सोमवार, २० जून, २०२२

बोम्बल्यांचा देश

जगभरात सध्या इराक प्रश्नाची चर्चा सुरु आहे. आपली प्रसार माध्यमे तर बी.बी.सी. वा सी.एन.एन. यांच्यापेक्षाही अधिक रस घेऊन त्या विषयाला अधिक वेळही देत आहेत. तेथे अडकलेले ४० भारतीय हा सगळ्या देशाचा विषय आहे हे खरे. विपत्तीत अडकलेल्या लोकांची चिंता वाटणे, चिंता करणे आणि त्यांना सुखरूप आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे यात वावगे काहीच नाही. पण विपत्ती आल्यावर हातपाय गळायचे की खंबीरपणे पाय रोवून उभे राहायचे? जो उठतो तो एकच धोशा लावतो- पाहा यांची स्थिती, पाहा कसे रडताहेत. बरे हे एक वेळ मानवियता म्हणून समजून घेताही येईल, पण त्याला जोड देऊन सरकारच्या नावाने जेव्हा बोंब ठोकली जाते तेव्हा गमतीशिवाय दुसरे काहीही वाटू शकत नाही. जिथे प्रत्यक्ष इराकी सरकारला स्थितीचा अंदाज आला नाही आणि स्थिती हाताळता आली नाही तिथे ४० लोकांच्या सुरक्षेसाठी इतक्या दुरून भारत सरकार काय करू शकणार? आणि उपाय शेवटी रोगाची लक्षणे दिसल्यावर आणि निदान झाल्यावरच करतात ना? एक आणखीनही मुद्दा आहे की, वेळ काही सांगून येत नाही. आणि दुसरे म्हणजे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, जोरावर सिंह- फतेह सिंह वगैरेंचा वारसा आपण टाकून दिला आहे का? मागे नेपाळहून भारतीय विमानाचे अपहरण करण्यात आले होते तेव्हाही असेच घडले होते. पंतप्रधान वाजपेयी यांच्या निवासापुढे लोकांनी इतके गळे काढले की विचारता सोय नाही. तुमची काहीही मजबुरी असो आमची माणसे परत आणा !! हे चूक आहे. मानवी जीवनाचे महत्व लक्षात घेऊन आणि त्याबद्दल आदर सन्मान बाळगूनही हे म्हणणे भाग आहे की ही वृत्ती चूक आहे. घटना अशाच घडत असतात. अन्यथा अमेरिकेच्या ट्वीन टोवर्सवर अचानक हल्ला कसा झाला असता? परीक्षा पाहणारे असे प्रसंग येतच असतात. त्यावेळी गळे काढायचे, कावकाव करायची की; सर्वोच्च त्यागाची तयारी ठेवून हिमतीने वागायचे आणि सगळ्यांनी हिंमत वाढवणारे वर्तन करायचे. पतीच्या मृतदेहाला सलाम करून रणांगणावर आपले कर्तव्य पार पाडायला जाणाऱ्या महिला अजूनही आपण पाहतो, त्यावेळी असे गळे काढणे खटकते. आपल्या बिनडोक प्रसार माध्यमांबद्दल तर बोलायलाच नको.

- श्रीपाद कोठे

२१ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा