आज पर्यावरण दिवस आहे. कोरोनाच्या सावटातील हा पर्यावरण दिवस. कोरोनाने तीन लाखाहून अधिक लोकांचे देशभरात बळी घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ तज्ञ डॉक्टरांनी दिलेली एक माहिती आज वाचण्यात आली. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे देशभरात वर्षाला १८ लाख लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे कोरोनाने घेतलेल्या बळींच्या सहापट अधिक. शिवाय हे सतत सुरूच असते. सहज एक विचार आला - आपल्याला पर्यावरणापेक्षा कोरोनाची काळजी अधिक का वाटते? कोरोना संसर्गजन्य असल्याने बहुतेक. आपला तर नंबर लागणार नाही ना ही भीती अधिक असते. ती स्वाभाविक आहेच पण आपल्याला एकूण मानवी जगण्यासमोर उभे असलेल्या संकटाची फारशी काळजी वाटत नाही हेही खरेच आहे. तसे नसते तर पर्यावरण सुरक्षा हा आमच्या काळजीचा विषय नक्कीच झाला असता. आणखीन एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. पर्यावरण संरक्षण म्हणजे झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर बंद करणे, पाणी जपून वापरणे एवढेच नाही. हा विषय खूप मोठा, व्यापक आणि खोल आहे. कृती, धोरण, कार्यक्रम, नियोजन; यासोबतच मानसिकता, विचारपद्धती, तत्त्वज्ञान, स्वप्ने यांच्याशीही त्याचा संबंध आहे. आपल्या स्वप्नांची नाळ मोदी, ममता, सोनिया, पवार, अखिलेश, मायावती, पुतीन, बायडेन, ट्रम्प किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा जाहिराती किंवा प्रसार माध्यमे किंवा अन्य कोणाशीही न जोडण्याची काळजी घेतली तरीही ती पर्यावरणाची मोठी सेवा होईल. बाकी ठराव, चर्चा, निधी इत्यादी तोंडीलावणी आहेतच.
- श्रीपाद कोठे
५ जून २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा