रा.स्व. संघाच्या संस्थापकांपासून, आज आपल्यात नसलेल्या पहिल्या पाचही सरसंघचालकांच्या जन्मदिन वा पुण्यतिथीला; त्यांना अभिवादन करणारे संदेश राजकीय (भाजपा) नेत्यांकडून पोस्ट होऊ लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. या पाचही सरसंघचालकांची प्रेरणा आणि प्रेरणा देण्याची शक्ती याबाबतही शंका नाही. परंतु एक बाब मनात आणि बुद्धीत स्पष्ट असली पाहिजे की, संघ/ संघविचार वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत. गेल्या काही वर्षात संघ म्हणजे भाजप असेच सर्वसाधारण मत दिसते. भाजपचे म्हणणे म्हणजे संघाचे म्हणणे, भाजपची नीती म्हणजे संघाची नीती अशी भावना दुर्दैवाने तयार झाली आहे. आता मोठे नेते जन्मदिनाला वा पुण्यतिथीला अभिवादन संदेश प्रसारित करीत असतील तर हळूहळू समूहाच्या मनात संघ म्हणजे भाजप हे समीकरण घट्ट होऊ शकेल. सामान्य स्वयंसेवक सुद्धा प्रवाहात येऊन असाच विचार करू लागतो. याचा अर्थ लगेच संघ आणि भाजपा हे शत्रू आहेत किंवा त्यांच्यात मतभेद (संघर्ष) आहे वगैरे करणे योग्य नाही. त्याचा अर्थ एवढाच की, संघ संघाच्या पद्धतीने, संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून, संघाच्या कामात सहभागी होऊन आणि संघाच्या अधिकृत साहित्यातून समजून घ्यायला हवा.
- श्रीपाद कोठे
१८ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा