स्वामीजींनी शिकागो धर्मपरिषदेत हिंदुत्वाचा जयनाद केल्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर आदर आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. खेत्री संस्थानच्या राजेसाहेबांनीही त्यांना अभिनंदन पत्र पाठविले. त्या अभिनंदनपत्राला स्वामीजींनी अमेरिकेतून पत्रोत्तर पाठविले. या सुदीर्घ उत्तरात स्वामीजींनी भारतेतर जगाच्या जीवनोद्देशाची, जगण्याच्या प्रयोजनाची, जीवनदृष्टीची चिकित्सा केली आणि जीवनाकडे पाहण्याच्या या दृष्टीमुळे भारत त्यांच्यासाठी कसा टाकावू आहे याचाही उहापोह केला. त्यानंतर स्वामीजी म्हणतात, जे जगण्यास योग्य असतात तेच जगात टिकून राहतात. मग बाकीचे जग म्हणते त्याप्रमाणे भारत जर टाकावू असेल तर, हजारो वर्षे प्रचंड आघात आणि वादळे यांना तोंड देऊनही तो अद्याप टिकून का आहे? हा भेदक प्रश्न उपस्थित केल्यावर स्वामीजी अतिशय प्रभावी शब्दात या समाजाच्या, या देशाच्या जीवनस्रोतावर प्रकाश टाकतात. स्वामीजी या पत्रोत्तरात म्हणतात, `एका क्षणात जे सगळ्या जगभर रक्ताचे पाट वाहवू शकतात ते निश्चितच गौरवाला पात्र मानले जाऊ शकतात, काही लक्ष लोकांना सुखसमृद्धीत ठेवण्यासाठी सगळ्या पृथ्वीवरील अर्ध्या जनतेची जे उपासमार करतात त्यांचाही मोठा उदोउदो केला जाऊ शकतो, तर मग दुसऱ्या कोणाच्या तोंडची भाकरी न काढून घेता, जे कोट्यवधी लोकांना शांततेत आणि समृद्धीत ठेवतात त्यांना तुम्ही काहीच श्रेय देणार नाही काय? इतरांवर कोणत्याही प्रकारचा बलप्रयोग न करता, शतकानुशतके लक्ष लक्ष मानवांचे नीट संगोपन करणे आणि त्यांचे भाग्य घडविणे यात कोणतीच शक्ती प्रकट होत नाही का?’ संपूर्ण जगभर आज जे-जे म्हणून संघर्ष सुरु आहेत त्याचा इतका मूलगामी वेध आणि भारताने त्याला दिलेले चिरंतन उत्तर किती थोडक्या आणि प्रभावी शब्दात स्वामीजींनी मांडले आहे.
- श्रीपाद कोठे
२६ जून २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा