संवाद !! गेली दोन दिवस सतत समोर येणारा शब्द. अन्य अनेक शब्दांप्रमाणे जरा निरर्थक होऊ घातलेला. संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे बोलणे नाही. संवाद म्हणजे गप्पा नाही. संवाद म्हणजे सांगणे, विचारणे, चौकशा करणे नाही. संवाद ही खूप व्यापक, खोल, आशयघन अशी गोष्ट आहे. शब्द, बोलणे हा संवादातला एक छोटासा भाग असू शकतो पण संवाद नाही. प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे किंवा समाज माध्यमांचा वापर करून खूप बोललो म्हणजे संवाद झाला असं नसतं. पण याचा अर्थ मौन म्हणजे संवाद असाही नाही. संवाद ही गूढ, गंभीर, अगम्य वगैरे गोष्ट नाही. मात्र एक नक्की की, संवाद ही उगवून येणारी आणि विकसित होणारी बाब आहे. ती खूप सोपी नाही.
संवाद दोन व्यक्तींचा असू शकतो किंवा व्यक्ती आणि प्राणी, व्यक्ती आणि निसर्ग, व्यक्ती आणि ईश्वर, व्यक्ती आणि ती व्यक्ती स्वतः. संवादाचे असे अनेक प्रकार असू शकतात. संवादाच्या अनेक पातळी असू शकतात. संवादाची अनेक स्थाने असू शकतात. संवादाची विविध स्वरूपं असू शकतात. संवाद हा सार्थक संवाद असायला हवा. तसा तो नसेल तर विसंवादही होऊ शकतो. सार्थक संवादासाठी बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यांचा स्वाध्यायही करावा लागतो.
सर्वप्रथम म्हणजे, प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे. वेगळी आहे. त्या विश्वंभराकडे इतके साचे आहेत की, त्याला एक साचा पुन्हा वापरावा लागत नाही. त्याने वापरलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट अगदी खूणगाठ म्हणून बांधून घ्यायला हवी. तुम्ही एका छताखाली राहता, एका परिवारातले आहात, नातेवाईक आहात, शेजारी आहात, एकाच गावातले आहात, एकाच देशातले आहात, एकाच ठिकाणी काम करता, एकत्र शिकले आहात; या कशाकशानेही हे प्रत्येकाचे वेगळेपण नष्ट होत नाही. प्रत्येकाच्या गरजा, स्वभाव, परिस्थिती, मनस्थिती, शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक आध्यात्मिक स्थिती, विचार करण्याची पद्धत, प्रतिक्रिया देण्याची पद्धत, मनाला लावून घेणे, दुखावले जाणे इत्यादी बाबी; अशा असंख्य गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीसोबत सतत राहूनही त्याच्या बाह्य लौकिक व्यवहारांचा सुद्धा पूर्ण आवाका लक्षात येणे कठीण असते, मग त्याच्या आंतरिक जीवनाचा, आंतरिक हालचालींचा, आंतरिक क्रिया प्रतिक्रियांचा अंदाज सहज कसा लावता येईल. शिवाय कोणी अंतर्मुख तर कोणी बहिर्मुख, कोणी प्रवृत्तीपर तर कोणी निवृत्तीपर, कोणी बोलणारा तर कोणी अबोल. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम वेगळे. याहीपेक्षा नेमक्या त्या त्या क्षणी त्याची व्यस्तता किंवा मनस्थिती हेही सांगता येत नाही. अन हे आपण सोडून बाकी सगळ्यांना लागू होते असे समजण्याचे कारण नाही. हे प्रत्येकालाच लागू होणारे आहे. आदर्श मानवाचे धडे देऊन प्रत्येक माणूस आपले सगळे विचार व्यवहार नियंत्रित करेल वगैरे समजणे भाबडेपणा ठरतो. आदर्शवाद सांगत राहीलाच पाहिजे पण आपण वास्तवात जगत असतो, आपल्याला वास्तवात जगावे लागते, आपल्याला वास्तवात जगायचे असते; याचे अवधानही सुटू नये.
एकदा ही बाब स्पष्ट झाली की मग संवाद आदींचा विचार करता येतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीशी संवाद करू शकेल असे नसते. इतकेच नाही तर कधीतरी खूप चांगले tuning असलेल्या दोन व्यक्तींचा कालांतराने संवाद होईलच असेही म्हणता येत नाही. सहपाठी, शेजारी किंवा परिवारजन यात हा अनुभव आपण घेतच असतो. एखाद्या विषयाबद्दल एखाद्याशी संवाद झाला म्हणजे सगळ्याच बाबतीत होईल असेही नसते. प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी, सेवा करणाऱ्या व्यक्तीशी संवाद होईलच असेही नसते. यात चांगले, वाईट, मान, अपमान, राग, लोभ असे काहीही नसते. तसे समजणे उलट सामान्य व्यवहारात सुद्धा अडथळे निर्माण करत जाते.
संवाद ही एक समंजस कृती आहे. त्याचा अट्टाहास उपयोगाचा नसतो. तो उमलून यावा लागतो. मग तो प्रवासातल्या अनोळखी व्यक्तीबरोबर सुद्धा होऊ शकतो. संवाद हा बऱ्याच गोष्टींची मागणी करतो. शांत निरीक्षण, शब्द- स्पर्श- वेळ- कालावधी- पद्धत- इत्यादींचा नेमकेपणा, आपण आणि अन्य यांना समजून घेण्याचे प्रयत्न, संयम, सहनशीलता, आपली मानसिक- बौद्धिक- भावनिक- आध्यात्मिक- वाटचाल; अशा पुष्कळ बाबी. केवळ भावनावेग आणि त्यापोटी काही तरी करणे, बोलणे; काळजी इत्यादी पोटी dominate करणे; लादत जाणे म्हणजे कळकळ होऊ शकेल संवाद नाही. संवाद होणे ही एका प्रदीर्घ प्रक्रियेची परिणती आहे. संवाद कुठे, कधी, कोणाशी, किती वेळ होईल; ही बाब वेगळी. पण व्यक्तीच्या आंतरिक विशालतेच्या (भावुकतेच्या नव्हे), आंतरिक सखोलतेच्या, आंतरिक निर्मळतेच्या प्रक्रियेची परिणती असते. अशा व्यक्तीशी पुष्कळांचा संवाद होऊ शकतो. त्याचा संवाद घडून येईलच हे मात्र त्याच्या ललाटी काय लिहिले आहे त्यावर अवलंबून असते. म्हणून तर भवभूतीनेही आपुल्या जातीचा भेटला नाही ही खंत व्यक्त केली होती आणि भगवान कृष्णाला एकाकी जंगलात देहत्याग करावा लागला होता. मोठ्या गोष्टी बाजूला ठेवून सामान्य विचार केला तरीही, आंतरिक विकासाचा ध्यास घेतलेल्या माणसांची संख्या जेवढी वाढेल तेवढी संवादाची एकूणच प्रक्रिया वाढेल. नाही तर वादविवाद, विसंवाद, वितंडवाद आहेतच.
एक आणखीन महत्वाची बाब म्हणजे संवादाने अवलंबित्व कमी केले पाहिजे. 'मी आहे ना चिंता करू नको' किंवा 'देव आहे तो सगळं व्यवस्थित करेल' किंवा 'अमुक ढमूक यात मन रमवत जा' अशा प्रकारचे संवाद हे सार्थक संवाद म्हणता येणार नाहीत. संवादाने दुष्टपणा करू नये मात्र ताकद वाढवावी. त्यासाठीचे कौशल्य, एखाद्याला त्याचं बळ मिळवून देणं; हे संवादाचं गमक आहे.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, १६ जून २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा