शुक्रवार, १० जून, २०२२

उत्साहातील उथळपणा

अमेरिकन काँग्रेसमधील मोदींच्या ऐतिहासिक भाषणाने समर्थक आणि विरोधक दोघातही अमाप उत्साह उत्पन्न केला आहे. या उत्साहाच्या भरात दोघेही मर्यादा विसरून उथळपणाचे प्रदर्शन करू लागले आहेत. मोदींच्या भाषणाला टाळ्या वाजल्या याचे समर्थन सुरु होताच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणालाही टाळ्या वाजल्या होत्या हे दाखवणारी छायाचित्रे झळकू लागली. खरे तर ही छायाचित्रे डॉ. सिंग यांचे भाषण झाले तेव्हाच झळकायला हवी होती. का झळकली नाहीत? कारण त्यांच्या मागे कोणीही उभे नव्हते. जे कोणी उभे होते ते गांधी घराण्याच्या मागे उभे होते अन युवराज गांधींना, डॉ. सिंग यांनी काढलेला अध्यादेश भर पत्रपरिषदेत आगंतुकपणे येऊन फाडून टाकण्याचाही संकोच नव्हता. एक पंतप्रधान म्हणून पक्षसुद्धा ज्यांच्या पाठीशी उभा नव्हता, त्यांच्या भाषणाला अमेरिकन काँग्रेसने टाळ्या वाजवल्या काय अन न वाजवल्या काय? सारखेच होते. अन आज जर त्या टाळ्यांचे देशवासीयांना कौतुक असेल तर त्यात एवढे पोटात दुखण्याचे कारण काय? शिवाय डॉ. सिंग यांच्यासाठी औपचारिकपणे एकदा- दोनदा टाळ्या वाजणे, अन नऊ वेळा उत्स्फूर्त दाद मिळणे यात फरक आहे की नाही? शिवाय यातील एकदा तर मोदींनी स्वत: टाळ्या वाजवणे सुरु केले होते (अमेरिकन सैनिकांच्या डी-डे च्या बलिदानाचे स्मरण केले तेव्हा) अन काँग्रेस सदस्य नंतर उठून टाळ्या वाजवू लागले होते अन सभाध्यक्षांनी उठून त्यांचे अनुकरण केले होते. ही तर अभूतपूर्व गोष्ट होती. पण आता डॉ. सिंग यांचे फोटो टाकण्याचा उथळपणा नाही केला तर ते मोदीविरोधक कसे?

दुसरा मुद्दा पुढे आला आहे teleprompter वापरण्याचा. पूर्वी लिहिलेले भाषण वाचण्याची पद्धत होती. आता आजच्या काळानुरूप नवीन तंत्रज्ञान आहे. दोन्हीत तात्विक फरक काय आहे? काहीच नाही. बरे ही काही लपूनछपून केलेली गोष्ट नाही. मग जणू काही teleprompter वापरणे हे पाप आहे असा पवित्रा घेणे याला उथळपणा यापेक्षा वेगळा शब्द असूच शकत नाही.

दुसऱ्या बाजूला समर्थकही उथळपणा करू लागले आहेत. ते नरेंद्र (स्वामी विवेकानंद) आणि हे नरेंद्र अशी तुलना, तशी छायाचित्रे फिरू लागली आहेत. हे सर्वथा अनुचित आहे. उत्साहाच्या भरात अवधान सुटायला नको. स्वामी विवेकानंद आणि नरेंद्र मोदी यांची अशी साधर्म्यतुलना अनाकलनीय आहे. स्वामी विवेकानंद सत्ता, संपत्ती, संघटन वा समर्थन याचा अंशही गाठीशी अन पाठीशी नसताना शिकागोच्या मंचावर उपस्थित झाले होते. ही व्यक्ती कोण आहे हे देखील माहीत नसताना त्यांनी केलेल्या संबोधनातील आत्मीय आणि आध्यात्मिक शक्तीने कोलंबिया सभागृह भारीत झाले होते. तेथील श्रोतृसमुदायाला त्या नरेंद्राकडून कशाचीही अपेक्षा नव्हती. त्या नरेंद्राचे कौतुक नव्हते. कारण कौतुक करण्यासारखे त्याने तोवर काहीही केलेले नव्हते. त्या सभागृहाचे काही शिष्टाचार नव्हते. भाषणाच्या आदल्या दिवसापर्यंत स्वामीजी अमेरिकेच्या रस्त्यावरून अनिकेत, अकिंचन, अज्ञात भटक्या म्हणून फिरत होते. नरेंद्र मोदी आणि नरेंद्रनाथ दत्त यांची साधर्म्यतुलना म्हणूनच अनाठायी आहे. शिवाय दोघांच्या भाषणाचे विषय, आशय, प्रयोजन या सगळ्यातच जमीनअस्मानाचे अंतर आहे. नरेंद्र मोदींचे अमेरिकन प्रतिनिधीगृहातील भाषण हा निखालस आनंदाचा विषय आहे. पण आनंदाच्या प्रसंगी निर्माण होणाऱ्या उत्साहाने आपल्याला अधिक प्रगल्भ करायला हवे. हा उत्साह आपल्याला उथळ बनवीत असेल तर चिंता आणि चिंतन केले पाहिजे. यावर दुमत होऊ शकत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ११ जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा