एका सरपंचाने आपल्या लेकीसोबत काढलेल्या सेल्फीची चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांनीही `मन की बात'मध्ये मुलींच्या आदराचे, सन्मानाचे आवाहन केले. चांगली अन आवश्यकच गोष्ट आहे. वादविवाद होण्याचे कारणच नाही. महिलांच्या एकूण स्थितीबद्दल सुद्धा बरीच चर्चा होते. तीही योग्य आहेच. फक्त या सगळ्यात दुर्लक्षित राहणाऱ्या अन अचर्चित राहणाऱ्या काही गोष्टी.
१) मोठ्या प्रमाणात मुलींना नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्यांना नमस्कार करू दिला जात नाही.
२) मोठ्या प्रमाणात लोक मुलीच्या जन्मापासूनच तिच्या भविष्यासाठी तरतूद करू लागतात.
३) मोठ्या प्रमाणात तिला झालेल्या छोट्याशा सुद्धा त्रासाने डोळे पाणावणारे लोक आहेत.
४) महिला कोणत्याही वयाची वा जातीधर्माची असो, तिला कोणी त्रास देताना दिसल्यास हटकणारे अन वेळप्रसंगी त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करणारे सगळ्या जातीधर्माचे ज्येष्ठ नागरिक आताआतापर्यंत होते. यात शेजारधर्मही आला. मात्र अतिरेकी व्यक्तीवादाने आपण ही सहजता घालवली.
५) अन्याय करणाऱ्यांपेक्षा घराघरात सहयोग, सहकार्य अन समजूतीने वागणारे लोक अधिक आहेत.
६) मोठ्या प्रमाणात शेजारी वा नातेवाईकांकडे थोड्या वेळासाठी, बाहेरगावी जाताना, शिक्षणासाठी वगैरे मुलींना ठेवले जाते. अन जिथे त्या मुली राहतात तिथे एक चांगले भावनिक नाते निर्माण होते. लोकही त्या मुलींची अतिशय जबाबदारीने काळजी घेतात.
अशा आणखीन गोष्टी सांगता येतील. मात्र या वा अशा बाबींची चर्चा होत नाही. स्वच्छ कपड्यावर डाग पडला की डागाचीच चर्चा होते. पण डागाची चर्चा इतकीही होऊ नये की स्वच्छ कपड्यांकडे लक्षच जाऊ नये किंवा विपरीत भावना- जसे भय, हीनता आदी निर्माण होईल. चांगल्या, सकारात्मक, उर्जावान, आनंददायी गोष्टींची चर्चा पुरेशी झाली तर त्या आधार आणि प्रेरणाही देतील.
- श्रीपाद कोठे
२९ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा