आजच्या पर्यावरण दिनी दोन गोष्टींची चर्चा झाली.
एक मित्र भेटायला आला. तो सांगत होता एका कार्यक्रमाबद्दल. त्यांच्या संस्थेतर्फे ते नागपूरच्या `ग्रेट नाग रोड'वर ६०० झाडे लावणार आहेत. फारच मोठे काम. त्याचे अभिनंदन केले. तो म्हणाला काही सूचना? मी म्हणालो- तुम्ही करता आहात तेव्हा हे काम होणारच आणि नुसते वृक्ष लावून तुम्ही स्वस्थ बसणार नाही तर ते जगवणे, वाढवणे आणि टिकवणे हेही तुम्ही करणार यात शंका नाही. माझी सूचना म्हणशील तर एक आहे. कसे करता येईल पाहा. झाडे लावताना जमीन (माती) जेवढी मोकळी करता येईल तेवढी करा. कारण आजकाल झाडे लावण्याची जागरुकता तर दिसते. मात्र त्याचवेळी काही गोष्टी सुटून जातात. एक तर मोठ्या प्रमाणावर लावली जाणारी झाडे जमिनीतील पाणी शोषून घेणार. त्यामुळे जमिनीतील पाण्याची उपलब्धता कमी होणार आणि पाण्याची पातळी आणखीन खाली जाणार. त्यामुळे झाडे वाढवताना पाण्याची उपलब्धता वाढेल हे पाहिले पाहिजे. नाही तर काही नवीन समस्या जन्माला येतील. कुंड्यांमध्ये झाडे लावतानाही ही बाब महत्वाची ठरते. कारण कुंडीतील झाडाला आपण पाणी घालतो त्यावेळी त्यातील चार थेंब सुद्धा जमिनीत झिरपत नाहीत. हां कुंडीतील झाडांचे दोन फायदे जरूर आहेत. एक म्हणजे, उष्णता शोषण आणि दुसरे म्हणजे, प्राणवायू उत्सर्जन. पण त्याचवेळी पाणी या घटकाचाही विचार आवश्यक आहे. त्यामुळे कुंडीपेक्षाही जमिनीत झाडे लावण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
आम्ही बोलत असतानाच, बातम्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण दाखवत होते. एक तृतियांश शालेय विद्यार्थ्यांना फुफ्फुसाचे विकार आहेत, असा त्याचा निष्कर्ष. प्राणवायूचे मास्क लावलेले विद्यार्थी वगैरे सगळं बाकी होतंच. मनात आले, आपला समाज ढोंगी आणि मूर्ख आहे का? आज प्रदूषण हा विषय काही फार नवीन राहिलेला नाही. पण त्याच्या त्याच त्याच चर्चा, तीच तीच सर्वेक्षणे आणि उपाय योजनांची तीच ठराविक वटवट; यापलीकडे आम्ही केव्हा जाणार? जायला हवे हे मात्र नक्की. मोठ्या शहरांचा मोह सोडायला आमची तयारी नाही. वाहनांचा वापर कमी करण्याची आमची तयारी नाही. माती, झाडे, पाणी यापेक्षा आम्हाला सिमेंट आवडते. ही आवड सोडायला आम्ही तयार नाही. एअर कंडिशनर, रसायने, सौंदर्य प्रसाधने यांचा वापर मर्यादित करायला आम्ही तयार नाही. खूप साऱ्या चिंता व्यक्त करतानाच आम्हाला विसर पडतो की रोज कोट्यवधी घरातून कोट्यवधी स्त्री पुरुष जे केस रंगवतात त्याचाही प्रदूषणात किती मोठा वाटा आहे? प्रत्येकाने एक युनिट कमी वीज वापरली तरीही कितीतरी उष्णता आटोक्यात आणता येईल. पण हे होण्यासाठी शहाणपण आणि प्रामाणिकपणा हवा. नुसती सर्वेक्षणे आणि अहवाल उपयोगाचे नाही. या गोष्टी गोड शब्दात वगैरे सांगायची वेळही निघून चालली आहे. थोडे कडवट होणे आवश्यक आहे.
- श्रीपाद कोठे
५ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा