मंगळवार, ७ जून, २०२२

वागळे आणि आंबेडकर

सध्या वागळे पुराण खूप सुरु आहे. त्यावर काही बोलण्या लिहिण्यासाठी मी फार लहान आहे. फक्त एक किस्सा आठवला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांच्याच सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी) नागपूरचे अध्यक्ष सदानंद फुलझेले होते. आणि मुख्य व्याख्यान झाले दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे. `डॉ. आंबेडकर व मी' असा त्यांचा विषय होता. त्यात त्यांनी सांगितलेला किस्सा-

मामासाहेब म्हणाले- `नागपूरच्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर चंद्रपूरलाही तसाच एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी तरुण भारतचा वार्ताहर म्हणून भाऊसाहेब माडखोलकर यांनी मला पाठवले. कार्यक्रम आटोपल्यावर जेवणाची व्यवस्था होती. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे पंगत होती. बाबासाहेब पंगतीच्या सुरुवातीला खुर्चीवर बसले होते. त्यांना खाली बसण्याचा त्रास होत असल्याने. शेजारी खाली बाकी सगळे. त्यात मीही होतो. वाढणे सुरु झाले तेव्हा बाबासाहेबांनी व्यवस्था पाहणाऱ्या लोकांना आवाज दिला आणि सांगितले की, तो तरुण भारतचा मुलगा बसला आहे ना पलीकडे त्याला मांसाहार वगैरे चालत नाही. तो बामन आहे. त्याला जरा नीट वाढा.'

यावर कुठल्याही टिप्पणीची गरज नाही. मामासाहेबांनी, सदानंद फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार संघाच्या जाहीर कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात तो प्रसिद्धही झाला होता. कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे त्यांचे नाव घेणारा वागळे?

- श्रीपाद कोठे

८ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा