बुधवार, २२ जून, २०२२

संपादकांचे बुद्धीदारिद्र्य

आज सकाळी एक अग्रलेख वाचला. रेल्वे भाडेवाढ हा विषय होता. मला तो अग्रलेख मुळीच आवडला नाही आणि पटलाही नाही. त्यामुळे लगेच संबंधित संपादकाला तसा मेसेज केला. संध्याकाळी संपादकीय विभागातील एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा फोन आला. म्हणाला, तुमचं काय म्हणणं आहे? मी माझी भूमिका सांगितली. त्यांचे एकच तुणतुणे, आपल्यावर ६० लाख कोटींचे कर्ज आहे. एवढा पैसा कुठून आणणार ते सांगा. हे तर कोणीही मान्य करेल की, परिस्थिती बिकट आहे. पण त्यावर जादूची कांडी फिरवून तोडगा निघणार नाही हेही सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. ते बाकी काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यांचा आरोप होता की, सरकारने सगळं फुकट द्यावं हेच तुमचं म्हणणं आहे आणि त्यांनी फोन बंद केला. वरून हेही म्हणाले की, त्यांना खूप कामे आहेत. ते माझ्यासारखे रिकामे नाहीत.

मला रिकामे म्हटल्याबद्दल मला मुळीच वाईट वाटले नाही. उलट मला ते भूषण वाटते. लोकांनी फार काम करू नये, थोडे रिकामे असावे हा माझा सिद्धांत आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी. पण त्यांच्या बोलण्याचा रोख जो होता तो असा की, मी कम्युनिस्ट कामगार नेत्यासारखा किंवा गरिबांची बाजू घेऊन `फुकट संस्कृती'चे समर्थन करणाऱ्या व्यक्तीसारखा बोलतो आहे. ते संपादक मला चांगले ओळखतात. माझी संघनिष्ठा, माझे संघकार्य, माझे संघविचार, त्यापायी मी मोजलेली किंमत हेही त्यांना माहित आहे आणि तरीही माझ्यावर मी डावा असल्याचा आरोप करून ते मोकळे झाले. मला दु:ख त्याचंही नाही. कारण डावा तर डावा. या शब्दजंजाळाची  मला काहीही मातब्बरी कधीच वाटली नाही, वाटत नाही.

मग मला वाईट कशाचे वाटले? मला वाईट वाटले, संपादकांच्या निर्बुद्धतेचे. एखादा मान्यवर संपादक इतका मठ्ठ आणि निर्बुद्ध असेल, तर एकूण समाजाची बौद्धिक कुवत आणि स्थिती काय म्हणावी? अन अशा स्थितीत समाजाचे खरंच भवितव्य काय? मला वाईट याचे वाटले. कारण मी काय म्हणतो वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवू. पण या भाडेवाढीचे समर्थन करताना त्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून संसदेत केलेल्या पहिल्या भाषणाचाही विसर पडावा? मला तर वाटते त्यांना ते भाषण समजले तरी की नाही? काय म्हणाले होते मोदी? मोदी म्हणाले होते, `या देशावर पहिला अधिकार कोणाचा? पहिला अधिकार आहे या देशातील गरीबांचा. कारण श्रीमंत लोक तर त्यांना हवे ते मिळवू शकतील त्यांच्या संपन्नतेच्या बळावर. पण गरिबांनी काय करावे?' हे त्यांचे शब्द आहेत. शेवटी त्यांनी नाराही दिला होता- श्रामेव जयते. काय नरेंद्र मोदींना `फुकट संस्कृती'वाले म्हणायचे? आपण काय बोलतो, काय लिहितो, काय विचार करतो; कुठलीही सुसंगतता नसलेले हे विद्वान संपादक !! आज आमच्या बौद्धिक नेतृत्वाची ही बुद्धीदरिद्री अवस्था समाजाला कुठे घेऊन जाईल?

सध्याच्या आर्थिक स्थितीवर उपाय काय असाही त्यांचा प्रश्न होता. त्यावर एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, त्याबद्दल माझे मत, माझ्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनामा समितीला आणि नीती निर्धारकांना मी पोहोचवल्या आहेत, फार पूर्वीच. उपाय काय असा प्रश्न विचारणाऱ्या त्या दिवट्या संपादकाला माझा प्रतिप्रश्न आहे की, सत्तेवर येण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या भाजपने सत्ता मिळाल्यावर काय उपाय करायचे याचा सर्वंकष अभ्यास केला नाही का? उपाय काय याचे उत्तर त्यांनी द्यायचे आहे. डोक्यावर घेणारी जनता हवेत भिरकावून द्यायलाही कमी करत नाही, हा जगाचा अनुभव आहे. सगळ्यांनीच हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२३ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा