गुजरातमध्ये मतदान सक्तीचे होण्याची शक्यता, अशी बातमी आज वाचली. मतदानाच्या सक्तीला माझा मुळातच विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्र वा केंद्रात मतदान सक्तीचे झाले तर मी मतदान करणार नाही. सज्ञान झाल्यापासून मी मतदान कधीच टाळले नाही. नियमित मतदान करतो. परंतु ते सक्तीचे झाल्यास मात्र मी मतदान करणार नाही अन त्या गुन्ह्यासाठी होणारा दंड वगैरेही भरणार नाही. जबरदस्तीने सरकारी यंत्रणा जे करेल ते करेल.
या विषयावरील एक साधकबाधक लेख काही काळापूर्वी मी अनेक वृत्तपत्रांनाही पाठवला होता. पण कोणीही तो छापला नाही. याची कारणे सर्वज्ञात आहेत. माझ्या ब्लॉगवर तो उपलब्ध आहे. जगभरातील अशा सक्तीचा आढावा घेऊन सोबत माझ्या विरोधाचीही मीमांसा मी त्यात केली आहे.
अनेक भारतीय व अभारतीय चिंतकांनी (ज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय देखील आहेत) एक विचार मांडला आहे की, माणूस हा राजकीय प्राणी नाही; माणूस हा आर्थिक प्राणी नाही; माणूस हा सामाजिक प्राणी नाही. माणूस यापेक्षा खूप काही वेगळी गोष्ट आहे. (तो सध्या विषय नाही, त्यामुळे विस्तार करत नाही.) याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. हे चिंतक म्हणतात म्हणून किंवा मी त्याचे अनुमोदन करतो म्हणून नव्हे. तर ती काळाची अन अख्ख्या जगाची गरज आहे म्हणून. माझ्या नियमित लिखाणातून हा विषय सतत येतच असतो अन पुढेही येईल. तूर्त एवढे पुरेसे आहे की, सर्वांगीण विचार करता, मतदानसक्ती ही अत्यंत चुकीची बाब आहे. अन त्यामुळेच माझा तिला १००% विरोध आहे.
- श्रीपाद कोठे
२५ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा