रविवार, २६ जून, २०२२

पक्षनिरपेक्षता

सध्याच्या स्थितीत दोन राजकीय विचार मनात येतात.

१) भाजपने आणि भारतीय मनाने काँग्रेसमुक्त व्हायला हवे. भारत काँग्रेसमुक्त होईल,  न होईल; तो वेगळा विषय आहे पण भाजप आणि भारतीय मन यांनी मात्र काँग्रेसमुक्त व्हायला हवे. काँग्रेस, काँग्रेसची पापे, काँग्रेसचा कारभार त्यांचे ते पाहतील. भाजपने आणि भारतीय मानसाने (माणसाने नाही) काँग्रेसच्या पकडीतून बाहेर पडावे.

२) भारतीय समाजाने पक्ष चौकटीबाहेर पडून राजकारणाचा विचार करायला हवा. पुढील निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे, किती जागा द्यायच्या ते त्यावेळी ठरवावे पण आता पक्ष मनातून काढावे. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, आज ज्या व्यवस्थेत आपण आहोत त्यात खूप systemic problems, lacunas, mistakes, errors आहेत. हे रचनेच्या स्तरावर ही आहे आणि सैद्धांतिक (ideological) स्तरावर सुद्धा आहे.

उदाहरण म्हणून - रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्या एका ताज्या लेखात रवींद्रनाथ टागोर यांच्या 'स्वदेशी समाज'चा उल्लेख केला आहे. त्यात टागोरांनी 'कल्याणकारी राज्य' ही भारतीय संकल्पना नसल्याचे म्हटले आहे. डॉ. वैद्य यांनीही त्याचे समर्थन केले आहे. हा विषय सैद्धांतिक स्तरावरच्या systemic error चा विषय आहे.

दुसरे उदाहरण - पंचायत राज व्यवस्था. आपण नेहमी म्हणतो की, आपली लोकशाही ही भारताची प्राचीन लोकशाही परंपरेतून आलेली आहे. त्याची चिकित्सा मात्र करत नाही. प्राचीन भारतीय पंचायत व्यवस्था अगदी खालच्या स्तरातून वर विकसित होत असे. त्या पद्धतीचा पूर्ण विकास कधी झाला नाही. परंतु त्याचे basics फार वेगळे होते. आताची पंचायत राज व्यवस्था मात्र केंद्रीय सत्तेचा एक विभाग आहे. दोन्हीत भावना, रचना, पद्धती, अंमलबजावणी या सगळ्यात खूप फरक आहे. व्यवस्थेतील systemic error चे हे उदाहरण आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत. न्यायव्यवस्था हा मोठा विषय आहे. अन या systemic errors केवळ सुधार, आयोग, कायदे, अध्यादेश इत्यादीपुरत्या मर्यादित नाहीत. खूप वेगळ्या पद्धतीने ते हाताळले जाण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षनिरपेक्ष विचार करणारा समाज हवा. या गोष्टींचा संबंध सत्तेवर कोण आहे याच्याशी नाही. मात्र त्यावर जेव्हा तपशीलवार चर्चा होईल तेव्हा, पक्षीय तू तू मी मी होऊन मूळ विषय तसेच राहण्याचा धोका आहे. तसे होऊ नये. राजकीय व्यवस्थेतील systemic errors दूर करून अधिक चांगली व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी समाजाने पक्षनिरपेक्ष व्हावे लागेल.

पाहू या काय होते ते.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा