गुरुवार, ९ जून, २०२२

पंतप्रधानांच्या भाषणाचा अन्वयार्थ

दोन दिवस झाले पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची चर्चा सुरु आहे. त्यांचे समर्थक, हितचिंतक, पाठीराखे; अन त्यांचे टीकाकार, विरोधक, हितशत्रू यांच्यातील छोट्या-मोठ्या चकमकी, खडाजंगी हेही छान सुरु आहे. परंतु आता यापलीकडे जाऊन त्यांच्या भाषणातील मुद्यांची चर्चा होण्याची गरज आहे. दहशतवाद, त्या अनुषंगाने पाकिस्तान, एनएसजीमधील भारताचा प्रवेश हे दोन विषय प्रामुख्याने आहेत. भाषणापूर्वी व भाषणानंतरही त्यावर चर्चा होत आहे, होईलही.

यातील दहशतवाद आणि पाकिस्तान या विषयांवर तर बोलण्याचाही कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांना अधिकारच नाही. मोदी सरकारच्या या संदर्भातील कामाचे मूल्यमापन करणे तर दूरच. कारण पाकिस्तान ही मुळातच कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांची निर्मिती आहे. तसेच दहशतवादाचे केवळ पोषण नव्हे तर स्वत:च्या स्वार्थासाठी दहशतवाद उभा करण्याचे पापही याच दोघांचे आहे. प्रथम पाक जन्माला घालून भारताच्या पाचवीलाच यांनी दहशतवाद पुजला. अन दुसरीकडे तेवढ्याने भागले नाही म्हणून पंजाबातील भिंद्रनवाले असो की नक्षलवाद यांनीच निर्माण केला. अगदी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत शांत असलेले काश्मीर यांनीच पेटवले. अन देशभरात भाषा, जाती, प्रांत, साधने, पंथ अशी भांडणे उकरून काढून देश कायम अस्वस्थ ठेवण्याचे पापही कॉंग्रेस व कम्युनिस्ट यांचेच आहे. त्यामुळे या विषयांवर त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करणेच इष्ट.

ज्या नेहरूंमुळे काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात गेला त्यांचेच सतत नाव घेणाऱ्यांनी भारत-पाक संबंधात अमेरिकेला आणण्याची काय गरज असा प्रश्न विचारणे यासारखा दांभिकपणा दुसरा असू शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघात कृष्ण मेनन यांनी काश्मीर प्रश्नावर तब्बल आठ तास भाषण केले होते हे माहितीही नसणारे आणि मुत्सद्दीपणा हा शब्दही ऐकला नसलेले लोक काश्मीर अथवा पाकिस्तान हे विषय अमेरिकी सभागृहात काढण्यावरून टीकाटिप्पणी करतात, हे त्यांचे बुद्धीदारिद्र्य म्हटले पाहिजे.

परंतु या सगळ्या विषयांपेक्षा महत्वाचे असे दोन मुद्दे मोदींनी आपल्या ऐतिहासिक भाषणात मांडले. त्यांचे मात्र उल्लेख देखील होताना दिसत नाहीत. बाकीच्यांचे सोडून देऊ, पण भाजपतर्फे आणि विचारवंतांतर्फे ते पुढे आणले जायला हवेत. कारण ते मुलभूत आणि दीर्घकालीन तर आहेतच, पण दहशतवाद, पाकिस्तान, एनएसजी यासारख्या विषयांवरील स्थायी तोडगाही त्यातच लपलेला आहे. कोणते आहेत हे दोन मुद्दे?

मोदींनी भाषणाच्या सुरुवाती सुरुवातीला योगदिनाचा उल्लेख केला आणि एक मार्मिक टिप्पणी केली ज्यावर सदस्यांनी मुक्त हसून प्रतिसादही दिला. ती टिप्पणी होती- हजारो वर्षांपासून आम्ही जगाला योग शिकवला पण अजूनही त्याच्या पेटंटसाठी दावा केलेला नाही. तसेच भाषण संपवताना त्यांनी आवाहन केले की, जगाच्या कल्याणासाठी - केवळ संपन्न नव्हे तर मूल्यवान (not only wealth but values also) जगाच्या निर्मितीसाठी दोन्ही देश एकत्र येऊ या. भोगभूमी आणि सत्ताकांक्षी समजल्या जाणाऱ्या, जगाचा पोलीस म्हटल्या जाणाऱ्या संपन्न अन शक्तिशाली देशाच्या शक्तिशाली लोक प्रतिनिधीगृहात त्यांच्या विचार परंपरेला छेद देणारा विचार प्रभावीपणे अन आग्रहाने ठेवणे आणि त्याला मान्यता मिळवणे ही सामान्य बाब नाही. मोदी यांचे व्यक्तिमत्व, भारताची वाढलेली ताकद, त्या विचारांची अंगभूत महत्ता आणि स्वीकृत मार्गाने पदरी आलेली भारतेतर जगाची विफलता; या चार कारणांनी मोदींचा विचार उचलून धरला गेला. पेटंटवरील टिप्पणीला प्रतिनिधींनी हसून दिलेली दाद, त्या पद्धतीच्या दोषांची झालेली जाणीव दाखवून जाते. ज्ञान, पैसा, परिश्रम, संशोधन, तंत्रज्ञान, कौशल्य, विचार, साधने ही सगळ्या जगासाठी आहेत. ज्या अज्ञात शक्तीकडून आपल्याला हे लाभते त्याबद्दल कृतज्ञ राहून, त्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून या जगासाठी त्याचा उपयोग करायला हवा. आपली बँकठेव वाढवणे किंवा विविध प्रकारची सत्ताकांक्षा पूर्ण करणे यासाठी त्याचा उपयोग करणे ही मूल्यहीनता आहे. या जीवनदृष्टीच्या अभावीच जगातील बहुतांश समस्या अन संघर्ष जन्माला आले आहेत. समस्या अन संघर्ष जन्माला घालणारे सगळेच काही दुष्ट वृत्तीचे नाहीत. उलट सज्जनांकडील जीवनदृष्टीचा अभाव हे समस्यांचे मोठे कारण आहे. त्या मानाने मुळात दुष्ट असणाऱ्या शक्तींचा बंदोबस्त ही सोपी बाब आहे. मोदींच्या भाषणाचा हाही महत्वाचा आशय आहे. या पैलूंवर भर देऊन अधिकाधिक अंगांनी त्याचा विचार होणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १० जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा