रविवार, ५ जून, २०२२

दत्तात्रय जी

आजचा प्रसंग. दुपारी १२ ची वेळ. रेशीमबाग परिसरात सुरु असलेल्या रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात भोजनाची पंगत बसली होती. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रयजी होसबळे हेही सगळ्यांसोबत खालीच जेवायला बसले होते. साधं वरण, भात, ढेणसाची भाजी, पोळ्या, ताक, कांदा असा साधाच स्वयंपाक. बाकीचे हजारेक स्वयंसेवक जे आणि जसे जेवत होते, ते आणि तसेच दत्तात्रयजी देखील जेवत होते. भात वाढायला एक विशीतला स्वयंसेवक आला. भात वाढताना चमच्याला भात चिकटतो. असा भात चिकटला की नंतर भात नीट वाढला जात नाही. त्या स्वयंसेवकाचेही तसेच झाले. दत्तात्रयजी त्याला चमचा हातात घेऊन समजावून सांगत होते, भात कसा वाढायचा. चमचा कसा स्वच्छ करायचा वगैरे. वीस दिवसांपूर्वी १६ मे रोजी, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथग्रहण समारंभात निमंत्रितांच्या पहिल्या रांगेत बसलेले दत्तात्रयजी सगळ्या जगाने पाहिले. तेच दत्तात्रयजी यांचे हे रूप. कोणाला हे खरे वाटणार नाही, पण असेच आहे. हेच आहे संघाचं गुपित आणि हीच आहे संघाची शक्ती. संघाचे ४-५ लोक सोडले तर त्या सोहोळ्याला हजर असलेल्या चार-पाच हजार लोकांपैकी अगदी ४-५ लोक तरी अशा तऱ्हेने जगत-वागत असतील का? `अलौकिक नोहावे लोकांप्रती' हे ज्ञानेश्वर माउलीचे वचन जगणारी ही राष्ट्रनिष्ठांची मांदियाळी आहे. अन हे सारे `असे असे वागायचे आहे' अशा भूमिकेतून, ठरवून वगैरे नाही. सहज, स्वाभाविक. सगळं असणंच इतकं साधं, सहज, स्वाभाविक. फुलाला स्वत:च्या सुगंधाचा मागमूसही नसावा इतक्या निर्लीप्तपणे. हे समजून घेणं खरंच खूप कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

६ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा