नुकतीच एक पोस्ट पाहिली. सनी लिओन या अभिनेत्रीबद्दलची. त्यात ती रडत आहे आणि तिच्या तोंडी वाक्य आहे- `मी वेश्या नाही. प्रत्येकाला भूतकाळ असतो.'
गंमत वाटली. गंमत तिच्याबद्दल नाही. तिने जे काही केले वा केले नाही त्याबद्दल नाही. तर त्यातील मानवी वृत्तीबद्दल. म्हणजे `पोर्न स्टार' म्हणून काम करताना तिने कोणताही मागचापुढचा विचार केला नाही. `मी कोणाला जुमानत नाही. जुमानणार नाही,' अशा वृत्तीने ती राहिली. म्हणजे मला हवे तेव्हा मला हवे तसे मी राहणार, करणार, वागणार, बोलणार. दुसऱ्यांचा, त्यांच्या भावनांचा, आवडीनिवडीचा, गरजांचा, व्यक्तिमत्वाचा, स्वातंत्र्याचा वगैरे विचार करण्याची मला फिकीर नाही. माझी आवड, माझ्या गरजा, माझ्या अपेक्षा, माझ्या भावना याच महत्वाच्या, त्याचाच फक्त मी विचार करणार, तेवढ्याच ग्राह्य धरणार. त्यालाही हरकत नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांनी मला हवे तसेच समजून घ्यायला हवे हा हट्टही ठेवणार आणि तशी अपेक्षाही करणार. मला जर पूर्ण स्वातंत्र्य हवे तर त्याची किंमत चुकवण्याची तयारी का नको? मग लोकांकडून अपेक्षा वगैरे का ठेवायच्या? म्हणजे मी दुसऱ्याचा विचार करणार नाही आणि दुसऱ्यांनी मात्र माझा विचार केला पाहिजे. मी दुसऱ्यांना समजून घेणार नाही, पण मला मात्र दुसऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. वरून तुम्ही समजून घेत नसाल तर तुम्ही किती दुष्ट, किती संवेदनाहीन, किती हेकड, किती आग्रही; वगैरे.
ही आहे मानवी वृत्ती. अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही अनेकदा आपण सुद्धा असेच वागत नसतो का? असेच का वागत असतो? आणि याची नुसती चर्चा करून होत नाही. पदोपदी स्वत:ची झाडाझडती घेत, परिश्रम घेत वळण लावत जावे लागते. यालाच साधना वगैरे म्हणत असावेत.
- श्रीपाद कोठे
१९ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा