रविवार, १९ जून, २०२२

अण्वस्त्रांची विल्हेवाट

Stockholm international peace research institute ने एक अहवाल तयार केला असून त्यात म्हटले आहे की, जगातील अण्वस्त्रांची संख्या सहाशेने कमी झाली आहे.

तशी चांगलीच बातमी म्हणायला हवी. पण त्याच वेळी एक प्रश्न उभा राहतो, या कमी झालेल्या अण्वस्त्रांचे झाले काय? जगात कोणीही कोणत्याही देशावर अण्वस्त्र वापरलेले नाही. मग ६०० अण्वस्त्रे गेलीत कुठे? उत्तरही सोपं आहे की, ती नष्ट करण्यात आली असली पाहिजेत. कुठे नष्ट केली असतील? समुद्राच्या तळाशी? पृथ्वीच्या पोटात? अंतराळात? कुठेही नष्ट केली असोत आणि कशाही अन कितीही शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट केली असोत; त्यांचे किरणोत्सर्जन तर झालेच असणार. आजच्या कोणत्याही अण्वस्त्राची शक्ती, little boy पेक्षा कितीतरी अधिक आहे. विषय स्पष्ट आहे- आजच्या अनेकानेक समस्यांना याने हातभार लागला असेल वा नाही? ६०० अण्वस्त्रे नष्ट करण्याने काय काय होऊ शकेल याचा विचार कोण करणार, कधी करणार?

अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा सुरक्षा ही मानवी मनाची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. बाकी काही नसले तरी चालेल पण सुरक्षा हवी. आजच्या घडीला तर तो इतका भयग्रस्त झाला आहे की, त्याच्या या मूळ प्रेरणेचा कितीतरी पटींनी विस्तार झाला आहे. त्याने त्याच्या सुरक्षा विषयक प्रयत्नांचे एक समांतर विक्राळ विश्व निर्माण केले आहे. सुरक्षेचे उपाय जेवढे वाढत जातात तेवढे भय आणखीन वाढते हा जगाचा, मानवजातीचा अनुभव आहे. सुरक्षेचे उपाय सुरक्षा मिळवून देत नाहीत. मुळात भयग्रस्तता कमी होणे, कमी करणे हा त्यावरील उपाय आहे. त्यासाठी अनेक स्तरांवर विविध प्रकारे काम करायला हवे असते. त्यासाठी जीवनशैलीपासून विविध कल्पनांपर्यंत कठोर आणि रुचीला न उतरणारे प्रामाणिक विश्लेषण ही पहिली पायरी आहे. अभिनिवेशरहित होऊन, सखोल विचार करण्याची मानवाची तयारी किती आहे हा प्रश्न आहे. ज्यांना हे जाणवते, समजते, आकळते; ते प्रसंगी वाईटपणा घेऊन, किंमत चुकवून; माणसाला, जगाला याची जाणीव किती करून देतात हा त्यानंतरचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष परिवर्तन या दोन प्राथमिक पावलांशिवाय शक्य नाही. बाकी साऱ्या नुसत्या गप्पा.


- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २० जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा