कदाचित एकालाही हे पटणार नाही पण सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या ही समाजाच्या निर्बुद्ध षंढत्वाची परिणती आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून सोशल मीडिया वाहतो आहे. झगमगणाऱ्या दुनियेपासून मी स्वतःला वेगळं करून घेतलं असल्याने मला या व्यक्तीविषयी तशी माहिती नाही. आजच्या घटनेनंतर थोडीबहुत माहिती कळली. परंतु या घटनेवर व्यक्त झालेल्या बहुतांश प्रतिक्रिया पाहिल्या आणि लिहायला हवं असं वाटलं.
उपदेशामृत पाजणारे आणि fighting spirit वर प्रवचने झोडणारे यांच्याकडे तर सरसकट दुर्लक्ष करायला हवे. मी आणि माझं जीवन म्हणजेच जग अशा थाटात जगणाऱ्या, विचार करणाऱ्या या लोकांना काडीचंही जीवन समजत नाही. राग येईल. येऊ द्या. कोणाची खुशामत करायला मी लिहीत नाही. पण आपल्याजवळचा एखादा शब्दही खर्च करायला मागेपुढे पाहणाऱ्या, समोरचा कसा react होईल याच भीतीत वावरणारा, आत्यंतिक आतल्या गाठीचा आणि अहंमन्य समाज fighting spirit म्हणताना 'तुझं तू पाहा' एवढंच वास्तवात म्हणत असतो.
यश-अपयश याकडे पाहण्याचा आणि त्याविषयीचा दृष्टिकोन, हाही महत्वाचा भाग आहे. आशावाद नावाची जी एक निर्बुद्ध गोष्ट आपण सांगतो, शिकवतो; त्याचाही अशा घटनांत मोठा वाटा असतो. 'प्रयत्न करा, यश मिळणारच' या वाक्याला आपण इतकं डोक्यावर घेतलं आहे की, अपयश हा सुद्धा आयुष्याचा भाग आहे हे वास्तव नाकारू लागलो आहे. अपयश हाही आयुष्याचा भाग आहे एवढंच नाही, तर एखाद्याच्या आयुष्याला अपयशाचा शापच असू शकतो, हेही कधी कधी दृष्टीला पडूनही आम्ही नाकारतो. आयुष्यातील अपयशाचे स्थान आपल्या डरपोकपणापोटी नाकारून आम्ही माणसाला वास्तवापासून दूर खेचून नेतो. खोट्या आशा जागवतो. त्या पूर्ण झाल्या नाही की, अशा घटना घडतात.
जीवन हा एक जुगार आहे. यात चांगलं आहे, वाईट आहे; न्याय आहे, अन्याय आहे; खरं आहे, खोटं आहे; यश आहे, अपयश आहे. कोणाच्या वाट्याला काय येईल, किती प्रमाणात येईल; हे सांगता येत नाही. जे वाट्याला येईल त्यासह जगत राहावं लागतं, लागेल. इतकं नग्न वास्तव सांगता यायला हवं, समजता यायला हवं, पचवता यायला हवं. शब्दांचे फुलोरे आणि गुलाबाची स्वप्ने जगण्याला मदत करत नाहीत. प्रत्येकाची कृस वाहून नेण्याची शक्तीही कमीजास्त असते. बेडकाचा बैल होऊ शकत नाही. समाजाला, माणसांना हे सांगताना किंवा कोणी सांगितलेले ऐकतानाही अनेकांच्या विजारी पिवळ्या होतात. अन त्याला घाबरून फक्त छान छान ऐकण्या बोलण्याची घातक सवय आपण लावतो, लावून घेतो. आपल्याला जीवनदायी सत्यापेक्षा, सुखदायी असत्य जवळचे आणि आपले वाटते. मग कसेतरी धडपडत, ठेचकाळत, जमेल तसे पुढे पुढे जात राहायचे. सगळ्याच गोष्टींवर हसण्याची भंपक तत्वज्ञाने निर्माण करायची. हो तर हो, नाही तर नाही; अशा वृत्तीने काही जण जगू शकतात. काही नाही जगू शकत.
मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा नामक प्रकाराचे स्तोम, त्याला देण्यात येणारे अवास्तव, अतिरेकी महत्व; हाही अशा घटनांचा एक वेगळा पैलू आहे. ज्याप्रमाणे यश वा अपयश म्हणजे जीवन नाही, त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या इच्छा म्हणजेही जीवन नाही. नियती कोणाबद्दल क्रूर असेल आणि कोणाबद्दल कनवाळू हे सांगता येत नाही. अन कथित इहवाद्यांना किंवा ईशवाद्यांना माणसाची नियती बदलताही येत नाही. याला पराभव समजून जो तो ढोंगी प्रयत्नवादाची कवने गात फिरतो. पण प्रयत्न सोडता येत नाहीत, अन परिणामांची स्वप्ने रंगवू नयेत; हे रोखठोकपणे सांगण्या, ऐकण्या, समजण्याची शक्ती विकसित करण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करत नाही.
एखादी अशी घटना घडते. आसवांच्या नद्या वाहतात आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या'.
- श्रीपाद कोठे
१४ जून २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा