आज आपले सगळे जीवन राजकारणाने व्यापलेले आहे. नको एवढा राजकारणाचा वावर आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात होतो आहे. crony capitalism वगैरे शब्द आज खूप वापरले जातात. स्वामीजींनी ११५ हून अधिक वर्षांपूर्वी राजकारणाबद्दल काय म्हटले होते, हे म्हणूनच लक्षणीय ठरते. महात्मा गांधी यांनीही स्वामीजींनंतर दहाएक वर्षांनंतर साधारण हेच विचार त्यांच्या `हिंद स्वराज'मध्ये व्यक्त केले होते.
पूर्व आणि पश्चिम' या प्रदीर्घ निबंधात राजकारणाबाबत निरीक्षण नोंदवताना स्वामीजी लिहितात- `मूठभर शक्तिशाली माणसे करतील ते धोरण नि बांधतील ते तोरण, अशीच सर्वत्र स्थिती असते. बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप. चालले त्यांच्यामागे. आणखीन काय? ते तुमचं पार्लमेंट बघितलं, व्होट बॅलट, मेजॉरिटी सारं काही बघितलं, पंत ! सगळ्या देशात ही एकच कथा. शक्तिमान पुरुष इच्छा होईल तिकडे समाजाला नेत असतात आणि बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप. भारतवर्षात हे शक्तिमान पुरुष कोण? तर, धर्मवीर. ते आमच्या समाजाला चालवतात. तेच समाजाची रीतीनीती बदलण्याची गरज पडल्यास बदलून देतात. आम्ही चुपचाप ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. फक्त यात तो तुमचा हैदोसहुल्ला, ती मेजॉरिटी, व्होट वगैरे नाही; इतकेच काय ते.
आता हे मात्र खरे की व्होट, बॅलट वगैरेंमधून बहुजन समाजाला पाश्चात्य देशांमध्ये जे एक प्रकारचे शिक्षणवळण लाभते ते आम्हाला लाभत नाही. पण त्याचबरोबर हेही खरे की, राजनीतीच्या नावाखाली जे चोरांचे गट युरोपीय देशांमधील बहुजन समाजाचे रक्त शोषून पुष्ट होत असतात ते पण आमच्या देशात नाही. राजनीतीच्या गोंडस नावाखाली पाश्चात्य देशांमध्ये चालणारा तो लाचलुचपतीचा धुमाकूळ, ती दिवसाढवळ्या डाकेखोरी ! त्या राजनीतीची अंदरकी बात बघितली असती तर माणसाविषयी अगदी निराश, हताश होऊन गेला असता, पंत ! `गली गली गोरस फिरे, मदिरा बैठी बिकाय... सतीको धोती ना मिले, कसबिन पहिने खासा' (दूध विकण्यासाठी गल्लोगल्ली फिरावे लागते, पण दारू एके जागी बसूनच विकली जाते. सती स्त्रीला नेसायला वस्त्र मिळण्याची मारामारी, पण बाजारबसविला मात्र लयलूट.) धन्य कलियुगाचा महिमा. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे आपल्या मुठीत ठेवली आहेत. प्रजेला, बहुजन समाजाला ते लुटतात, लुबाडतात, शोषतात, सैन्यात भरती करून मरण्यासाठी देशदेशांतरी पाठवतात. जय झाला तर यांचेच उखळ पांढरे होणार. सैनिकांच्या रक्ताच्या मोबदल्यात. अन प्रजा? ती तर तिथेच गारद झाली, मेली. तिचं फक्त रक्त सांडायचं काम ! याचं नाव राजनीती, पंत ! समजलं? तिने दीपून जाऊ नका, तिच्या भूलावणीला भुलू नका.
एक गोष्ट समजून घेण्याचा यत्न करा. सांगा, माणूस कायदे तयार करीत असतो की कायद्यांनी माणूस तयार होत असतो? माणूस पैसा निर्माण करीत असतो की पैशाने माणूस निर्माण होऊ शकतो? माणूस नावलौकिक मिळवीत असतो की नावलौकिकाने माणूस निर्माण होत असतो? माणूस व्हा, पंत, आधी माणूस व्हा ! मग दिसेल की, बाकीचे सारे कसे आपोआप तुम्हाला येउन मिळत आहे. ते कुत्र्यासारखे आपसात एकमेकांवर गुरगुरणे, भुंकणे सोडून देऊन सदुद्देश्यासाठी सदुपाय, सत्साहस नि सद्वीर्य यांचे अवलंबन करा. जन्मला आहात तसे एक डाग ठेवून जा मागे. तुलसी आयो जगत मे, जगत हंसे तुम रोय... ऐसी करनी कर चलो, आप हंसे जग रोय' (जेव्हा तू जन्मला होतास तेव्हा सगळे हसत होते, तू रडत होतास. तुलसीदासा, आता अशी करणी करीत चल की, तू हसत हसत मरशील आणि सगळे तुझ्यासाठी रडतील.) हे करू शकला तर तुम्ही माणूस, पंत. एरवी कसचे मनुष्य तुम्ही !'
- श्रीपाद कोठे
२८ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा