समाजासाठी क्षात्र वृत्ती आणि वाणिज्य वृत्ती या दोनच पुरेशा नसतात. खरं तर हे वाक्यही चूक आहे. सत्य हे आहे की, मानव जातीत या दोनच वृत्ती असतात असं नाही. याशिवाय ब्राम्ह वृत्ती असणारी माणसे असतात आणि यातील कोणत्याही वृत्तीचा प्रकर्ष नसलेली माणसेही असतात. या चारही वृत्तींचा उपयोग करून समाज उभा होतो. समाज उभा होतो. समाज उभा केला जाऊ शकत नाही. समाज वाटचाल करतो. समाज चालवता येत नाही.
परंतु वर्तमान समाजविचार, वर्तमान देशविचार, वर्तमान देशभक्ती कल्पना, वर्तमान राज्यविचार, वर्तमान राष्ट्रविचार; फक्त क्षात्रवृत्ती आणि वाणिज्यवृत्ती या दोनच मान्य करतो. मानवजातीचं समूह जीवन आणि माणसाचं व्यक्तीजीवन या दोन्हीची जी ओढाताण सुरू आहे, त्यातील संघर्ष सुरू आहे, त्यातील अशांती आहे, त्याचा व्यापकतेचा प्रवास जो खुंटला आहे, त्याची जी कोंडी झाली आहे; याच्या मुळाशी 'माणूस' म्हणजे काय याचं अपूर्ण, स्वप्नाळू, काल्पनिक आकलन हेच कारण आहे.
'माणूस' म्हणजे काय याचं योग्य आकलन कसं होईल? कसं होतं? कसं होऊ शकतं? ते वर्तमान लोकशाही, वर्तमान गणिती विचार पद्धती, वर्तमान वस्तुकरणात्मक विचार पद्धती; यांनी होऊ शकत नाही. त्यासाठी मानव जातीतील पाचव्या प्रकारच्या लोकांकडे लक्ष द्यावं लागतं. ब्राम्ह, क्षात्र, वाणिज्य आणि यातील कोणत्याही वृत्तीचा प्रकर्ष नसलेले लोक; यांच्याशिवाय काही माणसे असतात. त्यांना या वृत्तींशी, या वृत्तींना अनुसरून चालणाऱ्या जगाशी, जगाच्या व्यवहाराशी काहीही देणेघेणे नसते. ते या जगाच्या सुखाने हुरळून जात नाहीत, तसेच दु:खाने त्यांना विषादही होत नाही. याचा अर्थ ते दगड असतात असे नाही. वरवर पाहता तसे वाटू शकते, पण त्यांना जगाच्या व्यवहाराशी घेणेदेणे नसले तरी तो समजत असतो, त्याची जाण असते आणि त्यातील सार आणि असार यावर त्यांची दृष्टी असते. जगाविषयीच्या उदासीन वृत्तीची त्यांना तमा नसते आणि त्याची किंमत चुकवण्याचेही त्यांना काही वाटत नाही. किंबहुना आपण काही किंमत चुकवता इत्यादी त्यांच्या मनालाही स्पर्श करत नाही. हे लोकच 'माणूस' म्हणजे काय हे सांगतात, सांगू शकतात. सुखाने हुरळणाराच नव्हे, दु:खाने विव्हळणारा सुद्धा 'माणूस' म्हणजे काय सांगू शकत नाही. 'माणूस' म्हणजे काय हे सांगणाऱ्या या लोकांनाच बुद्ध, आदि शंकराचार्य, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामकृष्ण म्हटले जाते. हे लोक बाकीच्या गोष्टीही सांगतात. पण 'माणूस' म्हणजे काय हे त्यांचं सांगणं अधिक मूलभूत आणि महत्वाचं असतं. आजच्या व्यवस्थांनी, विचारांनी मात्र हा मानवातील पाचवा वर्ग जवळजवळ नेस्तनाबूत केला आहे. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' हे आज कोण ऐकून आणि समजून घेणार? समस्त विश्व एक आहे, सगळी मनुष्यजात एक आहे, संपूर्ण पृथ्वी एक आहे, मानव हा विश्वमानव आहे; हे आज कोण ऐकून वा समजून घेणार? युक्तिवाद खूप होतील, शहाणपणाचं प्रमाणपत्र आम्हालाच मिळालेलं आहे अशा थाटात होतील; पण 'माणूस' म्हणजे काय याकडे मात्र कोणी लक्ष देणार नाही.
वर्तमानकाळाची ही विडंबना आहे. ज्यांना हे आकलन असू शकतं तेही यावर मौन असतात. बोलले तरी सांभाळून, जपून, सोयीचं एवढंच बोलतात हे सुखदायक नक्कीच नाही.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, ९ जून २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा