शुक्रवार, २४ जून, २०२२

एकांगीपणा

कशाच्याही संदर्भात (व्यक्ती, विचार, समाज, संघटना, अगदी काहीही) तीन गोष्टी असतात - संरक्षण, संगोपन, संवर्धन. ही तिन्ही कामे वेगवेगळी आहेत. यातील प्रत्येक काम प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक काम करण्याची गरजही नसते. आपापल्या प्रकृतीनुसार लोक ते ते काम करतात. या प्रत्येक कामाची पद्धत, भाषा, प्राधान्य, प्रकृती, आग्रह हेदेखील वेगळे असतात. गंमत अशी की, यातील आपलेच काम महत्वाचे, एवढेच नाही तर तेच एकमेव करावे असे काम; अशी बहुतेकांची धारणा असते. आपल्याला तीनमधील जे काम योग्य वाटते त्याशिवायची कामे चुकीची आहेत, ती करणारे चुकीच्या मार्गावर आहेत; अशीच अनेकांची भावना असते. दुसरे काही समजून घेण्याची तयारीही नसते. किमान आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळ्या गोष्टीही असतात, त्यांचेही महत्व असते हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही नसतो. यालाच म्हणतात एकांगीपणा. स्वामी विवेकानंद तर म्हणत की, मानवाला एकांगीपणाचा रोग जडलेला आहे.

या तीन व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाची बाब असते. संरक्षण, संगोपन, संवर्धन या तिन्हीच्या आधी ती गोष्ट येते. ती म्हणजे संरक्षण, संगोपन, संवर्धन कशाचे करायचे ती बाब. एखाद्या व्यक्तीचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करायचे तर ते ती व्यक्ती अस्तित्वात आल्यानंतर केले जाते. एखाद्या संस्थेचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करायचे तर ते ती संस्था अस्तित्वात आल्यानंतर केले जाते. संरक्षण, संगोपन, संवर्धन ही तिन्ही कामे अमुक काही तरी अस्तित्वात आल्यानंतरची कामे आहेत. जशी ही तीन कामे करणारे लोक आपापल्या प्रकृतीनुसार ती कामे करतात (एकमेकांबद्दल आस्था आणि विश्वास नसूनही) तसेच; प्रत्येक गोष्टीच्या मूळ अस्तित्वाचा किंवा या समग्र अस्तित्वाचा विचार करणारे, त्यासाठी काम करणारेही असतात. ते थोडे असतात आणि बरेचदा misunderstood असतात. हे जे मूळ अस्तित्व असतं, त्याला म्हणतात धर्म आणि त्याचा विचार करणारे असतात त्यांना म्हणतात ऋषी. वर्तमानात या दोन बाबी दुर्लक्षित आहेत, पण त्यांचा विचार पुढे येणे आवश्यकही आहे. धर्म आणि ऋषी यांचा उच्चार करणे सोपे असले तरी त्यांची समज मात्र कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २५ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा