्याचं अस्तित्व वगैरेबद्दल ते प्रश्न होते. प्रश्न ऐकता ऐकताच श्रीरामकृष्णांची भावसमाधी लागली. ते आनंदाने नाचूगाऊ लागले. त्यातच त्यांचं बाह्य जगाचं ज्ञान नाहीसं झालं. त्यानंतर काही वेळाने ते हळूहळू पूर्ववत झाले. त्यावेळी प्राध्यापक महोदयांनी त्यांना पुन्हा विचारलं- माझ्या प्रश्नाचं उत्तर तर आपण दिलंच नाहीत. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले- उत्तर तर मी दिलं. तुला ते समजलं नाही. प्राध्यापक आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले- अरे, काय तुझी विलक्षण बुद्धिमत्ता? तुझी तर्कबुद्धी, तो बुद्धीचा विलास. ही सारी बुद्धी कुठून आली रे? श्रीरामकृष्णांचा अभिप्राय स्पष्ट होता. मानवी बुद्धीला अगम्य अशा ईश्वरी शक्तीचीच ती देणगी होती. प्राध्यापक मजकुरांचे समाधान झाले होते.

हा सारा प्रसंग सांगताना, तो जर्मन नाट्यदिग्दर्शक जणू काही तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत होता. इतका तो त्या प्रसंगाशी, त्यातील पात्रांशी, त्यांच्या विचारांशी, भावांशी एकरूप झालेला होता. समरस होण्याचा त्याचा हा स्वभाव नंतरही अनुभवाला आला. कन्याकुमारीत चोल राजांनी बांधलेलं हजार-बाराशे वर्षांच पुरातन शिवमंदिर आहे. दुसऱ्या दिवशी तोच मला तिथे घेऊन गेला. अतिशय शांत, लोभसवाणा परिसर असलेलं, आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारं ते मंदिर !! त्या मंदिरात दर सोमवारी दरिद्रीनारायणांसाठी भोजनाचं आयोजन असतं. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने चक्क दरिद्रीनारायणांच्या पंगतीला बसून तिथे भोजन केलं होतं.

याच मंदिरात भगवे कपडे घातलेला, पण विदेशी गोऱ्या रंगाचा व चेहेरेपट्टीचा एक तरुण दिसला. एका मोठ्या पडवीत दूर कोपऱ्यात एक वळकटी. त्याच्या शेजारी बसून तो कुठलासा ग्रंथ वाचण्यात दंग होता. जर्मन मित्रानेच त्याची माहिती दिली. तो तरुण झेकोस्लोव्हाकियाचा. भारतात आला. हिमालयापासून भटकंती सुरु केली. आता कन्याकुमारीत आला होता आणि प्राचीन शिवमंदिरात राहत होता. काय करत असेल तो दिवसभर? विरंगुळा कोणता असेल त्याच्यासाठी? नेमका कशाचा शोध तो घेत होता? आपली माणसं, आपला देश; सारं सोडून तो असा भणंगासारखा का भटकत असेल? तो साधा पर्यटक तर नक्कीच नव्हता. त्याच्याशी संवाद झाला नाही. पण झेकोस्लोव्हाकियाचा तो तरुण मनावर मात्र कायमचा कोरला गेला.

जर्मन मित्राने मग मला कन्याकुमारीच्या भव्य चर्चमध्ये नेले. चर्चमध्ये जाण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता. मंदिरात जातात त्याप्रमाणे पादत्राणे बाहेरच काढून ठेवून आम्ही चर्चमध्ये गेलो. नुकताच नाताळ आटोपला असल्याने येशूच्या जन्माचे अनेक देखावे तेथे होते. येशू व मेरीच्या प्रतिमांना मी चक्क हिंदू पद्धतीने हात जोडले. तो मनमोकळं हसला. समजूतदारपणे. त्यानंतर एका तामिळ कुटुंबातील तामिळ पद्धतीच्या घरगुती मंदिरालाही आम्ही भेट दिली.

दुसऱ्या दिवशी दिवसभर तो कुठे गायब होता कुणास ठाऊक? सायंकाळी मात्र आम्ही एकत्रच सूर्यास्त पाहिला व संध्याकाळ समुद्रावर घालवली. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या उन्मत्त वाऱ्याच्या साथीने तो आपलं मनही मोकळं करीत होता. स्वत:बद्दल मात्र तो फार बोलला नाही. इथली माणसं, इथलं जीवन, इथले अनुभव याबद्दलच तो बोलत होता. तो म्हणाला- `लोक मला विचारतात, तुम्ही इथे काय करता? तेही एकट्यानेच. तुमचा वेळ कसा जातो? तुम्हाला कंटाळा नाही येत? मी त्यांना म्हणतो- इथे समुद्र आहे, एवढी झाडे आहेत, जाणारी येणारी माणसं आहेत. एखाद्या झाडाखाली बसून राहिलं तरीही दिवस निघून जातो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकताना. आणखी काय हवं आनंदासाठी? वेळ घालवण्यासाठी?' त्याचं म्हणणं खरंही होतं अन कठीणही. कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला त्याचा हा आनंद हेवा करण्यासारखाच.

हा त्याचा स्वभाव होता, ही त्याची वृत्ती होती, हा त्याचा नेहमीचाच अनुभव होता किंवा कसे हे मला जाणून घ्यायचे होते. पण त्याने लगेच विषय बदलला. म्हणाला- उद्या सकाळी मी जातोय. `कुठे?' या माझ्या प्रश्नावर त्याचे उत्तर होते, `चेन्नईला.' त्या रात्री आम्ही पहिल्यांदाच एकत्र भोजन केले. रात्री गप्पा मारत मारतच आम्ही झोपी गेलो. तो पहाटेच जाणार होता. सकाळी उठण्यात मी पक्का. त्यामुळे त्याला म्हटलं- सकाळी जाण्यापूर्वी मला नक्की उठव. तो `हो' म्हणाला. सकाळी उठलो आणि पाहिलं तर त्याचा बिछाना मात्र रिकामा होता. त्याचे कपाटही उघडे. मला न सांगताच तो पहाटे निघून गेला होता.

अनेक गोष्टींसाठी माझ्या लेखी पहिला असलेला `तो' - व्यक्ती, घटना, पात्र, प्रसंग, विचार, भावना यांच्याशी समरस होण्याच्या आपल्या स्वभावाशी विपरीत अशा पद्धतीने, न सांगता निघून गेला होता. हा कोरडेपणा, तटस्थपणा, त्रयस्थपणा की आणखी काही? का गेला असेल तो असे न सांगता?

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, ३१ डिसेंबर २०१५

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

वैद्यकीय शिक्षण आणि ब्ल्यू फिल्म

दोन दिवसांपूर्वी मी मांडलेला एलीयनच्या अंधश्रद्धेचा मुद्दा काल एकाने एका वाहिनीवरील चर्चेत मांडला. त्याला उत्तर देताना `पिके'चे समर्थन करणाऱ्या एकाने मुद्दा मांडला अंधश्रद्धेचा वापर करून पैसा कमावण्याचा. चित्रपटात त्याला विरोध आहे असे त्याचे म्हणणे. त्याला विचारायला हवे- `अरे मूर्खा, एलियनची अंधश्रद्धा पसरवून ते सिनेमावाले राजरोसपणे जे अब्जावधी रुपये कमावत असल्याच्या बातम्या रोज वृत्तपत्रात येतात त्या तू पाहिल्या नाहीस का?' एखादा कफल्लक, बेकार माणूस; एखादा दगड मांडून त्याला शेंदूर फासून पैसे मिळवीत असेल तेव्हा किमान त्याच्या टीचभर `पापी पेट'चा सवाल असतो. तुम्ही हे का करताय? अपचनाच्या ढेकरा येत असूनही, तुमचे हे धंदे? एखादा भिकारी भाकरीची चोरी करतो आणि एखादा गर्भश्रीमंत करचोरी करतो तेव्हा दोन चोरीत फरक असतो हे या स्वनामधन्य विद्वानांच्या डोक्यात शिरत नाही का?

एक तर मुळात श्रद्धा- अंधश्रद्धा, देव, विज्ञान वगैरे बद्दल प्रचंड गोंधळ सगळीकडे आहे. तो नीट उकलण्याऐवजी त्यात भर घालण्याचेच लोकशाही उद्योग सुरु आहेत. खरे तर सगळेच्या सगळे विज्ञान हेच असंख्य गृहितकांवर आधारित आहे. साधा प्रकाश म्हटला तरी, लाल रंगाच्या खालील (ज्याला इन्फ्रा रेड म्हणतात) आणि जांभळ्या रंगाच्या वरील (ज्याला अल्ट्रा व्हायोलेट म्हणतात) कोणतीही प्रकाश शलाका माणसाला दिसू शकत नाही. तापमानाच्या बाबतीतही तेच. शून्य तापमान हे गृहितक नाही तर काय? आपण ठरवले की अमुक ठिकाणी पारा आला की त्याला शून्य तापमान म्हणायचे. गणितासारख्या नेमक्या शास्त्रात किती गृहितके? मुळात कोणत्याही शास्त्रात गृहितकांशिवाय अभ्यास सुरूच होत नाही. मग ज्याला आपल्या लेखी अस्तित्व नाही, ते सारेच अंधश्रद्धा नाही का? अशा अंधश्रद्धा विज्ञानापासून आध्यात्मापर्यंत आणि कलेपासून राजकारणापर्यंत सर्वत्र आहेत. अन त्याचा गैरवापर करणारेही सगळ्याच क्षेत्रात असंख्य आहेत. अगदी आहारशास्त्रात सुद्धा. याचा अर्थ ते समर्थनीय ठरते असे नाही. मात्र प्रत्येक साधन प्रत्येक गोष्टीसाठी असते असे समजणे चुकीचे आहे एवढेच.

अगदी माझे स्वत:चे उदाहरण देतो. आमच्याकडे घरकामाला असलेल्या बाई तब्येत थोडीबहुत कमीजास्त झाली की जायच्या इकडेतिकडे. बाहेरचं आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे. त्यांना म्हणून म्हणून, सांगून सांगून आणि एका खात्रीच्या डॉक्टर मित्राकडे पाठवून आता त्यात बदल झाला आहे. गेली काही वर्षे हे बाहेरचे प्रकरण बंद झाले आहे. अशी असंख्य उदाहरणे घरोघरी असतील. डॉ. रविंद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे, बंग दांपत्य, आमटे बंधू, गिरीश प्रभुणे; अशीही अनेक थोर उदाहरणे आहेत. अनेक धार्मिक नेते, संत, विचारक, प्रवचनकार, कीर्तनकार यांनीही हे काम केले आहे. खरे तर इस्लाम वा ख्रिश्चन यांची देव संकल्पना आणि हिंदूंची देव संकल्पना यातच जमीन आसमानाचा फरक आहे. तथाकथित बुद्धिवादी ज्याला अंधश्रद्धा म्हणतात त्यासुद्धा पूर्णतेचे शिखर चढण्याच्या पायऱ्याच आहेत. त्यातील काहीही न समजून घेता न पेलवणारे धनुष्य उचलण्याचा बालीशपणा करण्यात अर्थ नाही. अगदी शंकराचार्य किंवा विवेकानंद यांनीही हे काम केले आहे. पण त्यांनी केवळ नकारात्मक आणि निषेधात्मक बाबी न मांडता त्यातील अर्थ आणि आशय उलगडून पूर्णता प्रदान केली आहे. अन या गोष्टी अशाच पद्धतीने व्हायला हव्यात.

चित्रपट माध्यम वापरायचे असेल तरी मराठीतल्या `जत्रा'सारखे उदाहरण आहेच ना? पण नको त्या गोष्टीसाठी नको ते माध्यम वापरणे आणि ते सुद्धा त्याच्याही मर्यादा ओलांडून एखाद्या विषयावर भाष्य करणे, हे परिपक्वतेचे उदाहरण नक्कीच नाही. मानवी शरीराचे कार्य वैद्यकीय महाविद्यालयात शिकवले जाणेच योग्य असते, त्यासाठी ब्ल्यू फिल्मचा वापर बरोबर म्हणायचा का? सगळे रोग दूर करण्यासाठी प्रत्येकच पद्धत उपयोगी नसते ना?

- श्रीपाद कोठे

३१ डिसेंबर २०१४

सारस्वतांपुढील आव्हान

साहित्य-संस्कृती हे शब्द जोड शब्दासारखेच पुष्कळदा वापरले जातात. त्यातील साहित्य या शब्दाचा काही ना काही बोध तर सगळ्यांना होतो. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, समीक्षा, वैचारिक लिखाण, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन; अशा विविध प्रकारांनी साहित्याचा कमीअधिक परिचय माणसाला असतो. साहित्य दाखवता येतं, सांगता येतं, त्याचं वर्णन सहजतेने करता येतं. `संस्कृती' या शब्दाचे मात्र तसे नाही. संस्कृती म्हणजे काय हे दाखवता येत नाही, तिचे वर्णन करता येत नाही. आजकाल नृत्य- गायन- नाट्य- चित्रपट- लोककला- इत्यादींना विस्कळीत अर्थाने संस्कृती म्हटले जाते, समजले जाते. परंतु ते योग्य नाही. या कला आहेत. संस्कृती ही अधिक जीवनानुगामी अमूर्त भावात्मक वस्तू आहे. वस्तू हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण ती आहे, ती असते. ती केवळ कल्पना नाही. एवढेच की ती अमूर्त आहे. एखाद्या भौतिक पदार्थासारखे तिचे मोजमाप वा वर्णन करता येत नाही एवढेच. अर्थात हेही तेवढेच खरे की, साहित्य वा विविध कलांमधून संस्कृती अभिव्यक्त होत असते. प्रकट होत असते. एवढेच नाही तर, साहित्य वा विविध कला आणि त्यांचे आविष्कार संस्कृतीला घडवीत किंवा बिघडवित असतात. संस्कृतीला आकार वा घाट देत असतात. दुसरीकडे संस्कृतीही साहित्य वा कलांना घडवीत किंवा बिघडवित असते. त्यांना आकार आणि घाट देत असते. या दोन्ही बाबी अन्योन्याश्रयी असतातच असे नाही. परंतु त्यांचा प्रवास सोबत सोबत, हातात हात घालून होत असतो. साहित्य आणि कला या जीवनानुभवाकडे थोड्या अधिक झुकलेल्या असतात. मनोरंजन, मनोविनोद, मनोरुची त्यात प्रधान असतात. संस्कृती ही जीवनार्थाकडे थोडी अधिक झुकलेली असते. जीवनदृष्टी, जीवनाचे तत्वज्ञान त्यात प्रधान असते एवढेच. म्हणूनच साहित्याचा वा कलेचा विकास आणि संस्कृतीचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावे लागते. साहित्य वा कलांचा विकास होतो आहे का? त्यांची घडण होते आहे का? त्यांची वृद्धी होते आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगळ्या पद्धतीने शोधावी लागतात. जसे- लोक लिहितात की नाही, वाचतात की नाही, लिहीणाऱ्यांची अथवा वाचणाऱ्यांची संख्या, ग्रंथालये, ग्रंथालयांची संख्या, पुस्तक प्रकाशने, त्यांची आकडेवारी, साहित्य संमेलने, साहित्य विषयक अन्य कार्यक्रम आणि आयोजने, या साऱ्यासाठी दिला जाणारा वेळ आणि पैसा, अन्य सोयी- सवलती- साधने- यांची उपलब्धता; हे सारे विचारात घ्यावे लागते. त्यांचा ताळेबंद मांडावा लागतो. अन्य कलांच्या बाबतीतही असाच विचार करावा लागतो. त्यातून त्यांचे घडणे वा बिघडणे, त्यांची वृद्धी वा घट समजून घेता येते; समजून घेतली जाते. संस्कृतीची वाढ-घट कशी मोजायची? कशी समजून घ्यायची? त्याचं माप कोणतं? संस्कृतीचं घडणं बिघडणं अथवा वाढ-घट अशी बाह्य एककांनी समजून घेता येत नाही. संस्कृतीचा विकास समजून घेण्याचे मापदंड आंतरिक आहेत. ज्या मानवाच्या जीवनाचा तो अविच्छेद्य भाग आहे; त्या मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हाच संस्कृतीच्या विकासाचा मापदंड असू शकतो. साहित्य अथवा कला; संस्कृतीच्या या विकासाला किती साहाय्य करतात, त्यासाठी किती पूरक ठरतात, यावरून साहित्य वा कलांच्या दर्जेदार असण्यावर वा नसण्यावर मोहोर उठवता येते.

मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हे तरी कसे ठरवायचे? या प्रश्नाचे उत्तर, म्हटले तर फार सोपे आहे. अर्थांची, शब्दांची फार ओढाताण न करता त्याचे उत्तर देता येते. मोठी पिशवी ती, ज्यात अधिक वस्तू सामावू शकतात, लहान पिशवी ती ज्यात कमी वस्तू सामावू शकतात. त्याचप्रमाणे भावना, विचार, जाणीवा, दृष्टी मोठी अथवा व्यापक तेव्हाच म्हटली जाईल, जेव्हा त्याचा परीघ अधिकाधिक मोठा असेल; अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेऊ शकेल. याउलट ज्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांचा परीघ लहान असेल, त्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी लहान म्हणाव्या लागतील. अन आपला लहान परीघ मोठा करण्याचे नाकारत, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेण्याचे नाकारत जाणे; याला संकुचितपणा म्हणावे लागेल. आणखीन एका गोष्टीची नोंद घेणेही गरजेचे आहे. आपला परीघ मोठा करणे, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी सामावून घेणे ही; चांगली अन योग्य असली तरीही धोकादायक प्रक्रिया आहे. त्यासाठी विवेक जागा असणे नितांत गरजेचे. परीघाबाहेरील व्यक्ती वा विचार यांना परिघात सामावून घेणे विवेकाधिष्ठित असायला हवे. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; यासारख्या बाबी व्यापकतेच्या नावाखाली सामावून घेता येत नाहीत, सामावून घेऊ नयेत. त्यातून फक्त आत्मनाशी भस्मासूर निर्माण होतात. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; इत्यादी बाबी समजून जरूर घेतल्या पाहिजेत. परंतु समजून घेणे आणि सामावून घेणे यातील भेद दुर्लक्षित करणे चुकीचे ठरते.

संस्कृतीच्या जडणघडणीत समाजजीवनाच्या विविध घटकांचा कळत वा नकळत सहभाग असतो. वर्तमानाचा विचार केल्यास काय चित्र डोळ्यासमोर येते? प्रसारमाध्यमे आणि संवाद माध्यमे आजच्या युगावर सर्वाधिक प्रभाव गाजवीत असल्याचे पाहायला मिळते. कधी नव्हे एवढा हा प्रभाव वाढला आहे. ही मानवी प्रवासातील `न भूतो' अशी प्रक्रिया आहे. संवाद आणि संवादाची विविध माध्यमे मानवी सभ्यता व संस्कृतीएवढीच पुरातन आहेत यात वाद नाही. भाषा आणि वाणीचा किंवा मानवी खाणाखुणांचा उपयोग तर होतच असे, पण पशुपक्ष्यांचा संवाद माध्यम म्हणून वापर; तसेच `मेघा'सारख्या गोष्टींचा साहित्यिक प्रतिभेने संवाद माध्यम म्हणून केलेला उपयोग; नवीन नाहीत. तरीही, संवाद आणि संवाद माध्यमे यांचा पसारा, वैविध्य, राजापासून रंकापर्यंत असलेली त्याची उपलब्धता, सहजता, गती; हे सारे अभूतपूर्व आहे. प्रसार माध्यमे ही तर अगदी अलीकडच्या दोन शतकांची देणगी आहे. त्यातही गेल्या दोनेक दशकात झालेले बदल हे क्रांतिकारी या शब्दालाही उल्लंघून गेलेले आहेत. संवाद माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांच्या या पसाऱ्याने मानवाच्या व्यक्त होण्याचे सगळे संदर्भच बदलून टाकले आहेत. `खाजगी किंवा व्यक्तिगत' या बाबी तर पातळ होऊ लागल्या आहेतच; पण व्यक्त होण्यातील स्त्री- पुरुष- तृतीयपंथी- हे लिंगभेद; भाषाभेद, भौगोलिक सीमा, जाती- भाषा- प्रांत- देश- विषय- वय- या साऱ्या सीमाही पुसट झाल्या आहेत. आपल्या घरात बसून जगातील कोणाशीही संवाद साधण्याची सोय आता उपलब्ध आहे. कोणतीही माहिती जाणून घेणे किंवा कोणतीही माहिती विशिष्ट व्यक्ती वा व्यक्तीसमूह यांच्यापर्यंत किंवा यच्चयावत सगळ्यांपर्यंत पोहोचवणे यात काहीही नवीन राहिलेले नाही. विचारांचे आदानप्रदान सहजसोपे झाले आहे. मोबाईल आणि आंतरजाल या संवादमाध्यमांनी माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानातील मर्यादा तर पुसल्याच, सोबतच `प्रसार माध्यमे' हा मध्यस्थही बाजूस सारला आहे. माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी असलेली अवलंबिता पुसून टाकली आहे. प्रसारमाध्यमांचे भविष्य काय असेल असाही एक प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

आपल्या त्या त्या वेळच्या निवडीप्रमाणे कधी व्यक्तिगत, तर कधी समष्टीशरण अशा या संवादसाधनांनी चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत आहेत. त्यांचे नेमके आकलन होण्यास अजून काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तरीही त्यातील प्रवाह स्पष्टपणे पाहता, अनुभवता येतील इतके ठळक निश्चित आहेत. चांगल्या आणि वाईट गोष्टींची सहज उपलब्धता हे त्याचे एक लक्षण आहे. मोठाले धार्मिक वा तात्विक ग्रंथ, सगळ्याच भाषांमधील मोकळे होत असलेले कथा, कादंबरी- कविता- इत्यादी साहित्य, वैचारिक वाङ्ग्मय, वैज्ञानिक माहिती, इतिहास, पुराणे, राज्यघटना, नियम, कायदे, बँकांचे आणि कंपन्यांचे ताळेबंद, शास्त्रीय आणि अन्य संगीत, जुने व नवे चित्रपट, नाटके, भूगोल, पर्यटन, निसर्ग हे सगळे बोटांच्या टोकावर आले आहे. केवळ माहिती म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहार म्हणूनही हे एका क्लिकचे काम होते आहे. प्रवासापासून निवासाच्या आरक्षणापर्यंत किंवा प्रत्यक्ष पैसा कमावणे- खर्च करणे- देवाणघेवाण- अन्य व्यवहार हेही जागचे न हलता होऊ लागले आहेत. शिक्षण वा वैद्यकीय उपचार हे दोन व्यक्तींचा थेट संपर्क न होता होऊ लागले आहेत. खरेदी-विक्री डाव्या हाताचा मळ झाला आहे. यासोबतच फसवणूक, अधिकृततेचा अभाव, एकलकोंडेपणा, संशयीवृत्ती, गैरफायदा घेणे, लुबाडणूक, अनिश्चितता, आरोग्याच्या तक्रारी यांचीही भरमसाठ वाढ होते आहे. आपल्याला दुष्ट लोकांचा वा वृत्तींचा फटका बसू नये याचा मोठा तणाव प्रत्येकाला जाणवू लागला आहे. शिवाय जशा चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत तशाच पोर्नोग्राफी, ड्रग्ज, मादक द्रव्य, जुगार, वेश्यावृत्ती हेही सहज उपलब्ध आहे. एकीकडे माणसे एकलकोंडी होऊन दुरावू लागली आहेत, तर दुसरीकडे आपापल्या आवडीनुसार गट तयार करून आवडीच्या विषयात रममाण होऊ लागले आहेत. असंख्य साहित्यिक, वैज्ञानिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय गट तयार होत आहेत. त्यात देवाणघेवाण होत आहे. आभासी वास्तवातून भेटणारे लोक आणि विचार, भावना, माहिती, साहित्य यांची देवाणघेवाण करणारे लोक; प्रत्यक्ष भेटून एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. त्यांचे लहानमोठे कार्यक्रम होऊ लागले आहेत. अन अशा गटांची सभासद संख्या लाखात सुद्धा पोहोचू लागली आहे. लिहिणारा, व्यक्त होणारा, वाचणारा वर्ग विकसित होऊ लागला आहे; वाढू लागला आहे. कधीकधी हे व्यसन सुद्धा होत आहे. कौटुंबिक गटात सुद्धा आजवर माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा, गुणांचा परिचय होऊ लागला आहे. यातून प्रत्येकाला चांगल्या व वाईट दोन्ही अर्थाने; संधी, सन्मान आणि ओळख प्राप्त होऊ लागली आहे.

संवाद माध्यमांमुळे प्रसार माध्यमांचे स्वरूपही बदलले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, तसेच पैशासाठी जाहिरात शरणता हा प्रसार माध्यमांचा धर्म झाला आहे. राजकारण, चित्रपट, मनोरंजन, गॉसिप, तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित कार्यक्रम आणि लिखाण यांना प्रमुखता मिळाली आहे. संवाद माध्यमांच्या प्रभावातून ही माध्यमेही सुटू शकत नाहीत. संवाद माध्यमातील घडामोडी, प्रवाह, त्यांचा खरेखोटेपणा हेदेखील त्यांचे विषय होऊ लागले आहेत. तांत्रिक प्रगतीमुळे अन्य देशांशी live देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. दोन देशातील वृत्तवाहिन्या एकत्र येऊन वृत्त वा चर्चा लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत. देशविदेशातील वृत्तपत्रे आंतरजालात सहजपणे उपलब्ध होऊ लागली आहेत. जेवण, झोप, अभ्यास, कौटुंबिक कार्यक्रम, पाहुणेराहुणे, भेटीगाठी, आवडीनिवडी, इच्छा, अपेक्षा, मानसिकता यांच्यावर या साऱ्याचा प्रभाव होऊ लागला आहे. क्रीडास्पर्धा, राजकीय घडामोडी, अन्य महत्वाच्या घटना, चित्रपट यांची माहिती सर्वजनसुलभ होऊ लागली आहे. मानवी जीवन आणि त्याचे असंख्य पैलू यांचा परहस्ते अनुभव का होईना, घरबसल्या मिळू लागला आहे. माहिती, प्रतिमा, दृश्य, मतमतांतरे, घडामोडी यांनी माणसाचे मन, बुद्धी तुडुंब भरून जाऊ लागली आहे. reality show या प्रकाराने इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे मोठे विश्व व्यापले आहे. अस्पर्शित प्रतिभांना अवकाश प्राप्त होणे हा त्याचा सकारात्मक परिणाम आहे, तर उथळ कौशल्यविकास आणि अकाली प्रगती खुंटणे हे त्याचे नकारात्मक परिणाम आहेत. काही बाबतीत या reality show मधून गरजू आणि अभावग्रस्तांना मदत मिळते आहे; तर अनेकदा `सोपा आणि पापमय पैसा' वाहतो आहे. सुमार लोक celebrity होत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर वाढला आहे. त्यामागे लोक धावत आहेत अन त्या तथाकथित celebrity उखळ पांढरे करून घेत आहेत. प्रादेशिक वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमे लोकांमध्ये जाऊन; लोकहिताचे वा लोकानुरंजनाचे उपक्रम करीत आहेत. राजकीय चर्चा हे बौद्धिक दंगलीचे क्षेत्र झाले आहे. मुद्रित माध्यमातील संपादकांचे महत्व कमी होऊ लागले आहे. गंभीर, उच्च अभिरुचीचे लिखाण हद्दपार होऊ लागले आहे. दोन्ही प्रकारच्या प्रसार माध्यमांनी दैनंदिन जीवन तर व्यापून टाकले आहेच; सोबतच अर्थकारणालाही आकार दिला आहे, देत आहेत. राजकीय निर्णय प्रभावित करण्याची या माध्यमांची शक्तीही वाढली आहे.

प्रसार माध्यमे आणि संवाद माध्यमे यांच्या चांगल्या वाईट परिणामांची चर्चा बाजूला ठेवून, केवळ सकारात्मक बाबी लक्षात घेतल्या तरीही संस्कृती संदर्भात काही प्रश्न समोर येतात. विचारांच्या, भावनांच्या, माहितीच्या देवाणघेवाणीतून, अभिव्यक्त होण्याच्या प्रक्रियेतून, समजून घेण्याच्या प्रयत्नातून; काय येणेजाणे करते आहे? कशाची देवाणघेवाण होते आहे? या देवाणघेवाणीने मानवी मन आणि जगणे किती आणि कसे समृद्ध होत आहे? वरवर नजर टाकली तरीही लक्षात येईल की; चित्र फारसे आशादायक नाही. संवाद माध्यमातून असंख्य स्त्री-पुरुष व्यक्त होऊ लागले आहेत. पण या व्यक्त होण्याचे स्वरूप कुरकुर, तक्रारी, कुरघोडी, टवाळकी असेच मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय गटात लोकांनी स्वत:च स्वत:ला वाटून घेतले आहे. अन्यथा प्रामाणिक आणि कळकळीचे असलेले लोकसुद्धा राजकीय हमरीतुमरी सोबतच, एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. संपूर्ण मानवी जीवनाचे अपार राजकीयीकरण झाले असून त्याने परस्पर संबंधांनाही गिळंकृत करणे सुरु केले आहे. मानवी मनातील सत्ताकांक्षा भस्मासूर होऊन समोर येते आहे. यात राजकीय सत्ता तर आहेच, सोबतच व्यक्ती, परिवार, विचार, संस्था, संघटना यांच्याही सत्ताकांक्षा तीव्र, तिखट आणि कडू होऊ लागल्या आहेत. एकाच छताखाली राहणारे चार जीवसुद्धा आपली सत्ता कशी चालेल किंवा सत्ता आपल्या हाती कशी राहील याचा प्रयत्न करताना दिसतात. सत्ताकांक्षेच्या भस्मासुराप्रमाणेच संपत्तीकांक्षेच्या भस्मासुरानेही अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. कोणत्याही गोष्टीचा संदर्भबिंदू पैशाशी येऊन थांबतो आहे. प्रतिष्ठा, मोठेपणा, न्याय, योग्यता, आदर पैशाच्या संदर्भात तोलले जाऊ लागले आहेत. `सर्वेगुणाः काञ्चनम् आश्रयन्ते' हे मानवी वृत्तीच्या अपरिपक्वतेचं लक्षण, मानवी पुरुषार्थ म्हणून पुढे येतं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मनात आढ्यता आणि ज्याच्याकडे नाही त्याच्या मनात आशाळभूतपणा निर्माण होतो आहे. शिक्षण, संस्कार, जाहिराती, वातावरण, धोरणे, भाषा, चिकित्सा, विश्लेषण, चर्चा, जीवनाचे आदर्श आणि मापदंड; या साऱ्यातून सत्ता आणि संपत्ती यांचाच महापूर आला आहे. चांगल्या चांगल्या समाजोपयोगी योजना आदींचे `दूत' म्हणूनदेखील सत्ता, संपत्ती आणि भ्रष्ट जीवन यात बुडालेले लोकच पुढे येत आहेत. जीवन आणि तत्वज्ञान, जीवन आणि धर्म, जीवन आणि आध्यात्मिकता यांचा संबंधविच्छेद होऊ लागला आहे. `साधी राहणी, उच्च विचारसरणी' हा थट्टामस्करीचा विषय झाला आहे. माणसाने माणसाला समजून घेण्यासाठी, माणसाने जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक अशी मनाची घडण गमावून बसतो आहोत आणि त्याची गरज आहे याकडेही दुर्लक्ष होत आहे. ज्ञान, सद्गुण, सदाचार, सद्भाव, साधेपणा, सहृदयता, संवेदनशीलता, विचारीपणा, संतुलन; या साऱ्यांना तिलांजली देणे सुरु झाले आहे. कधी भलेपणाचा अतिरेक, तर कधी व्यवहारचातुर्याचा अतिरेक पाहायला मिळतो. गैरफायदा घेणे आणि बळी जाणे दोन्ही वाढते आहे. यातून असुरक्षितता, अविश्वास, संशयीपणा, रिक्तता वाढत चालले आहे. मन, बुद्धी, भावना, विचार, जाणीवा; सशक्त, सार्थक आणि व्यापक होण्याऐवजी संकुचित, विसविशीत होत आहेत. संघर्षाची आणि समन्वयाची दोन्ही ताकत माणूस आणि समाज गमावून बसतो आहे. जीवनदृष्टी अशी काही राहिली आहे का असा प्रश्न पडू लागला आहे. जीवन म्हणजे केवळ वाहत राहणे अशीच भूमिका दिसून येते. गरिबी, दुर्बलता, अन्यायग्रस्तता म्हणजे आक्रस्ताळेपणाला सूट; तसेच श्रीमंती, बलसंपन्नता म्हणजे अधिकाराची सूट असेच चित्र पुढे येते आहे. संस्कृती म्हणजे जर जीवनदृष्टीचा विस्तार आणि त्याला अनुसरून व्यवहार हा असेल; तर दुर्दैवाने म्हणावे लागेल की संस्कृतीची घसरण सुरु आहे. व्यक्ती आणि समाजाच्या जीवनातील सत्ता आणि संपत्तीकडे झुकलेला लंबक जोवर ज्ञान, गुणसंपन्नता आणि आत्मभावाच्या विकासाकडे झुकत नाही तोवर ही घसरण सुरूच राहील. ढळलेला हा तोल प्रस्थापित करण्याचे आव्हान विचारी सारस्वतांपुढे आ वासून उभे आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

३१ डिसेंबर २०१७

जीवनशैली

काल श्री. नितीन गडकरी यांच्या एका कार्यक्रमाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे, असे विचार श्री. गडकरी यांनी व्यक्त केल्याचे बातमीत म्हटले आहे. हा विचार नवीन नाही. सगळ्यांनाच आता ते पटू लागले आहे. त्यातही श्री. गडकरी यांच्यासारख्या व्यक्तीने ते म्हटले याला महत्व आहे. त्यांनी म्हटल्यामुळेही आता अनेकांना ते पटेल. फक्त एवढेच वाटते की, श्री. गडकरी यांनी या विषयाचा पाठपुरावा करावा. हा विषय इथेच थांबू नये. अन जीवनशैली बदलणे हा जो उपाय आहे त्याची सखोल, विस्तृत, व्यापक चर्चा व्हावी. आमचे आजचे प्राधान्यक्रम, जगण्याच्या वर्तमान प्रेरणा, उत्पादन- वितरण- उपभोगाच्या पद्धती, शहरांचे आकार, तंत्रज्ञान, सुखसाधने, विचारशून्यता, वेळेची उपलब्धता, जग आणि समाज यांचे दडपण; अशा जीवनशैलीला प्रभावित करणाऱ्या असंख्य घटकांचा साधकबाधक विचार होईल यासाठीही पुढाकार घ्यावा. आजच्या पद्धतीनेच (व्यवहार, तत्व, सिद्धांत, विचार, दिशा) जगणे रेटत राहून जीवनशैली बदलण्याचा विचार करणे हे वाळूवर रेघोट्या ओढणे ठरेल. त्यामुळे जी अतिशय योग्य भूमिका श्री. गडकरी यांनी मांडली त्याच्या सर्व अंगांचा विचार तरी प्रारंभ व्हावा एवढेच.

- श्रीपाद कोठे

३१ डिसेंबर २०१८

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

यांच्यावरच कारवाई करा...

आमीर खान, राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिजात जोशी हे सगळे मूर्ख, मठ्ठ आणि धूर्त आहेत. त्या पिके चित्रपटात त्यांनी हिंदूंचा अवमान केला की नाही वगैरे गोष्टी दूर ठेवा. त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा गुन्हा दाखल करायला हवा. कोणीही कधीही न पाहिलेल्या, अनुभवलेल्या एलियनचा (परग्रहावरील माणसाचा) प्रचार केल्याबद्दल. अन वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचा दावा करणारी, सृजनशीलतेच्या गप्पा मारणारी कलाकार, बुद्धिवादी आणि विचारी मंडळी; जी या चित्रपटाचं समर्थन करीत आहेत त्यांना तुरुंगात पाठवायला हवे. एका वेश्येचा हात सहा तास हातात घेऊन भोजपुरी शिकता येते हे दाखवणे वैज्ञानिक दृष्टी विकसित करणारे आहे का?

- श्रीपाद कोठे

३० डिसेंबर २०१४

नाही चिरा, नाही पणती...

डॉ. घनश्यामल प्रसाद राव यांचे आज पहाटे विशाखापट्टणम येथे वृद्धापकाळाने निधन झाले. कोण होते ते? अन मी ही बातमी सगळ्यांना का सांगतो आहे? स्व. राव संस्कार भारती या अखिल भारतीय संघटनेचे पूर्व उपाध्यक्ष होते आणि आज देशभरात संस्कार भारतीचे लाखो कार्यकर्ते जे `संस्कार भारती' गीत प्रत्येक कार्यक्रमात गाऊन लाखो, करोडो लोकांना आनंद देतात, डोलायला लावतात; त्या गीताचे ते रचयिता आहेत. त्यांची बातमी कुठे येणार नाही, त्यांनी रचलेले गीत संस्कार भारती व्यतिरिक्त कुठे ऐकायला मिळणार नाही. पण यामुळे त्या गीताचे आणि त्याची रचना करणाऱ्यांचे महत्व मुळीच कमी होत नाही. लहानमोठा पुढारी किंवा लहानमोठा पुरस्कार मिळवणारे लोक किंवा टीव्हीच्या टुकार मालिकेत टुकार काम करणारी व्यक्ती यांना प्रसिद्धी मिळते, त्यांच्या निधनाच्या बातम्या येतात; पण म्हणून ते महान असतातच असेही नाही. लोकप्रियता किंवा प्रसिद्धी यांचा महानतेशी मेळ घालण्याचा चाळा माणसाच्या मनाला असतो. परंतु तो चाळा बाजूला ठेवून पाहिले तर स्व. राव यांचे महत्व आणि योगदान कळण्यास कठीण नाही. गंमत म्हणजे संस्कार भारतीचे हे गीत गाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या असंख्य लोकांनाही हे ठाऊक नाही की हे गीत घनश्यामलजी यांनी रचले आहे. रा. स्व. संघाने जपलेल्या आणि जोपासलेल्या आत्मविलोपीत्वाचा हा नमुना आहे.

त्यांची एक आठवण सांगण्याचा मोह होतो. माझी लहान बहिण काही काळ विशाखापट्टणम येथे होती. त्यांच्या घराजवळ संघाची शाखा लागत असे. स्व. घनश्यामलजी त्या शाखेत जात असत. त्यांचा बहिणीशी संपर्क आला. असा संपर्क कसा येतो आणि संघाचे लोक एकमेकांशी कसे जोडले जातात हे संघाच्या लोकांना सांगण्याची गरज नाही आणि अन्य लोकांना ते अनुभवल्याशिवाय समजणार नाही. तर संपर्क झाल्याने त्यांचे जाणेयेणे सुरु झाले. त्यावेळी बहिणीची मुलगी तान्ही होती. तिच्याशी चार घटका खेळणे हाही एक भाग. मी संस्कार भारतीचे काम करीत असे तेही बहिणीकडून त्यांना कळले. त्यामुळे त्यांच्या स्नेहाची साखर चमचाभर अधिकच पडत असे. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतेच. फोनही कमीच. त्यामुळे बहीण आली तेव्हा हे समजले. मी तिला म्हटले- `अगं संस्कार भारतीचं सुमधुर गीत त्यांनीच रचलं आहे.' तिला आश्चर्यच वाटलं. तिला काहीही माहिती नव्हतं. त्यांनी कधीही आपल्या तोंडाने सांगितलं नाही की हे गीत त्यांनी रचलं आहे. ते अखिल भारतीय उपाध्यक्ष आहेत हे देखील त्यांनी सांगितले नव्हते.

खूप काही करायचं पण तोंडातून त्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही. कुठून येतो हा गुण? कुठून येतं हे आत्मविलोपीत्व? मला वाटतं ही देवाघरची माणसं असतात. सैनिकाचा पोशाख न घालता मानवी जीवनातील शत्रूंना परास्त करीत, समोर येईल त्याला कुठला ना कुठला आधार देत जगणारे हे सैनिकच असतात. अष्टावधानी, संस्कृत पंडित, सात्विकतेची मूर्ती अशा डॉ. घनश्यामल प्रसाद राव यांना विनम्र भावांजली.

- श्रीपाद कोठे

३० डिसेंबर २०१४

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

मूल्यभान

स्वातंत्र्य, समता, लोकशाही वगैरे मूल्यांनी जगाचं अतोनात नुकसान केलं आहे. अजूनही करत आहेत. त्यावर विचार व्हायला हवा. या गोष्टी साधन असू शकतात, पण मूल्य नाही. स्वा. सावरकरांच्या गीतातील `जे जे उत्तम, उदात्त, उन्नत...' हे शब्द आपल्याला पाठ असतात. पण उत्तम, उदात्त आणि उन्नत होण्याची/ असण्याची ओढ आणि प्रेरणा या मूल्यांनी कुस्करून टाकली आहे. आपण जन्मजात तसेच आहोत अशा थाटात प्रत्येक जण वागताना दिसतो, तो याचाच परिणाम. व्यक्तिश: आणि समूहश: आपली विचारप्रक्रिया, मानसिकता इतक्या खोलपर्यंत बिघडलेली आहे की विचारता सोय नाही. अगदी इलेक्ट्रिशियन, प्लंबरपासून तर स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यापर्यंत; किंवा औद्योगिक विवादापासून शिक्षकांच्या दर्ज्यापर्यंत असंख्य गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर समस्या सोडवण्याचे प्रयत्नदेखील या मूल्यांनी तयार केलेल्या आपल्या मानसिकतेमुळे यशस्वी होऊ शकत नाहीत.

- श्रीपाद कोठे

२९ डिसेंबर २०१४

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

राम माधव यांचे विधान

भाजप प्रवक्ते राम माधव यांनी अल जझीराच्या कार्यक्रमात अखंड भारताबद्दल व्यक्त केलेल्या मतावरून चर्चा सुरु झाली आहे. खरं तर त्यांनी काही खूप खळबळजनक वगैरे काही म्हटलेलं नाही. उलट हिंदू भावविश्व त्यांनी बिचकत बिचकत व्यक्त केलं. ते एका सत्तारूढ पक्षाचे प्रवक्ते असल्याने ते स्वाभाविकही आहे. पण खरे तर या देशाची भावना `अखंड भारत' जवळ थांबू शकत नाही. आम्हाला तर `अखंड जग' हवं आहे. `वसुधैव कुटुंबकम' किंवा `कृण्वन्तो विश्वमार्यम' ही भावना तर अखंड भारताच्या कितीतरी पुढे जाणारी आहे. त्यामुळे पहिली पायरी म्हणून सगळ्यांनी राम माधव यांच्या वक्तव्याचे स्वागतच करायला हवे.

या निमित्ताने आणखीन एक गोष्ट स्पष्ट झाली. संघ आणि संघ परिवाराला मुसलमानांशी ना वैर आहे ना त्यांच्याविषयी भीती आहे. उलट त्यांच्यासह जगण्याची संघ आणि परिवाराची तयारी आहे. सहजीवनाचा व्यवहार विकसित करण्यास त्यांची हरकत नाही. पण बाकीच्यांचे मुसलमान प्रेम किती बेगडी आहे किंवा वरून प्रेमाचा कितीही देखावा करीत असले तरीही मनातून कशी भीती आहे हेच बाकीच्यांनी दाखवून दिले. अर्थात १९४७ पासूनच्या देश विभाजनापासूनच हे वास्तव स्पष्ट झालेले आहे.

जागतिकीकरणाच्या कथित पाठीराख्यांचा उथळपणाही उघडा पडला. त्यांना जगाचा व्यापार एक हवा, पण सगळ्यांचे सहजीवन मान्य नाही. एकमेकांवर कुरघोडी करायला, एकमेकांचे शोषण करायला त्यांना जगाचा बाजार हवा. मात्र `सर्वेपि सुखिन: सन्तु' साठी विश्वकुटुंब मात्र नको.

- श्रीपाद कोठे

२८ डिसेंबर २०१५

संसद भवन

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नवीन संसद भवन उभारण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिला असल्याची बातमी आहे. विद्यमान संसद भवन ८८ वर्षांचे असून जागाही अपुरी पडते असे त्यांनी याबाबत म्हटले आहे. नवीन संसद भवन सध्याच्या संसद भवनाच्या जागेवर उभारावे किंवा त्यासाठी दुसरी जागा द्यावी, असे त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

नवीन संसद भवन उभारण्याची सूचना नक्कीच स्वागतयोग्य आहे. माझे-तुझे असा वाद न करताही एक गोष्ट मान्य करावीच लागेल की, नवीन संसद भवन `आपले' राहील. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची भावना वेगळी राहील. अन ते आवश्यकही आहे. सध्याचे संसद भवन इंग्रजांचे आहे. आजवर त्याने दिलेल्या योगदानासाठी धन्यवाद देऊन त्याला निरोप द्यावा. नवीन संसद भवन भारतीय इमारत, शिल्प व चित्र शैलीनुसार उभारावे. ते मजबूत व टिकावू असावे, पुढच्या किमान १०० वर्षातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन तेवढे प्रशस्त असावे, अन सूर्यप्रकाश अन हवा यांचे सुयोग्य नियोजन त्यात असावे. त्यात आवाजाचा नीट विचार करावा अन एअर कंडिशनर नसावे. शिवाजी महाराजांच्या दरबारात अगदी शेवटला माणूस बोलला तरीही राजांना अन दरबाराला स्पष्ट ऐकू जाईल अशी व्यवस्था होती, असे वर्णन आहे. नागपूर जवळच्या बाजारगाव येथे एक पुरातन गुहा सापडली असून, त्यात एक रंगमंच आहे. या रंगमंचाची देखील ही खासियत आहे. ध्वनिक्षेपक नसतानाही आवाज दूरवर आणि स्पष्ट. अशा वैशिष्ट्यांचाही विचार नवीन संसद भवन उभारताना व्हावा.

नवीन संसद भवन उभारले गेल्यास आताच्या जागेवरच उभारावे. दुसरी जागा त्यासाठी दिल्यास दोन गोष्टी होतील. एक तर आजकाल जागेचा तुटवडा आहे. त्यात भर पडेल. दुसरे म्हणजे, लगेच विद्यमान संसद भवन वारसा म्हणून जतन करण्यात येईल. यानिमित्ताने या `वारसा' राजकारणाचा अन समाजकारणाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. `वारसा' `स्मृतीस्थळ' इत्यादी प्रकरण आपल्या येथे वाजवीपेक्षा जास्त आहे. एक उदाहरण द्यायचे तर- पन्हाळगडाचे देता येईल. पन्हाळगडावरील गंगा, यमुना, सरस्वती ही धान्याची तीन अगडबंब कोठारे वटवाघुळांची वस्ती झाली आहे. एकीकडे शेतमाल साठवण्याच्या कोठारांची वानवा आहे तर दुसरीकडे, असलेली कोठारे उंदीर घुशींसाठी राखीव करून ठेवलेली आहेत. यासाठी यासंदर्भात मुळातूनच विचार व्हायला हवा. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या बंगल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने एक चांगला पायंडा घातला आहे. तीच भूमिका पुढेही कायम राहावी आणि नवीन संसद भवन आहे त्याच जागेवर उभारावे किंवा अन्य जागेत उभारले तरीही सध्याच्या इमारतीचे स्मारक करू नये किंवा त्या जागी नवीन स्मारक वा त्यासारखे काही करू नये. अन्य जागांसारखीच ती जागा मानावी.

- श्रीपाद कोठे

२८ डिसेंबर २०१५

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

जय कलियुग, जय जय कलियुग

सगळी गंमत आहे. देवाधर्माचे धडे अभिनेते आणि चित्रपट देत आहेत. लोक त्यालाच धार्मिक शिक्षण समजत आहेत. रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद-उपनिषदे, स्मृती, आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, कबीर, नानक, दादू, मीरा, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, चिन्मयानंद, दयानंद, गोरखपूर प्रेसची प्रकाशने, अलवार संत, तिरुवल्लुवर; असली सगळी नावेही धर्मशिक्षण देणाऱ्या अभिनेत्यांनी किंवा त्यांच्याकडून ते घेणाऱ्या लोकांनी ऐकली नसतील. सांख्य, योग, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशेषिक ही षडदर्शने आहेत हे कधी त्यांच्या कानावरून गेले नसेल. हजारो वर्षात होऊन गेलेल्या हजारो ऋषी मुनी संत यांनी केलेले प्रबोधन किती प्रचंड आहे याची यांना कल्पनाही नसेल. या विषयावर अधिकारवाणीने खंडन वा मंडन करण्यासाठी लागणारे सायास, अभ्यास वा साधना यांनी केली असण्याची शक्यताच नाही. तरीही दीडशहाणे लेखक, दिवटे अभिनेते चित्रपट काढून शिकवणार आणि गल्ला किती जमा झाला यावरच नजर ठेवून तयार केलेले चित्रपट पाहून आपण सर्वज्ञानी होणार !!! जय कलियुग, जय जय कलियुग.

- श्रीपाद कोठे

२७ डिसेंबर २०१४

मानव

 १) भांडवलशाही आणि उपभोगवाद,

२) समाजवाद आणि लोकशाही,

३) विज्ञानवाद आणि इहवाद,

ही तीन नाणी आहेत आणि त्या प्रत्येक नाण्याच्या दोन दोन बाजू.

- पहिल्या नाण्याने माणसाला पशू समजले आणि पशू बनवले.

- दुसऱ्या नाण्याने माणसाला मतदार समजले आणि मतदार बनवले.

- तिसऱ्या नाण्याने माणसाला निर्जीव दगड समजले आणि निर्जीव दगड बनवले.

*****************

जगातील आजचे सगळे विचार, व्यवस्था, विमर्श, व्यवहार; या तीनपैकी कुठल्या तरी साच्यात किंवा त्यांची सरमिसळ करून सुरू आहेत. त्यालाही मोठा काळ लोटला आहे. हाती फक्त शून्य. त्यामुळे फक्त विचार, व्यवहार, व्यवस्था यांची चर्चा करून उपयोग नाही. तर या तीनपेक्षा वेगळा असलेला मानव समजून घ्यावा लागेल. मानवाची भारताची कल्पना ही याहून भिन्न आहे. सगळ्यात पहिले ती समजून घेणे आणि समजावून देणे आवश्यक आहे. त्यानंतर बाकी साऱ्या गोष्टी. असाच क्रम असावा लागेल. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे

२७ डिसेंबर २०१९

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

घी और डिब्बा

एका गृपवर हा मेसेज आला. अन्यत्र चित्रासहितपण हाच मेसेज पाहायला मिळाला. खूप खटकलं. आक्रमकता कमीअधिक असणे, आक्रमकतेबद्दल काही धोरणात्मक मत असणे, धोरणात बदल; हे सगळे समजून घेता येतेच. पण साधेपणा, सरळपणा ही वाईट गोष्ट आहे; असा जो एक subtle सूर या मेसेजमध्ये आहे; त्याचे समर्थन करता येत नाही. 'कोणीतरी असं करतात' असं म्हणून त्याकडे कानाडोळा करणं हे योग्य होणार नाही. स्वामी विवेकानंद असोत की या देशाची संत परंपरा; यांच्याविषयी सुद्धा अशाच हलक्या आणि उपहासपूर्ण पद्धतीने ज्यावेळी बरेच लोक बोलू लागतात, तेव्हा ती गंभीर बाब ठरते. राजकीय फायदातोटा एवढी एकच गोष्ट म्हणजे जीवन असतं का? आक्रमकता वेळप्रसंगी आवश्यक असतेच, पण याचा अर्थ सरलता अन शांत वृत्ती अयोग्य असते का? आक्रमकता डोक्यात का जाते? अन आक्रमकता डोक्यात जाणे योग्य ठरते का? भारत, भारतीय जीवन, हिंदू, धर्म, परंपरा इत्यादींवर जाणीवपूर्वक आघात करणाऱ्यांबाबत आक्रमक होणे, त्यात संतुलन गमावणे; योग्य नसले तरीही समजून घेता येते. पण जेव्हा आपल्याच माणसांची सात्विक वृत्ती आपल्या आक्रमकतेचे अनावश्यक लक्ष्य बनते, तेव्हा ते केवळ आक्षेपार्हच नाही तर धिक्कारार्ह म्हटले पाहिजे. आक्रमकता, संघर्ष हे आपद्धर्म असतात, अनेकदा आवश्यक असतात; पण जीवनाचा प्रधान स्वर हा सात्विकता, समंजसपणा हाच असतो, असायला हवा. आक्रमकता ही त्या त्या वेळची गरज असली तरी, नित्य संघर्षशील जगातून कणाकणाने समंजसपणाकडे जाणे, म्हणजेच मानवी सभ्यता. मनुष्यजात पूर्ण सभ्यतेला पोहोचलेली नाही हे खरे आहेच, पण समंजसपणा वाढवत जाणे हीच त्याची दिशा असू शकते. आजवरच्या मानव समाजाने तेच केलेले आहे आणि भारत हा त्या प्रयत्नांचा मुकुटमणी आहे. आज जर सभ्यतेचा तो प्रवास नाकारला जात असेल, तर तो भारताच्या कण्यावर आघात आहे यात संशय असू नये. कण्यावरचा हा आघात वाढत राहिला, त्याला अटकाव केला गेला नाही; तर भारत तर लयाला जाईलच पण मानवजात भरकटल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट अगदी खूणगाठ म्हणून लक्षात ठेवली पाहिजे की, आक्रमकता फार काही साध्य करू शकत नाही. अनेकांना त्रास होईल, अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, पण एक गोष्ट लक्षात आणून दिलीच पाहिजे की; छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्यानंतरही समस्या संपल्या नाहीत. आजच्यापेक्षा अधिक असलेला दहशतवाद शिवरायांनी मोडून काढला पण तो पुन्हा उफाळून आलाच. संताजी धनाजी घोड्यांना पाण्यात दिसत, पण ते सारेच लयाला गेले. महाभारत युद्धाने सुद्धा मानवजात किती पुढे गेली? शिवराय चुकीचे नव्हतेच. महाभारत युद्धदेखील चूक नव्हतेच. पण शौर्याने बहाल केलेल्या परिस्थितीत कणाकणाने समंजसपणा वाढवायचा असतो. त्याला पर्याय नसतो अन तोच उपाय असतो. भारताने हे भान आजवर जोपासले आणि जगाला देण्यासारख्या ज्या गोष्टी भारताकडे आहेत त्यात हे भान महत्वाचे आहे. आज जर आम्ही हे भान चुकीचे ठरवत असू तर ते दुर्दैवीच ठरेल. आक्रमकता डोक्यात गेलेले लोक हा समाजाचा मुख्य प्रवाह नसेलही कदाचित, पण त्याला मौन संमती देण्याने तो मुख्य प्रवाह होण्याच्या दिशेने जाईल, हे सगळ्याच सुजाण लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

शनिवार, २६ डिसेंबर २०२०

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

हिंदू आहोत म्हणूनच...

`नाताळाच्या शुभेच्छा देऊ नका कारण आपण हिंदू आहोत आणि ख्रिश्चन मंडळी मोठ्या प्रमाणावर हिंदूविरोधी कारवाया करीत आहेत.' अशा आशयाच्या पोस्ट वाचून, चर्चा वाचून मनात आले किती विसंगत आहे हे म्हणणे. म्हणजे ख्रिश्चन मंडळी हिंदूविरोधी कारवाया करीत आहेत हे अगदी खरे आहे, पण म्हणून नाताळाच्या शुभेच्छा न देणे न पटणारे आहे. आपले मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी कोणी ख्रिश्चन असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात. आपण हिंदू आहोत म्हणूनच आपण नाताळाच्या शुभेच्छा देतो, देऊ शकतो, द्यायला हव्यात. आपण तसे नाही केले तर आपले हिंदुपण खऱ्या अर्थाने उरणार नाही, जपले जाणार नाही. त्याचवेळी सगळ्या जगाला ख्रिश्चन बनवण्याचे जे उद्योग आहेत त्यांना विरोध करून तसे होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हवी. मनात दुसऱ्याचा राग वा द्वेष न बाळगता, अयोग्य गोष्टींना विरोध आणि त्यांचा बंदोबस्त करणे; सोबतच- सर्व चराचराबद्दल आत्मीयतायुक्त व्यवहार हेच हिंदुपण आहे. अयोग्य गोष्टीला विरोध करण्याचे सामर्थ्यही असायला हवे आणि सगळ्यांबद्दल आत्मियता बाळगण्याचे मोठेपण अन उमदेपणही हवे. नाव हिंदू राखून ख्रिश्चनांसारखे वागायचे, की ख्रिश्चन बहिरंगात आंतरिक हिंदुपण निर्माण करायचे? इतरांना शुभेच्छाही देण्याची दानत नसणे हे ख्रिश्चन वा अन्य संकुचित विचारांचे लक्षण आहे, हिंदूंच्या व्यापक वैश्विक विचारांचे ते लक्षण नाही.

- श्रीपाद कोठे

२५ डिसेंबर २०१४

ठकासी आणावा महाठक

 'ठकासी आणावा महाठक' ही समर्थोक्ती प्रसिद्ध तर आहेच पण लोकप्रियदेखील आहे. आजकाल तर फारच सुळसुळाट झाला आहे या तत्वाचा. पण समर्थांच्या एकूण विचारसंपदेत हा विचार किती आहे? कसा आहे? ब्रम्ह निरुपणापासून तर असंख्य ऐहिक, लौकिक, आध्यात्मिक विचारांचा, भावांचा, व्यवहारांचा उहापोह समर्थांनी केला आहे. त्यासह आणि त्या प्रमाणात 'ठकासी आणावा महाठक' हे योग्य वाटते. मात्र त्याशिवाय आणि प्रमाणात नसलेले हे तत्व योग्य म्हणावे का? ते तर फक्त दोन बोक्यांचे भांडण म्हणावे लागेल.

- श्रीपाद कोठे

२५ डिसेंबर २०१९

*********

याला आभास कसं म्हणायचं? अनेक जण मिनिटभराचा का होईना, आपला वेळ खर्च करतात, शुभेच्छा व्यक्त करतात, प्रार्थना करतात; ती व्यक्ती, तिचं मन प्रत्यक्ष हे करत असतात.. हा आभास नसतो, हे वास्तव असते. प्रत्यक्ष हातात हात घेणे किंवा मूर्त रुपात जवळ असणे, दिसणे, अनुभवणे हे वास्तवाचं एक रूप; तर यातील काहीही नसलेलं वास्तवाचं हे दुसरं रूप. अरुपासारखं भासणारं रूप. तरल वास्तव. आपण सगळ्यांनी व्यक्त केलेल्या भावना म्हणूनच वास्तव आहेत. विश्वातील समग्र कटुतेला पुरून उरणारी आणि उरण्याएवढी मधुरता, जपण्याची अन जोपासण्याची शक्ती यातून मिळेल असा विश्वास आहे.

सगळ्यांना धन्यवाद.

- श्रीपाद कोठे

२४ डिसेंबर २०१७

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

देव आणि सरकार

सगळ्या समस्या देवाने सोडवाव्या. - चूक

सगळ्या समस्यांसाठी देव जबाबदार.- चूक

सगळ्या गोष्टींसाठी देवाने धावून यावं. - चूक

सगळ्या समस्या देव सोडवू शकेल. - चूक

सगळ्या गोष्टी देवाला मागायच्या. - चूक

आम्ही काहीही, कसंही वागलेलं देवाने चालवून घ्यायचं.- चूक


अन...


सगळ्या समस्या सरकारने सोडवाव्या. - ??

सगळ्या समस्यांसाठी सरकार जबाबदार.- ??

सगळ्या गोष्टींसाठी सरकारने धावून यावं. - ??

सगळ्या समस्या सरकार सोडवू शकेल. - ??

सगळ्या गोष्टी सरकारला मागायच्या. - ??

आम्ही काहीही, कसंही वागलेलं सरकारने चालवून घ्यायचं.- ??


दोन्ही भूमिकात काय मुलभूत फरक आहे?

- श्रीपाद कोठे

२३ डिसेंबर २०१४

शनिवारे सर

काही लोक पुस्तके विकत घेतात, वाचत नाहीत. काही पुस्तके वाचतात, विकत घेत नाहीत. काहींना दोन्ही शक्य असतं. काहींना दोन्ही शक्य नसतं. काहींना दोन्ही आवडतं, काहींना दोन्ही आवडत नाही. वडिलांना पुस्तके विकत घेणे आणि वाचणे दोन्हीचा छंद. शिवाय ग्रंथालयातून आणून वाचण्याचाही. आम्ही बहिण भाऊ, जावई, सून, नातवंडे यांच्यातही ते उतरले. शिवाय काका, मामा, चुलत-मामे भाऊ यांच्यातही पुस्तकप्रेम; विकत घेणे आणि वाचणे या दोन्ही अंगांनी बहरलेले. त्यामुळे अनेकदा भेटीही पुस्तकांच्या. भरीसभर मी पत्रकारितेत. त्यामुळे तिकडूनही पुस्तके जवळ येत राहिली. परिणामी घरात भरपूर पुस्तके. आता मात्र माणसे आपापल्या कामाने विखुरली. वडील वृद्धत्वामुळे पुस्तकांपासून दूर, जमलेल्या आणि जमवलेल्या बहुतांश पुस्तकांचे वाचनही झालेले. पुस्तकांची जपणूक हाही मुद्दा ओघानेच आलेला. त्यामुळे मनात विचार आला जेथे वाचले जात असेल अशा ग्रंथालयाला आपल्या संग्रहातील काही भाग द्यावा. मनात विचार असतानाच आमचे मित्र, संघाचे कार्यकर्ते आणि भारतीय विचार मंचाचे पदाधिकारी गिरीश हरकरे घरी आले. सहज बोलताना ते निवासाला असलेल्या नागपूरच्या हनुमाननगरच्या ग्रंथालयाचा विषय निघाला. त्यांना मनातला विचार सांगितला. त्यांनी लगेच होकार दिला. सगळी व्यवस्था केली. योग जुळवून आणला आणि काल एका छोटेखानी, अनौपचारिक कार्यक्रमात जवळपास २०० छोटी-मोठी पुस्तके हनुमाननगरच्या ग्रंथालयाला भेट दिली.

४९ वर्षे पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या या ग्रंथालयाचा इतिहास त्या निमित्ताने समजला. उर्मी, प्रयत्न आणि सातत्य यातून अशा संस्था उभ्या राहतात, टिकतात, वाढतात. समाजालाही त्याचा उपयोग होतो. अन खऱ्या अर्थाने माणसाचे भरणपोषण करणारी अशी लहानलहान कामे करणारी मंडळी अनाम, अप्रसिद्ध असते. धरतीला सुपीक करणाऱ्या मृगधारांसारखी.

ग्रंथालयात बसलो असताना अशीच एक व्यक्ती मनात उगवली. स्व. गो. सी. शनिवारे. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तिका आणि त्यांच्यावरील एक पुस्तिका यांचाही २०० पुस्तकात समावेश होताच. मन थेट ४० वर्षे मागे गेलं. आठवीत होतो. गो. सी. शनिवारे आमचे शिक्षक. मराठीचे. शिक्षक - विद्यार्थी संबंध आजच्यासारखे friendly नसणारा, ७० च्या दशकाचा काळ. असाच २३ डिसेंबर होता. आमच्या शाळेत त्यावेळी पटांगणातल्या फळ्यावर वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव लिहिण्याचा उपक्रम होता. त्या दिवशी माझे नाव फळ्यावर होते. प्रार्थना होऊन तासिका सुरु झाल्या. वर्गात येणारे शिक्षक, शिक्षिका मला शुभेच्छा देऊन शिकवणे सुरु करीत होत्या. त्याचं एक अप्रूप वाटत होतं. तिसरी किंवा चौथी तासिका असेल. ती होती शनिवारे सरांची. ते वर्गात आले. मला शुभेच्छा दिल्या आणि जवळ आले. त्यावेळच्या अनेक शिक्षकांप्रमाणे धोतर, झब्बा असाच त्यांचा वेश. झब्ब्याच्या खिशात त्यांनी हात घातला आणि बंदा रुपया काढला. एक रुपया ही मोठी गोष्ट होतीच. शाळेशेजारीच असणाऱ्या आशियातील मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाहनतळावर; शिकणारे आणि शिकवणारे यांच्या सायकली उभ्या असत. त्याही उंचेल्या, आधी balance घेऊन मग सीटवर बसण्याच्या. अनेक शिकणारे आणि शिकवणारे तर बसने ये-जा करीत. त्यावरून रुपयाची किंमत कळावी. तर शनिवारे सरांनी रुपया काढला आणि म्हणाले- हात पुढे कर. हे अनपेक्षित होते. शुभेच्छा देण्यासाठी फळ्यावर नाव लिहिणे आणि शिक्षकांनी शुभेच्छा देणे; हे उपक्रम शाळेने नुकतेच सुरु केले होते. पण त्याशिवाय अधिक काही नाही. चोकलेट, भेटी वगैरे नाहीच. शिवाय संस्कार आणि वातावरण. मी म्हटले- `नाही सर. मी नाही घेत. घरी आवडणार नाही.' तरीही त्यांनी आग्रह केला आणि मी हात पुढे केला नाही त्यामुळे बेंचवर तो रुपया ठेवून ते शिकवू लागले.

तास संपला. मधली सुटी झाली. काय करावं सुचत नव्हतं. शनिवारे सरांनी शाळेबाहेर, राजाबाक्षा मारुती मंदिराच्या जवळ `आपले दुकान' नावाचं एक छोटंसं दुकान लावलं होतं. शाळेच्या आधी व नंतर थोडा वेळ आणि मधल्या सुटीत ते दुकान उघडीत असत. शालेय साहित्य आणि गोळ्या बिस्किटे दुकानात ठेवत. सुटी होताच, मी त्यांनी दिलेला रुपया घेतला आणि `आपले दुकानात' गेलो. सर म्हणाले- काय रे? म्हटले - `सर, प्लीज हा रुपया परत देतो. तो घ्या.' त्यावर ते हसले. म्हणाले- `कसा रे तू? तुझे वडील मला ओळखतात. आम्ही मित्र आहोत. काही म्हणणार नाहीत ते.' तरीही मी आग्रह केला तेव्हा म्हणाले- बरं. त्यांनी रुपया परत घेतला आणि एक छान शाईचं पेन काढून मला दिलं. म्हणाले- `हे तुझा मास्तर देतो आहे. त्याची ही आज्ञा आहे.' मी ते पेन घेतले. पुष्कळ दिवस ते वापरीत होतो.

दहावीनंतर शाळा सुटली. काही वर्षांनी सर निवृत्त झाले. तरीही कधीमधी घरी येत. वडिलांचे मित्र असले तरीही वडिलांपेक्षा वयाने मोठे होते. त्यामुळे आईला सुनबाई म्हणत असत. आले की सांगत- सुनबाई चहा घेईन किंवा सुनबाई आज चहा नको. कधी सहज भेटायला, कधी स्वत: लिहिलेलं पुस्तक द्यायला. मी पत्रकारिता सुरु केल्यानंतरची गोष्ट. एकदा टायफॉईडने आजारी असताना त्यांना कुठे तरी कळलं. तेव्हा भेटायला आले होते. सर आग्रही वृत्तीचे होते. वाणी खणखणीत होती. स्वभाव सात्विक होता. अभिरुची उत्तम होती. वाचन दांडगं होतं. लेखनकला होती. आचार विचार शुद्ध होते. पूर्णतः निर्व्यसनी आणि मनाने निर्विष होते. पण... ... हा पणच खूप महत्वाचा असतो. हा पणच आयुष्याचं कोडं असतो. सगळं असूनही शनिवारे सरांच्या विशाल भाळावर सुख, शांतता, समाधान लिहिलेले नव्हते. कधी बोलण्यात सहज उल्लेख आला तरच. अन्यथा मुद्दाम कधी बोलत नसत. पण सरांचं व्यक्तिगत आयुष्य फार निराशाजनक आणि करुण गेलं. संसार, मुले, कुटुंब सगळ्याच बाबतीत विफलता. अखेरच्या दिवसात एकाकी. तरीही फिरणे, भेटीगाठी, संबंध, वाचन, लेखन सुरूच. त्यांचीही काही स्वभाववैशिष्ट्ये असतीलच. पण तशी कोणाची नसतात. सरांच्या बाबतीत मात्र विफल जीवनासाठी बोट दाखवायला प्रभूने `स्वभाववैशिष्ट्य' ही एक जागा ठेवली होती. शिक्षक असल्याने निवृत्तीवेतन वगैरे मिळत असणारच. पण `चलनवाढ' नावाच्या पश्चिमेच्या अर्थशास्त्राने दिलेल्या देणगीने जसे जगभरात असंख्यांना भरडून काढले तसेच त्यांनाही भरडले. शिवाय आणखीही काही बाबी होत्याच. तेव्हाचे नागपूरचे खासदार आणि विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित कधीतरी पैसे देत असत. अर्थात स्वत:हून. सरांनी कधीच हात पसरला नाही. कधी श्री. पुरोहित भेटूनही जात. स्वत:चं घरदार, पैसाअडका, माणूस असं काहीही सोबत नसतानाच एक दिवस सरांनी जगाचा निरोप घेतला.

प्रयत्न, परिश्रम, सद्गुण, सचोटी, उपक्रमशीलता, अभिक्रमशीलता इत्यादी इत्यादी असले की; सुख यश पायाशी येतं असं म्हणतात. पण अशा सगळ्या समीकरणांना पार वाऱ्यावर भिरकावून देणारी उदाहरणेही पाहायला मिळतात. स्व. गो. सी. शनिवारे नावाचे आमचे शिक्षक हे तसं उदाहरण. एक मात्र खरं की, रूढ, मनाला बरं वाटणारी समीकरणे भिरकावून देणारा काळही; त्यांच्यातील सत्व, स्वत्व, सदाचार, सुसंस्कृतपणा यांना धक्का लावू शकला नव्हता. त्यांची पुस्तके अन त्यावरील त्यांची छबी नजरेपुढे आली तेव्हा हे सगळं मनात जागलं आणि कडा ओलावल्या.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २४ डिसेंबर २०१७

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

जगाने हिंदू व्हायला हवे

सगळ्या जगाने हिंदू होण्याला पर्याय नाही. तसे झाल्याशिवाय जगाचे भले नाही. कारण-

हिंदू होणे म्हणजे-

अ) कोणी कोणत्याही मार्गाने ईश्वराची भक्ती, आराधना करू शकतो या तत्वाला मान्यता देणे.

ब) ईश्वर न मानण्याचीही पूर्ण मुभा.

क) आपल्याच मार्गाने ईश्वराची प्राप्ती होईल या आग्रहाचा त्याग.

ड) `सर्वेपि सुखिन: सन्तु' या तत्वाचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात आग्रह.

इ) सगळ्यांना असे सुख प्राप्त व्हावे यासाठी तडजोड करण्याची तयारी.

ख्रिश्चन, मुस्लिम, कम्युनिस्ट, जडवादी, विज्ञानवादी, भांडवलवादी यापैकी कोणीही ही तत्वे मान्य करीत नाहीत. १००% हिंदू समाज या तत्वांचे १००% पालन करीत नाही. पण ही तत्वे केवळ आणि केवळ हिंदूच मान्य करतात. अन्य लोक तर ती मान्यही करीत नाहीत. मग तत्वे मान्य करून त्यानुसार व्यवहार करण्याचा आग्रह धरणे उचित की, ही उदार आणि सर्वसमावेशक तत्वे बासनात गुंडाळून ठेवणे इष्ट. अन ही तत्वे जर योग्य असतील तर ती काही प्रमाणात का होईना आचरणात आणणारा आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करण्याचा इतिहास असणारा हिंदू टिकायला हवा की नाही? मग तो टिकण्यासाठी प्रसंगी आपद्धर्म म्हणून आक्रमक होण्यात चूक काय?

संपूर्ण जगाने हिंदू होणे योग्य की अहिंदू होणे योग्य? ही तत्वे मानणे आणि आचरणात आणणे म्हणजे हिंदू असणे. ही तत्वे मान्य करून अन आचरण्याचा प्रयत्न करून कोणी मशिदीत वा चर्चमध्ये जात असेल तर ती व्यक्तीही हिंदूच म्हणावी लागेल. गणेशाचे, शिवाचे, रामाचे, कृष्णाचे, देवीचे; तसेच अल्लाचे आणि येशूचे मंदिर असू शकेल. ही तत्वे मानली आणि पाळली म्हणजे झाले? हिंदू सोडून कोणाला ही तत्वे मान्य आहेत.

- श्रीपाद कोठे

२२ डिसेंबर २०१४

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

देवयानी प्रकरण आणि स्वामी विवेकानंद

भारतीय राजनयिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत जी वागणूक मिळाली त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. अत्यंत वाईट, असभ्य, घृणास्पद, लाजीरवाणा असा हा प्रकार आहे. या प्रकरणामुळे नाकाने कांदे सोलणार्या अमेरिकेचा खरा चेहरा उघड झाला आहे. अमेरिकेचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा स्पष्ट झाला आहे आणि त्याची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली आहेत. भारत सरकारने ज्या पद्धतीने हा विषय लावून धरला ते अभिनंदनीय आहे. तपशीलावर चर्चा होऊ शकेल, पण त्यातील भावनेशी सगळेच सहमत होतील.

देवयानीच्या या प्रकरणात वंशवाद, वर्णभेद, उन्मत्तता, अहंमन्यता, पैशाचा माज आणि अर्थधार्जिणी मूल्यव्यवस्था या गोष्टी आहेत. सुमारे १२० वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनाही या गोष्टींचा अनुभव आला होता आणि त्यांनी त्याची हजेरीही घेतली होती. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेपूर्वी मिशिगन सरोवराच्या काठी भरलेले प्रदर्शन पाहायला स्वामीजी गेले असता, काही लोकांनी त्यांची कफनी धरून ओढली होती. वेगळ्या देशातील, वेगळ्या वंशाच्या, वेगळ्या वर्णाच्या, वेगळी वेशभूषा केलेल्या माणसाची मस्करी करणे आणि त्याचा अपमान करणे हाच त्या लोकांचा उद्देश होता. स्वामीजींनी जेव्हा अस्खलित इंग्रजीत, कठोर स्वरात त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. बोस्टन शहरात तर एकदा त्यांच्या मागे मोठा जमावच लागला होता. स्वामीजींना चक्क रस्त्याने पळत पळत जीव वाचवावा लागला होता. असे अनुभव आल्यामुळेच एकदा अमेरिकेतीलच एका व्याख्यानात त्यांनी अमेरिकन श्रोत्यांना थेट भेदक प्रश्न विचारला होता, `केवळ मी हिंदू असल्याने मला अनेकदा बसायला साधी खुर्चीही तुमच्या देशात नाकारण्यात आली आहे. यावर तुमचे काय उत्तर आहे?'

पैशाचा माज आणि पैसा हेच एकमेव मूल्य समजण्याच्या वृत्तीवर तर त्यांनी कडक प्रहार केले. `भारतातील जातीभेदापेक्षाही तुमचा डॉलरवर आधारलेला जातीभेद जास्त घातक आणि वाईट आहे,' असे सडेतोडपणे त्यांनी अमेरिकनांना ठणकावले होते. एकूणच पाश्चात्य, विशेषत: अमेरिकन समाजातील अर्थधार्जीण्या मूल्यव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले होते, `तुमच्या समाजात पैसा हेच सर्वस्व आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तो येथे जगूच शकत नाही. कोणी जर उद्या म्हटले की, मला नाक धरून बसायचे आहे आणि ध्यानधारणा करायची आहे, तर ते येथे होऊच शकणार नाही. भारतात कोणीही अशा तर्हेने आपली साधना करू शकेल. समाज त्याच्या जीविकोपार्जनाची काळजी घेईल.'

`नॉर्दम्टन डेली हेराल्ड' या वृत्तपत्राने १६ एप्रिल १८९४ रोजी स्वामीजींच्या १४ एप्रिल १८९४ च्या एका व्याख्यानाचा वृत्तांत प्रकाशित केला. त्या वृत्तांतात म्हटले होते, `धनासंबंधीचा लोभ, ऐषआरामाच्या मागे लागण्याचा राष्ट्रीय दुर्गुण, स्वार्थपरता, युरोपातील व अमेरिकेतील वर्चस्व गाजविणार्या गोर्या लोकांना नैतिक व सामाजिक दृष्टीने भयंकर धोका निर्माण करणारी त्यांची डॉलरवर आधारलेली जातीभेदाची भावना- या सार्या गोष्टींसंबंधी वक्त्यांनी केलेली कानउघाडणी अगदी ठीकच होती आणि त्यांनी आपले हे विचार अत्यंत प्रभावीपणे पुढे मांडले.' सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी एका अमेरिकन वृत्तपत्राने स्वामीजींच्या या विचारांना दिलेली प्रसिद्धी आणि त्यांनी केलेली कानउघाडणी

ठीक होती; हा व्यक्त केलेला स्वत:चा अभिप्राय, अतिशय बोलका आहे. तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेचे मानस मुळीच बदललेले नाही, उलट त्यातील स्वार्थ आणि दुष्टावा अधिकच पक्का झालेला आहे हे देवयानी प्रकरणाने पुढे आणले आहे. 

स्वामीजींच्या या प्रतिक्रियांमध्ये फार गंभीर व सखोल आशय दडलेला आहे. देवयानी प्रकरणात त्याची प्रचीती येत आहे. पैसा हे जगण्याचे आणि विनिमयाचे साधन न राहता तो जीवनाचा पर्याय झालेला आहे. अन हा अत्यंत चुकीच्या अर्थसंस्कृतीचा आणि अर्थमूल्यांचा परिणाम आहे. चांगले किंवा वाईट, चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य, स्वीकार किंवा नकार, प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठा अशा सगळ्याच गोष्टी कशाच्या आधारावर ठरवायच्या, तर केवळ पैशाच्या आधारावर. सगळ्या गोष्टींचे मापदंड केवळ आणि केवळ पैसा, ही दूषित वृत्तीच यासाठी कारणीभूत आहे. या निमित्ताने जी वेगवेगळी माहिती समोर येत आहे ती या चुकीच्या मार्गाची आणि चुकीच्या विचारांची पुष्टी करणारीच आहे. देवयानीच्या घरी काम करणार्या महिलेच्या डायरीतील जी माहिती आता बाहेर येत आहे ती, मूल्यव्यवस्था आणि मानवीयता या दोन्ही बाबतीतला अमेरिकन व भारतीय दृष्टीकोन किती वेगळा आहे हे अधोरेखित करणारी आहे. हा केवळ दोन दृष्टिकोनातील फरक नाही, तर जगाच्या भल्यासाठी अमेरिकन दृष्टीकोन किती घातक आहे आणि भारतीय दृष्टीकोन कसा लाभदायी आहे याची जाणीव करून देणाराही आहे.

आज सगळे जग तथाकथित अमेरिकन कल्पना, संकल्पना, विचार, राहणीमान, जीवनशैली, सामाजिक- सांस्कृतिक- तर्हा, जीवनमूल्य यांनी भारावून गेले आहे. आपण भारतीयही त्याला अपवाद नाही. विशेषत: ज्यांच्या कुटुंबातील कोणीतरी तिकडे आहे, ते लोक तर अमेरिकेशिवाय श्वासही घेऊ शकत नाहीत. तिकडे राहत असलेले पत्रकार, लेखक, वकील अशी मंडळीही गेले दोन दिवस जी भाषा बोलत आहे, ती विचारहीनतेचा आणि संवेदनाहीनतेचा परिपाकच आहेत. `अमुक तुमचा विचार, अमुक आमचा विचार. आपण आपापल्या विचारानुसार जगू,' असे म्हणण्याचे दिवस केव्हाच मागे पडले आहेत. सगळं जग जवळ येत असताना सर्वसमावेशक, सगळ्यांचे हित जोपासणारी व्यवस्था, कायदे, मूल्य, संकल्पना विकसित करण्याची गरज आहे. `हम करे सो कायदा' ही अहंमन्य वृत्ती; दंभ, सत्तालालसा जोपासणारी वृत्ती निपटूनच काढावी लागेल.

हे जग कोणा एका अमेरिकेची जहागिरी नाही. सत्ता, संपत्ती, सद्गुण, बुद्धिमत्ता, विचार, समजूतदारी, शहाणपण यांचा मक्ता काही जगनिर्मात्याने अमेरिकेला दिलेला नाही. स्वामीजींनी या विषयांवर १२० वर्षांपूर्वीच द्रष्टेपणाने विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे. जगभरातील विविध समाजाचे आदर्श, विविध चालीरीती, विविध समजुती या सार्याकडे कसे पाहावे आणि त्याच्या एकीकरणाची प्रक्रिया काय राहील, त्यासाठी स्वीकार आणि नकाराचा आधार काय राहील वगैरे चर्चा स्वामीजींनी केलेली आहे. त्यांचे ते विश्लेषण आणि मार्गदर्शन समजून घेऊन सगळ्या जगाचे वैचारिक नेतृत्व स्वीकारण्याची तयारी भारताला करायला हवी. जगातील अन्य कोणताही देश हे काम करू शकत नाही.

भारताबाहेर वेगवेगळ्या नावाखाली भारतीयांना ज्या पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो आणि जगभरात विविध देशांच्या लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो ते पाहता, जगाची मानसिकता बदलण्याची गरज आहे हे लक्षात येते. काही दिवसांपूर्वी, आई आपल्या मुलाला हाताने जेऊ घालते म्हणून तिच्या गोंडस बाळाला त्याच्या डॉक्टर असलेल्या भारतीय आईपासून हिरावून घेण्याचे प्रकरण कितीतरी गाजले होते. तेही पाश्चिमात्य देशातच घडले होते. एका भारतीय महिला अधिकार्याची चौकशी आणि तपासणी केवळ ती साडी नेसली म्हणून याच अमेरिकेत करण्यात आली होती. या संबंधात अधिकृतपणे देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात हेच कारण नमूद करण्यात आले होते. आपल्यापेक्षा वेगळी वेशभूषा, वेगळी जीवनशैली, वेगळे खानपान हे सुद्धा सहन न करणारी ही कोणती मानवता? ही अत्यंत असहिष्णू अमानुषता केवळ कायदे, नियम यांचा विषय नाही. तेवढ्याने काहीही होणार नाही.

या संबंधातही स्वामीजींनी वेळोवेळी अत्यंत स्पष्ट मते मांडली. `बाल्टिमोर अमेरिकन' या वृत्तपत्रात २२ ऑक्टोबर १८९४ रोजी `क्रियाशील धर्म' या विषयावरील स्वामीजींच्या भाषणाचा वृत्तांत प्रकाशित झाला होता. स्वामीजी काय म्हणाले ते सांगताना या वृत्तात म्हटले होते, `ज्या क्षणी जग नि:स्वार्थ होईल त्याच क्षणी सारे दु:ख नाहीसे होईल. जोवर कायदे व संस्था यांच्या साहाय्याने समाज अनिष्ट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करतो तोवर अनिष्ट गोष्टी नष्ट होणार नाहीत. गेली हजारो वर्षे जगाने हा उपाय योजून पाहिला. पण तो सफल झाला नाही.' स्वामीजींचा अभिप्राय स्पष्ट आहे. मानसिकता, विचार करण्याची पद्धती, जगण्याचे प्रयोजन या सार्याचा फेरविचार आवश्यक आहे. ही जबाबदारी भारताचीच आहे. तोच भारताचा जीवनहेतू आहे, असेही स्वामीजींनी अनेकदा म्हटले आहे. जोवर या आदर्शाच्या दिशेने मोठी वाटचाल मानवसमाज करीत नाही, तोवर काही गोष्टी तात्कालिक धोरणात्मक बाब म्हणून कराव्या लागतील. त्या करायलाच हव्या. मात्र त्यासोबतच जगापुढील खरा धोका ओळखून दूरगामी दृष्टीने आवश्यक असलेले वैचारिक व नैतिक नेतृत्व भारताने स्वीकारायला हवे. देवयानीला न्याय मिळवून देतानाच भविष्यातील आपली जबाबदारीही भारतीय समाजाने उचलायला हवी. देवयानी प्रकरणाचा हा आशय आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २० डिसेंबर २०१३

धर्मांतर

धर्मांतराच्या मुद्यावरून खूप अकलेचे तारे तोडले जात आहेत. थोडा शिखांचा इतिहास काढून बघण्याची तसदी फारसे कोणी घेत नाही. गुरु नानकदेवांपासून गुरु तेगबहादूर यांच्यापर्यंत नऊ शीख गुरूंनी इस्लामला आत्मसात करण्याचा अथक प्रयत्न केला. अखेरीस दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांना खालसा पंथ स्थापन करावा लागला होता. त्यांनी नाराच दिला होता-

सकल जगत मे खालसा पंथ गाजे

जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे

अन त्यांच्या, ९ वर्षांचा जोरावर सिंह आणि ७ वर्षांचा फतेह सिंह या छाव्यांना मुस्लिम पंथ न स्वीकारल्याबद्दल भिंतीत चिणून मारण्यात आले होते.

ही काही फार जुनी गोष्ट नाही. फक्त ३१० वर्षे झाली त्याला.

आपण १७ व्या नाही तर २१ व्या शतकात आहोत. त्यावेळचा इस्लाम आज नाही. त्यावेळचा हिंदू आज नाही. त्यावेळची राजकीय, सामाजिक, आर्थिक, जागतिक स्थिती आज नाही. हे सगळं खरं आहे. पण अजूनही ती मानसिकता मोठ्या प्रमाणात आहे, हेही सत्य आहे. मुख्य म्हणजे- भोळेपणा कौतुकाचा विषय ठरू शकतो. मात्र त्याने काही साध्य करता येत नाही. मन परिवर्तन, मानवता वगैरे सुद्धा सजग, सावध राहून आणि संदर्भ लक्षात ठेवून आणि घेवून करावयाच्या गोष्टी आहेत; हे भान सुटता कामा नये.

- श्रीपाद कोठे

२० डिसेंबर २०१४


- वावा छान विश्लेषण केले आणि घरवापसीचे समर्थन केले पण एक गोष्ट विसरले साहेब, घर वापसी मध्ये जात कोणती मिळाली ? कारण हिंदू धर्म जाती विरहित आहे हे म्हणायचे धाडस आपण सुद्धा करणार नाही.

- हो, मी ते धाडस करतो.

- मग हे धाडस नीखलास खोट आहे आणि खोटे विचार ही हिंदू संस्कृती नसावी.

- Shahaji Patodekar तुम्ही तुमचे मत सांगू शकता, पण मी खोटा आहे हे कसे? याला धाडस म्हणायचे की मूर्खपणा? खऱ्याचा ठेका काय तुम्हाला देऊन ठेवला आहे का कोणी? यालाच म्हणतात, अक्कलशून्यता किंवा बौद्धिक दहशतवाद. म्हणजे मी म्हणतो तेवढेच फक्त खरे. कारण ते मी म्हणतो आहे. बाकीचे सारे खोटे. जरा स्वत:ला तपासा. जीभ उचलून टाळूला लावण्याचा उद्योग बंद करा.

- आहो असे गोल गोल बोलू नका आणि चुकीचा संदेश ठासून सांगू नका. 

घर वापसी वाल्यांना जात कोणती दिली ते सांगा. 

आम्ही आक्कलशून्य असू पण आक्कलवाल्यानी नीट आक्कल वापरावी सरळ मार्ग .उगाच जनतेला फसवू नये

- Shahaji Patodekar, राज्य घटनेने जर जातीविहीन समाज निर्माण केला आहे तर नसलेल्यालाही जात देण्याचा आचरटपणा कशाला करायचा? जातीशिवाय जगायला शिका ना !!! उगाच तोंडाच्या वाफा कशाला दवडायच्या? नाही तर म्हणा आम्हाला जातीवर आधारित समाजच हवा म्हणून किंवा आम्ही इतके नालायक आहोत की आम्ही जातीशिवाय जगूच शकत नाही म्हणून. जे जगू शकतात त्याविना त्यांना जगू द्या ना. मुळात काही चांगल्या आदर्श अशा निर्मितीत रस असणे वेगळे आणि नुसती कावकाव करणे वेगळे असते राव. अन यापुढे तुमच्याशी वाद करण्याची माझी इच्छा नाही. कृपया आपले सडके विचार स्वत:जवळ ठेवावे. माझ्या पोस्टवर उपदेश, सल्ले वा चर्चा करू नये.

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

नागरिकत्व

विविध युरोपीय देशांचा विस्तारवाद, हा विस्तारवाद आवरताना केलेली अनैसर्गिक देशांची रचना, दोन्ही (विशेषतः दुसरे) महायुद्धे यांच्यात आजच्या असंख्य समस्यांची बीजं आहेत. यांना युरोपीय पुनर्जागरणाने खतपाणी घातले आहे. घुसखोरी, शरणार्थी, नागरिकता हे विषयही त्यात येतात. स्वामी विवेकानंद किंवा गांधीजी यांच्या चरित्रात कुठेही पासपोर्ट, व्हिसा इत्यादी गोष्टी आढळत नाहीत. कारण त्यावेळी त्या नव्हत्याच. अनंत काणेकर यांनी 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' या शीर्षकाचे युरोप, रशिया भेटीचे प्रवासवर्णन लिहिले आहे. १९३० च्या दशकात. त्यातदेखील कुठेही पासपोर्ट, व्हिसा यांचा उल्लेख नाही. मग आज जगभरात हे विषय एवढ्या संघर्षाचे का होत आहेत? खूप खोलात जाऊन या गोष्टींचा विचार व्हायला हवा आहे.

(सध्या देशात सुरू असलेल्या वादाबाबत कोणती भूमिका मी घेतलेली नाही. प्रत्येकाने भूमिकाच घ्यावी, विचार करू नये; असे तर नाही नं. तसंच  सगळ्यांनी 'आज आणि आत्ता' यावरच बोलावं असंही नाही. मी विचार मांडतो आहे.

- श्रीपाद कोठे

१९ डिसेंबर २०१९

भीमांजली

जवळपास कुठेतरी लग्न असावं. संध्याकाळी सातपासून कानफाडू आवाजात गाणी सुरू झाली. चार तास डोकेदुखी सुरू होती. वाचन लेखन शक्य नव्हतं. मग सहज वाहिन्या बदलत बसलो. आपण बहुतेक मोजक्या वाहिन्या पाहत असतो. अनेक तर आपल्याला माहितीही नसतात. अशीच एक वाहिनी दिसली - आवाज India वाहिनी. त्यावर चक्क शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरू होता. मी त्या वाहिनीवर पोहोचलो तेव्हा व्हायोलिन सुरू होतं. त्यानंतर राकेश चौरसिया यांची बासरी. बरं वाटलं फार. या वाहिनीनेच ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तोच हा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपला तेव्हा आयोजकांनी आभार मानताना या कार्यक्रमाची माहितीही सांगितली. त्यानुसार - गेल्या पाच वर्षांपासून या भीमांजली कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात येते. सकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या वर्षी पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित विश्वमोहन भट सहभागी झाले होते. शास्त्रीय संगीताच्या त्या कार्यक्रमाला पहाटे सहा वाजता तीन हजार लोक उपस्थित होते. हीच परंपरा चार वर्षे चालली. यावर्षी कोरोनामुळे आयोजन आटोपशीर होते. हे सगळे ऐकून खूप समाधान वाटले. सामान्य माणसाची, संपूर्ण समाजाची अभिरुची घडवण्यात असे कार्यक्रम नक्कीच मोलाचे असतात. अभिरुची घडवण्याची ही प्रक्रिया आणखी विस्तारायला हवी आहे.

- श्रीपाद कोठे

१९ डिसेंबर २०२०

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

न्यायव्यवस्था

नेहमीच ऐकायला येणारी एक गोष्ट आज पुन्हा ऐकायला मिळाली- न्यायालये भावनांवर नाही, पुराव्यांवर चालतात. निमित्त- निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका. एकूणच न्यायिक तत्वज्ञानातील ही एक चूक आहे. न्यायालये कोणासाठी असतात? माणसांसाठी. मग माणूस म्हणजे काय? फार चर्वितचर्वण करता येईल. पण एक नक्की की, माणूस हा शरीर, मन, बुद्धी, तर्क, भावना, क्रिया-प्रतिक्रिया, इच्छा-आकांक्षा, विकार-विचार अन आणखीन बऱ्याच गोष्टींचं एक अजब (non definable) रसायन आहे. त्याच्या कुठल्या क्षणाचा, कुठल्या कृतीचा, कुठल्या व्यवहाराचा काय अन्वय आणि अर्थ असेल ते गणिती पद्धतीने ठरवताही येत नाही अन सांगताही येत नाही. पण त्याच्यासाठी न्याय देणारी व्यवस्था मात्र साक्षी-पुरावे अशा गणिती पद्धतीने चालतात. दुर्दैव हे की, जे सुरु आहे तेच सत्य, तेच अंतिम, तेच योग्य असे मानून हतबलतेचा भाव व्यक्त केला जातो. मुळात आपली गृहितके तपासून पाहण्याचे कष्ट का घेऊ नयेत? मानवी सभ्यतेच्या विचारशीलतेचा, चिंतनशीलतेचा अंत झालेला आहे का? किंवा आपण तसे का धरून चालतो.

न्यायव्यवस्थेच्या संदर्भातील अशीच दुसरी एक धारणा आहे- शेकडो अपराधी सुटले तरी चालेल, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. कोण अपराधी अन कोण निरपराध हे ठरवणे कठीण नक्कीच असते. पण म्हणून शेकडो अपराधी सुटले तरी चालतील हे तत्व म्हणून स्वीकारणे अनेक दोष उत्पन्न करतेच. सोबतच अशा सुटून गेलेल्या अपराधी तत्वांची किंमत समाजाला चुकवावी लागते, त्याचे काय? खूप आकर्षक वाटणाऱ्या, तथाकथित मानवीय तत्वाचे परिणाम लक्षात घ्यायला हवेत की नकोत?

या सगळ्याचा उहापोह करण्याचा उपाय काय?

- श्रीपाद कोठे

१८ डिसेंबर २०१५

सहिष्णुता अन रा. स्व. संघ - २

महात्मा गांधींच्या हत्येनंतर लादलेल्या पहिल्या बंदीनंतर देखील रा. स्व. संघाच्या सहिष्णूतेची परीक्षा होतच राहिली. सरकारनेच संघावरील आरोप मागे घेऊनही तेच आरोप उगाळणे सुरूच राहिले. क्षुद्र राजकारणासाठी असत्य उगाळत राहून समाजात तट निर्माण करण्याचे उद्योग सुरु झाले. प्रसार माध्यमांनी त्यात भर घातली. परिणामी मोठ्या सामाजिक असहिष्णुतेचा सामना संघाला करावा लागला. विविध जातीपंथांनी, व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनी, सरकारने संघाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे, तुच्छ लेखण्याचे, हेटाळणी करण्याचे, बदनामी करण्याचे, गैरसमज पसरवण्याचे उद्योग सुरूच ठेवले. संघाने मात्र याबद्दल तक्रारीचा, निषेधाचा सूर कधीही काढला नाही. कधी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. धीम्या गतीने, पण निश्चितपणे संघ आपले काम करीत राहिला. जातायेताना स्वयंसेवकांना त्रास देणे, शिवीगाळ करणे, संघस्थान खराब करून ठेवणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार तर असंख्य म्हणता येतील. स्वयंसेवकांनी आपापल्या स्तरावर त्याचा धैर्याने सामना केला. अनेकदा स्वयंसेवकांचा संयम संपलाही. अशा वेळी संतप्त प्रतिक्रिया उमटत. पण संघाने आपली भूमिका कायम ठेवली. हा आपला समाज आहे. त्याचे शिव्याशाप सहन करायचे पण त्याच्याचसाठी काम करत राहायचे. खुद्द स्वयंसेवक सुद्धा कधीकधी या भूमिकेमुळे संघापासून दुरावले. मात्र संघाची सहिष्णूता कायम राहिली.

महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यासारखी नावे आधी प्रात:स्मरण व नंतर एकात्मता स्तोत्रात समाविष्ट करतानाही, स्वयंसेवकांनी सोसलेल्या असहिष्णुतेची प्रतिक्रिया उमटली. नाही असे नाही. पण संघाने त्यांचीही समजूत काढली. आपण समाज जोडायला निघालो आहोत, समाज तोडायला नाही; ही भूमिका अन भावना कायम राहिली. प्रसार माध्यमांनी कधी खोटे, कधी विपर्यस्त, तर कधी गैरसमज पसरवणारे वृत्त वा विश्लेषण प्रसिद्ध केले तरीही संघाने त्यांना जाब विचारला नाही किंवा त्यांच्यावर बहिष्कार घातला नाही. शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना संघाच्या कामात सहभागी होण्यास बंदी घातली, तरीही संघाने सहिष्णूता सोडली नाही.

केरळ, पश्चिम बंगाल या प्रांतात तर स्वयंसेवक व कार्यकर्त्यांवर प्रत्यक्ष हिंसक हल्ले झाले. अनेक जण त्यात मारल्या गेले. त्रिपुरातून संघाच्या तीन प्रचारकांचे अपहरण झाले. त्यांचे पुढे काय झाले ते कोणालाही माहीत नाही. संघाने निषेध नोंदवला, तक्रार वगैरे केली, निवेदने दिली. परंतु व्यक्ती वा गटांविरुद्ध भूमिका घेतली नाही, भावना बाळगल्या नाहीत. पंजाबात हिंदू (सहजधारी) विरुद्ध शीख (केशधारी) असा संघर्ष उत्पन्न करण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. दहशतवाद तर टोकाचा होता. संघाने समन्वयाची भूमिका घेतली. त्याचे परिणाम संघाला भोगावे लागले. संघावर प्रहार झाले. पण तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी खणखणीत भूमिका घेतली- no retaliation. प्रत्याघात नाही.

स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात पुकारलेली आणीबाणी हा तर जगजाहीर काळा अध्याय आहे. त्यावेळी अनेकांसोबत, पण अनेकांपेक्षा खूप अधिक असहिष्णूता संघाने झेलली. सरसंघचालकांसह हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, अधिकारी तब्बल दीड वर्ष कारागृहात होते. काहींना तर आपले जीवही गमवावे लागले. अट्टल गुन्हेगार कैद्यांना देखील, कौटुंबिक सुख-दु:खाच्या प्रसंगी मिळणारी पेरोल सुविधा अनेकांना नाकारण्यात आली. तरीही आणीबाणी उठल्यावर सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ठाम भूमिका मांडली- forget and forgive. विसरा व क्षमा करा. सहिष्णुता यापेक्षा वेगळी काय असू शकते?

संघाची `हिंदू राष्ट्र' भूमिका तर त्याच्या स्थापनेपासून आजवर प्रचंड टीकेचा विषय राहिली आहे. त्यावरून त्याला किती अन काय काय ऐकावे अन सहन करावे लागले, संघाचे संघालाच ठाऊक. काहीही कर्तृत्व, ज्ञान, अनुभव, आवाका, चिंतन नसलेले; ज्यांच्या पाठीशी कदाचित घरचे सदस्य सुद्धा उभे राहणार नाहीत; असे पत्रकार-संपादक वगैरे जेव्हा या विषयावरून संघाला वाट्टेल तसे बोलतात, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात; तेव्हा असहिष्णुतेच्या त्या बीभत्स प्रकाराला सुद्धा संघ शांतपणे सहन करतो. सहिष्णुतेचे यापेक्षा अधिक मोठे उदाहरण कदाचित शोधूनही सापडणार नाही.

पाच-दहा माणसांच्या पुंजीवर सुरु झालेला संघ, काहीही साधने हाताशी नसणारा संघ, समाजाचा मोठा भाग विरोधात आणि गैरसमज बाळगणारा; अशा परिस्थितीत आज एक मोठी शक्ती झाला आहे, हे असहिष्णू वृत्तीने होऊ शकते किंवा सहिष्णुतेच्या अभावी होऊ शकते; असे ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल तसे म्हणावे. जग वाटण्या न वाटण्याने चालत नसते याची मात्र खात्री बाळगावी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १८ डिसेंबर २०१५

स्वधर्म

घाना येथे गांधीजींचा पुतळा हटवल्याच्या एकूण प्रकरणावरून असं वाटायला लागलं आहे की, माणसाचं बोलणं, व्यक्त होणंच भविष्यात बंद होईल की काय. व्यक्तिवाद, अस्मितावाद, मानापमान हे आता मर्यादे पलीकडे जात आहेत अन म्हणूनच विकृत होत आहेत. आज लोक एकमेकांशी बोलायला, भेटायला सुद्धा घाबरतात, हे वास्तव आहे. अविश्वास हा सुद्धा याच प्रक्रियेतील एक उपघटक. अन याचं एकमेव कारण म्हणजे युरोपीय पुनर्जागरणाने जन्माला घातलेली आणि दोन जागतिक युद्धांनी पक्की केलेली मूल्यव्यवस्था. अत्यंत एकसुरी, एकांगी, स्वप्नाळू, शब्दाधारीत, आवरणस्पर्शी मूल्यव्यवस्था, विचारपद्धती, विचार हे याचे कारण आहे. उजेड आणि अंधार, गांभीर्य आणि विनोद, उच्च आणि निम्न, वर्गीकरण आणि समन्वय/ एकीकरण, कोमलता आणि कठोरता; अशा सगळ्या परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचंही जीवन व्यवहारात स्थान असतं, हे मानायलाच आज कोणी तयार होत नाही. या प्रक्रियेमुळे समजूतदारपणा, विवेक कमी होऊ लागला आहे. अतिसंवेदनशील आणि असंवेदनशील असे वर्ग तयार व्हायला लागले आहेत. कारण कोणत्याही गोष्टीचं प्रमाण आणि प्रकार ठरवण्यासाठी केवळ ती गोष्ट पुरेशी नसते. संबंधित घटकांच्या पलीकडील काही तरी असावे लागते. हे जे काही तरी तत्व आहे त्यालाच भारताने धर्म म्हटले आहे. उद्या गीता जयंती आहे. गीतेने सांगितलेला स्वधर्म हा विचार सगळ्या चिंतनाचा आधार होणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

१८ डिसेंबर २०१८

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

हाती काय?

कोणाला वाईट वाटेल, कोणाला पटणार नाही, कोणाला राग येईल कदाचित. पण एक गोष्ट निर्विवाद आहे की, आपण निर्माण न केलेल्या जगाचं आपल्या मनातील, आपल्या भावनांना अनुसरून काढलेलं चित्र समोर ठेवून आपण विचार करीत असतो. आपण या संपूर्ण चराचराचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यापासून वेगळे नाही हे आपण तोंडाने कितीही म्हटलं तरीही त्याची अनुभूती मात्र शून्य असते. मग आपण एकतर या बाजूला झुकतो वा त्या. कालची पाकिस्तानातील घटना वा तशा घटना चांगल्या आहेत का? मुळीच नाहीत. पण त्यांची काही कारणमीमांसा आहे की नाही? नक्कीच आहे. मग केवळ असे काही होऊ नये म्हणून इच्छाचिंतन करून किंवा प्रार्थना करून किंवा कायदा-सुव्यवस्था कुठे आहे; वगैरे भाबडे प्रयत्न वा प्रश्न करून तशा घटना बंद होतील का? मुळात अशा घटना कायमच्या बंद वगैरे होऊ शकतात का? समाज म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय? त्याच्या मर्यादा काय? रोज करोडो नवीन जीव या जगात येतात, ते येताना आपापले संचित- गुणदोष सगळे घेऊन येतात. त्यांची गुणसूत्रे कोणी तिसऱ्यानेच सेट केलेली असतात. अशा जुन्या नव्या अब्जावधी गुणसूत्रांच्या क्रियाप्रतिक्रिया घडत असतात. त्यातून ठळकपणे लक्षात येतील अशा चांगल्या वा वाईट घटना घडतात. या जगातला कोणताही तरंग एकापासून दुसरा वेगळा नाही. जशी समुद्रात निर्माण होणारी सुनामीची एक लाट, समुद्रातील असंख्य लहानमोठ्या तरंगांचा परिणाम असतो, तसेच हे आहे. एकाच वेळी हे सगळे होत असते. अन परत किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा आणि परत जाणाऱ्या लाटा हेदेखील सुरूच असते, सतत आणि एकाच वेळी. मग आपल्या हातात काय उरते? की काहीच नाही? याचे उत्तरही आहे उरते आणि उरत नाही. ही व्यामिश्रता फार विचित्र आहे. म्हणूनच पाचशे वर्षांहून जुन्या काळी मीरा म्हणून गेली होती- `करम की गती न्यारी' अन वर्तमानात आम्हीही तेच म्हणतो. मग काय हातावर हात ठेवून बसायचे, अश्रू गाळत बसायचे, बोटे मोडत बसायचे. नाही. मुळीच नाही. दुध आणि पाणी ओळखायला शिकायचे, दुध आणि पाणी वेगळे करायला शिकायचे, दुध आणि पाणी त्या-त्या वेळी त्या-त्या प्रमाणात प्यायला शिकायचे, अनावश्यक दुधाची अन अनावश्यक पाण्याची विल्हेवाट लावायला शिकायचे. योग्य-अयोग्य चा विवेक अन त्याच्याशी त्या-त्या वेळी वागण्याची दृष्टी आणि शक्ती यांची साधना करणे हे आहे आपल्या हाती. भावनांचा ओलावा, वास्तवाची जाण, विश्लेषणाची प्रखरता, अन व्यवहाराचे कुशल तारतम्य; हे सगळेच हवे.

- श्रीपाद कोठे

१७ डिसेंबर २०१४

सत्ता व समाज

आज सहज दोन मराठी चित्रपट आठवले. `शिक्षणाच्या आयचा घो' आणि `कायद्याचं बोला'. भरत जाधवने मुख्यमंत्र्यांच्या घरी आवेशात मांडलेले विचार आणि मकरंद अनासपुरेने न्यायालयात कायदा आणि न्याय व्यवस्था यावर केलेलं भाष्य; हेही आठवलं. उदाहरण म्हणून; या दोन्हीचा आपल्याला समाज म्हणून किती आठव आहे? हे चित्रपट आले तेव्हा वेगळ्या पक्षांची सरकारे होती. त्यामुळे दोन्ही चित्रपटातून मांडलेल्या स्थितीसाठी ती सरकारे जबाबदार असे समाज धरून चालला. मुद्दा असा की, आज सरकारे बदलली म्हणून त्या स्थितीत फरक पडला का? या आणि त्या सरकारांचे समर्थक लगेच विश्लेषण आणि कारणमीमांसा करू लागतील. परंतु, समाजाची जडणघडण हा `सत्ता' या गोष्टीपेक्षा खूप मोठा विषय आहे. याच्याकडे किंवा त्याच्याकडे असलेली सत्ता म्हणजे; समाजाची सुव्यवस्थित बांधणी करण्याची संधी असते. सत्ता असणे म्हणजे आपोआप समाज उभा राहणे नसते.

- श्रीपाद कोठे

१७ डिसेंबर २०१७

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

इतिहास

 - ऐतिहासिक म्हणजे योग्य.

- ऐतिहासिक म्हणजे श्रेष्ठ.

- ऐतिहासिक म्हणजे मालक/ मालकी.

- इतिहास हा योग्यता, श्रेष्ठता आणि मालकी सिद्ध करण्यासाठीचं साधन.

- यासाठी आपल्या दृष्टीचा, सोयीचा इतिहास लिहायचा, रचायचा.

- इतिहासाचे विश्लेषण आणि अन्वयार्थ आपल्याला वाटणाऱ्या पद्धतीने लावायचे. जे मार्क्सने केले.

- हे खरे असले तरी; त्याला उत्तर देण्यासाठी जे प्रयत्न केले जातात; त्यांनाही हे सारे लागू होऊ शकतेच.

- यातील याचे बरोबर अन याचे चूक हे ठरवणे अवघड अन दुरापास्त असते.

- साधने, पुरावे यांच्या अंगभूत आणि स्वरूपगत मर्यादा; आणि अर्थ लावण्याची अपरिहार्य सापेक्षता; यामुळे विविध गटातील इतिहासावरून चालणारा संघर्ष न संपणारा ठरतो.

- मानवी वेळ, ऊर्जा, बुद्धी, पैसा, साधने, मानसिकता; या सगळ्याचा अपव्यय आणि विकार उत्पन्न होतात.

- मानवी जीवनाचा आशय, त्याचे भविष्य, त्याचे सहजीवन, त्याच्या गरजा, त्याची सार्थकता; यांचा विचार; यांना प्रधानता; या आधारे व्यक्ती आणि समाज धारणा करण्याचा प्रयत्न; ही भारताची विशेषता.

- भारताने इतिहास या गोष्टीला दिलेले दुय्यम स्थान पूर्ण विचारांती.

- इतिहासावर अवास्तव, अनावश्यक भर; ही मार्क्सच्या विचारांची देणगी.

- मार्क्सला 'नाही रे' वर्गाच्या स्थितीची जबाबदारी निश्चित करायची होती त्यासाठी खटाटोप.

- अशी निश्चिती करता येत नाही. मानवी जीवनाचा प्रवाह असा एकमार्गी नसतो याचं तोकडं आकलन याच्या मुळाशी.

- आज त्यानेच जगभर विक्राळ रूप घेतले आहे.

- यातून बाहेर पडण्यासाठी 'वैचारिक प्रतिक्रांतीची' नव्हे, वैचारिक सृजनाची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

१६ डिसेंबर २०१९

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

भूदान यज्ञ : समरसतेचा महाप्रयोग

आचार्य विनोबा भावे हे नाव भारतातच नव्हे तर जगभरात सुपरिचित आहे. महात्मा गांधी यांचे अनुयायीत्व स्वीकारून त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. मुळातच विनोबाजी आध्यात्मिक वृत्तीचे. त्यामुळे लहान वयातच त्यांनी घर सोडले आणि आध्यात्मिक साधनेसाठी भटकंती सुरू केली. नंतर महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. जीवनाचा प्रवाह बदलला तरीही आंतरिक आध्यात्मिक धारणा मात्र कायम राहिली. गांधीजींच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या सत्याग्रहादी कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय सहभागी होते. अन स्वातंत्र्यानंतर राजकारणापासून दूर राहून व्रतस्थपणे समाजाच्या उन्नतीचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना, लेखनाला, वक्तृत्वाला अध्यात्माची बैठक आहे.

त्यांच्या कार्यापैकी भूदान हा सर्वाधिक चर्चित कार्यक्रम होता. संपूर्ण देशभर त्यांनी यासाठी पायी भटकंती केली होती. याच कार्यक्रमानिमित्त विचारविनिमय करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावले तेव्हा विनोबा वर्धेहून दिल्लीलादेखील पायीच गेले होते. आपल्या पायी प्रवासाबद्दल बोलताना एकदा त्यांनी फार मार्मिक विवेचन केले होते. ते म्हणाले, 'पूर्वी स्वयंचलित वाहने नव्हती तरीही; बैलगाडी, घोडागाडी, घोडे, हत्ती, उंट यांचा प्रवासासाठी उपयोग होतच असे. घोड्यांचा उपयोग करून कमी वेळात मोठे अंतर कापता येत होतेच. परंतु महात्मा गौतम बुद्ध, आद्य शंकराचार्य आदींनी पायीच प्रवास केला. कारण कमी वेगाच्या या प्रवासात समाज पाहता येतो, समजून घेता येतो.' त्यांच्या पायी प्रवासाच्या आग्रहामागे ही विशाल दृष्टी होती.

विनोबांनी भूदान यज्ञाद्वारे आर्थिक, सामाजिक, भाषिक, क्षेत्रीय, जातीय दुरावा आणि दरी कमी करण्याचा आणि सांधण्याचा प्रयोग केला. एक प्रकारे तो समरसतेचा महाप्रयोगच होता. एका ठिकाणी ते म्हणतात, 'भूदानासाठी पदयात्रा सुरू आहे. त्याचा एकमेव उद्देश हृदये जोडणे हा आहे.'

स्वातंत्र्यानंतर त्यावेळच्या हैद्राबाद राज्यात कम्युनिस्टांनी हैदोस घातला होता. हिंसेचा वापर करून गरिबांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा दावा होता. ही समस्या सोडवण्यासाठी विनोबा हैदराबादेत गेले होते. तिथे फिरत असताना त्यांच्या मनात हा विचार आला. तेलंगणात फिरत असताना हरिजन लोकांनी त्यांच्याकडे जमिनीची मागणी केली आणि विनोबा गावकऱ्यांशी बोलले. गावकऱ्यांनी त्यांची मागणी मान्य करून त्यांना भूमी दिली. ही घटना २८ एप्रिल १९५१ रोजीची. त्यावरून विनोबांना ही कल्पना सुचली. त्यांनी हा प्रयोग सुरू ठेवला आणि दोन महिन्यात त्यांना बारा हजार एकर जमीन दान मिळाली. त्यानंतर उत्तर प्रदेशात एक लाख एकर जमीन विनोबांना मिळाली. राज्याचा हस्तक्षेप आणि कायदा यांच्याशिवाय अहिंसक मार्गाने जमिनीचा प्रश्न सोडवता येतो हे आश्चर्य जगाने त्यावेळी पाहिलं. देशभरातच भूमीहीनांचा प्रश्न जटील होता. सरकारसमोर देखील ही मोठी समस्या होती. विनोबांच्या या भूदान प्रयोगाने सरकारचेही लक्ष वेधून घेतले आणि त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना विचारविनिमय करण्यासाठी दिल्लीला बोलावले. त्यातून फार काही साध्य मात्र झाले नाही. कारण विनोबांना सरकारी दाव्याला न बांधलेला सर्वोदयी समाज निर्माण करायचा होता. त्यानंतर भूदान यात्रेत, सर्वोदयी संमेलनात आणि अन्यत्रही विनोबांनी भूदान यज्ञाच्या तात्त्विक आणि व्यावहारिक अंगांचे भरपूर विवेचन केले.

२९ सप्टेंबर १९५१ रोजी वारंगल येथील भाषणात विनोबा म्हणाले, 'दरिद्र नारायणाला परिवाराचा भाग समजून जमीन द्यावी. यासाठी विचारक्रांती हवी. लढायांनी जी क्रांती झाली नाही ती बुद्ध, येशू आणि रामानुज यांनी घडवली. यातील एकेकाने जे काम केले ते अनेक राजे मिळून सुद्धा करू शकले नाहीत.' याच भाषणात उत्तर भारत आणि दक्षिण भारत संघर्ष किंवा आर्य आणि द्रविड संघर्ष यांचे समाधान करताना ते म्हणाले, 'सुरुवातीला उत्तरेत पहाडी संस्कृती आणि दक्षिणेत समुद्री संस्कृती होती. दंडकारण्यामुळे आर्य व द्रविड यांचा संबंध आला नाही. नंतर दोहोंचा संबंध आला आणि त्यातून आजचा भारत उभा झाला.' आर्य बाहेरून आल्याचे किंवा द्रविड बाहेरून आल्याचे; आर्य आणि द्रविड परस्परांचे शत्रू असल्याचे; कोणा एकाच्या प्राचीनत्वाचे; आपसातल्या संघर्षाचे; असे सगळे वाद निकालात काढून; आर्य व द्रविड दोघेही याच भारताचे सुपुत्र आहेत आणि त्यावेळच्या परिस्थितीमुळे ते उशिरा एकत्र आलेत; असा निर्वाळा ते देतात.

नंतरच्या एका सर्वोदयी संमेलनात त्यांनी भूदान विचाराचा आणखीन विस्तार केला. दान शब्दाने अस्वस्थ होण्याचे कारण नाही असे स्पष्ट करून 'दान म्हणजे सम्यक विभागणी' या शंकराचार्यांच्या व्याख्येची ते आठवण करून देतात. त्यामुळेच जमीन घेणाऱ्याला ओशाळे वाटण्याचे कारण नाही. कारण तो फुकट खाणार नसून जमिनीवर मेहनत करून खाणार आहे, अशी भूमिका विनोबा मांडतात. भूमीदान घेण्याबद्दल तीन सूत्र सांगताना ते म्हणतात, 'आमची भूमिका समजून जमीन दिली तर आनंद होईल, आमची भूमिका समजून घेऊनही जमीन दिली नाही तर राग येणार नाही, आमची भूमिका समजून न घेता दबावाखाली जमीन दिली तर दु:ख होईल.' श्रीमंत आणि गरीब शेतकरी, सगळ्या जातीधर्माचे लोक, हरिजन बांधव, महिला; सगळ्यांनी दरिद्र नारायणाला आपल्या कुटुंबाचा घटक मानून जमीन दिली आहे, असेही ते त्या संमेलनात बोलताना म्हणाले होते. देशातील जमिनीची समस्या सोडवण्यासाठी पाच कोटी एकर जमीनीची गरज असली तरीही पहिला टप्पा म्हणून २५ लाख एकर जमीन मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

२ ऑक्टोबर १९५१ रोजी सागर येथे सर्वोदय संमेलनात केलेल्या भाषणात, भूदान हे गरीब आणि श्रीमंत दोघांच्याही भक्तीचे काम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.

भूदान यज्ञाच्या संदर्भात विनोबांनी समरसता असा शब्द वापरला नसला तरीही त्यांची तीच भावना आणि दृष्टी होती. मथुरेच्या सर्वोदय संमेलनात १ नोव्हेंबर १९५१ रोजी त्यांनी दिलेले भाषण या अंगाने फार नेमके आणि महत्त्वाचे आहे. या भाषणात ते म्हणतात, 'लोक मला विचारतात की, आपल्या या अभियानात आपण हरिजन सेवेचे काम का करत नाही? हे म्हणजे वाहणाऱ्या गंगेला विनंती करण्यासारखे आहे की, जाताजाता तू झाडांना पाणी देऊन जा. गंगा हे काम करणारच आहे. तिला सांगण्याची काय गरज? तसेच मला मिळणारी जमीन मोठ्या प्रमाणावर हरिजनांमध्येच वाटली जाणार आहे. माझी इच्छा आहे की भंगी लोकांनी शेती करावी. त्यांना जमीन देण्याची माझी इच्छा आहे. आज जे काम ते करतात, ते काम माणसांनी करण्यासारखे नाही. आमच्या समाजात उच्चनीच भावना निर्माण झाली. काही लोक स्वतःला उच्च समजू लागले आणि त्यांनी स्वतःला शरीर श्रमापासून दूर करून घेतले. ज्यांना शरीर श्रम करावे लागतात ते सगळे निम्न समजले जाऊ लागले. चामड्याचे काम करणारा हरिजन. तो निम्न जातीचा. त्याच्यापेक्षा उच्च शेतकरी. कारण तो जमिनीवर काम करतो. हरिजनांपेक्षा भंगी निम्न कारण ते सफाईचं काम करतात. अशा अनेक श्रेणी झाल्या. परिश्रम न करणारे उच्च समजले जाऊ लागले. श्रमाची प्रतिष्ठा राहिली नाही. देशासाठी परिश्रम करणाऱ्यांना निम्न समजलं तर देश अवनतीला जातो. रोमन इतिहासात असं झालं आणि भारतातही असंच झालं. जोवर आर्थिक व सामाजिक जीवन एकरस होणार नाही तोवर समाज शक्तिशाली होणार नाही. प्रत्येक कामाचे आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक मूल्य सारखे असायला हवे. भूमीदानासाठी मी एवढे परिश्रम का करतो आहे? कारण समाजात जो मोठ्या प्रमाणात उच्चनीच भाव आहे तो संपावा आणि सगळ्यांना शारीरिक श्रमाची संधी मिळावी.' विनोबांचे हे प्रतिपादन अतिशय बोलके आहे.

१९५१ च्या नोव्हेंबर महिन्यात विनोबा दिल्ली आणि आसपासच्या परिसरात होते. त्या काळात केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी, 'सगळी जमीन ईश्वराची आहे. त्यामुळेच गावची जमीन सगळ्यांची असायला हवी. कोणाजवळ जमीन आहे आणि कोणाजवळ नाही हे अन्यायकारक आहे' असा विषय मांडला. 'मला भिक्षा म्हणून जमीन नको. त्यामुळे आर्थिक रचना बदलणार नाही. आर्थिक रचना बदलण्यासाठी आंतरिक परिवर्तन हवे. सद्भावना पसरत जाते. हृदय परिवर्तन, जीवन परिवर्तन, समाजरचना परिवर्तन ही माझी पद्धत आहे. कम्युनिस्टांची सुरुवात कत्तलीने होते आणि समाप्ती कायद्याने होते. माझी सुरुवात करुणेने होते आणि समाप्ती कायद्याने होते. मी गरिबांचा एजंट आहे. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत सगळ्यांचे हृदय परिवर्तन हवे'; असे त्यांनी या काळात सतत प्रतिपादन केले.

सर्वसेवा संघाचे सहमंत्री वल्लभ स्वामी यांना लिहिलेल्या पत्रात विनोबा लिहितात, 'माझं आंदोलन कायद्यासाठी नसून नैतिक आंदोलन आहे. अहिंसक समाज रचनेत कायद्याचे स्वरूप ग्रंथाच्या शेवटी लिहिल्या जाणाऱ्या 'समाप्त' शब्दासारखे असायला हवे.' आपल्या कामात फक्त गांधी निधीचे कार्यकर्ते असावेत असं नाही; तर त्यात आपल्या विचारांशी सहमत असलेले काँग्रेस, प्रजा समाजवादी पार्टी, समाजवादी, कम्युनिस्ट सगळे असू शकतात; अशी स्पष्ट भूमिका विनोबांनी मांडली होती. आपल्याला सर्वोदयवाले असा वेगळा गट नको. आपण सगळ्यांमध्ये इतकं मिसळून जायला हवं की, आपण फक्त मानव राहायला हवं, असेही उद्गार १६ मे १९५३ रोजी बोलताना त्यांनी काढले होते.

भूदान समित्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सूचना केली होती की; ज्या प्रांतात हिंदी भाषा व देवनागरी लिपी चालते तिथे त्या पद्धतीने आणि जिथे नाही चालत तिथे एका बाजूला हिंदी भाषा व लिपी आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणची भाषा व लिपी; अशी दानपत्रे असावी. समाजाच्या सामरस्याची सूक्ष्म काळजी विनोबा घेत होते हेच या सूचनेतून दिसून येते.

भूदान यज्ञाच्या काळात विनोबांना अनेक प्रश्न विचारण्यात येत. त्यांना उत्तर देताना ते आपली भूमिका स्पष्ट करीत असत. एकदा त्यांना विचारण्यात आले - 'वर्णव्यवस्था आपण ठीक मानता का?' त्याच्या उत्तरात ते म्हणाले, 'वर्णव्यवस्था अतित्वातच नाही. सगळ्या व्यवसायांना समान मजुरी हे वर्णव्यवस्थेचं सार आहे. आज तसे होत नाही. याचा अर्थ एका वर्णाच्या व्यक्तीने दुसरे काम करूच नये असे नाही. त्याचा अर्थ एवढाच की, परंपरेने चालत आलेले काम केल्यास व्यक्ती लवकर स्वावलंबी होऊ शकते.'

आणखीन एकदा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, भूदानासाठी हरिजन संघटन तयार करणार का? त्यावर ते म्हणाले, 'अशा संघटनेवर आमचा फारसा विश्वास नाही. मानवता वाढायला हवी. भूदान आंदोलन सगळ्या समाजासाठी आहे. ते अमुक एका वर्गासाठी नाही. समाजात जे माघारले आहेत त्यांना उचलून घेणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.'

आज भंगी लोकांची स्थिती फारच खराब आहे. त्यांच्यासाठी आपण काय विचार केला आहे? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, 'एका भंगी व्यक्तीने आम्हाला जमीन मागितली होती. आम्ही म्हटले, तुला शेती येत असेल तर जमीन नक्की देऊ. त्यामुळे तुझा सध्याचा व्यवसाय सुटेल. भंगी मुलांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना शेती करण्याचे शिक्षण देऊ शकतो आणि त्यानंतर जमीन देऊ शकतो. मात्र शेती करता येत नसेल तर जमीन देऊन उपयोग नाही. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे.'

सर्वोदय समाजात हरिजनांचे स्थान काय असेल? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विनोबा म्हणाले, 'सर्वोदय समाज समुद्र आहे. त्यात एकही नदी नाही. समुद्र होण्याआधी नदीनाल्यांचं अस्तित्व असतं. त्यानंतर वेगळं अस्तित्वच नसतं. हरिजन इत्यादी भेद संपतील तेव्हाच सर्वोदय समाज अस्तित्वात येईल. सर्वोदय समाज निर्माण होण्यासाठी सगळे भेद सोडावे लागतील.'

विनोबांची ही निवडक प्रश्नोत्तरे पाहिली तरी लक्षात येतं की, समाजातील कोणत्याही वर्गाबद्दल त्यांना आकस नव्हता. सगळ्यांना सन्मानाचे सुखी जीवन जगता यावे हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी सगळ्या जातीवर्गाच्या माणसांच्या मनाची मशागत करणे हा त्यांचा मार्ग होता. कायद्यावर त्यांचा फारसा भर नव्हता आणि हिंसाचाराला तर त्यांच्या विचारात स्थानच नव्हते.

गरीब-श्रीमंत भेद, भाषा वा प्रांत भेद, जातीभेद यांचा विचार तर त्यांच्या चिंतनात होताच; पण दूर जंगलात राहणारा आदिवासी समाजही त्यांच्या आत्मीयतेतून सुटला नव्हता. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील भिल्ल वस्तीत विनोबा गेले होते. त्यावर आधारित 'आदिवासीयोसे' नावाचे छोटेसे पुस्तक आहे. या भिल्ल लोकांशी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही येथे पुण्य कमावण्यासाठी नाही तर पाप धुण्यासाठी आलो आहोत. आजपर्यंत आम्ही लोकांनी भिल्लांची सेवा केली नाही. देशातील सगळे आदिवासी यांचेच बंधू आहेत. ते जंगलात राहतात. सहनशील आहेत. देशात मोठमोठे महापुरुष झालेत पण आम्ही यांना रामायण, गीता काहीही दिले नाही. जनावरांसारखी तुमची उपेक्षा केली. आजपर्यंतचे पाप धुवायला आम्ही आलो आहोत. हरिजन आणि आदिवासींनी खूप कष्ट सहन करूनही प्रेम सांभाळून ठेवले आहे. आता तुमच्या सेवेसाठी सगळे येतील.' अतिशय भावपूर्ण आणि उत्कट अशी विनोबांची भावना होती.

कुष्ठरोग्यांच्या सेवेबद्दलही त्यांना आस्था होती. कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संमेलनही पवनारला झाले होते. विनोबांनी त्यांना मार्गदर्शनही केले होते. याच क्षेत्रात मोठं काम करणारे बाबा आमटे व शिवाजीराव पटवर्धन यांच्याशीही विनोबांचे आत्मीय संबंध होते.

सामाजिक समरसतेचा विचार करताना मनूस्मृतीची चर्चा स्वाभाविकच होते. विनोबांनी 'मनू शासनम' शीर्षकाने मनूस्मृतीचे संकलन केले आहे. त्याची त्यांनीच लिहिलेली प्रस्तावना मननीय आहे. या प्रस्तावनेत ते म्हणतात, 'मनूच्या आणि आपल्या काळात फरक पडला आहे. जुन्या काळी गीता उपयोगी पडत असे तशीच आजही पडते. कारण तिच्यावर काळाचा परिणाम झाला नाही. ती कालातीत वस्तू आहे. मनूचा ग्रंथ समाजशास्त्राचा आहे. म्हणून मनूची वाक्ये आज जशीच्या तशी चालणार नाहीत. एवढेच नव्हे तर काही विरुद्धही पडतील. म्हणून आम्हाला विवेकाने निवड करावी लागेल.' आपले स्वतःचे उदाहरणही त्यांनी दिले आहे. ते सांगतात, 'ब्रम्हचाऱ्याने जोडा व छत्री वापरू नये, असे मनूस्मृती सांगते. छत्री न वापरल्याने फरक पडला नाही. पण जोडा न वापरल्याने बडोद्याच्या कडक उन्हात डोळे बिघडले. म्हणून जोडा घालणे सुरू केले. ते वाक्य या पुस्तकात घेतलेले नाही. त्यामुळे विवेकाने निवड करावी लागते.'

याच प्रस्तावनेत पुढे विनोबा लिहितात, 'आजकाल मनूवर कैकांचा राग आहे. ते ठीकही आहे. कारण मनूस्मृतीत कैक परस्परविरोधी विचार आहेत. मी मानीत नाही की ते सर्व मनूचे आहेत. तसे पाहिले तर ती भृगु संहिता आहे. परंतु आहे मनूच्या नावावर. आणि त्यातही अनेक प्रकारचे क्षेपक निश्चितच असणार. ज्या वचनांवर राग आहे ती विषमतेची वचने काढून टाकली तरी मनूचे काही बिघडत नाही. कारण मनूला विषमता नको, व्यवस्था हवी आहे. व्यवस्थेसाठी समाजात कामाची विभागणी करावी लागते. अशी विभागणी न केली तर समाजात स्पर्धा होते आणि ज्या कार्यात पैसा जास्त मिळतो तिकडे सगळे जातात. त्याऐवजी सर्व कामांसाठी जवळपास समान मजुरी असली आणि प्रत्येकाच्या शक्ती व वृत्तीनुसार कामाची विभागणी झाली तर हरकत नाही. म्हणून मनूने जी व्यवस्था सांगितली तिला विषमता मानू नये. कारण मनूने सुद्धा शेवटी आम्हाला 'सर्वसमतेत' पोहोचवले आहे. 'मुक्ती' प्रकरणात सांगितले आहे की, जो मनुष्य भगवंताच्या जवळ पोहोचतो, महाज्ञानी होतो, ज्याला ब्रम्हाचे ज्ञान होते तो 'सर्व समतां एत्य' - सर्वांशी समता प्राप्त करतो. म्हणून जी व्यवस्था केली - जरी तीत विषमतेचा प्रवेश झाला आहे, जो व्हायला नको होता आणि त्यामुळे देशाचे नुकसानही झाले - तीत मनूचा उद्देश समतेकडे नेण्याचाच होता. विषमताकारी अंश मी काढून टाकला आहे. फक्त असाच अंश ठेवला आहे जो मनूच्या मूळ उपदेशासाठी अनिवार्य आहे. मनुस्मृती समाजशास्त्र आहे. तिचा आरंभ तत्त्वज्ञानाने होतो आणि समाप्ती मुक्तीत, ब्रम्हविद्येत होते. आदि आणि अंत दोहोतही ब्रम्हविद्येचा निर्देश आहे. समाजशास्त्रावर पश्चिमेतही पुष्कळ ग्रंथ लिहिले गेले आहेत. परंतु त्यात ब्रम्हविद्येचा उल्लेख नसतो. ते तिला आवश्यक मानीत नाहीत.' विनोबा पोथीनिष्ठ नसून प्रागतिक होते हेच या प्रस्तावानेतून दिसून येते.

भगवान बुद्ध आणि बौद्ध तत्त्वज्ञान याविषयीही विनोबांना ओढ होती. त्यांनी धम्मपदाचेही संकलन केले आहे. भूदान यज्ञाच्या प्रवासात ते लखनौला बुद्ध जयंतीच्या दिवशी पोहोचले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, 'भूदान यज्ञाच्या स्वरूपात तेच धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य करण्यात येत आहे जे गौतम बुद्धांनी केले होते.' सारनाथला बौद्ध भिक्षूंनी त्यांना धम्मपद पुस्तक भेट दिले होते. १९२३ साली वयाच्या २८ व्या वर्षी 'उपनिषदांचा अभ्यास' या लिखाणाचा समारोप त्यांनी धम्मपदाच्या एका वचनाने केला होता. तर १९४५ साली स्थितप्रज्ञ दर्शनावरील व्याख्यानांचा समारोप करताना त्यांनी वेदांत आणि बौद्ध दर्शन यांच्या अंतिम ध्येयाची एकरूपता दाखवण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्या साहित्यावरही त्यांनी लेखन केले आहे. ज्ञानेश्वर हिमालयाचे शिखर आहेत तर तुकारामाची वाणी मराठी भाषेची गंगा आहे, अशी त्यांची भावना आहे. जीवनाच्या एकरसतेचा आणि उन्नतीचा विचार करताना उच्चनीच असा विचार त्यांनी केला नाही. म्हणूनच त्यांनी 'कुराण सार'ही लिहिले. या साऱ्याचा मूलभूत विचार विनोबा करतात. ते लिहितात, 'आत्मदर्शन वा आत्मानुभूती ही महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म पंचविध असतो. आत्मदर्शन, नीती, भक्ती, कथा, कायदे ही त्याची पाच अंगे. सर्वच धर्मातील कायद्याचा भाग निरुपयोगी झाला आहे. मनुस्मृती, कुराण, बायबल सगळीकडे कायदेच कायदे आहेत. ते आता उपयोगाचे नाहीत.' विनोबांच्या या भूमिकेवर वेगळ्या भाष्याची गरज नाही.

विनोबांच्या व्यक्तिगत जीवनातही भेदांना तिलांजली देणारे, समाजातील समरसतेचा भाव जागवणारे आणि जोपासणारे पुष्कळ प्रसंग पाहायला मिळतात. विनोबांचे आजोबा शंभुराव हे शिवभक्त आणि धर्मपरायण होते. त्यांचे स्वतःच्या मालकीचे एक मंदिरही होते. शिवाशिव कडक पाळण्याच्या त्या काळात त्यांच्या मंदिरात दलितांना देवदर्शनाची मोकळीक होती. देवळाच्या वार्षिक उत्सवात गावातील भंगी, चांभार या सगळ्यांना ते भोजनाला बोलावीत. अन स्वतः त्यांना वाढत असत. देवाघरी कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही; अशीच त्यांची भावना होती. हीच भावना विनोबांमध्ये सुद्धा पाझरली होती. त्यांच्या आईचेही त्यांच्यावर असेच संस्कार होते. लहान विनूला त्या सांगत, 'अंत्यज काही नीच नसतात. देव नव्हता का विठ्या महार झाला?' आजोबा आणि आईकडून मिळालेली ही शिदोरी विनोबांना आयुष्यभर पुरली. त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक घटनांमधून या संस्काराचे पडसाद पाहायला मिळतात.

साबरमती आश्रमातील एक प्रसंग फार बोलका आहे. विनोबा साबरमती आश्रमात राहायला गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांचे भाऊ बाळकोबा हेही साबरमतीला राहायला आले. आश्रमातील संडास साफ करणारा भंगी एक दिवस तब्येत ठीक नसल्याने आला नाही. त्याचा लहान मुलगा सफाईसाठी आला. बाळकोबांना त्याची धडपड दिसली तेव्हा ते धावून गेले आणि त्यांनी सफाईचे काम केले. हे कळल्यावर विनोबा म्हणाले, 'बाळकोबा हे तू चांगले केले. उद्यापासून मीही तुझ्याबरोबर हे काम करीन.' परंतु यामुळे आश्रमात खळबळ माजली. त्यावेळी गांधीजी बाहेरगावी गेले होते. ते परतल्यावर आश्रमवासीयांनी त्यांच्याकडे तक्रार केली. गांधीजींनी सगळ्यांचे ऐकून घेतले आणि म्हणाले, 'हे काम ब्राह्मणांच्या हातून झाले याच्यापेक्षा आणखीन चांगले काय असू शकते? हे पवित्र काम आहे. आश्रमवासीयांनी हे करायलाच पाहिजे.' त्यानंतर संडास सफाई हे आश्रम जीवनाचे अंग समजले जाऊ लागले. यामुळे अनेक जण आश्रम सोडून निघून गेले ज्यात गांधीजींची बहिणही होती.

साबरमतीहून पवनारला आल्यावरही विनोबांनी सफाईचे काम सोडले नाही. 'सफाईत प्रभूदर्शन आहे' या श्रद्धेने ते रोज पवनारहून सुरगावला सफाईसाठी जात. एक दिवस ते निघाले तेव्हा नदीला पूर होता. आता काय करायचे या विचारात असतानाच त्यांना दुसऱ्या काठावर एक इसम दिसला. विनोबांनी त्याला हाक मारली अन म्हणाले, 'गावात जाऊन विठोबाच्या मंदिरात सांग की, तुमचा भंगी रोजच्याप्रमाणे आला होता. पण पुरामुळे त्याला परत जावे लागले. उद्या येऊन तो दोन्ही दिवसांची सफाई करेल.' आपण सांगितलेले त्याला समजले की नाही म्हणून त्यांनी त्याला विचारले, 'काय सांगशील?' त्यावर तो म्हणाला, 'विनोबा आले होते. पुरामुळे परत गेले.' विनोबा त्याला म्हणाले, 'अरे बाबा, असे सांग की तुमचा भंगी आला होता.'

बिहारच्या पदयात्रेत विनोबा बैद्यनाथ धाम येथे गेले होते. पुजारी परवानगी देतील तर मी दर्शनाला जाईन अन माझ्यासोबत हरिजन बंधूही येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पुजाऱ्यांनी निरोप दिला, 'ठीक आहे.' त्याप्रमाणे १९ सप्टेंबर १९५३ रोजी विनोबा सगळ्यांसह दर्शनाला गेले. पण त्यांच्यावर अनपेक्षित हल्ला झाला. पंड्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या कानाला इजा झाली. त्यांनी ती मारहाण सहन केली आणि ते दर्शन न घेता परतले.

असेच आणखीनही काही प्रसंग आहेत. ओरिसातील पदयात्रेत २१ मार्च १९५५ रोजी ते जगन्नाथ पुरीला गेले. मात्र सोबत एक फ्रेंच महिला आहे म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला. तेव्हा ते म्हणाले, 'मंदिरात हरिजनांना प्रवेश देणे पुरेसे नाही. प्रत्येक श्रद्धाळूला दर्शन घेता यायला हवे. १९५७ च्या मे महिन्यात केरळच्या गुरुवायूर मंदिरात ख्रिश्चन बांधवाला प्रवेश नाकारल्याने ते दर्शन न घेताच परतले. याच मंदिरात हरिजन प्रवेशासाठी यशस्वी सत्याग्रह झाला होता.

काही ठिकाणी याउलट चांगले अनुभवही आले. गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिरात मात्र सोबतच्या मुसलमानाला प्रवेश दिल्याने ते दर्शनाला गेले. १९५८ च्या मे महिन्यात पंढरपूरलाही त्यांना सगळ्या जातीधर्माच्या लोकांसह दर्शनाची परवानगी मिळाली. त्यावेळी त्यांनी सगळ्यांसह आनंदाने पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतले. पदयात्रेच्या काळात सार्वजनिक विहिरीच्या वापराबाबत एक चांगला अनुभवही त्यांना आला. मध्य प्रदेशातल्या दुर्ग जिल्ह्यात पदयात्रेत एक दिवस त्यांना कळले की, पुढील मुक्कामाच्या हलदी या गावात हरिजनांना सार्वजनिक विहीर वापरण्यास बंदी आहे. विनोबांनी दुसऱ्या दिवशी त्या गावी पोहोचल्यावर सांगितले की, हरिजनांना विहीर खुली झाली नाही तर आपण आणि कोणीही पदयात्री या गावात अन्न ग्रहण करणार नाही. समाधानाची गोष्ट ही की, गावकऱ्यांनी बंदी काढून घेतली. विनोबांचा दबाव कामी आला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

(पूर्वप्रकाशित : समरसता साहित्य पत्रिका, दिवाळी अंक २०२१)

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे कोणालाही माहीत नाही. सांगता येत नाही. अगदी न्यूटनला सुद्धा. अमुक गोष्टी अशा घडतात. त्या घडवणारी शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. म्हणजे परिणामावरून त्याचं कारण सिद्ध होतं. प्रत्यक्ष कारण म्हणजे काय, त्याचं स्वरूप; हे मात्र ठाऊक नसतं. हे योग्यच आहे. मात्र हे योग्य मानणारे लोक, पुनर्जन्म वा तत्सम गोष्टींचं असं विश्लेषण अमान्य करतात. पुनर्जन्म नेमका कसा असतो, पुनर्जन्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय; इत्यादी सांगता येत नाही. जसे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे सांगता येत नाही. पण माणसाच्या जन्मजात क्षमता आणि मर्यादा, त्यातील भेद, वर्तन- समज- आकलन- अनुकरण- याबाबींच्या जन्मजात शक्ती; prodigy children; क्वचित आढळणारी गेला जन्म आठवणारी व्यक्ती (नागपूरचे उत्तरा हुद्दार यांचे प्रसिद्ध प्रकरण); यावरून करता येणारा पुनर्जन्माचा दमदार सिद्धांत; किंवा या विश्वाच्या परिणामांवरून केली जाणारी ईश्वर कल्पना मात्र फेटाळून लावायच्या.

हे काही बुद्धीला, तर्काला धरून नाही.

- श्रीपाद कोठे

१५ डिसेंबर २०१५

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

ऐतिहासिकता व्यावहारिक व्हावी

पर्यावरण आणि प्रदूषण हा आजचा सगळ्यात मोठा, महत्वाचा अन चर्चित विषय आहे. एक तर कालच फ्रान्सची राजधानी paris येथे याबाबत एक ऐतिहासिक जागतिक प्रस्ताव पारित करण्यात आला. थोडेथोडके नव्हे तब्बल १३ दिवस जगभरातील नेते, तज्ञ मंडळी यावर खल करीत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली भारताची रोखठोक भूमिकासुद्धा चर्चेत राहिली. विकसित देशांची दादागिरी, त्यांचा बेजबाबदारपणा, आपली जबाबदारी विकसनशील देशांवर ढकलून देण्याची सवय, स्वत:चे चोचले पुरवण्यात कोणतेही व्यवधान येऊ नये यासाठीचे त्यांचे प्रयत्न, अन मुळातच चुकीची मानसिकता आणि विचारांची दिशा; हे सगळे भारताच्या दबंग भूमिकेने पृष्ठभागावर आले. paris येथे झालेला हा प्रस्ताव जसा ऐतिहासिक आहे, तशीच भारताची ही कामगिरीही इतिहासात नोंदली जाणारी ठरेल.

दुसरीकडे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. न्यायालयाचे आदेश, सरकारचे निर्णय, लोकांच्या गरजा- अडचणी- भावना- , या सगळ्यांचा खल होतो आहे. पाय दाबले तर डोकं वर होतं अन डोकं खाली दाबलं तर पाय वर होतात, अशी विचित्र स्थिती झाली आहे. समस्या कमी होतील, त्रास कमी होईल अन संघर्षही वाढणार नाही; यासाठी काय करावे असा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही गोष्टी कठोरपणे सांगण्याची, बोलण्याची, समजून घेण्याची गरज आहे. paris येथे भारताने जसा विकसित देशांचा दबाव झुगारून निश्चित, स्पष्ट भूमिका घेतली; तसेच विविध पातळ्यांवर होण्याची आवश्यकता आहे.

एक गोष्ट निर्विवाद आहे की प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल विकसित देशांमध्ये अधिक ढासळलेला आहे. हा समतोल ढासळण्यासाठी तेच जबाबदार आहेत. त्यांची जीवनशैली आणि आधुनिक यांत्रिकता आणि तांत्रिकता यासाठी जबाबदार आहे. लाकडांच्या चुली, उघड्यावर शौचाला जाणे इत्यादी गोष्टी नसूनही विकसित देशांचा प्रदूषणातील वाटा खूप जास्त आहे.

नेमके हेच देशांतर्गतही पाहायला मिळते. एखाद्या गावातील प्रदूषणापेक्षा राजधानी दिल्लीतील प्रदूषण खूप जास्त आहे. राजधानीतील करोडपती व्यक्तीपुढे असलेल्या समस्या, प्रश्न किंवा त्रास गावातील गरीबापेक्षा जास्त आहेत. (येथे फक्त प्रदूषण आणि पर्यावरण यांच्याच संदर्भात विचार करावयाचा आहे.) अन हे निर्माणही त्यानेच केले आहेत. एखादी व्यक्ती घरी चूल पेटवते तेव्हा जो carbon dioxide निर्माण होतो, तो सहजपणे वातावरणात शोषला जातो. त्या परिसरातील झाडेझुडपे, वने; एवढेच नाही तर शेतात उभी असलेली हिरवी पिकेही प्रकाश संश्लेषणासाठी तो carbon dioxide शोषून घेतात. त्याचा त्रास ना त्यांना होत ना बाकीच्यांना. पण त्यालाच शहाणपण शिकवायला सगळे पुढे असतात. कचरा, घाण यांचेही तसेच. उघड्यावर शौचाला जाण्याचा प्रश्न अनेकदा चर्चेला येतो. उघड्यावर शौचाला जाणे बंद व्हायलाच हवे. स्वच्छता आणि आत्मसन्मान यासाठी ते आवश्यक आहे. पण ते प्रदूषणाचे कारण नाही. गावात उपलब्ध असलेली माती ती घाण जिरवून टाकते. नव्हे, ती निसर्गाला समृद्ध करते. शहरातील घाण, तुंबलेल्या मलवाहिन्या, केरकचरा, अगदी अन्नाचा कचरासुद्धा प्रदूषणात भर घालून पर्यावरणाचा ऱ्हास घडवून आणतो. मात्र, पैसा आणि संघटीत शक्तीच्या बळावर दुबळ्या गावांवर गुरकावता येते. त्यामुळे त्यांना उपदेश करायला सगळे धावतात.

एकीकडे carbon dioxide ची चर्चा होते, पण chlorofluoro compounds चा उल्लेख टाळला जातो. कारण त्याची चर्चा आम्हाला आमच्या सुविधांवर पाणी सोडायला लावू शकते, आमच्या प्रतिष्ठेच्या उथळ- खोट्या- कृत्रिम- कल्पनांना तिलांजली द्यायला लावू शकते. त्यासाठी आमची तयारी नसते. सर्व प्रकारच्या वातानुकूलन यंत्रणा, स्वयंचलित वाहने, मनुष्यनिर्मित उर्जेचा अधिक वापर, कोट्यवधींच्या लोकसंख्येची शहरे, वस्तू वापराच्या पद्धती, मानापमान- प्रतिष्ठा यांच्या कल्पना; यांचा फेरविचार करण्याची, स्वत:ला कठोरपणे तपासण्याची आमची तयारी असते का? राजधानीत वाहतुकीचा जेवढा खोळंबा होतो तेवढा लहान जिल्हा स्थानी होत नाही. स्वाभाविकच पेट्रोलचे ज्वलन, वेळ, ताणतणाव, परिणामी प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी पुष्कळच कमी होते. पण सारे काही एकाच ठिकाणी एकवटणारी धोरणे, व्यवस्था; अन सामान्य माणसाच्या मनातील अवाढव्यपणाची निरर्थक ओढ यांचा विचार किती केला जातो?

शैक्षणिक संस्था, गंभीर- प्रदीर्घ- आजार वा व्याधी यावर उपाय करणाऱ्या वैद्यकीय संस्था शहरांपासून दूर, लहान गावी असणे हितावह असूनही, त्या दृष्टीने प्रयत्न आणि विचार का होत नाही? निवृत्तीचे जीवन जगणारे लोक, कामधंद्याच्या निमित्ताने लहान गावात गेलेले लोक, कामधंद्याच्या निमित्ताने मोठ्या शहरात आलेले लोक लहान गावी स्थायिक होण्याचा प्रयत्न का करीत नाहीत? चांगले, प्रदूषण विरहीत, शांत, आरोग्यदायी जीवन जगण्यापेक्षा; आम्ही अमुक एखाद्या महानगरात राहतो हे सांगण्यात आम्हाला भूषण का वाटते? सरकार, उद्योजक, व्यावसायिक, समाजाचे विविध घटक, सामान्य माणूस या सगळ्यांनी याबाबत आपापल्या भूमिकांचा विचार का करू नये?

जल, वायू, जमीन, प्रकाश, ध्वनी यांचे प्रदूषण वाढवण्यात आणि पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात रसायनांचा वापरही महत्वाचा ठरतो. सौंदर्य प्रसाधने, perfumes, केसांचे वा अन्य रंग, प्लास्टिक, फटाके, आतिषबाजी, चैनीच्या अनेक गोष्टी कमी करण्याचा किती विचार होतो? साधेपणा, आटोपशीरपणा, सुखाचे आणि आनंदाचे विविध पर्याय, आत्मविकास, चिंतनशीलता अशा असंख्य गोष्टींना जीवनात स्थान देण्यावर कितीसा खल होतो? पर्यावरण रक्षणासाठी झाडे हवीत, झाडे वाचवण्यासाठी कागदाचा वापर कमी करा असा एक स्वर ऐकू येतो. पण इमारतींचा अपरिमित सोस सोडून देऊन अधिकाधिक जमीन वृक्षलागवडीखाली आणण्याची चर्चा कितीशी होते?

सगळ्या गोष्टी कायदा, पैसा, नियम याचभोवती फिरत राहतात. श्वासोच्छवासामुळे carbon dioxide सतत तयार होतो. त्यामुळे श्वास घेणे बंद करा किंवा त्यावर कर लावा, अशी भूमिका भविष्यात ऐकू आल्यास नवल वाटू नये; अशी आज स्थिती आहे. आम्ही करतो ते सारे बरोबरच आहे. सुखाचा हव्यास, त्यासाठीचे धावणे, त्यासाठीचे ओरबाडणे हे सगळे असेच सुरु ठेवून पर्यावरण रक्षण वगैरेचा काही विचार करता आला तर करावा, अशी आजची भूमिका आहे. या भूमिकेला छेद देण्याची गरज आहे. खरा प्रश्न पैशाची सोय, तंत्रज्ञान इत्यादी नाहीच. खरा प्रश्न आहे मानसिकता. ही बदलण्यासाठी असंख्य तपशीलांचा सखोल परामर्श घेऊन, जीवन व्यवहाराची आणि त्याआधी जीवनाची फेरमांडणी करायला हवी. त्यासाठी प्रसंगी कठोरही व्हावे लागेल. अगदी स्वत:साठीसुद्धा. ते नाही केले तर ऐतिहासिक प्रस्ताव होतील, ऐतिहासिक भूमिका घेतल्या जातील; पण ही ऐतिहासिकता व्यावहारिकतेत येणार नाही. अन म्हणूनच निरुपयोगी अन निरर्थक ठरेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, १४ डिसेंबर २०१५

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

अभिनंदनीय आणि आनंददायी

संयुक्त राष्ट्रसंघाने काल `आंतर्राष्ट्रीय योगदिनाची' अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे आता २०१५ च्या २१ जून पासून दरवर्षी २१ जून हा दिवस `आंतर्राष्ट्रीय योगदिन' म्हणून साजरा होईल. तेही जगभर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधात केलेली सूचना उचलून धरण्यात आली आणि थोड्याथोडक्या नव्हे, चक्क १७७ देशांनी त्या सूचनेला पाठिंबा दिला आणि काल त्याची प्रत्यक्ष अधिकृत घोषणा करण्यात आली. तमाम भारतीय जनतेच्या अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. दुर्दैवाने हा आनंद आणि अभिमान दिसून आलेला नाही. वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांची ही मुख्य `हेडलाईन' व्हायला हवी होती. पण तसे झालेले नाही. तू-तू, मी-मी आणि अन्य क्षुद्रता आपल्यात किती ठासून भरलेली आहे याचीच जणू पावती यानिमित्ताने मिळाली आहे. ना सरकारी स्तरावर, ना विरोधी पक्षांतर्फे, ना प्रसार माध्यमात, ना सामाजिक स्तरावर, ना सोशल मीडियात; कुठेही हा आनंद, अभिमान, उल्हास, कौतुक दिसून आलेले नाही. कोणत्याही विरोधी पक्षाने या निर्णयाचे स्वागत का केले नाही? हजारो वर्षांची योगपरंपरा जागतिक स्तरावर मान्यता मिळवीत असेल तर ते अभिनंदनीय नाही का? `योग' या गोष्टीची अंगभूत शक्ती आणि श्रेष्ठता, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी आजवर खपलेले आणि अजूनही खपणारे लोक यांचा हा विजय आम्हाला व्यापक आणि सकारात्मक करू शकलेला नाही. `योगा' लोकप्रिय करण्यासाठी स्वत:च्या सीडी काढून स्वत: लोकप्रियता आणि पैसा मिळवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींनीही चकार शब्द तोंडातून काढण्याचे कष्ट घेतले नाही. असो. यात बदल होईल तेव्हा होईल. मात्र आज `आंतर्राष्ट्रीय योगदिन' जाहीर झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करून त्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेचे आणि त्या परंपरेच्या आजच्या अनुयायांचे त्रिवार अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे.

आता `योग' या विषयाची जगभर चर्चा होईल. योगासने शिकवणाऱ्या लोकांची मागणी होईल. योगदिनाला शुभेच्छापत्रे पाठवली जातील. ई-शुभेच्छापत्रेही उपलब्ध होतील. योगाची मंडळे निघतील. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्याची एक व्यावसायिक बाजूही आहे. त्यात काही गैर आहे असेही नाही. अगदी भारताला विदेशीचलन सुद्धा त्यातून मिळू शकेल. परंतु हे सारे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील ते भाषण किती जणांनी लक्षपूर्वक ऐकले आणि ज्यांनी लक्षपूर्वक ऐकले त्यांना ते किती लक्षात आहे माहित नाही. पुन्हा लक्षात असलेल्या भाषणाचा कशा पद्धतीने अन्वयार्थ लावला जातो; या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. मोदींनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की, आपण आपली जगण्याची शैली बदलण्याची गरज आहे. पर्यावरणापासून तर अर्थकारणापर्यंत, आरोग्यापासून तर समाजकारणापर्यंत सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ते आवश्यक आहे. `योग' या अपेक्षित जीवनशैलीचा मार्ग दाखवतो. त्यामुळेच `योग' म्हणजे केवळ शारीरिक कसरतीचा एक प्रकार असा विचार न करता, महर्षी पतंजली यांनी म्हटल्याप्रमाणे - `योग: चित्तवृत्तीनिरोध:' हे लक्षात घ्यायला हवे. योगासनांसोबत त्याच्या सखोल तत्वज्ञानाचा, योगाने केलेल्या मानवी जीवनाच्या तलस्पर्शी विश्लेषणाचा प्रचार-प्रसार होईल; त्यासंबंधातील समज वाढेल, आचरण वाढेल यावर जोर द्यायला हवा. `योगा'द्वारे शरीर चांगले राखून पैसा, मानसन्मान, पदप्रतिष्ठा, करीयर, शारीरिक सुखोपभोग, अधिकाधिक संग्रह आणि अधिकार; यांचीच आराधना करायची असेल तर तो `योग' या मूळ वस्तूचा/ भावनेचा/ संकल्पनेचा घोर अपमान ठरेल. `सर्वे सन्तु निरामयाः' सोबतच `सर्वे भद्राणि पश्यन्तु' हा `योगा'चा म्हणूनच भारतीय चिंतनाचा गाभा आहे हे विसरता कामा नये. संपूर्ण जगभरातील ७०० कोटी लोकांच्या जीवनात योगाच्या माध्यमातून इष्ट परिवर्तन येवो आणि सगळ्यांच्या जीवनात निरामयतेसोबतच भद्रता नांदो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १२ डिसेंबर २०१४