शुक्रवार, १० जून, २०२२

लालजी, माफ करा, पण...

आदरणीय लालजी,

खरं तर तुमच्याशी थेट बोलावं ही पण आमची लायकी नाही. पण आज नाईलाज आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आज राजीनामा दिला त्याचे समर्थन नाही करता येत. जो पक्ष तुम्ही वाढवला, ज्यासाठी तुम्ही भल्याबुऱ्या अनेक गोष्टी सहन केल्या, तुरुंगवास भोगला, त्या पक्षाला तुम्ही असे वेठीस धरणे योग्य आहे का? तुम्ही राजीनामा दिलात त्याचं दु:ख नाही. खरंच दु:ख नाही. खरं तर फार आधीच तुम्ही राजकारणातून, किमान दैनंदिन आणि निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडायला हवं होतं. नानाजी देशमुखांनी नाही का, वयाच्या साठाव्या वर्षी ठरवून राजकारण सोडले. पुन्हा त्याकडे वळून पाहिले नाही. आणि त्यानंतर जे काही केले, ते एखाद्या तरुणालाही लाजवेल असे. त्यांच्या या कृतीने ते पुढच्या किती तरी पिढ्यांसाठी आदर्श आणि आधार ठरलेत. तुमच्या राजीनामापत्रात तुम्ही त्यांचे नाव घेतले, पण त्यांचा कित्ता मात्र तुम्हाला नाही गिरवता आला. तुम्ही दीनदयाळजींचाही उल्लेख केला आहे. मात्र दीनदयाळजींनी कधीही निवडणूक लढवली नव्हती. राजकीय पक्षात राहूनही किती प्रचंड व्रतस्थता होती त्यांच्या ठायी.

लालजी, तुम्ही संघाचे प्रचारक होता. अनेकदा तुम्ही त्याचा जाहीर आणि साभिमान उल्लेखही केला आहे. मग विसरलात आपली परंपरा, विसरलात आपले संस्कार? डॉक्टर हेडगेवार यांच्या काळापासून आपण म्हणत आलो आहोत, नाकापेक्षा मोती जड होऊ नये म्हणून. विसरलात? बैठकीत, चर्चेत कितीही मतभेद असू देत, आग्रह असू देत; पण एकदा निर्णय घेतला की, तो सगळ्यांचा असतो ना? मुख्य म्हणजे, मी पक्ष वाढवला, मी सगळ्यात मोठा आहे; म्हणजे प्रत्येक गोष्ट मी म्हणतो तशीच झाली पाहिजे, हे म्हणणे कितपत योग्य म्हणता येईल?

एकात्म मानववाद तुमच्या आस्थेचा विषय नक्कीच असेल. जीवनातील अर्थ-काम, धर्माने नियंत्रित व्हावा असे दीनदयाळजी म्हणत असत. त्या दृष्टीने विचार केला तर ८६ हे वय वानप्रस्थाश्रमाचे वय नाही का? तसेही ज्या भाजपवरील प्रेमापोटी तुम्ही हे पाऊल उचलले, त्या भाजपचा विचार तरी करायचा की नाही? एखाद्या कुटुंबात सुद्धा या वयात हस्तांतरण होऊन गेलेले असतेच की. मग एवढा मोठा पक्ष, संपूर्ण देश चालवण्यासाठी सक्षमपणे उभा व्हायला हवा की नको? खरं तर तुम्हीच त्यासाठी पुढाकार घेऊन काम करायला हवे होते. पण तुम्ही दूर व्हायलाच तयार नाही. याला काय म्हणायचे?

पत्रात तुम्ही म्हणालात, पक्षात स्वार्थ वाढला आहे आणि कार्यपद्धती नीट राहिलेली नाही. पण हे काय एका रात्रीतून झाले काय? की फक्त गेल्या दोन-तीन वर्षातच ही स्थिती निर्माण झाली आहे? ही सारी परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या साक्षीने बिघडत होती. तुम्ही का सावरली नाहीत ती? मागे एकदा सुदर्शनजींनी तुम्ही निवृत्त व्हावे असा सल्ला दिला होता. त्यावेळीच तुम्ही ८० च्या आसपास होता. त्यावेळीच तुम्ही विचारपूर्वक दूर होऊन काम केले असते तर? राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सभ्यता, राजकीय नेतृत्व यात पक्षापलीकडे जाऊन खूप भरीव आणि सार्थक कार्य तुम्ही करू शकला असता. सर्वार्थाने तो तुमचा अधिकार होता. पण तुमचा जीव अतिशय क्षुल्लक गोष्टीतच अडकून पडला. मोठेपणाच्या धुंदीत महान होण्याचे स्वप्नच तुम्हाला पडले नाही, असे वाटते.

लालजी, लहान तोंडी खूप मोठा घास घेतला आज. पण स्वत:चा पिता चुकत असेल तर त्यालाही टोकणाऱ्या आणि खडसावून प्रश्न विचारणाऱ्या नचिकेताची परंपरा आहे ना आपली? अन या नचिकेत्यानेच तर मृत्यूचेही रहस्य उलगडून या राष्ट्राला अमरता आणि चिरंजीवित्व बहाल केले आहे ना?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ११ जून २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा