स्व. डॉ. अब्दुल कलाम यांनी India 2020 ची कल्पना सगळ्यांसमोर ठेवली होती. जिकडेतिकडे ती सांगितली आणि ऐकली जात असे. पण आज 2020 अर्ध्यावर आले असताना सर्वत्र निराशेची स्थिती आहे. हे मुद्दाम नमूद करण्याचं कारण म्हणजे; नुसता उत्साह, नुसती स्वप्ने, अन नुसते मानवी परिश्रम आणि बुद्धिमत्ता यांनी मानवी जीवन सुखीही होऊ शकत नाही आणि त्याच्या समस्याही निरस्त होऊ शकत नाहीत. कोरोना हे एक कारण आणि उदाहरण झाले. पण मानवी जीवनावर एकूणच प्रभाव टाकणाऱ्या, मानवी जीवनाला पुढे नेणाऱ्या किंवा मागे खेचणाऱ्या, मानवी जीवनाला प्रेरणा देणाऱ्या, मानवी जीवनाची घडण करणाऱ्या; मानवी समजुतदारीच्या कक्षेत येणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत; त्यांचाही साधकबाधक विचार माणूस करत नाही. जीवनाचा एकांगी, एकरेषीय विचार बाजूला सारण्याची कोणाचीही तयारी नाही. आज समोर असलेली आरोग्याची परिस्थिती असो की आर्थिक व्यवस्थेची; सर्वत्र मूलगामी चिंतनाचा, विचारांचा अभाव आहे. कोरोना संकटाला आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला पण सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर सुद्धा; केव्हातरी कोरोनाबाधितांची संख्या कमी होईल आणि सगळं मोकळं केल्याची घोषणा केल्यावर सगळं पहिल्यासारखं सुरळीत होईल, असंच आपण मानत आहोत. हो, अजूनही तसंच मानत आहोत. मोठमोठे लोक तसंच मानत आहेत. अन प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगाने बदलते आहे. अनागोंदीचे रूपांतर उद्रेकात होऊ नये याचा विचार होताना फारसा दिसत नाही. व्यवस्था, ती राबवणारे, नियोजन करणारे, सामान्य माणूस, साधनहीन लोक, कामापुरती साधने असणारे, पिढ्यांची ददात नसणारे; या सगळ्यांसाठी हवी असणारी दिशा; मार्ग काढायला हवा असणारा विचार आणि तत्वज्ञान; यांची चर्चा कोणीही करत नाही. सगळे वेबिनार अन लाइव्ह या विषयांना स्पर्शच करत नाहीत. एक गोष्ट अगदी आवडली नाही तरीही खूणगाठ म्हणून लक्षात घ्यायला हवी की, मूलभूत विचार केल्याशिवाय वरवरच्या मलमपट्टीने काहीही होणार नाही. जीवनाची दिशाच बदलण्याचे आव्हान आज उभे ठाकले आहे. शतकानुशतकांच्या धारणा, मते, दृष्टी टाकून देऊन विचार करावा लागेल. त्यासाठी कठोरता लागेल तसाच प्रामाणिकपणा लागेल; त्यासाठी कळकळ लागेल तशीच मूलगामी प्रतिभा आणि प्रज्ञा लागेल; त्यासाठी वर्तमानाची जाणीव लागेल तसेच द्रष्टेपण लागेल; त्यासाठी समग्रतेला कवेत घेणारे बाहू लागतील. मानवतेचा जगन्नाथाचा रथ ओढायला तशी आणि तेवढी माणसे लागतील. आज तरी त्यांचा अभाव जाणवतो आहे.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, ३० जून २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा