बुधवार, २९ जून, २०२२

धर्म आणि यांत्रिकता

हेल भगिनींना १५ मार्च १८९४ रोजी डेट्रोईट येथून लिहिलेल्या पत्रात स्वामी विवेकानंद लिहितात,  `चिंतनासाठी, विशेषत: आध्यात्मिक चिंतनासाठी माणूस पूर्ण मोकळा असला पाहिजे. ही मोकळीक, ही स्वाधीनता आणि माणूस म्हणजे एक यंत्र नव्हे हा सिद्धांत, हाच समस्त धार्मिक विचारांचा पाया आहे. म्हणूनच धार्मिक चिंतन ठराविक यांत्रिक पद्धतीने करता येणे अशक्य आहे. यंत्राच्या पातळीवर सारे काही ओढून आणण्याच्या या प्रवृत्तीमुळे पाश्चात्यांची विलक्षण भरभराट झाली हे खरे, परंतु तिच्याचमुळे धर्म त्यांना दुरावला हेही तितकेच खरे. या प्रवृत्तीने धर्माला जणू हुसकावून लावले आहे आणि धर्माचा जो काही थोडाफार अंश उरला आहे त्यालाही पाश्चात्यांनी यांत्रिक कवायतीचे स्वरूप दिले आहे.’

- श्रीपाद कोठे

३० जून २०१५

धर्माच्या नावावर मंदिर मस्जिद पाडापाड करणे, डोकी फोडणे या पेक्षा यांत्रिक कवायत परवडली! (प्रमोद मुनघाटे)

गांधीवादाने वा बौद्ध तत्वज्ञानाने हिंसा थांबली? शांती आणली? मार्क्सवादाने कामगारांचे राज्य आणले? फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणली? आपल्या राज्यघटनेने तिला अपेक्षित ते घडवले?

१९५५ मध्ये ११ बुद्धिवंतांच्या सह्या असलेला रसेल- आईनस्टाईन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. रसेल आणि आईनस्टाईन यांच्याही त्यावर सह्या होत्या. त्या जाहीरनाम्याने विज्ञानाने मानवजातीला निर्माण केलेल्या धोक्याबद्दल इशारा दिला होता आणि चिंता व्यक्त केली होती. काय झाले त्याचे?

वर उल्लेख केलेल्या विचार्धारांनी तसा प्रयत्न तरी केला. पण भारतातील धार्मिक कट्टरतेणे काय केले ? देशापुढे समस्या निर्माण केल्या. माथेफिरू राजकारण्यांनी धर्माचा आधार घेऊन आपली पोळी शेकून घेतली!

विज्ञानाच्या बळावरच श्रीपाद्जी तुम्ही इथे लिहू शकत आहात. सर्वसामान्य लोक शिकू शकत आहेत, अन्यथा काय झाले असते ? शिक्षण बंदिस्तच राहिले असते, वेद्शालामध्येच!

या विश्वाची उत्पत्ती, त्यातील मानव जातीचा विकास, या विकासात त्याला झालेला चांगल्या- वाईटाचा बोध, त्याला त्याच्या लघुतेतून वर उचलण्याचे प्रयत्न, त्या प्रयत्नांचे यश आणि मर्यादा.... असे अनेक विषय आहेत.

Pramod Munghate तुमची समस्या ही आहे की, तुम्हाला उजेड हवा किंवा अंधार हवा. मी फक्त एवढेच महंत असतो की, उजेड आणि अंधार दोन्ही मिळून दिवस आहे. उजेड पण खरा आणि आवश्यक आहे आणि अंधार पण खरा आणि आवश्यक आहे.

यापुढे मी कदाचित तुमच्याशी चर्चा करणार नाही. कारण मला चर्चेतून तत्वबोध झाला तर आवडतो, कंठशोष नाही आवडत आणि पटतही. आणि राजकारणाच्या किंचितही पलीकडे तुमची नजर जाऊ शकत नाही.

आम्हाला पहाट हवी आहे, श्रीपादजी!

ठीक आहे, जशी तुमची इच्छा! श्रींची इच्छा बलीयसी!!

एक मुद्दा फक्त अखेरचा म्हणून स्पष्ट करतो- हिंदू तत्वज्ञान जगातील सगळ्यात वाईट आहे हे मत बाळगायला काहीच हरकत नाही. पण केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील असंख्य लोक मूर्ख आहेत आणि काय समजते ते फक्त आम्हालाच हा दुराग्रह चुकीचा आहे.

बरे ठीक आहे, आपल्या आज्ञेनुसार आता चर्चा बंद! क्षमा असावी!!

गर्वहरण

असं म्हणतात की, माणूस ज्याचा गर्व करतो त्याच गोष्टीत त्याची नाचक्की होते आणि ईश्वर त्याचं गर्वहरण करतो. अहंकार काबूत ठेवण्याची ही त्याची पद्धत. भारतीय जनता पार्टीचे असेच झाले असेल का? नुकतेच केंद्र सरकारला एक वर्षं झाल्याबद्दल सगळीकडे उच्चरवात सांगितले गेले की, वर्ष झाले पण आमच्यावर आरोप नाही भ्रष्टाचाराचा !! कदाचित त्याचा गर्वच भोवला. चांगलं काम करा, चांगले राहा पण ते डोक्यात जाऊ देऊ नका, हाच तर नियतीचा संदेश नसेल.

सहज एक आणखीन. एक संदेश वाचण्यात आला- `आम्ही काही महागाई कमी व्हावी म्हणून मत दिले नव्हते. चांगल्या शासनासाठी दिले होते वगैरे.' हा संदेश तयार करणारे भाजपचेच असावेत यात शंका नाही. आणि पक्षाच्या समर्थकांच्या माध्यमातून तो पसरला. पण पक्षाने, कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी अशा फसव्या आणि आत्मसंतोषी गोष्टींपासून दूर राहावे. या घातक ठरू शकतात. मुळात महागाई ही काही चांगली गोष्ट नाही. ती कमी व्हायलाच हवी. खूप मोठा विचार करायचा तर वाढत्या महागाईच्या अर्थव्यवस्थेचे हाल ग्रीससारखे होतील. पण माफक विचार केला तरीही, लोक काहीही बोलत नाहीत पण विचार करीत असतात आणि मतपेटीत व्यक्त होतात. आत्मसंतोषी वृत्ती प्रचार चांगला करू शकेल, पण निवडणुकीत तारणार नाही याचे भान असू द्यावे.

- श्रीपाद कोठे

३० जून २०१५

India 2020

स्व. डॉ. अब्दुल कलाम यांनी India 2020 ची कल्पना सगळ्यांसमोर ठेवली होती. जिकडेतिकडे ती सांगितली आणि ऐकली जात असे. पण आज 2020 अर्ध्यावर आले असताना सर्वत्र निराशेची स्थिती आहे. हे मुद्दाम नमूद करण्याचं कारण म्हणजे; नुसता उत्साह, नुसती स्वप्ने, अन नुसते मानवी परिश्रम आणि बुद्धिमत्ता यांनी मानवी जीवन सुखीही होऊ शकत नाही आणि त्याच्या समस्याही निरस्त होऊ शकत नाहीत. कोरोना हे एक कारण आणि उदाहरण झाले. पण मानवी जीवनावर एकूणच प्रभाव टाकणाऱ्या, मानवी जीवनाला पुढे नेणाऱ्या किंवा मागे खेचणाऱ्या, मानवी जीवनाला प्रेरणा देणाऱ्या, मानवी जीवनाची घडण करणाऱ्या; मानवी समजुतदारीच्या कक्षेत येणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत; त्यांचाही साधकबाधक विचार माणूस करत नाही. जीवनाचा एकांगी, एकरेषीय विचार बाजूला सारण्याची कोणाचीही तयारी नाही. आज समोर असलेली आरोग्याची परिस्थिती असो की आर्थिक व्यवस्थेची; सर्वत्र मूलगामी चिंतनाचा, विचारांचा अभाव आहे. कोरोना संकटाला आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला पण सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर सुद्धा; केव्हातरी कोरोनाबाधितांची संख्या कमी होईल आणि सगळं मोकळं केल्याची घोषणा केल्यावर सगळं पहिल्यासारखं सुरळीत होईल, असंच आपण मानत आहोत. हो, अजूनही तसंच मानत आहोत. मोठमोठे लोक तसंच मानत आहेत. अन प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगाने बदलते आहे. अनागोंदीचे रूपांतर उद्रेकात होऊ नये याचा विचार होताना फारसा दिसत नाही. व्यवस्था, ती राबवणारे, नियोजन करणारे, सामान्य माणूस, साधनहीन लोक, कामापुरती साधने असणारे, पिढ्यांची ददात नसणारे; या सगळ्यांसाठी हवी असणारी दिशा; मार्ग काढायला हवा असणारा विचार आणि तत्वज्ञान; यांची चर्चा कोणीही करत नाही. सगळे वेबिनार अन लाइव्ह या विषयांना स्पर्शच करत नाहीत. एक गोष्ट अगदी आवडली नाही तरीही खूणगाठ म्हणून लक्षात घ्यायला हवी की, मूलभूत विचार केल्याशिवाय वरवरच्या मलमपट्टीने काहीही होणार नाही. जीवनाची दिशाच बदलण्याचे आव्हान आज उभे ठाकले आहे. शतकानुशतकांच्या धारणा, मते, दृष्टी टाकून देऊन विचार करावा लागेल. त्यासाठी कठोरता लागेल तसाच प्रामाणिकपणा लागेल; त्यासाठी कळकळ लागेल तशीच मूलगामी प्रतिभा आणि प्रज्ञा लागेल; त्यासाठी वर्तमानाची जाणीव लागेल तसेच द्रष्टेपण लागेल; त्यासाठी समग्रतेला कवेत घेणारे बाहू लागतील. मानवतेचा जगन्नाथाचा रथ ओढायला तशी आणि तेवढी माणसे लागतील. आज तरी त्यांचा अभाव जाणवतो आहे.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, ३० जून २०२०

मंगळवार, २८ जून, २०२२

कपड्यावरील डागाची चर्चा

एका सरपंचाने आपल्या लेकीसोबत काढलेल्या सेल्फीची चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांनीही `मन की बात'मध्ये मुलींच्या आदराचे, सन्मानाचे आवाहन केले. चांगली अन आवश्यकच गोष्ट आहे. वादविवाद होण्याचे कारणच नाही. महिलांच्या एकूण स्थितीबद्दल सुद्धा बरीच चर्चा होते. तीही योग्य आहेच. फक्त या सगळ्यात दुर्लक्षित राहणाऱ्या अन अचर्चित राहणाऱ्या काही गोष्टी.

१) मोठ्या प्रमाणात मुलींना नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्यांना नमस्कार करू दिला जात नाही.

२) मोठ्या प्रमाणात लोक मुलीच्या जन्मापासूनच तिच्या भविष्यासाठी तरतूद करू लागतात.

३) मोठ्या प्रमाणात तिला झालेल्या छोट्याशा सुद्धा त्रासाने डोळे पाणावणारे लोक आहेत.

४) महिला कोणत्याही वयाची वा जातीधर्माची असो, तिला कोणी त्रास देताना दिसल्यास हटकणारे अन वेळप्रसंगी त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करणारे सगळ्या जातीधर्माचे ज्येष्ठ नागरिक आताआतापर्यंत होते. यात शेजारधर्मही आला. मात्र अतिरेकी व्यक्तीवादाने आपण ही सहजता घालवली.

५) अन्याय करणाऱ्यांपेक्षा घराघरात सहयोग, सहकार्य अन समजूतीने वागणारे लोक अधिक आहेत.

६) मोठ्या प्रमाणात शेजारी वा नातेवाईकांकडे थोड्या वेळासाठी, बाहेरगावी जाताना, शिक्षणासाठी वगैरे मुलींना ठेवले जाते. अन जिथे त्या मुली राहतात तिथे एक चांगले भावनिक नाते निर्माण होते. लोकही त्या मुलींची अतिशय जबाबदारीने काळजी घेतात.

अशा आणखीन गोष्टी सांगता येतील. मात्र या वा अशा बाबींची चर्चा होत नाही. स्वच्छ कपड्यावर डाग पडला की डागाचीच चर्चा होते. पण डागाची चर्चा इतकीही होऊ नये की स्वच्छ कपड्यांकडे लक्षच जाऊ नये किंवा विपरीत भावना- जसे भय, हीनता आदी निर्माण होईल. चांगल्या, सकारात्मक, उर्जावान, आनंददायी गोष्टींची चर्चा पुरेशी झाली तर त्या आधार आणि प्रेरणाही देतील.

- श्रीपाद कोठे

२९ जून २०१५

कमी पगारात देशासाठी

घरगुती gas cylinder वरील सबसिडी सोडून देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि लोकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. आता रेल्वे तिकिटावर ज्यांना सवलत मिळते त्यांनाही ती सोडून देण्याचे आवाहन करण्यात आले असून तसा पर्याय देण्यात येणार आहे. तसे हे लहान प्रयत्न आहेत. एक मोठा प्रयत्न सरकारला करता येईल. सर्व केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, सरकारी बँका आणि सरकारी उद्योगांचे कर्मचारी, विमा कंपन्यांचे कर्मचारी, शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांचे कर्मचारी (कर्मचारी म्हणजे अधिकारी पण) यांच्या gas cylinder वरील सबसिडी आणि रेल्वे तिकिटावरील सवलती अधिकृतपणे काढूनच घेतल्या तर... नाही तरी आता सातवा वेतन आयोग लागू केला आहेच. अन्यत्रही याचे अनुकरण होणारच. तेव्हा या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सवलती मुळातच काढून घ्याव्या.

सवलती सोडण्याचे आवाहन करता येऊ शकते का असे कोणी विचारले असते तर दोनेक वर्षांपूर्वी त्याचे उत्तर नाही आले असते. पण ते आज वास्तव आहे. तसेच एक आवाहन आणखीन करता येऊ शकेल. हस्ते परहस्ते ही कल्पना पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचायला हवी. कल्पना अशी की- सरकारने कमी पगारात देशासाठी काम करण्याचे आवाहन करावे. सरकारी नोकरी म्हणजे चांगला पगार अन कमी काम असे समीकरण आहे. त्याऐवजी कमी पगारात काम करण्याचे आवाहन करावे. पगार कमी (जगण्यासाठी आवश्यक तेवढा) मिळेल. आजचा पगार उद्या कदाचित कमीही होईल. जगण्यापुरते मिळेल याची शाश्वती अन निवासासारख्या काही प्राथमिक गोष्टी मिळतील. पगारवाढ हा विषय डोक्यात न ठेवता देशासाठी काम करणाऱ्यांना सरकारी नोकऱ्या, असे आवाहन करावे. त्यासाठी वेगळे मंत्रालय, वेगळ्या समांतर व्यवस्था उभ्या कराव्या. आजची व्यवस्था सुरूच राहील, पण हळूहळू समाप्त होईल. या आवाहनालाही निश्चित प्रतिसाद मिळेल. आजही पैशाशिवाय अन्य प्रेरणांनी काम करणारे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. दुसरे म्हणजे एकदा आपला सगळ्यांचाही कस लागून जाईल. आपली देशभक्ती, आपले मोदीप्रेम यांचीही कसोटी लागेल. ही काही नवीन कल्पना नाही. स्व. नानाजी देशमुख यांनी अशी कल्पना राबवून दीनदयाल शोध संस्थानचे प्रकल्प उभे केले आहेत. ते खासगी आणि लहान प्रमाणात आहेत. पण हे मोठ्या प्रमाणात व्हायलाही हरकत नाही. अन नाहीच मिळाला प्रतिसाद तर सुरु आहे ते सुरु राहीलच.

- श्रीपाद कोठे

२९ जून २०१६

सोमवार, २७ जून, २०२२

स्वामी विवेकानंद राजकारणावर...

आज आपले सगळे जीवन राजकारणाने व्यापलेले आहे. नको एवढा राजकारणाचा वावर आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात होतो आहे. crony capitalism वगैरे शब्द आज खूप वापरले जातात. स्वामीजींनी ११५ हून अधिक वर्षांपूर्वी राजकारणाबद्दल काय म्हटले होते, हे म्हणूनच लक्षणीय ठरते. महात्मा गांधी यांनीही स्वामीजींनंतर दहाएक वर्षांनंतर साधारण हेच विचार त्यांच्या `हिंद स्वराज'मध्ये व्यक्त केले होते.

पूर्व आणि पश्चिम' या प्रदीर्घ निबंधात राजकारणाबाबत निरीक्षण नोंदवताना स्वामीजी लिहितात- `मूठभर शक्तिशाली माणसे करतील ते धोरण नि बांधतील ते तोरण, अशीच सर्वत्र स्थिती असते. बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप. चालले त्यांच्यामागे. आणखीन काय? ते तुमचं पार्लमेंट बघितलं, व्होट बॅलट, मेजॉरिटी सारं काही बघितलं, पंत ! सगळ्या देशात ही एकच कथा. शक्तिमान पुरुष इच्छा होईल तिकडे समाजाला नेत असतात आणि बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप. भारतवर्षात हे शक्तिमान पुरुष कोण? तर, धर्मवीर. ते आमच्या समाजाला चालवतात. तेच समाजाची रीतीनीती बदलण्याची गरज पडल्यास बदलून देतात. आम्ही चुपचाप ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. फक्त यात तो तुमचा हैदोसहुल्ला, ती मेजॉरिटी, व्होट वगैरे नाही; इतकेच काय ते.

आता हे मात्र खरे की व्होट, बॅलट वगैरेंमधून बहुजन समाजाला पाश्चात्य देशांमध्ये जे एक प्रकारचे शिक्षणवळण लाभते ते आम्हाला लाभत नाही. पण त्याचबरोबर हेही खरे की, राजनीतीच्या नावाखाली जे चोरांचे गट युरोपीय देशांमधील बहुजन समाजाचे रक्त शोषून पुष्ट होत असतात ते पण आमच्या देशात नाही. राजनीतीच्या गोंडस नावाखाली पाश्चात्य देशांमध्ये चालणारा तो लाचलुचपतीचा धुमाकूळ, ती दिवसाढवळ्या डाकेखोरी ! त्या राजनीतीची अंदरकी बात बघितली असती तर माणसाविषयी अगदी निराश, हताश होऊन गेला असता, पंत ! `गली गली गोरस फिरे, मदिरा बैठी बिकाय... सतीको धोती ना मिले, कसबिन पहिने खासा' (दूध विकण्यासाठी गल्लोगल्ली फिरावे लागते, पण दारू एके जागी बसूनच विकली जाते. सती स्त्रीला नेसायला वस्त्र मिळण्याची मारामारी, पण बाजारबसविला मात्र लयलूट.) धन्य कलियुगाचा महिमा. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे आपल्या मुठीत ठेवली आहेत. प्रजेला, बहुजन समाजाला ते लुटतात, लुबाडतात, शोषतात, सैन्यात भरती करून मरण्यासाठी देशदेशांतरी पाठवतात. जय झाला तर यांचेच उखळ पांढरे होणार. सैनिकांच्या रक्ताच्या मोबदल्यात. अन प्रजा? ती तर तिथेच गारद झाली, मेली. तिचं फक्त रक्त सांडायचं काम ! याचं नाव राजनीती, पंत ! समजलं? तिने दीपून जाऊ नका, तिच्या भूलावणीला भुलू नका.

एक गोष्ट समजून घेण्याचा यत्न करा. सांगा, माणूस कायदे तयार करीत असतो की कायद्यांनी माणूस तयार होत असतो? माणूस पैसा निर्माण करीत असतो की पैशाने माणूस निर्माण होऊ शकतो? माणूस नावलौकिक मिळवीत असतो की नावलौकिकाने माणूस निर्माण होत असतो? माणूस व्हा, पंत, आधी माणूस व्हा ! मग दिसेल की, बाकीचे सारे कसे आपोआप तुम्हाला येउन मिळत आहे. ते कुत्र्यासारखे आपसात एकमेकांवर गुरगुरणे, भुंकणे सोडून देऊन सदुद्देश्यासाठी सदुपाय, सत्साहस नि सद्वीर्य यांचे अवलंबन करा. जन्मला आहात तसे एक डाग ठेवून जा मागे. तुलसी आयो जगत मे, जगत हंसे तुम रोय... ऐसी करनी कर चलो, आप हंसे जग रोय' (जेव्हा तू जन्मला होतास तेव्हा सगळे हसत होते, तू रडत होतास. तुलसीदासा, आता अशी करणी करीत चल की, तू हसत हसत मरशील आणि सगळे तुझ्यासाठी रडतील.) हे करू शकला तर तुम्ही माणूस, पंत. एरवी कसचे मनुष्य तुम्ही !'

- श्रीपाद कोठे

२८ जून २०१५

रविवार, २६ जून, २०२२

प्रश्न पाण्याचा

चेन्नईत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अकोला, यवतमाळला गेली कित्येक वर्षे पाणीटंचाई आहे. त्याची चर्चा झाली नाही. तरीही ठीक आहे. देर आये दुरुस्त आये. नीती आयोगाने सुद्धा २०२० मध्ये म्हणजे पुढल्याच वर्षी २१ शहरे पाणी प्रश्नाने ग्रस्त होतील असे म्हटले आहे. २०३० पर्यंत पाण्याची वानवा होईल असेही नीती आयोगाने म्हटले आहे. आपल्या शहराचा, गावाचा क्रमांक कसा आणि किती लवकर लावायचा याचा विचार करायला लागू या. कारण त्याशिवाय वेगळा काही विचार आम्ही करू शकतो का याची मला शंका आहे. तहान लागल्यावर विहीर खोदली जाऊ शकते पण विहिरीत पाणी नाही आणले जाऊ शकत. एवढे होऊनही आम्हाला (सामान्य माणसाला, प्रशासनाला, सरकारला, राजकीय नेत्यांना, उद्योगपतींना, धनिकांना, गरिबांना, शिक्षितांना, अशिक्षितांना, स्त्रियांना, पुरुषांना) जर पाण्यापेक्षा अन्य गोष्टीच महत्वाच्या वाटत असतील तर तेच ठीक.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१९

पक्षनिरपेक्षता

सध्याच्या स्थितीत दोन राजकीय विचार मनात येतात.

१) भाजपने आणि भारतीय मनाने काँग्रेसमुक्त व्हायला हवे. भारत काँग्रेसमुक्त होईल,  न होईल; तो वेगळा विषय आहे पण भाजप आणि भारतीय मन यांनी मात्र काँग्रेसमुक्त व्हायला हवे. काँग्रेस, काँग्रेसची पापे, काँग्रेसचा कारभार त्यांचे ते पाहतील. भाजपने आणि भारतीय मानसाने (माणसाने नाही) काँग्रेसच्या पकडीतून बाहेर पडावे.

२) भारतीय समाजाने पक्ष चौकटीबाहेर पडून राजकारणाचा विचार करायला हवा. पुढील निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे, किती जागा द्यायच्या ते त्यावेळी ठरवावे पण आता पक्ष मनातून काढावे. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, आज ज्या व्यवस्थेत आपण आहोत त्यात खूप systemic problems, lacunas, mistakes, errors आहेत. हे रचनेच्या स्तरावर ही आहे आणि सैद्धांतिक (ideological) स्तरावर सुद्धा आहे.

उदाहरण म्हणून - रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्या एका ताज्या लेखात रवींद्रनाथ टागोर यांच्या 'स्वदेशी समाज'चा उल्लेख केला आहे. त्यात टागोरांनी 'कल्याणकारी राज्य' ही भारतीय संकल्पना नसल्याचे म्हटले आहे. डॉ. वैद्य यांनीही त्याचे समर्थन केले आहे. हा विषय सैद्धांतिक स्तरावरच्या systemic error चा विषय आहे.

दुसरे उदाहरण - पंचायत राज व्यवस्था. आपण नेहमी म्हणतो की, आपली लोकशाही ही भारताची प्राचीन लोकशाही परंपरेतून आलेली आहे. त्याची चिकित्सा मात्र करत नाही. प्राचीन भारतीय पंचायत व्यवस्था अगदी खालच्या स्तरातून वर विकसित होत असे. त्या पद्धतीचा पूर्ण विकास कधी झाला नाही. परंतु त्याचे basics फार वेगळे होते. आताची पंचायत राज व्यवस्था मात्र केंद्रीय सत्तेचा एक विभाग आहे. दोन्हीत भावना, रचना, पद्धती, अंमलबजावणी या सगळ्यात खूप फरक आहे. व्यवस्थेतील systemic error चे हे उदाहरण आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत. न्यायव्यवस्था हा मोठा विषय आहे. अन या systemic errors केवळ सुधार, आयोग, कायदे, अध्यादेश इत्यादीपुरत्या मर्यादित नाहीत. खूप वेगळ्या पद्धतीने ते हाताळले जाण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षनिरपेक्ष विचार करणारा समाज हवा. या गोष्टींचा संबंध सत्तेवर कोण आहे याच्याशी नाही. मात्र त्यावर जेव्हा तपशीलवार चर्चा होईल तेव्हा, पक्षीय तू तू मी मी होऊन मूळ विषय तसेच राहण्याचा धोका आहे. तसे होऊ नये. राजकीय व्यवस्थेतील systemic errors दूर करून अधिक चांगली व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी समाजाने पक्षनिरपेक्ष व्हावे लागेल.

पाहू या काय होते ते.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१९

शनिवार, २५ जून, २०२२

टिकाऊ, टाकाऊ

स्वामीजींनी शिकागो धर्मपरिषदेत हिंदुत्वाचा जयनाद केल्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर आदर आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. खेत्री संस्थानच्या राजेसाहेबांनीही त्यांना अभिनंदन पत्र पाठविले. त्या अभिनंदनपत्राला स्वामीजींनी अमेरिकेतून पत्रोत्तर पाठविले. या सुदीर्घ उत्तरात स्वामीजींनी भारतेतर जगाच्या जीवनोद्देशाची, जगण्याच्या प्रयोजनाची, जीवनदृष्टीची चिकित्सा केली आणि जीवनाकडे पाहण्याच्या या दृष्टीमुळे भारत त्यांच्यासाठी कसा टाकावू आहे याचाही उहापोह केला. त्यानंतर स्वामीजी म्हणतात, जे जगण्यास योग्य असतात तेच जगात टिकून राहतात. मग बाकीचे जग म्हणते त्याप्रमाणे भारत जर टाकावू असेल तर, हजारो वर्षे प्रचंड आघात आणि वादळे यांना तोंड देऊनही तो अद्याप टिकून का आहे? हा भेदक प्रश्न उपस्थित केल्यावर स्वामीजी अतिशय प्रभावी शब्दात या समाजाच्या, या देशाच्या जीवनस्रोतावर प्रकाश टाकतात. स्वामीजी या पत्रोत्तरात म्हणतात, `एका क्षणात जे सगळ्या जगभर रक्ताचे पाट वाहवू शकतात ते निश्चितच गौरवाला पात्र मानले जाऊ शकतात, काही लक्ष लोकांना सुखसमृद्धीत ठेवण्यासाठी सगळ्या पृथ्वीवरील अर्ध्या जनतेची जे उपासमार करतात त्यांचाही मोठा उदोउदो केला जाऊ शकतो, तर मग दुसऱ्या कोणाच्या तोंडची भाकरी न काढून घेता, जे कोट्यवधी लोकांना शांततेत आणि समृद्धीत ठेवतात त्यांना तुम्ही काहीच श्रेय देणार नाही काय? इतरांवर कोणत्याही प्रकारचा बलप्रयोग न करता, शतकानुशतके लक्ष लक्ष मानवांचे नीट संगोपन करणे आणि त्यांचे भाग्य घडविणे यात कोणतीच शक्ती प्रकट होत नाही का?’ संपूर्ण जगभर आज जे-जे म्हणून संघर्ष सुरु आहेत त्याचा इतका मूलगामी वेध आणि भारताने त्याला दिलेले चिरंतन उत्तर किती थोडक्या आणि प्रभावी शब्दात स्वामीजींनी मांडले आहे.

- श्रीपाद कोठे

२६ जून २०१४

शुक्रवार, २४ जून, २०२२

मतदानसक्तीला विरोध

गुजरातमध्ये मतदान सक्तीचे होण्याची शक्यता, अशी बातमी आज वाचली. मतदानाच्या सक्तीला माझा मुळातच विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्र वा केंद्रात मतदान सक्तीचे झाले तर मी मतदान करणार नाही. सज्ञान झाल्यापासून मी मतदान कधीच टाळले नाही. नियमित मतदान करतो. परंतु ते सक्तीचे झाल्यास मात्र मी मतदान करणार नाही अन त्या गुन्ह्यासाठी होणारा दंड वगैरेही भरणार नाही. जबरदस्तीने सरकारी यंत्रणा जे करेल ते करेल.

या विषयावरील एक साधकबाधक लेख काही काळापूर्वी मी अनेक वृत्तपत्रांनाही पाठवला होता. पण कोणीही तो छापला नाही. याची कारणे सर्वज्ञात आहेत. माझ्या ब्लॉगवर तो उपलब्ध आहे. जगभरातील अशा सक्तीचा आढावा घेऊन सोबत माझ्या विरोधाचीही मीमांसा मी त्यात केली आहे.

अनेक भारतीय व अभारतीय चिंतकांनी (ज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय देखील आहेत) एक विचार मांडला आहे की, माणूस हा राजकीय प्राणी नाही; माणूस हा आर्थिक प्राणी नाही; माणूस हा सामाजिक प्राणी नाही. माणूस यापेक्षा खूप काही वेगळी गोष्ट आहे. (तो सध्या विषय नाही, त्यामुळे विस्तार करत नाही.) याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. हे चिंतक म्हणतात म्हणून किंवा मी त्याचे अनुमोदन करतो म्हणून नव्हे. तर ती काळाची अन अख्ख्या जगाची गरज आहे म्हणून. माझ्या नियमित लिखाणातून हा विषय सतत येतच असतो अन पुढेही येईल. तूर्त एवढे पुरेसे आहे की, सर्वांगीण विचार करता, मतदानसक्ती ही अत्यंत चुकीची बाब आहे. अन त्यामुळेच माझा तिला १००% विरोध आहे.

- श्रीपाद कोठे

२५ जून २०१५

इस्लामचे टीकाकार

विकिपीडियात सहज शोधलं, इस्लामचे टीकाकार कोण ते. २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील आणि त्यापूर्वीचे टीकाकार यांची यादी आहे. आणि समकालीन टीकाकारांची मोठी यादी आहे. त्यात-

इस्लामचे नऊ मुस्लिम टीकाकार आहेत.

इस्लाम सोडून अन्य पंथ स्वीकारणारे आठ आहेत.

मुस्लिम म्हणून जन्माला आलेले पण स्वत:ला निधर्मी म्हणवून घेणारे १३ आहेत.

मध्यपूर्वेची पार्श्वभूमी असलेले पाच ख्रिश्चन आहेत.

मध्यपूर्वेची पार्श्वभूमी नसलेले १५ ख्रिश्चन आहेत.

ज्यू ११ आहेत.

मूळ भारतीय पंथांचे सात आहेत.

पाश्चात्य देशातील कोणताही संप्रदाय न मानणारे १० आहेत.

यातील काही नावे परिचयाची तर काही अपरिचित आहेत. मात्र सगळ्यात गंमत म्हणजे, या यादीत स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, स्वामी दयानंद इत्यादी कोणाचीही नावे नाहीत.

निष्कर्ष १- आपल्या देशातील तथाकथित विद्वान/ विचारवंत/ सेक्युलर लोक/ लेखक/ संपादक काहीही म्हणत असले तरी जग मात्र; स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, स्वामी दयानंद यांना वा यांच्या सारख्यांना इस्लामचे टीकाकार मानत नाही.

निष्कर्ष २- इस्लामवर टीका करणे याला जग पाप वा गुन्हा मानत नाही.

निष्कर्ष ३- इस्लामवर टीका याचा अर्थ सर्वधर्मसमभावाला तिलांजली असे जग मानत नाही.

- श्रीपाद कोठे

२५ जून २०१५

स्थानकांचा वापर

नागपूर मेट्रोने स्थानकांचा वापर करून भरपूर वीज तयार केल्याची बातमी आज वाचायला मिळाली. सहज मनात आलं; देशभरात केंद्र आणि राज्य सरकारच्या हजारो विभागांची लाखो कार्यालये, त्यांच्या इमारती, मोकळ्या जागा आहेत. सौर विजेची निर्मिती आणि जल पुनर्भरण करणे सहज शक्य आहे. जागा उपलब्ध आहेत, परवानग्या तुमच्या हाती आहेत. अधिग्रहण, मोबदला, दावे यातलं काही नाही. फक्त इच्छाशक्ती, सहकार्य, नियोजन एवढंच हवं. रेल्वे स्थानके, बस स्थानक ही पण आहेतच. पाणी आणि वीज दोन्ही प्रश्न पूर्ण सुटू शकतील.

- श्रीपाद कोठे

२५ जून २०१८

एकांगीपणा

कशाच्याही संदर्भात (व्यक्ती, विचार, समाज, संघटना, अगदी काहीही) तीन गोष्टी असतात - संरक्षण, संगोपन, संवर्धन. ही तिन्ही कामे वेगवेगळी आहेत. यातील प्रत्येक काम प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक काम करण्याची गरजही नसते. आपापल्या प्रकृतीनुसार लोक ते ते काम करतात. या प्रत्येक कामाची पद्धत, भाषा, प्राधान्य, प्रकृती, आग्रह हेदेखील वेगळे असतात. गंमत अशी की, यातील आपलेच काम महत्वाचे, एवढेच नाही तर तेच एकमेव करावे असे काम; अशी बहुतेकांची धारणा असते. आपल्याला तीनमधील जे काम योग्य वाटते त्याशिवायची कामे चुकीची आहेत, ती करणारे चुकीच्या मार्गावर आहेत; अशीच अनेकांची भावना असते. दुसरे काही समजून घेण्याची तयारीही नसते. किमान आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळ्या गोष्टीही असतात, त्यांचेही महत्व असते हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही नसतो. यालाच म्हणतात एकांगीपणा. स्वामी विवेकानंद तर म्हणत की, मानवाला एकांगीपणाचा रोग जडलेला आहे.

या तीन व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाची बाब असते. संरक्षण, संगोपन, संवर्धन या तिन्हीच्या आधी ती गोष्ट येते. ती म्हणजे संरक्षण, संगोपन, संवर्धन कशाचे करायचे ती बाब. एखाद्या व्यक्तीचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करायचे तर ते ती व्यक्ती अस्तित्वात आल्यानंतर केले जाते. एखाद्या संस्थेचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करायचे तर ते ती संस्था अस्तित्वात आल्यानंतर केले जाते. संरक्षण, संगोपन, संवर्धन ही तिन्ही कामे अमुक काही तरी अस्तित्वात आल्यानंतरची कामे आहेत. जशी ही तीन कामे करणारे लोक आपापल्या प्रकृतीनुसार ती कामे करतात (एकमेकांबद्दल आस्था आणि विश्वास नसूनही) तसेच; प्रत्येक गोष्टीच्या मूळ अस्तित्वाचा किंवा या समग्र अस्तित्वाचा विचार करणारे, त्यासाठी काम करणारेही असतात. ते थोडे असतात आणि बरेचदा misunderstood असतात. हे जे मूळ अस्तित्व असतं, त्याला म्हणतात धर्म आणि त्याचा विचार करणारे असतात त्यांना म्हणतात ऋषी. वर्तमानात या दोन बाबी दुर्लक्षित आहेत, पण त्यांचा विचार पुढे येणे आवश्यकही आहे. धर्म आणि ऋषी यांचा उच्चार करणे सोपे असले तरी त्यांची समज मात्र कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २५ जून २०१९

बुधवार, २२ जून, २०२२

संपादकांचे बुद्धीदारिद्र्य

आज सकाळी एक अग्रलेख वाचला. रेल्वे भाडेवाढ हा विषय होता. मला तो अग्रलेख मुळीच आवडला नाही आणि पटलाही नाही. त्यामुळे लगेच संबंधित संपादकाला तसा मेसेज केला. संध्याकाळी संपादकीय विभागातील एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा फोन आला. म्हणाला, तुमचं काय म्हणणं आहे? मी माझी भूमिका सांगितली. त्यांचे एकच तुणतुणे, आपल्यावर ६० लाख कोटींचे कर्ज आहे. एवढा पैसा कुठून आणणार ते सांगा. हे तर कोणीही मान्य करेल की, परिस्थिती बिकट आहे. पण त्यावर जादूची कांडी फिरवून तोडगा निघणार नाही हेही सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. ते बाकी काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यांचा आरोप होता की, सरकारने सगळं फुकट द्यावं हेच तुमचं म्हणणं आहे आणि त्यांनी फोन बंद केला. वरून हेही म्हणाले की, त्यांना खूप कामे आहेत. ते माझ्यासारखे रिकामे नाहीत.

मला रिकामे म्हटल्याबद्दल मला मुळीच वाईट वाटले नाही. उलट मला ते भूषण वाटते. लोकांनी फार काम करू नये, थोडे रिकामे असावे हा माझा सिद्धांत आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी. पण त्यांच्या बोलण्याचा रोख जो होता तो असा की, मी कम्युनिस्ट कामगार नेत्यासारखा किंवा गरिबांची बाजू घेऊन `फुकट संस्कृती'चे समर्थन करणाऱ्या व्यक्तीसारखा बोलतो आहे. ते संपादक मला चांगले ओळखतात. माझी संघनिष्ठा, माझे संघकार्य, माझे संघविचार, त्यापायी मी मोजलेली किंमत हेही त्यांना माहित आहे आणि तरीही माझ्यावर मी डावा असल्याचा आरोप करून ते मोकळे झाले. मला दु:ख त्याचंही नाही. कारण डावा तर डावा. या शब्दजंजाळाची  मला काहीही मातब्बरी कधीच वाटली नाही, वाटत नाही.

मग मला वाईट कशाचे वाटले? मला वाईट वाटले, संपादकांच्या निर्बुद्धतेचे. एखादा मान्यवर संपादक इतका मठ्ठ आणि निर्बुद्ध असेल, तर एकूण समाजाची बौद्धिक कुवत आणि स्थिती काय म्हणावी? अन अशा स्थितीत समाजाचे खरंच भवितव्य काय? मला वाईट याचे वाटले. कारण मी काय म्हणतो वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवू. पण या भाडेवाढीचे समर्थन करताना त्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून संसदेत केलेल्या पहिल्या भाषणाचाही विसर पडावा? मला तर वाटते त्यांना ते भाषण समजले तरी की नाही? काय म्हणाले होते मोदी? मोदी म्हणाले होते, `या देशावर पहिला अधिकार कोणाचा? पहिला अधिकार आहे या देशातील गरीबांचा. कारण श्रीमंत लोक तर त्यांना हवे ते मिळवू शकतील त्यांच्या संपन्नतेच्या बळावर. पण गरिबांनी काय करावे?' हे त्यांचे शब्द आहेत. शेवटी त्यांनी नाराही दिला होता- श्रामेव जयते. काय नरेंद्र मोदींना `फुकट संस्कृती'वाले म्हणायचे? आपण काय बोलतो, काय लिहितो, काय विचार करतो; कुठलीही सुसंगतता नसलेले हे विद्वान संपादक !! आज आमच्या बौद्धिक नेतृत्वाची ही बुद्धीदरिद्री अवस्था समाजाला कुठे घेऊन जाईल?

सध्याच्या आर्थिक स्थितीवर उपाय काय असाही त्यांचा प्रश्न होता. त्यावर एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, त्याबद्दल माझे मत, माझ्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनामा समितीला आणि नीती निर्धारकांना मी पोहोचवल्या आहेत, फार पूर्वीच. उपाय काय असा प्रश्न विचारणाऱ्या त्या दिवट्या संपादकाला माझा प्रतिप्रश्न आहे की, सत्तेवर येण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या भाजपने सत्ता मिळाल्यावर काय उपाय करायचे याचा सर्वंकष अभ्यास केला नाही का? उपाय काय याचे उत्तर त्यांनी द्यायचे आहे. डोक्यावर घेणारी जनता हवेत भिरकावून द्यायलाही कमी करत नाही, हा जगाचा अनुभव आहे. सगळ्यांनीच हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२३ जून २०१४

महाकाय बँका

आघाडीच्या सहा बँकांमध्ये २६ बँकांचे विलीनीकरण करून मोठ्या बँका करण्यात येणार आहेत. स्टेट बँकेच्या subsidiary चे अन महिला बँकेचे स्टेट बँकेत विलीनीकरण झालेही. कशासाठी? आंतरराष्ट्रीय मापदंड असल्यामुळे.

स्टेट बँकेपेक्षा कितीतरी महाकाय असलेल्या अमेरिकन बँका २००८ मध्ये कोसळल्याच ना? उलट लहान लहान बँका अन पतसंस्था असून, किंबहुना त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था भक्कम राहिली.

किती दिवस आंतरराष्ट्रीयता, आधुनिकता, जागतिक मापदंड वगैरेचे ओझे वाहणार?

`वाढत्या किमती, वाढते पगार' यांचे अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे. त्याच्या परिणामी inflation, stagnation, stagflation सगळे होऊन गेले आहे. आता भांबावलेली धावाधाव तेवढी सुरु आहे. प्रचलित अर्थशास्त्र, अर्थनीती, अर्थव्यवहार, अर्थरचना सगळ्यांना केराची टोपली दाखवण्याला पर्याय नाही. एका जागतिक अर्थक्रांतीची गरज आहे. त्याचे नेतृत्व भारताशिवाय कोणीही करू शकत नाही. भारत हे नेतृत्व करेल का? सध्या तरी तसे वाटत नाही.

- श्रीपाद कोठे

२३ जून २०१६

सोमवार, २० जून, २०२२

बोम्बल्यांचा देश

जगभरात सध्या इराक प्रश्नाची चर्चा सुरु आहे. आपली प्रसार माध्यमे तर बी.बी.सी. वा सी.एन.एन. यांच्यापेक्षाही अधिक रस घेऊन त्या विषयाला अधिक वेळही देत आहेत. तेथे अडकलेले ४० भारतीय हा सगळ्या देशाचा विषय आहे हे खरे. विपत्तीत अडकलेल्या लोकांची चिंता वाटणे, चिंता करणे आणि त्यांना सुखरूप आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे यात वावगे काहीच नाही. पण विपत्ती आल्यावर हातपाय गळायचे की खंबीरपणे पाय रोवून उभे राहायचे? जो उठतो तो एकच धोशा लावतो- पाहा यांची स्थिती, पाहा कसे रडताहेत. बरे हे एक वेळ मानवियता म्हणून समजून घेताही येईल, पण त्याला जोड देऊन सरकारच्या नावाने जेव्हा बोंब ठोकली जाते तेव्हा गमतीशिवाय दुसरे काहीही वाटू शकत नाही. जिथे प्रत्यक्ष इराकी सरकारला स्थितीचा अंदाज आला नाही आणि स्थिती हाताळता आली नाही तिथे ४० लोकांच्या सुरक्षेसाठी इतक्या दुरून भारत सरकार काय करू शकणार? आणि उपाय शेवटी रोगाची लक्षणे दिसल्यावर आणि निदान झाल्यावरच करतात ना? एक आणखीनही मुद्दा आहे की, वेळ काही सांगून येत नाही. आणि दुसरे म्हणजे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, जोरावर सिंह- फतेह सिंह वगैरेंचा वारसा आपण टाकून दिला आहे का? मागे नेपाळहून भारतीय विमानाचे अपहरण करण्यात आले होते तेव्हाही असेच घडले होते. पंतप्रधान वाजपेयी यांच्या निवासापुढे लोकांनी इतके गळे काढले की विचारता सोय नाही. तुमची काहीही मजबुरी असो आमची माणसे परत आणा !! हे चूक आहे. मानवी जीवनाचे महत्व लक्षात घेऊन आणि त्याबद्दल आदर सन्मान बाळगूनही हे म्हणणे भाग आहे की ही वृत्ती चूक आहे. घटना अशाच घडत असतात. अन्यथा अमेरिकेच्या ट्वीन टोवर्सवर अचानक हल्ला कसा झाला असता? परीक्षा पाहणारे असे प्रसंग येतच असतात. त्यावेळी गळे काढायचे, कावकाव करायची की; सर्वोच्च त्यागाची तयारी ठेवून हिमतीने वागायचे आणि सगळ्यांनी हिंमत वाढवणारे वर्तन करायचे. पतीच्या मृतदेहाला सलाम करून रणांगणावर आपले कर्तव्य पार पाडायला जाणाऱ्या महिला अजूनही आपण पाहतो, त्यावेळी असे गळे काढणे खटकते. आपल्या बिनडोक प्रसार माध्यमांबद्दल तर बोलायलाच नको.

- श्रीपाद कोठे

२१ जून २०१४

लतादीदींवर कुमारजी

आज सकाळी whats app वर आलेल्या एका पोस्टने योगायोगाची गंमत अनुभवता आली. काल लता दीदींच्या गाण्याबद्दल एक छोटीशी टिप्पणी केली होती. अन आज सकाळी आलेल्या पोस्टमध्ये वाचायला मिळालं- `लताच्या गाण्याबद्दल बोलताना कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते की, `या लोकांनी (संगीतकारांनी) तिला उगीचच चिल्लायला लावलंय. !'

आपल्याला जे वाटतं ते अगदी सारखं कोणाला तरी वाटतं हे प्रत्येकालाच समाधान देतं. अन तेही कुमारजींना तसं वाटलं होतं !!! अहाहा. ही लताजींवर टीका किंवा त्या टीकेचा आनंद नाही. समानधर्मा भेटल्याचा आनंद आहे.

- श्रीपाद कोठे

२१ जून २०१७

रविवार, १९ जून, २०२२

थोडेसे `कडवे प्रवचन'

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी `कडवी दवा देनी पडेगी' असे मत नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील आपल्या भाषणात काढले होते. आज जाहीर झालेल्या रेल्वेच्या प्रवासी व माल भाडेवाढीनंतर तीच शब्दावली सगळीकडे वापरली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तत्कालीन काँग्रेस सरकारची भाषा बोलू लागले आहेत. सत्ताग्रहणानंतरच्या महिनाभरातच हा अनुभव आल्याने सामान्य नागरिकाची अवस्था संभ्रमित झाली आहे. `कडवी दवा' अशीच प्यावी लागली तर काय होईल, हा त्याच्यापुढील प्रश्न आहे. तरुण सागरजी महाराज नावाचे एक प्रसिद्ध जैन संत आहेत. `कडवे प्रवचन' नावाने त्यांची प्रवचने प्रसिद्ध आहेत. नावाप्रमाणेच ती कडू असतात. तोच शब्द वापरून बोलायचे तर आज जगाला आणि भारतालाही कडू औषधासोबतच कडू प्रवचनांची नितांत गरज आहे. अर्जुनासारखा धनुर्धरसुद्धा जेव्हा हतप्रभ झाला तेव्हा श्रीकृष्णाने प्रथम त्याला कडू जहर असेच वचन ऐकवले होते. श्रीमद भगवदगीतेचा पहिला अध्याय त्याचाच आहे.

भारत म्हणजे कोण? भारत म्हणजे भारत सरकार, भारत म्हणजे राज्य सरकारे, भारत म्हणजे केंद्र सरकारपासून गट ग्राम पंचायती पर्यंतची प्रशासकीय व्यवस्था, भारत म्हणजे येथील शिक्षण संस्था, त्यात काम करणारे सगळे लोक, तेथे शिकणारे विद्यार्थी, भारत म्हणजे येथील १२५ कोटी लोक, त्यांच्या व्यवस्था, त्यांचे उद्योग, सेवा, शेती, कला, वाणिज्य, विज्ञान असं सगळं. कडू औषध आणि कडू प्रवचन या सगळ्यांना आवश्यक आहे.

अर्थकारणाच्या बाबतीत कडू औषध म्हणजे भाववाढ, भाडेवाढ, करवाढ असा अर्थ होतो. पण यासोबतच कडू प्रवचन आवश्यक आहे. अर्थकारणाच्या बाबतीत कडू प्रवचन काय असू शकेल?

विकासाची आजची कल्पना आणि पद्धती पूर्णत: चुकीची आहे हा त्याचा मूळ मुद्दा राहील. अमेरिकेने कशी प्रगती केली, युरोपने कशी प्रगती केली वगैरे युक्तिवाद करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांनी ही प्रगती जगाला पिळून केलेली आहे. जेव्हा स्वत:च्या देशाला आणि स्वत:च्या जनतेला पिळून झाले तेव्हा जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, मुक्त अर्थव्यवस्था यांचे नारे देऊन आणि काही तुकडे फेकून सगळ्या जगाला नादी लावले आणि आता जेव्हा जगाला लुबाडणे कठीण होऊ लागले तेव्हा अर्थव्यवस्था धोक्यात येऊ लागल्या. २००८ च्या जागतिक मंदीनंतर अजूनही जग का सावरू शकले नाही? अमेरिकेच्या महाकाय बँका ज्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या त्या पुन्हा उभ्या का राहू शकल्या नाहीत? occupy wall street सारखी आंदोलने का उभी राहिली? एखाद्या सरकारने किती कर्ज घ्यावे याची काही मर्यादा असते. अमेरिकन सरकारची ती मर्यादा संपून गेल्याने त्याला आणखी कर्ज घेता येत नव्हते, तेव्हा ती मर्यादा वाढवून घेण्यासाठी अमेरिकी प्रशासनाला अखेरच्या क्षणापर्यंत किती संघर्ष करावा लागला? या सगळ्यावरून देखील आम्ही काही शिकणार की नाही? तात्पर्य काय की, आपली विकासाची दिशा, अर्थकारणाची दिशा बदलणे ही सगळ्यात पहिली आवश्यकता आहे.

१९९२ च्या अयोध्या कांडानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. कोणत्याही बंदीकाळात संघाचे काम कधीच बंद नव्हते. त्याही वेळी काम सुरूच होते. बंदीचे स्वरूपही फारसे कठोर व त्रासदायक नव्हते. त्यावेळी रेशीमबागेत काही लेखक विचारवंतांची एक प्रदीर्घ बैठक झाली होती. त्यावेळी सहसरकार्यवाह असलेले सुदर्शनजी त्या बैठकीला पूर्ण वेळ उपस्थित होते. अन्य काही विषयांसोबत `हिंदू अर्थशास्त्र' असाही एक विषय एका सत्रात होता. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले `हिंदू अर्थशास्त्र' पुस्तकाचे विद्वान लेखक डॉ. म. गो. बोकरे यांना त्या सत्रासाठी आमंत्रित केले होते. डॉ. बोकरे स्वत: मोठे अर्थतज्ञ होते. सुरुवातीला कट्टर कम्युनिस्ट असलेले डॉ. बोकरे नंतर हिंदुत्वाकडे ओढले गेले होते. ही ओढ पूर्णत: बौद्धिक स्वरुपाची होती. त्यात त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. त्यातील एक होती अतिरिक्त धननिर्मिती आणि अतिरिक्त धनसंचयाची. कोणत्याही अर्थ व्यवस्थेत या गोष्टी अपरिहार्यपणे घडतात. त्याने प्रश्न आणि समस्याही उत्पन्न होतात. आज चीनमध्ये निर्माण झालेल्या अर्थसंकटामागे मोठ्या प्रमाणातील डॉलरसंचय हेही एक कारण आहे. त्या समस्येची चर्चा करताना डॉ. बोकरे म्हणाले होते की, `हिंदूंचे अर्थशास्त्र हे दानाचे अर्थशास्त्र आहे.' दान हा अर्थशास्त्राचा मोठा व महत्वाचा पैलू आहे. राजे महाराजे यज्ञ वा अन्य प्रसंगी सगळा खजिना दान करीत असत, अशी वर्णने वाचायला मिळतात. आज या पैलूची पुनर्स्थापना करण्याची गरज आहे.

फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या अब्जोपतींच्या ताज्या यादीत ५६ भारतीयांची नावे आहेत. यातील शेवटचे नाव जितेंद्र वीरवाणी यांचे असून त्यांच्याकडे १ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. सगळ्यात पहिले नाव अर्थातच मुकेश अंबानी यांचे आहे आणि त्यांच्याकडे १८.६ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. १ अब्ज डॉलर्स म्हणजे सहा हजार कोटी रुपये. या ५६ लोकांची संपत्ती सुमारे १९० अब्ज डॉलर्स म्हणजे ११ लाख ४० हजार कोटी रुपये आहे. भारत सरकारचा संपूर्ण देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प वर्षाचा दोन लाख कोटींचा असतो. काही वर्षांपूर्वी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शेतकऱ्यांचे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते त्यावेळी शेअर बाजार धडामकन एक हजार अंकांनी कोसळला होता. भारत म्हणजे हे सगळे उद्योगपती असल्याने त्यांनी आपली जबाबदारी उचलून आपली २० टक्के संपत्ती भारतासाठी दान द्यायला हवी. अन्यथा काहीही बोलण्याचा वा मागण्याचा त्यांना हक्क नाही. आजच्या काळात असा दानधर्म कोणी करेल हे कठीण आहे. तो कसा करवून घ्यायचा हे मोदी सरकारचे काम आहे. सामान्य माणसाला तोशीश न लावता छत्रपति शिवरायांनी संपन्न राज्य कसे उभे केले याचा अभ्यास मोदींनी करायलाच हवा. त्यातील सुरत लुटीची प्रकरणेही `माझा गुजरात'च्या बाहेर येउन अभ्यासायला हवीत.

या भारताचा तिसरा घटक तुम्ही आम्हीही आहोत. बाप मेला तरी चालेल पण मला मोटारसायकल हवीच अशी वृत्ती बाळगणाऱ्या वांड मुलासारखे वागायचे की काय हवे- नको, काय मागायचे काय नाही याचा विवेक ठेवून वागायचे, हा निर्णय तुम्हा आम्हाला करायचा आहे. याशिवाय करण्यासारखी अनेक कामे आहेत. छोटंसं उदाहरण घेता येईल. आज सगळीकडे विजेचा तुटवडा आहे. कोट्यवधी हातांमध्ये आज मोबाईल फोन आहेत. त्यावर गेम्स खेळण्याची सवय असंख्य लोकांना आहे. त्याचा खरेच काय उपयोग आहे? वेळेसह अनेक गोष्टींचा तो अपव्यय आहे. हे गेम्स खेळणे बंद केले वा कमी केले तर? असे समजू या की एका व्यक्तीने एक युनिट वीज वाचवली. अशा दहा कोटी लोकांनी एकेक युनिट वीज वाचवली (वाया घालवणे थांबवले) तर रोजची १० कोटी युनिट वीज वाचेल. थेंबे थेंबे तळे साचे याचा हा भव्य व्यावहारिक प्रत्यय होऊ शकेल. अशा हजारो गोष्टी करण्यासारख्या आहेत.

एकीकडे कररचना, विविध योजना, आखणी, उत्पादनवाढ, भ्रष्टाचाराला आळा, कठोर कायदे, काळा पैसा परत आणणे, सरकारी उद्योगांतील निर्गुंतवणूक वगैरे वगैरे उपाय करतानाच अन्य सगळ्या घटकांनीही आपापली जबाबदारी उचलली पाहिजे. अर्थसाक्षरता वाढली पाहिजे. दृष्टी बदलली पाहिजे. तरच `अच्छे दिन' येऊ शकतील आणि आल्यावर टिकतील. अन्यथा नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २० जून २०१४

न्याय अन्याय

काही मित्र जंगलात फिरायला गेले. त्यांचा आनंदविहार सुरु असताना त्यांना एक नैसर्गिक असा जलाशय दिसला. त्यांच्यापैकी एकाला त्यात हातपाय धुण्याची इच्छा झाली. त्याने मोबाईल, कॅमेरा, पाकीट, कंबरेचा पट्टा काढून काठावर ठेवले आणि तो पाण्यात उतरला. ५-१० मिनिटं गेली. छान सगळे मजा करत होते. अन गवतातले किडे हुडकत तिथे एक पक्षी आला. त्याने पाकीट चोचीत उचलले. मित्रांनी हाड हाड केलं तर तो उडाला. अन उडाला तो पाकीट घेऊनच. अन बरोब्बर त्या मोठ्ठ्या जलाशयाच्या मध्यावर त्याने ते चोचीतून टाकून दिले. बिच्चारा. डोक्याला हात लावून बसण्याशिवाय काय करू शकत होता? पैसे, लायसन्स, वेगवेगळे कार्ड वगैरे गेलं. गंगार्पण. कोणाकडे मागायचा न्याय? काय शिक्षा द्यायची पक्ष्याला?

आता बोला.

- श्रीपाद कोठे

२० जून २०१५

दीदींचं गाणं

हे कोणाला आवडणार नाही, कोणाला पटणार नाही. पण आजकाल मला अनेकदा लता दीदींचं गाणं नाही आवडत. असं वाटतं की विनाकारण वरवरच्या पट्ट्या गाठण्याचा हव्यास तर नाही हा. त्यांचं गाणं, आवाज, त्याचा पल्ला, गोडवा याबद्दल वादच नाही. पण अकारण किंचाळल्यासारखं वाटतं. तुकारामांच्या अभंगात तर खूपच जाणवतं. वृक्षवल्ली अम्हा सोयरी किंवा सुंदर ते ध्यान वगैरे अधिक कोमलपणे हवं. कर्कश वाटतं ते. अगदी प्रेमाची गाणी सुद्धा जरा कान चिरतात असं वाटतं. त्या ऐवजी थोडी गोलाई असती तर बरं, असंही वाटून जातं.

- श्रीपाद कोठे

२० जून २०१७

ऐक्य आणि स्वातंत्र्य

ऐक्य आणि स्वातंत्र्य. दोन गोष्टी. व्यक्तीपासून विश्वापर्यंत त्याचे अनेक पदर, त्याच्या अनेक तऱ्हा नित्य पाहायला, अनुभवायला मिळतात. या दोन्हीसाठीचे प्रयत्न जगभरात असफल होतानाच बहुधा दिसतात. भारतदेखील त्याला अपवाद नाही. भाषा, भूषा, भूगोल, भय, भावना अशा विविध गोष्टींचा आधार घेऊन ऐक्य निर्माण करण्याचा किंवा स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न होतो आणि लवकर वा उशिरा अभेद्य खडकावर आपटून संपून जातो. का? कारण या दोन्ही बाबी `बाहेरच्या'पेक्षा `आतल्या'शी संबंधित असतात. ऐक्य वा स्वातंत्र्य आतून येते, यायला हवे आणि अनुभवताही यायला हवे. त्याचा बाह्य आविष्कार वेगळा राहील. पण बाहेरील आविष्कार पाहून किंवा बाहेरील लक्षणांच्या आधारे ऐक्य वा स्वातंत्र्य जोखायला गेल्यास फसगत अवश्य होते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश वा अन्य अनेक प्रदेश यांना भारताचे अंग म्हणून काहीही वावगे वाटत नाही आणि जम्मू-काश्मीर वा गोरखाभूमी यांना तक्रार असते याची; किंवा घर सांभाळणारी स्त्री, शिकूनही पैसा न कमावणारी स्त्री स्वतंत्र नसते अशी भावना; यांची संगती लावताच येणार नाही. आत डोकावण्याचा प्रयत्न वाढायला हवा, एवढेच.

- श्रीपाद कोठे

२० जून २०१७

अण्वस्त्रांची विल्हेवाट

Stockholm international peace research institute ने एक अहवाल तयार केला असून त्यात म्हटले आहे की, जगातील अण्वस्त्रांची संख्या सहाशेने कमी झाली आहे.

तशी चांगलीच बातमी म्हणायला हवी. पण त्याच वेळी एक प्रश्न उभा राहतो, या कमी झालेल्या अण्वस्त्रांचे झाले काय? जगात कोणीही कोणत्याही देशावर अण्वस्त्र वापरलेले नाही. मग ६०० अण्वस्त्रे गेलीत कुठे? उत्तरही सोपं आहे की, ती नष्ट करण्यात आली असली पाहिजेत. कुठे नष्ट केली असतील? समुद्राच्या तळाशी? पृथ्वीच्या पोटात? अंतराळात? कुठेही नष्ट केली असोत आणि कशाही अन कितीही शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट केली असोत; त्यांचे किरणोत्सर्जन तर झालेच असणार. आजच्या कोणत्याही अण्वस्त्राची शक्ती, little boy पेक्षा कितीतरी अधिक आहे. विषय स्पष्ट आहे- आजच्या अनेकानेक समस्यांना याने हातभार लागला असेल वा नाही? ६०० अण्वस्त्रे नष्ट करण्याने काय काय होऊ शकेल याचा विचार कोण करणार, कधी करणार?

अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा सुरक्षा ही मानवी मनाची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. बाकी काही नसले तरी चालेल पण सुरक्षा हवी. आजच्या घडीला तर तो इतका भयग्रस्त झाला आहे की, त्याच्या या मूळ प्रेरणेचा कितीतरी पटींनी विस्तार झाला आहे. त्याने त्याच्या सुरक्षा विषयक प्रयत्नांचे एक समांतर विक्राळ विश्व निर्माण केले आहे. सुरक्षेचे उपाय जेवढे वाढत जातात तेवढे भय आणखीन वाढते हा जगाचा, मानवजातीचा अनुभव आहे. सुरक्षेचे उपाय सुरक्षा मिळवून देत नाहीत. मुळात भयग्रस्तता कमी होणे, कमी करणे हा त्यावरील उपाय आहे. त्यासाठी अनेक स्तरांवर विविध प्रकारे काम करायला हवे असते. त्यासाठी जीवनशैलीपासून विविध कल्पनांपर्यंत कठोर आणि रुचीला न उतरणारे प्रामाणिक विश्लेषण ही पहिली पायरी आहे. अभिनिवेशरहित होऊन, सखोल विचार करण्याची मानवाची तयारी किती आहे हा प्रश्न आहे. ज्यांना हे जाणवते, समजते, आकळते; ते प्रसंगी वाईटपणा घेऊन, किंमत चुकवून; माणसाला, जगाला याची जाणीव किती करून देतात हा त्यानंतरचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष परिवर्तन या दोन प्राथमिक पावलांशिवाय शक्य नाही. बाकी साऱ्या नुसत्या गप्पा.


- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २० जून २०१९

सनी लिओनी

नुकतीच एक पोस्ट पाहिली. सनी लिओन या अभिनेत्रीबद्दलची. त्यात ती रडत आहे आणि तिच्या तोंडी वाक्य आहे- `मी वेश्या नाही. प्रत्येकाला भूतकाळ असतो.'

गंमत वाटली. गंमत तिच्याबद्दल नाही. तिने जे काही केले वा केले नाही त्याबद्दल नाही. तर त्यातील मानवी वृत्तीबद्दल. म्हणजे `पोर्न स्टार' म्हणून काम करताना तिने कोणताही मागचापुढचा विचार केला नाही. `मी कोणाला जुमानत नाही. जुमानणार नाही,' अशा वृत्तीने ती राहिली. म्हणजे मला हवे तेव्हा मला हवे तसे मी राहणार, करणार, वागणार, बोलणार. दुसऱ्यांचा, त्यांच्या भावनांचा, आवडीनिवडीचा, गरजांचा, व्यक्तिमत्वाचा, स्वातंत्र्याचा वगैरे विचार करण्याची मला फिकीर नाही. माझी आवड, माझ्या गरजा, माझ्या अपेक्षा, माझ्या भावना याच महत्वाच्या, त्याचाच फक्त मी विचार करणार, तेवढ्याच ग्राह्य धरणार. त्यालाही हरकत नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांनी मला हवे तसेच समजून घ्यायला हवे हा हट्टही ठेवणार आणि तशी अपेक्षाही करणार. मला जर पूर्ण स्वातंत्र्य हवे तर त्याची किंमत चुकवण्याची तयारी का नको? मग लोकांकडून अपेक्षा वगैरे का ठेवायच्या? म्हणजे मी दुसऱ्याचा विचार करणार नाही आणि दुसऱ्यांनी मात्र माझा विचार केला पाहिजे. मी दुसऱ्यांना समजून घेणार नाही, पण मला मात्र दुसऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. वरून तुम्ही समजून घेत नसाल तर तुम्ही किती दुष्ट, किती संवेदनाहीन, किती हेकड, किती आग्रही; वगैरे.

ही आहे मानवी वृत्ती. अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही अनेकदा आपण सुद्धा असेच वागत नसतो का? असेच का वागत असतो? आणि याची नुसती चर्चा करून होत नाही. पदोपदी स्वत:ची झाडाझडती घेत, परिश्रम घेत वळण लावत जावे लागते. यालाच साधना वगैरे म्हणत असावेत.

- श्रीपाद कोठे

१९ जून २०१५

जोडाक्षरे

आकाशवाणीवर त्यावेळी लागणार सांजधारा कार्यक्रम आठवतो. आठवड्याचा एक दिवस विशेष व्यक्ती तो सादर करीत असे. आपल्या आवडीची गाणी आणि गप्पा, आठवणी सांगणे. एक कार्यक्रम सादर केला होता सई परांजपे यांनी. त्यात उच्चार, जिभेचे वळण यावर बोलताना त्यांनी स्वतःची आठवण सांगितली होती की, 'लहानपणी घरी आग्रहाने, रागावून, लोभाऊन श्री रामरक्षा पाठ करायला लावली होती. इच्छा नसे, ओरडा खावा लागत असे; पण पाठ केली आणि रोज म्हणण्याचा उपक्रम अनेक वर्षे चालला. अर्थात घरच्यांच्या आग्रहाने. मात्र त्यामुळे tounge twisting खूप उत्तम साधलं. भाषा, उच्चार, त्यातले बारकावे आत्मसात झाले.'

आज दर्जा नकोच असेल तर त्याला काय उपाय आहे? कालपासून जोडाक्षरे आणि अंक याबाबतच्या निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करणाऱ्या पोस्ट देखील वाचायला मिळाल्या. एकच वाटते - कोणत्याही गोष्टीचे सोपीकरण कठीणपणाच्या आकलनाच्या दिशेने हवे. सुमारीकरणाच्या दिशेने नको. आजवर नेमके तेच झाले आहे. भाजी विकणाऱ्या महिलांची उदाहरणे देऊन वीस-दोन, नव्वद-पाच चे समर्थन करताना हे लक्षात घ्यावे. शिवाय जोडाक्षरांचे काय? अन तज्ञांचे हवाले देताना, आजची परिस्थिती तज्ज्ञांनीच आणलेली आहे याचा विसरही नको पडायला.

- श्रीपाद कोठे

१९ जून २०१९

लोकशाही

लोकशाही म्हणजे केवळ मतदान नाही. ती केवळ सुरुवात आहे. सगळ्या गोष्टीतील लोकसहभाग हा लोकशाहीचा अर्थ. मग त्या दिशेने जायला काय हरकत आहे? धोरणे, निर्णय, अंमलबजावणी हे केवळ शासन, प्रशासन, आयोग, तज्ञ या स्तरावर राहण्यापेक्षा; जे करायचे ते किमान वर्ष-दोन वर्षे समाजात चर्चेसाठी का ठेवण्यात येऊ नये. समाजव्यापी चर्चा होऊ द्यावी. त्यातून कल, कंगोरे, कोन लक्षात येऊन स्पष्ट होतील. त्यानुसार निर्णय घ्यावे. त्यामुळे लादल्याची भावनाही उत्पन्न होणार नाही.

- श्रीपाद कोठे
१९ जून २०१९

शुक्रवार, १७ जून, २०२२

सावधपण हवे

रा.स्व. संघाच्या संस्थापकांपासून, आज आपल्यात नसलेल्या पहिल्या पाचही सरसंघचालकांच्या जन्मदिन वा पुण्यतिथीला; त्यांना अभिवादन करणारे संदेश राजकीय (भाजपा) नेत्यांकडून पोस्ट होऊ लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. या पाचही सरसंघचालकांची प्रेरणा आणि प्रेरणा देण्याची शक्ती याबाबतही शंका नाही. परंतु एक बाब मनात आणि बुद्धीत स्पष्ट असली पाहिजे की, संघ/ संघविचार वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत. गेल्या काही वर्षात संघ म्हणजे भाजप असेच सर्वसाधारण मत दिसते. भाजपचे म्हणणे म्हणजे संघाचे म्हणणे, भाजपची नीती म्हणजे संघाची नीती अशी भावना दुर्दैवाने तयार झाली आहे. आता मोठे नेते जन्मदिनाला वा पुण्यतिथीला अभिवादन संदेश प्रसारित करीत असतील तर हळूहळू समूहाच्या मनात संघ म्हणजे भाजप हे समीकरण घट्ट होऊ शकेल. सामान्य स्वयंसेवक सुद्धा प्रवाहात येऊन असाच विचार करू लागतो. याचा अर्थ लगेच संघ आणि भाजपा हे शत्रू आहेत किंवा त्यांच्यात मतभेद (संघर्ष) आहे वगैरे करणे योग्य नाही. त्याचा अर्थ एवढाच की, संघ संघाच्या पद्धतीने, संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून, संघाच्या कामात सहभागी होऊन आणि संघाच्या अधिकृत साहित्यातून समजून घ्यायला हवा.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०१५

योग दिवस

जागतिक `योग दिन' हा जागतिक `योगासन दिन' होतो आहे का? सुरुवात आहे. त्यामुळे त्यावर वादविवाद करून `प्रथमग्रासे मक्षिकापात:' करणे चांगले नाही. पण जागतिक `योग दिन' हा हळूहळू त्याच्या खऱ्या आशयाकडे जावा `योगासन दिना'कडे त्याची वाटचाल होऊ नये. एवढी खुणगाठ बांधणे मात्र आवश्यक. `योग दिन'चा आशय पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील त्यांच्या भाषणात एका वाक्यात स्पष्ट केला होता. ते म्हणाले होते- `योग रोग को भगाता है और भोग को भी.'

- श्रीपाद कोठे

१८ जून २०१५

डाकेगिरी

आजचे राज्यशास्त्र/ राजकारण/ राजनीती/ राज्यव्यवस्था,

आजचे अर्थशास्त्र/ अर्थकारण/ अर्थनीती/ अर्थव्यवस्था,

आजचे समाजशास्त्र/ समाजकारण/ समाजनीती/ समाजव्यवस्था,

ही सगळी सामूहिक डाकेगिरी आहे, दुसरे काही नाही. कोण कुठे आहे, कोण कुठे नाही किंवा कोणाच्या हातात काय आहे, कोणाच्या हातात काय नाही; याने काहीही फरक पडत नाही. कारण लालूच, मोह, भय, दादागिरी, स्वार्थ या किंवा यासारख्या ज्या गोष्टी जगभरात नेहमी व मुळातच त्याज्य वा वाईट मानल्या जातात आणि अनुभवाने ते सिद्ध केले आहे; त्याच गोष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहेत. या गोष्टी निसर्गत:, स्वभावत: आहेत. परंतु त्यातून वर उठण्याऐवजी; त्यांचे समर्थन करून, त्यांचा आधार घेऊन माणसाला वा समाजाला सुखी आणि सुव्यवस्थित करण्याचे प्रयत्न करणे केविलवाणे आणि हास्यास्पद आहे. जोवर याचा विचार किमान ६०-७० टक्के लोक करीत नाहीत, तोवर `गोंधळात गोंधळ' सुरूच राहील.

- श्रीपादची कोठे

१८ जून २०१५

नोंदी वर्गाच्या

संघ शिक्षा वर्गाच्या काल पोस्ट केलेल्या नोंदींमध्ये दोन महत्त्वाच्या लक्षणीय नोंदी राहिल्या.

- सहभागी स्वयंसेवकांची नोंदणी २२ मे रोजी झाली. त्याच वेळी सगळ्यांचे भ्रमणध्वनी कार्यालयात जमा झाले, जे त्यांना परत जातानाच मिळाले. वर्ग २३ तारखेला सुरू झाला. त्याच दिवशी लोकसभेचे निकाल होते. मात्र कोणाजवळही भ्रमणध्वनी नव्हता आणि नियोजित कार्यक्रमात बदलाचा तर प्रश्नच नाही. यालाच साधना म्हणतात. (यालाच हुकूमशाही, हिटलरशाही इत्यादी म्हणतात असे ज्यांना वाटते त्यांनी वाटून घ्यावे. ज्यांना तशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल त्यांनी प्रतिक्रिया द्यावी आणि उत्तराची वाट पाहावी.)

- समारोपाला बरेच निमंत्रित पाहुणे होते. त्यात दक्षिणी राज्यातील एक पाहुणे विशेष होते. (तपशील कोणाच्या लक्षात असेल तर त्यांचे नाव, राज्याचे नाव यांची पूर्ती करावी.) त्यांची बरीच सामाजिक कार्ये आहेत त्यातील एक काम म्हणजे, ते ज्या जातीचे किंवा जमातीचे आहेत, त्या जातीला किंवा जमातीला अनुसूचीतून वगळावे यासाठी ते जागृती/ कार्यक्रम/ आंदोलन करतात. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही अतिशय लक्षणीय आणि नोंद घेण्यासारखी तसेच अनुकरणीय बाब वाटली. काही लोक आम्हाला आरक्षण नको, आम्हाला एवढा पगार नको; असंही काही काही करत असतात. तसंच हे. या सगळ्याच चळवळी व्हायला हव्यात खरे तर.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०१९

आरोग्य

- health care violence च्या विरोधात आज अलोपॅथी डॉक्टरांचा protest आहे. सगळ्यांनीच याचं समर्थन करायला हवं. आपण सगळेच याचा उपयोग करत असतो अन आपल्याला त्याचा उपयोग/ फायदा होतोही. त्यामुळे त्याचं समर्थन आवश्यकच.

- मध्यंतरी रामदेव बाबा यांच्या निमित्ताने अलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा जो वाद झाला तो इथे जोडण्याचे कारण नाही. सगळ्या पॅथीचा समन्वय आणि सहकार्य हीच समंजस भूमिका असू शकते.

- आजच्या protest चे समर्थन म्हणजे unfair deeds and practices नाकारणे असेही समजण्याचे कारण नाही. कालच झी युवावर विक्रम गोखले, मुक्ता बर्वे यांचा 'आघात' दाखवला. वैद्यकीय क्षेत्र हाच विषय. तो आता नवीन राहिलेला नाही.

-  वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेले किंवा नसलेले; दोघांनीही योग्य गोष्टीलाच समर्थन आणि अयोग्य गोष्टींचा विरोध हेच धोरण नेहमी ठेवणे योग्य वाटते.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०२१

गुरुवार, १६ जून, २०२२

भत्त्याचे महाभारत

शेजारच्या दुकानात गेलो होतो. मालक लहानपणापासूनचा मित्र. शेजारी राहणारे. स्टेशनरी सामान, झेरॉक्स, इंटरनेट कॅफे, विविध ऑनलाईन कामे असा त्याचा व्याप. तिथे एक त्याच्या ओळखीचे गृहस्थ आले होते. त्यांचे काम तो करत होता. ते सगळे काम सुरु होते इंडियन अॉईलच्या वेबसाईटवर. ते गेल्यावर सहज गप्पा झाल्या. मित्राने त्या गृहस्थांचे जे काम केले त्याबद्दल सांगितले. ते गृहस्थ इंडियन अॉईलमधून फोरमन म्हणून सेवानिवृत्त झालेले. मासिक ३५-४० हजार रुपये पेन्शन. याशिवाय दर सहा महिन्याला १० हजार रुपये, म्हणजे वर्षाचे २० हजार रुपये त्यांना मिळतात. बोनस म्हणून. तसेच इंडियन अॉईलने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत- १) दर सहा महिन्यांनी ४० हजार रुपये घ्या किंवा २) दर तीन महिन्यांनी तुमचा जेवढा खर्च होईल तो पूर्ण खर्च घ्या. वैद्यकीय भत्ता म्हणून. क्लेम करायचा आणि पैसे घ्यायचे. त्यात `किरकोळ' अशा पर्यायाखाली काही गोष्टींची यादी आहे. त्यात चष्मा असाही पर्याय आहे. या गृहस्थांनी एकदा चष्म्यासाठी क्लेम केला. किती? १० हजार रुपये अन दुसऱ्या दिवशी १० हजार रुपये जमाही झालेत. दर तीन महिन्यांनी ३०-४० हजार रुपयांचा क्लेम केला जातो आणि तेवढे पैसे त्यांना मिळतात. या सगळ्या प्रकारात बेकायदेशीर काहीही नाही. पण याला नैतिक म्हणता येईल का?

यानिमित्ताने आम्ही काही मुद्यांची चर्चा केली.

१) हा सगळा प्रकार कायदेशीर असेल, पण नैतिक आहे का?

२) ३५-४० हजार रुपये पेन्शन असताना एवढे प्रचंड भत्ते कशासाठी?

३) चांगला खातापिता, चालता फिरता माणूस इतका आजारी असतो का?

४) वैद्यकीय भत्ता नियमितपणे देण्याला काय अर्थ आहे? माणूस सतत काय दवाखान्यातच राहतो का? नेहमीच आजारी असतो का?

५) साध्या फोरमनला किमान लाखभर रुपये दरवर्षाला विनाकारण वाटले जातात. असे खालच्या पदापासून उच्च पदापर्यंत हजारो लोक असतील, ज्यांना ही खैरात वाटली जाते.

६) हाच खर्च कंपनीच्या ताळेबंदात दाखवला जातो आणि कंपनीच्या उत्पादनांचे भाव त्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच पेट्रोल, डिझेलच्या दरात या खैरातीचा वाटाही असतो.

७) अशा तेल क्षेत्रातील सगळ्या कंपन्या विचारात घेतल्या तर हा घोळ कितीतरी वाढेल.

८) तेलाशिवाय कितीतरी क्षेत्रातील वेगवेगळ्या सरकारी कंपन्या आहेत. त्यांच्यात सुद्धा असा काही ना काही प्रकार असेलच.

९) खाजगी क्षेत्रात तर हा सगळा प्रकार कितीतरी अधिक प्रमाणात आहे.

१०) खतांच्या किंवा औषधांच्या कंपन्या तर आपल्या किरकोळ विक्रेत्यांना सहकुटुंब विदेश वारीवर वगैरे पाठवतात.

११) या सगळ्याचा भुर्दंड जनतेवर पडत नाही का? तो योग्य आहे का? जनतेने तो का सहन करायचा?

१२) महागाई, चलन फुगवटा, तुटवडा, भांडवली समस्या; यासारखी अर्थकारणाची अरिष्टे यापोटीच जन्म घेत नाहीत का?

१३) यासंबंधात सामाजिक चर्चा, प्रबोधन, स्पष्ट भूमिका, नियोजन, निर्णय; हे सारे व्हायला हवे की नाही?

१४) नुसता राजकीय चिंधी बाजार मांडून यातून मार्ग निघेल का?

१५) किमती ठरवण्याचा योग्य मार्ग निवडून त्याची अंमलबजावणी झाल्यास जो पैसा हाती येईल त्यातून अनेक कामे होऊ शकतील, अनेक कुटुंब चालू शकतील.

एका व्यक्तीवर एक लाख रुपये हा अगदी हात राखून अंदाज केला तरीही, या एक लाखात एक सामान्य घर चालू शकेल. अशी लाखो घरे चालू शकतील. अशा लाखो लोकांना चांगल्या, उत्पादक कामात सहभागी करून घेता येऊ शकेल. सामाजिक कार्य असा वेगळा विभाग करून हे करता येईल. आज पैशाची खूप अपेक्षा न ठेवता, गरज पूर्ण होईल इतपत पैसा मिळाल्यास; कामात झोकून देणारे हजारो स्त्री पुरुष आहेत. स्व. नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या अंतर्गत असेच प्रयोग केले आहेत. एकल विद्यालये हा असाच प्रयोग आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे असेच प्रयोग आहेत. अन्यही आहेत. यातून शिक्षण, आरोग्य, सेवा, संस्कार, स्वच्छता, प्रबोधन, सामाजिक स्वास्थ्य, कला; अशा अनेक क्षेत्रात खूप भरीव असे काम होऊ शकेल.

पण स्व. नानाजींचा आदर्श आम्ही ठेवू का? राज्यकर्त्यांचे बाजूला ठेवा, समाजाला तो हवा आहे का?

- श्रीपाद कोठे

१७ जून २०१५

प्रश्न विचारा

लोकसभा निवडणूक जिंकल्यावर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते, `मलाही प्रश्न विचारा. माझीही परीक्षा घ्या. माझ्या छोट्यातील छोट्या गोष्टीवर नजर ठेवा आणि त्याची चिरफाड करा.' हे आज आठवण्याचे कारण म्हणजे ललित मोदी प्रकरण. या प्रकरणी मोदींचे, भाजपचे समर्थक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत, ते मुळीच योग्य वाटत नाही. होऊन जाऊ द्या ना दुध का दुध, पानी का पानी. त्याने असे केले, त्याने तसे केले; म्हणून आम्हाला शिकवू नये वगैरे फारच हास्यास्पद आहे. `सत्यमेव जयते' टिकले तर राष्ट्र टिकेल. अन सत्यासाठी `मी' `तू' पणाच्या पलीकडे जावे लागेल. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे

१७ जून २०१५

संघ शिक्षा वर्ग समारोप. काही नोंदी -

संघ शिक्षा वर्ग समारोप. काही नोंदी -

१) शारीरिक प्रदर्शनात आज्ञा कमी करण्याचा प्रयत्न.

२) गीत, योगासने यासाठी संगीताचा प्रभावी उपयोग.

३) षटपदी, संडीन, प्रडीन, सिंहध्वज, ऊर्ध्वभ्रमण, वामेन ततीव्यूह, दक्षिण दिगंतर दक्षिण व्यूह; वगैरे वगैरे ऐकलं अन आपले वर्गाचे दिवस आठवले.

४) पाण्याच्या कमतरतेमुळे महिनाभरातील दोन दिवस तरी आंघोळीशिवाय राहावे लागण्याचे दिवस आता सरले. पाणी विभाग प्रमुखांनी दिलेल्या या माहितीने बरं वाटलं. ऐन मे महिन्यात पाणी कमी असल्याने किमान दोन दिवस तरी आंघोळी न करण्याची सूचना मिळत असे आणि ती पाळली जात असे हे आठवलं.

५) बाकी सारं तसंच.

- श्रीपाद कोठे

१७ जून २०१८

बुधवार, १५ जून, २०२२

संवाद !!

संवाद !! गेली दोन दिवस सतत समोर येणारा शब्द. अन्य अनेक शब्दांप्रमाणे जरा निरर्थक होऊ घातलेला. संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे बोलणे नाही. संवाद म्हणजे गप्पा नाही. संवाद म्हणजे सांगणे, विचारणे, चौकशा करणे नाही. संवाद ही खूप व्यापक, खोल, आशयघन अशी गोष्ट आहे. शब्द, बोलणे हा संवादातला एक छोटासा भाग असू शकतो पण संवाद नाही. प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे किंवा समाज माध्यमांचा वापर करून खूप बोललो म्हणजे संवाद झाला असं नसतं. पण याचा अर्थ मौन म्हणजे संवाद असाही नाही. संवाद ही गूढ, गंभीर, अगम्य वगैरे गोष्ट नाही. मात्र एक नक्की की, संवाद ही उगवून येणारी आणि विकसित होणारी बाब आहे. ती खूप सोपी नाही.

संवाद दोन व्यक्तींचा असू शकतो किंवा व्यक्ती आणि प्राणी, व्यक्ती आणि निसर्ग, व्यक्ती आणि ईश्वर, व्यक्ती आणि ती व्यक्ती स्वतः. संवादाचे असे अनेक प्रकार असू शकतात. संवादाच्या अनेक पातळी असू शकतात. संवादाची अनेक स्थाने असू शकतात. संवादाची विविध स्वरूपं असू शकतात. संवाद हा सार्थक संवाद असायला हवा. तसा तो नसेल तर विसंवादही होऊ शकतो. सार्थक संवादासाठी बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यांचा स्वाध्यायही करावा लागतो.

सर्वप्रथम म्हणजे, प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे. वेगळी आहे. त्या विश्वंभराकडे इतके साचे आहेत की, त्याला एक साचा पुन्हा वापरावा लागत नाही. त्याने वापरलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट अगदी खूणगाठ म्हणून बांधून घ्यायला हवी. तुम्ही एका छताखाली राहता, एका परिवारातले आहात, नातेवाईक आहात, शेजारी आहात, एकाच गावातले आहात, एकाच देशातले आहात, एकाच ठिकाणी काम करता, एकत्र शिकले आहात; या कशाकशानेही हे प्रत्येकाचे वेगळेपण नष्ट होत नाही. प्रत्येकाच्या गरजा, स्वभाव, परिस्थिती, मनस्थिती, शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक आध्यात्मिक स्थिती, विचार करण्याची पद्धत, प्रतिक्रिया देण्याची पद्धत, मनाला लावून घेणे, दुखावले जाणे इत्यादी बाबी; अशा असंख्य गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीसोबत सतत राहूनही त्याच्या बाह्य लौकिक व्यवहारांचा सुद्धा पूर्ण आवाका लक्षात येणे कठीण असते, मग त्याच्या आंतरिक जीवनाचा, आंतरिक हालचालींचा, आंतरिक क्रिया प्रतिक्रियांचा अंदाज सहज कसा लावता येईल. शिवाय कोणी अंतर्मुख तर कोणी बहिर्मुख, कोणी प्रवृत्तीपर तर कोणी निवृत्तीपर, कोणी बोलणारा तर कोणी अबोल. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम वेगळे. याहीपेक्षा नेमक्या त्या त्या क्षणी त्याची व्यस्तता किंवा मनस्थिती हेही सांगता येत नाही. अन हे आपण सोडून बाकी सगळ्यांना लागू होते असे समजण्याचे कारण नाही. हे प्रत्येकालाच लागू होणारे आहे. आदर्श मानवाचे धडे देऊन प्रत्येक माणूस आपले सगळे विचार व्यवहार नियंत्रित करेल वगैरे समजणे भाबडेपणा ठरतो. आदर्शवाद सांगत राहीलाच पाहिजे पण आपण वास्तवात जगत असतो, आपल्याला वास्तवात जगावे लागते, आपल्याला वास्तवात जगायचे असते; याचे अवधानही सुटू नये.

एकदा ही बाब स्पष्ट झाली की मग संवाद आदींचा विचार करता येतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीशी संवाद करू शकेल असे नसते. इतकेच नाही तर कधीतरी खूप चांगले tuning असलेल्या दोन व्यक्तींचा कालांतराने संवाद होईलच असेही म्हणता येत नाही. सहपाठी, शेजारी किंवा परिवारजन यात हा अनुभव आपण घेतच असतो. एखाद्या विषयाबद्दल एखाद्याशी संवाद झाला म्हणजे सगळ्याच बाबतीत होईल असेही नसते. प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी, सेवा करणाऱ्या व्यक्तीशी संवाद होईलच असेही नसते. यात चांगले, वाईट, मान, अपमान, राग, लोभ असे काहीही नसते. तसे समजणे उलट सामान्य व्यवहारात सुद्धा अडथळे निर्माण करत जाते.

संवाद ही एक समंजस कृती आहे. त्याचा अट्टाहास उपयोगाचा नसतो. तो उमलून यावा लागतो. मग तो प्रवासातल्या अनोळखी व्यक्तीबरोबर सुद्धा होऊ शकतो. संवाद हा बऱ्याच गोष्टींची मागणी करतो. शांत निरीक्षण, शब्द- स्पर्श- वेळ- कालावधी- पद्धत- इत्यादींचा नेमकेपणा, आपण आणि अन्य यांना समजून घेण्याचे प्रयत्न, संयम, सहनशीलता, आपली मानसिक- बौद्धिक- भावनिक- आध्यात्मिक- वाटचाल; अशा पुष्कळ बाबी. केवळ भावनावेग आणि त्यापोटी काही तरी करणे, बोलणे; काळजी इत्यादी पोटी dominate करणे; लादत जाणे म्हणजे कळकळ होऊ शकेल संवाद नाही. संवाद होणे ही एका प्रदीर्घ प्रक्रियेची परिणती आहे. संवाद कुठे, कधी, कोणाशी, किती वेळ होईल; ही बाब वेगळी. पण व्यक्तीच्या आंतरिक विशालतेच्या (भावुकतेच्या नव्हे), आंतरिक सखोलतेच्या, आंतरिक निर्मळतेच्या प्रक्रियेची परिणती असते. अशा व्यक्तीशी पुष्कळांचा संवाद होऊ शकतो. त्याचा संवाद घडून येईलच हे मात्र त्याच्या ललाटी काय लिहिले आहे त्यावर अवलंबून असते. म्हणून तर भवभूतीनेही आपुल्या जातीचा भेटला नाही ही खंत व्यक्त केली होती आणि भगवान कृष्णाला एकाकी जंगलात देहत्याग करावा लागला होता. मोठ्या गोष्टी बाजूला ठेवून सामान्य विचार केला तरीही, आंतरिक विकासाचा ध्यास घेतलेल्या माणसांची संख्या जेवढी वाढेल तेवढी संवादाची एकूणच प्रक्रिया वाढेल. नाही तर वादविवाद, विसंवाद, वितंडवाद आहेतच.

एक आणखीन महत्वाची बाब म्हणजे संवादाने अवलंबित्व कमी केले पाहिजे. 'मी आहे ना चिंता करू नको' किंवा 'देव आहे तो सगळं व्यवस्थित करेल' किंवा 'अमुक ढमूक यात मन रमवत जा' अशा प्रकारचे संवाद हे सार्थक संवाद म्हणता येणार नाहीत. संवादाने दुष्टपणा करू नये मात्र ताकद वाढवावी. त्यासाठीचे कौशल्य, एखाद्याला त्याचं बळ मिळवून देणं; हे संवादाचं गमक आहे.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १६ जून २०२०

सोमवार, १३ जून, २०२२

सुशांत राजपूत

कदाचित एकालाही हे पटणार नाही पण सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या ही समाजाच्या निर्बुद्ध षंढत्वाची परिणती आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून सोशल मीडिया वाहतो आहे. झगमगणाऱ्या दुनियेपासून मी स्वतःला वेगळं करून घेतलं असल्याने मला या व्यक्तीविषयी तशी माहिती नाही. आजच्या घटनेनंतर थोडीबहुत माहिती कळली. परंतु या घटनेवर व्यक्त झालेल्या बहुतांश प्रतिक्रिया पाहिल्या आणि लिहायला हवं असं वाटलं.

उपदेशामृत पाजणारे आणि fighting spirit वर प्रवचने झोडणारे यांच्याकडे तर सरसकट दुर्लक्ष करायला हवे. मी आणि माझं जीवन म्हणजेच जग अशा थाटात जगणाऱ्या, विचार करणाऱ्या या लोकांना काडीचंही जीवन समजत नाही. राग येईल. येऊ द्या. कोणाची खुशामत करायला मी लिहीत नाही. पण आपल्याजवळचा एखादा शब्दही खर्च करायला मागेपुढे पाहणाऱ्या, समोरचा कसा react  होईल याच भीतीत वावरणारा, आत्यंतिक आतल्या गाठीचा आणि अहंमन्य समाज fighting spirit म्हणताना 'तुझं तू पाहा' एवढंच वास्तवात म्हणत असतो.

यश-अपयश याकडे पाहण्याचा आणि त्याविषयीचा दृष्टिकोन, हाही महत्वाचा भाग आहे. आशावाद नावाची जी एक निर्बुद्ध गोष्ट आपण सांगतो, शिकवतो; त्याचाही अशा घटनांत मोठा वाटा असतो. 'प्रयत्न करा, यश मिळणारच' या वाक्याला आपण इतकं डोक्यावर घेतलं आहे की, अपयश हा सुद्धा आयुष्याचा भाग आहे हे वास्तव नाकारू लागलो आहे. अपयश हाही आयुष्याचा भाग आहे एवढंच नाही, तर एखाद्याच्या आयुष्याला अपयशाचा शापच असू शकतो, हेही कधी कधी दृष्टीला पडूनही आम्ही नाकारतो. आयुष्यातील अपयशाचे स्थान आपल्या डरपोकपणापोटी नाकारून आम्ही माणसाला वास्तवापासून दूर खेचून नेतो. खोट्या आशा जागवतो. त्या पूर्ण झाल्या नाही की, अशा घटना घडतात.

जीवन हा एक जुगार आहे. यात चांगलं आहे, वाईट आहे; न्याय आहे, अन्याय आहे; खरं आहे, खोटं आहे; यश आहे, अपयश आहे. कोणाच्या वाट्याला काय येईल, किती प्रमाणात येईल; हे सांगता येत नाही. जे वाट्याला येईल त्यासह जगत राहावं लागतं, लागेल. इतकं नग्न वास्तव सांगता यायला हवं, समजता यायला हवं, पचवता यायला हवं. शब्दांचे फुलोरे आणि गुलाबाची स्वप्ने जगण्याला मदत करत नाहीत. प्रत्येकाची कृस वाहून नेण्याची शक्तीही कमीजास्त असते. बेडकाचा बैल होऊ शकत नाही. समाजाला, माणसांना हे सांगताना किंवा कोणी सांगितलेले ऐकतानाही अनेकांच्या विजारी पिवळ्या होतात. अन त्याला घाबरून फक्त छान छान ऐकण्या बोलण्याची घातक सवय आपण लावतो, लावून घेतो. आपल्याला जीवनदायी सत्यापेक्षा, सुखदायी असत्य जवळचे आणि आपले वाटते. मग कसेतरी धडपडत, ठेचकाळत, जमेल तसे पुढे पुढे जात राहायचे. सगळ्याच गोष्टींवर हसण्याची भंपक तत्वज्ञाने निर्माण करायची. हो तर हो, नाही तर नाही; अशा वृत्तीने काही जण जगू शकतात. काही नाही जगू शकत.

मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा नामक प्रकाराचे स्तोम, त्याला देण्यात येणारे अवास्तव, अतिरेकी महत्व; हाही अशा घटनांचा एक वेगळा पैलू आहे. ज्याप्रमाणे यश वा अपयश म्हणजे जीवन नाही, त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या इच्छा म्हणजेही जीवन नाही. नियती कोणाबद्दल क्रूर असेल आणि कोणाबद्दल कनवाळू हे सांगता येत नाही. अन कथित इहवाद्यांना किंवा ईशवाद्यांना माणसाची नियती बदलताही येत नाही. याला पराभव समजून जो तो ढोंगी प्रयत्नवादाची कवने गात फिरतो. पण प्रयत्न सोडता येत नाहीत, अन परिणामांची स्वप्ने रंगवू नयेत; हे रोखठोकपणे सांगण्या, ऐकण्या, समजण्याची शक्ती विकसित करण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करत नाही.

एखादी अशी घटना घडते. आसवांच्या नद्या वाहतात आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या'.

- श्रीपाद कोठे

१४ जून २०२०

शनिवार, ११ जून, २०२२

जातीव्यवस्था

फक्त प्रामाणिक विचार करणाऱ्यांसाठी एक मुद्दा-

स्कील डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया आणि एकूण आर्थिक इतिहास याविषयी विचार करताना सहज एक कल्पना चमकून गेली की, आमच्या येथील जुन्या जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा, अनेक विपरीत अर्थ, गैरसमज वगैरे इंग्रजी शासनकर्त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक तर नसतील पसरवले? उत्पादन, वितरण, उपभोग, तंत्रज्ञान, कौशल्य, कच्चा माल, पक्का माल, साठवणुकीच्या सोयी, गुंतवणूक, मनुष्यबळ वगैरे गोष्टींवरच अर्थकारण अवलंबून असते. जगात कुठेही गेले तरी. गेली अनेक वर्षे जगात सगळे देश, सगळे समाज याच गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या जाती व्यवस्थेत या गोष्टींचा अन शिवाय सामाजिक स्थिरता, मूल्य, व्यक्तिमत्व विकास यांचा अपूर्व संगम होता. अर्थात सगळ्या व्यवस्थांप्रमाणे त्याचेही गुणदोष होते. त्याची चिकित्सा होतही होती आणि व्हायलाही हवी. पण आज जातीव्यवस्था हा शब्द उच्चारायची सुद्धा सोय राहिलेली नाही. तो शब्द उच्चारताच अंगावर पाल पडल्यासारखी प्रतिक्रिया उमटते. हा जो नकारात्मक, घृणेचा, पापाचा आणि ओशाळलेपणाचा भाव आहे, तो निर्माण करून इंग्रजांनी आपले इप्सित तर साध्य केले नसेल? अन्यथा, उण्यापुऱ्या २०० वर्षांपूर्वी ज्या देशात भिकारी नव्हता (खुद्द ब्रिटीश संसदेत १८३५ साली हे अधिकृतपणे सांगण्यात आले.) त्या देशाची आज ही स्थिती का झाली असावी? यावर सखोल, प्रामाणिक चिंतन व्हायला हवे.

- श्रीपाद कोठे

१२ जून २०१५

राजकीय परिवर्तन आणि वैचारिक परिवर्तन

राजकीय परिवर्तन हे वैचारिक परिवर्तन असतेच असे नाही. पश्चिम बंगालमध्ये सुमारे तीन दशके कम्युनिस्ट राजवट होती. तेथील जनतेने कम्युनिझम स्वीकारला का? उत्तर नाही असेच आहे. तीच गोष्ट उत्तर प्रदेशात समाजवादी वा बहुजन समाज पार्टी यांच्या सरकारांची. किंवा तामिळनाडूतील द्राविडियन पक्षांची. रशियात सुद्धा कम्युनिस्ट राज्य क्रांतीनंतर सात दशके सत्ता होती पण रशियन जनतेने तो विचार स्वीकारला होता असे म्हणता येईल का? अर्थात नाही. किंवा अमेरिकेत भांडवलशाही आहे म्हणजे तेथील जनतेने तो विचार मान्य केला असे म्हणता येईल का? भारताबाबतही आज हेच म्हणता येईल. सत्ता आणि विचारधारा हे अद्वैत नसते.

मग भारतीय जनतेने हिंदुत्व स्वीकारले नाही असा याचा अर्थ होतो का? अजिबात नाही. हिंदुत्व हाच भारताचा विचार आधीही होता, आजही आहे, उद्याही राहील. इस्लामिक राजवटीत भारताचा विचार हिंदुत्व होता, इंग्रजी आमदनीत तोच होता, काँग्रेस राजवटीत तोच होता आणि भाजपच्या राज्यातही तोच आहे. हे जरा विचित्र वाटेल परंतु वास्तव आहे. गडबड आमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे.

प्रश्न हा आहे की, विचार ही अशी स्वीकार वा नकाराची बाब आहे का? विचार म्हणजे काय? विचार ही मानवी जीवनाला प्रगल्भ करणारी जीवमान प्रक्रिया आहे. ती बांधून ठेवता येत नाही. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, युरोपीय पुनर्जागरण यांनी विचार आणि सत्ता यांना एक करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुळातच विचार या गोष्टीचे स्वरूप वेगळे असल्याने विविध सत्तांनी कितीही दावे, प्रतिदावे केले तरीही हे ऐक्य साधणे कोणालाही शक्य होत नाही. या प्रयत्नांनीच तुमचा विचार, आमचा विचार अशी भावना निर्माण झाली. वास्तविक प्रत्येक विचारातच काही ना काही तथ्य असते. जीवनाचे कोणते ना कोणते सत्य, तथ्य त्यात असते. विशिष्ट दृष्टिकोन त्यात असतो.  फापटपसाराही बराच असतो. मात्र त्याच्या मंथनातूनच काही ना काही हाती लागते ते मानवी जगण्याला प्रगल्भ करते. उलट हा आमचा विचार, हा तुमचा विचार ही भावना विचार म्हणून म्हटल्या जाणाऱ्या जीवमान प्रक्रियेलाच खीळ घालते.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर आज हिंदुत्व म्हणून समजल्या जाणाऱ्या गोष्टींचे काही महत्व आहे की नाही? निश्चितच आहे पण ते विषय हिंदू समाजाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषय आहेत. ते लक्षात घ्यावे लागतीलच. परंतु ते विषय म्हणजे हिंदुत्वाचा विचार नाही. हिंदुत्वाचा विचार या विषयांशी बांधला तर त्याचे विचार म्हणून असलेले मानवी जीवनातील स्थान आणि आवाहन संपुष्टात येते. तो विचार म्हणून संपून जाऊन राजकीय धोरणांपुरता सीमित होतो. एकूण विचार या जीवमान प्रक्रियेलाच हे लागू होते. त्यामुळे सत्तेचे येणे जाणे आणि समाजाने विचार ग्रहण करणे या वेगळ्या बाबी ठरतात. सत्ता असणे वा नसणे हा विचारांच्या स्वीकार्यतेचा, योग्यतेचा मापदंड नसतो. सत्ता येते-जाते, निर्माण होते - नष्ट होते; विचार चिरंतन असतात. ते तसेच असायला हवेत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १२ जून २०१९

जय जगत

NDTV वर रवीश बंगलोरच्या एका १९ वर्षीय मुलीला कारागृहात टाकण्याबद्दल सांगतो आहे. प्रकरण लक्षात यावे म्हणून फक्त दोन वाक्ये -

या मुलीने असदुद्दीन ओवैसी यांच्या कोणत्या तरी सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा दिली होती. तिला लगेच बाजूला करण्यात आले. तिचे म्हणणे असे की, तिला जगातल्या सगळ्या देशांचा जयजयकार करायचा होता. रवीशचे म्हणणे असे की, हे तर वसुधैव कुटुंबकम आहे.

माझी टिप्पणी -

श्री. रवीश -

१) हे वसुधैव कुटुंबकम नाही. हा आचरटपणा आहे.

२) विनोबांचे 'जय जगत' हे वसुधैव कुटुंबकम आहे.

३) वसुधैव कुटुंबकम हा सिद्धांत नाही. ती आकांक्षा आहे. त्यासाठी एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या शेवटी प्राप्त होणारं ते फळ आहे.

४) बटाट्याची भाजी करायची म्हणजे बटाटे आणून ठेवून द्यायचे किंवा तशी इच्छा व्यक्त करायची म्हणजे झाले, असे नसते.

- इथे एवढंच पुरे. तुम्हाला समजेल असं समजतो. लक्षात येणार नसेल तर केव्हाही माझ्याकडे या. हा एक विषय समजवायला मी तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढे दिवस देईन.

५) देशातल्या तरुणांची बाजू घेत जाच. आता घेता त्याहून जास्त घेत जा; पण विषयांची जाण, विषयांची मांडणी, प्रक्रिया यासंबंधात त्यांचे प्रबोधनही करत जा.

६) मुंह मे आया बक दिया, याला शहाणपण म्हणत नाहीत हे कृपया तुम्हीही लक्षात घ्या आणि बाकीच्यांनाही सांगत चला.

- श्रीपाद कोठे

११ जून २०२२

शुक्रवार, १० जून, २०२२

लालजी, माफ करा, पण...

आदरणीय लालजी,

खरं तर तुमच्याशी थेट बोलावं ही पण आमची लायकी नाही. पण आज नाईलाज आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आज राजीनामा दिला त्याचे समर्थन नाही करता येत. जो पक्ष तुम्ही वाढवला, ज्यासाठी तुम्ही भल्याबुऱ्या अनेक गोष्टी सहन केल्या, तुरुंगवास भोगला, त्या पक्षाला तुम्ही असे वेठीस धरणे योग्य आहे का? तुम्ही राजीनामा दिलात त्याचं दु:ख नाही. खरंच दु:ख नाही. खरं तर फार आधीच तुम्ही राजकारणातून, किमान दैनंदिन आणि निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडायला हवं होतं. नानाजी देशमुखांनी नाही का, वयाच्या साठाव्या वर्षी ठरवून राजकारण सोडले. पुन्हा त्याकडे वळून पाहिले नाही. आणि त्यानंतर जे काही केले, ते एखाद्या तरुणालाही लाजवेल असे. त्यांच्या या कृतीने ते पुढच्या किती तरी पिढ्यांसाठी आदर्श आणि आधार ठरलेत. तुमच्या राजीनामापत्रात तुम्ही त्यांचे नाव घेतले, पण त्यांचा कित्ता मात्र तुम्हाला नाही गिरवता आला. तुम्ही दीनदयाळजींचाही उल्लेख केला आहे. मात्र दीनदयाळजींनी कधीही निवडणूक लढवली नव्हती. राजकीय पक्षात राहूनही किती प्रचंड व्रतस्थता होती त्यांच्या ठायी.

लालजी, तुम्ही संघाचे प्रचारक होता. अनेकदा तुम्ही त्याचा जाहीर आणि साभिमान उल्लेखही केला आहे. मग विसरलात आपली परंपरा, विसरलात आपले संस्कार? डॉक्टर हेडगेवार यांच्या काळापासून आपण म्हणत आलो आहोत, नाकापेक्षा मोती जड होऊ नये म्हणून. विसरलात? बैठकीत, चर्चेत कितीही मतभेद असू देत, आग्रह असू देत; पण एकदा निर्णय घेतला की, तो सगळ्यांचा असतो ना? मुख्य म्हणजे, मी पक्ष वाढवला, मी सगळ्यात मोठा आहे; म्हणजे प्रत्येक गोष्ट मी म्हणतो तशीच झाली पाहिजे, हे म्हणणे कितपत योग्य म्हणता येईल?

एकात्म मानववाद तुमच्या आस्थेचा विषय नक्कीच असेल. जीवनातील अर्थ-काम, धर्माने नियंत्रित व्हावा असे दीनदयाळजी म्हणत असत. त्या दृष्टीने विचार केला तर ८६ हे वय वानप्रस्थाश्रमाचे वय नाही का? तसेही ज्या भाजपवरील प्रेमापोटी तुम्ही हे पाऊल उचलले, त्या भाजपचा विचार तरी करायचा की नाही? एखाद्या कुटुंबात सुद्धा या वयात हस्तांतरण होऊन गेलेले असतेच की. मग एवढा मोठा पक्ष, संपूर्ण देश चालवण्यासाठी सक्षमपणे उभा व्हायला हवा की नको? खरं तर तुम्हीच त्यासाठी पुढाकार घेऊन काम करायला हवे होते. पण तुम्ही दूर व्हायलाच तयार नाही. याला काय म्हणायचे?

पत्रात तुम्ही म्हणालात, पक्षात स्वार्थ वाढला आहे आणि कार्यपद्धती नीट राहिलेली नाही. पण हे काय एका रात्रीतून झाले काय? की फक्त गेल्या दोन-तीन वर्षातच ही स्थिती निर्माण झाली आहे? ही सारी परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या साक्षीने बिघडत होती. तुम्ही का सावरली नाहीत ती? मागे एकदा सुदर्शनजींनी तुम्ही निवृत्त व्हावे असा सल्ला दिला होता. त्यावेळीच तुम्ही ८० च्या आसपास होता. त्यावेळीच तुम्ही विचारपूर्वक दूर होऊन काम केले असते तर? राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सभ्यता, राजकीय नेतृत्व यात पक्षापलीकडे जाऊन खूप भरीव आणि सार्थक कार्य तुम्ही करू शकला असता. सर्वार्थाने तो तुमचा अधिकार होता. पण तुमचा जीव अतिशय क्षुल्लक गोष्टीतच अडकून पडला. मोठेपणाच्या धुंदीत महान होण्याचे स्वप्नच तुम्हाला पडले नाही, असे वाटते.

लालजी, लहान तोंडी खूप मोठा घास घेतला आज. पण स्वत:चा पिता चुकत असेल तर त्यालाही टोकणाऱ्या आणि खडसावून प्रश्न विचारणाऱ्या नचिकेताची परंपरा आहे ना आपली? अन या नचिकेत्यानेच तर मृत्यूचेही रहस्य उलगडून या राष्ट्राला अमरता आणि चिरंजीवित्व बहाल केले आहे ना?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ११ जून २०१३

उत्साहातील उथळपणा

अमेरिकन काँग्रेसमधील मोदींच्या ऐतिहासिक भाषणाने समर्थक आणि विरोधक दोघातही अमाप उत्साह उत्पन्न केला आहे. या उत्साहाच्या भरात दोघेही मर्यादा विसरून उथळपणाचे प्रदर्शन करू लागले आहेत. मोदींच्या भाषणाला टाळ्या वाजल्या याचे समर्थन सुरु होताच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणालाही टाळ्या वाजल्या होत्या हे दाखवणारी छायाचित्रे झळकू लागली. खरे तर ही छायाचित्रे डॉ. सिंग यांचे भाषण झाले तेव्हाच झळकायला हवी होती. का झळकली नाहीत? कारण त्यांच्या मागे कोणीही उभे नव्हते. जे कोणी उभे होते ते गांधी घराण्याच्या मागे उभे होते अन युवराज गांधींना, डॉ. सिंग यांनी काढलेला अध्यादेश भर पत्रपरिषदेत आगंतुकपणे येऊन फाडून टाकण्याचाही संकोच नव्हता. एक पंतप्रधान म्हणून पक्षसुद्धा ज्यांच्या पाठीशी उभा नव्हता, त्यांच्या भाषणाला अमेरिकन काँग्रेसने टाळ्या वाजवल्या काय अन न वाजवल्या काय? सारखेच होते. अन आज जर त्या टाळ्यांचे देशवासीयांना कौतुक असेल तर त्यात एवढे पोटात दुखण्याचे कारण काय? शिवाय डॉ. सिंग यांच्यासाठी औपचारिकपणे एकदा- दोनदा टाळ्या वाजणे, अन नऊ वेळा उत्स्फूर्त दाद मिळणे यात फरक आहे की नाही? शिवाय यातील एकदा तर मोदींनी स्वत: टाळ्या वाजवणे सुरु केले होते (अमेरिकन सैनिकांच्या डी-डे च्या बलिदानाचे स्मरण केले तेव्हा) अन काँग्रेस सदस्य नंतर उठून टाळ्या वाजवू लागले होते अन सभाध्यक्षांनी उठून त्यांचे अनुकरण केले होते. ही तर अभूतपूर्व गोष्ट होती. पण आता डॉ. सिंग यांचे फोटो टाकण्याचा उथळपणा नाही केला तर ते मोदीविरोधक कसे?

दुसरा मुद्दा पुढे आला आहे teleprompter वापरण्याचा. पूर्वी लिहिलेले भाषण वाचण्याची पद्धत होती. आता आजच्या काळानुरूप नवीन तंत्रज्ञान आहे. दोन्हीत तात्विक फरक काय आहे? काहीच नाही. बरे ही काही लपूनछपून केलेली गोष्ट नाही. मग जणू काही teleprompter वापरणे हे पाप आहे असा पवित्रा घेणे याला उथळपणा यापेक्षा वेगळा शब्द असूच शकत नाही.

दुसऱ्या बाजूला समर्थकही उथळपणा करू लागले आहेत. ते नरेंद्र (स्वामी विवेकानंद) आणि हे नरेंद्र अशी तुलना, तशी छायाचित्रे फिरू लागली आहेत. हे सर्वथा अनुचित आहे. उत्साहाच्या भरात अवधान सुटायला नको. स्वामी विवेकानंद आणि नरेंद्र मोदी यांची अशी साधर्म्यतुलना अनाकलनीय आहे. स्वामी विवेकानंद सत्ता, संपत्ती, संघटन वा समर्थन याचा अंशही गाठीशी अन पाठीशी नसताना शिकागोच्या मंचावर उपस्थित झाले होते. ही व्यक्ती कोण आहे हे देखील माहीत नसताना त्यांनी केलेल्या संबोधनातील आत्मीय आणि आध्यात्मिक शक्तीने कोलंबिया सभागृह भारीत झाले होते. तेथील श्रोतृसमुदायाला त्या नरेंद्राकडून कशाचीही अपेक्षा नव्हती. त्या नरेंद्राचे कौतुक नव्हते. कारण कौतुक करण्यासारखे त्याने तोवर काहीही केलेले नव्हते. त्या सभागृहाचे काही शिष्टाचार नव्हते. भाषणाच्या आदल्या दिवसापर्यंत स्वामीजी अमेरिकेच्या रस्त्यावरून अनिकेत, अकिंचन, अज्ञात भटक्या म्हणून फिरत होते. नरेंद्र मोदी आणि नरेंद्रनाथ दत्त यांची साधर्म्यतुलना म्हणूनच अनाठायी आहे. शिवाय दोघांच्या भाषणाचे विषय, आशय, प्रयोजन या सगळ्यातच जमीनअस्मानाचे अंतर आहे. नरेंद्र मोदींचे अमेरिकन प्रतिनिधीगृहातील भाषण हा निखालस आनंदाचा विषय आहे. पण आनंदाच्या प्रसंगी निर्माण होणाऱ्या उत्साहाने आपल्याला अधिक प्रगल्भ करायला हवे. हा उत्साह आपल्याला उथळ बनवीत असेल तर चिंता आणि चिंतन केले पाहिजे. यावर दुमत होऊ शकत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ११ जून २०१६

गुरुवार, ९ जून, २०२२

पंतप्रधानांच्या भाषणाचा अन्वयार्थ

दोन दिवस झाले पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची चर्चा सुरु आहे. त्यांचे समर्थक, हितचिंतक, पाठीराखे; अन त्यांचे टीकाकार, विरोधक, हितशत्रू यांच्यातील छोट्या-मोठ्या चकमकी, खडाजंगी हेही छान सुरु आहे. परंतु आता यापलीकडे जाऊन त्यांच्या भाषणातील मुद्यांची चर्चा होण्याची गरज आहे. दहशतवाद, त्या अनुषंगाने पाकिस्तान, एनएसजीमधील भारताचा प्रवेश हे दोन विषय प्रामुख्याने आहेत. भाषणापूर्वी व भाषणानंतरही त्यावर चर्चा होत आहे, होईलही.

यातील दहशतवाद आणि पाकिस्तान या विषयांवर तर बोलण्याचाही कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांना अधिकारच नाही. मोदी सरकारच्या या संदर्भातील कामाचे मूल्यमापन करणे तर दूरच. कारण पाकिस्तान ही मुळातच कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांची निर्मिती आहे. तसेच दहशतवादाचे केवळ पोषण नव्हे तर स्वत:च्या स्वार्थासाठी दहशतवाद उभा करण्याचे पापही याच दोघांचे आहे. प्रथम पाक जन्माला घालून भारताच्या पाचवीलाच यांनी दहशतवाद पुजला. अन दुसरीकडे तेवढ्याने भागले नाही म्हणून पंजाबातील भिंद्रनवाले असो की नक्षलवाद यांनीच निर्माण केला. अगदी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत शांत असलेले काश्मीर यांनीच पेटवले. अन देशभरात भाषा, जाती, प्रांत, साधने, पंथ अशी भांडणे उकरून काढून देश कायम अस्वस्थ ठेवण्याचे पापही कॉंग्रेस व कम्युनिस्ट यांचेच आहे. त्यामुळे या विषयांवर त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करणेच इष्ट.

ज्या नेहरूंमुळे काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात गेला त्यांचेच सतत नाव घेणाऱ्यांनी भारत-पाक संबंधात अमेरिकेला आणण्याची काय गरज असा प्रश्न विचारणे यासारखा दांभिकपणा दुसरा असू शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघात कृष्ण मेनन यांनी काश्मीर प्रश्नावर तब्बल आठ तास भाषण केले होते हे माहितीही नसणारे आणि मुत्सद्दीपणा हा शब्दही ऐकला नसलेले लोक काश्मीर अथवा पाकिस्तान हे विषय अमेरिकी सभागृहात काढण्यावरून टीकाटिप्पणी करतात, हे त्यांचे बुद्धीदारिद्र्य म्हटले पाहिजे.

परंतु या सगळ्या विषयांपेक्षा महत्वाचे असे दोन मुद्दे मोदींनी आपल्या ऐतिहासिक भाषणात मांडले. त्यांचे मात्र उल्लेख देखील होताना दिसत नाहीत. बाकीच्यांचे सोडून देऊ, पण भाजपतर्फे आणि विचारवंतांतर्फे ते पुढे आणले जायला हवेत. कारण ते मुलभूत आणि दीर्घकालीन तर आहेतच, पण दहशतवाद, पाकिस्तान, एनएसजी यासारख्या विषयांवरील स्थायी तोडगाही त्यातच लपलेला आहे. कोणते आहेत हे दोन मुद्दे?

मोदींनी भाषणाच्या सुरुवाती सुरुवातीला योगदिनाचा उल्लेख केला आणि एक मार्मिक टिप्पणी केली ज्यावर सदस्यांनी मुक्त हसून प्रतिसादही दिला. ती टिप्पणी होती- हजारो वर्षांपासून आम्ही जगाला योग शिकवला पण अजूनही त्याच्या पेटंटसाठी दावा केलेला नाही. तसेच भाषण संपवताना त्यांनी आवाहन केले की, जगाच्या कल्याणासाठी - केवळ संपन्न नव्हे तर मूल्यवान (not only wealth but values also) जगाच्या निर्मितीसाठी दोन्ही देश एकत्र येऊ या. भोगभूमी आणि सत्ताकांक्षी समजल्या जाणाऱ्या, जगाचा पोलीस म्हटल्या जाणाऱ्या संपन्न अन शक्तिशाली देशाच्या शक्तिशाली लोक प्रतिनिधीगृहात त्यांच्या विचार परंपरेला छेद देणारा विचार प्रभावीपणे अन आग्रहाने ठेवणे आणि त्याला मान्यता मिळवणे ही सामान्य बाब नाही. मोदी यांचे व्यक्तिमत्व, भारताची वाढलेली ताकद, त्या विचारांची अंगभूत महत्ता आणि स्वीकृत मार्गाने पदरी आलेली भारतेतर जगाची विफलता; या चार कारणांनी मोदींचा विचार उचलून धरला गेला. पेटंटवरील टिप्पणीला प्रतिनिधींनी हसून दिलेली दाद, त्या पद्धतीच्या दोषांची झालेली जाणीव दाखवून जाते. ज्ञान, पैसा, परिश्रम, संशोधन, तंत्रज्ञान, कौशल्य, विचार, साधने ही सगळ्या जगासाठी आहेत. ज्या अज्ञात शक्तीकडून आपल्याला हे लाभते त्याबद्दल कृतज्ञ राहून, त्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून या जगासाठी त्याचा उपयोग करायला हवा. आपली बँकठेव वाढवणे किंवा विविध प्रकारची सत्ताकांक्षा पूर्ण करणे यासाठी त्याचा उपयोग करणे ही मूल्यहीनता आहे. या जीवनदृष्टीच्या अभावीच जगातील बहुतांश समस्या अन संघर्ष जन्माला आले आहेत. समस्या अन संघर्ष जन्माला घालणारे सगळेच काही दुष्ट वृत्तीचे नाहीत. उलट सज्जनांकडील जीवनदृष्टीचा अभाव हे समस्यांचे मोठे कारण आहे. त्या मानाने मुळात दुष्ट असणाऱ्या शक्तींचा बंदोबस्त ही सोपी बाब आहे. मोदींच्या भाषणाचा हाही महत्वाचा आशय आहे. या पैलूंवर भर देऊन अधिकाधिक अंगांनी त्याचा विचार होणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १० जून २०१६

हिंदू

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू ही उपासना पद्धती नसून जीवन पद्धती आहे, असे स्पष्ट करण्याला दोन दशके उलटून गेल्यानंतरही विचारी लोकांनी गोंधळ करावा; याची मनापासून गंमत वाटते. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या हिंदूच्या अर्थानुसार-

१) सर्वसमावेशक, सतप्रवृत्त जीवनपद्धतीने जीवन जगणारे हिंदू ठरतात. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, नास्तिक किंवा कोणीही असोत.

२) हिंदू राष्ट्र म्हणजे - हिंदूंचे राष्ट्र, कोणाच्या तरी विरोधातील राष्ट्र, असा नसून; सर्वसमावेशक सतप्रवृत्त जीवन पद्धतीने चालणारे राष्ट्र असा होतो. त्यामुळे हिंदू शब्दावर आक्षेप घेणाऱ्यांची कीवच करावी लागते.

३) आम्ही प्रथम भारतीय आहोत, मग मुस्लिम- ख्रिश्चन- आहोत; या धरतीवर आम्ही प्रथम भारतीय आहोत, मग हिंदू आहोत; असे म्हणण्याची गरज नाही. उलट आम्ही प्रथम भारतीय आहोत अन मग हिंदू आहोत, असे म्हणणे एक तर हास्यास्पद किंवा पोरकट किंवा निरर्थक ठरते आणि व्यवहारात गोंधळ निर्माण करणारे.

- श्रीपाद कोठे

१० जून २०१८

जात

'जात' हा शब्द जरी उच्चारला तरी आग लागते असा आजचा काळ आहे. पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे. एवढेच नाही तर त्यावर शांतपणे विचार व्हायला पाहिजे. पुष्कळ मुद्दे असू शकतात. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जात व्यवस्थेने आर्थिक सुरक्षा प्रदान केली होती आणि आर्थिक अराजक टाळले होते.  यावर फार लिहिणार नाही. फक्त विचारासाठी विषय समोर ठेवला आहे. अर्थात जात व्यवस्था पुन्हा यावी असा याचा अर्थ नाही. ती येऊही शकत नाही. एवढेच नाही तर ज्या ब्राह्मणांनी जात व्यवस्था आपल्या स्वार्थासाठी तयार केली अन राबवली असा कंठशोष केला जातो, ते ब्राम्हण सुद्धा आता जात व्यवस्था मान्य करणार नाहीत.  का मान्य करणार नाहीत हा एक स्वतंत्र विषय आहे. शिवाय उच्चनीच, लहानमोठा हे भाव; परस्पर द्वेष, कलह; अथवा जात पंचायत सारखे प्रकार; या गोष्टी चुकीच्याच आहेत. असमर्थनीय आहेत. परंतु हेही तेवढेच खरे की, जात व्यवस्थेमागील मूलभूत चिंतन समजून घेणे आवश्यक आणि उपयोगी आहे. मनात भीती बाळगून आणि कोण काय म्हणेल, समाज काय म्हणेल याची भिड बाळगून विचार करणे योग्य नाही. विचारकांनी भीती आणि भिड न बाळगता विचार केला पाहिजे अन मांडला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१० जून २०२१

बुधवार, ८ जून, २०२२

आकाशवाणी प्रकाशवाणी

पूर्वी फक्त आकाशवाणी होती. त्यावरच्या बातम्या लोक ऐकत. त्या बातम्या नीट लिहिलेल्या, सुसंगत असत. वाचणारे नीट उच्चार करणारे, वाचण्याचा सराव असलेले असत. त्यामुळे ऐकणाऱ्यावरही भाषेचे संस्कार होत. कुठला उच्चार कसा, शब्द कसे तोडले जातात, कसे जोडले जातात, वाक्य कसे बोलायचे, पॉज कुठे कसा घ्यायचा, वाक्याचा प्रवाहीपणा हे सगळे आपोआप, नकळत समजत असे, मुरत असे. स्वाभाविकच ते प्रकट होत असे. याचा अर्थ सगळेच चांगले वाचणारे, लिहिणारे, बोलणारे होते असे नाही. पण सरासरी गुणवत्ता बरीच चांगली होती. आज प्रकाशवाणीच्या बातम्यांमुळे ही सगळीच गुणवत्ता घसरली आहे. शिवाय दृश्य गोष्टीचा परिणाम असा होतो की, सगळे लक्ष दृष्याकडेच जाते. बातम्या सांगणारे त्यानुसार बोलतात, वेळेवर सुचेल तसे, अडखळत, असंबद्ध वगैरे. त्यामुळे एक मोठी सामाजिक निरर्थकता जन्माला येते आहे.

- श्रीपाद कोठे

९ जून २०१५

जाहिरातींचे दर

शेतीमालापासून सोन्याचांदीपर्यंत सगळ्या गोष्टींच्या किमती ठरत असतात. त्यांची एक बरीवाईट, योग्य अयोग्य, पूर्ण अपूर्ण अशी एक पद्धत असते. पण जाहिराती सुद्धा विकल्या जातात आणि त्यात काम करणारे स्वत:चा वेळ, श्रम विकतात. पण जाहिरातीची किंमत आणि त्यात काम करणाऱ्यांचा मेहनताना ठरवण्याची काहीच पद्धत का नसावी? त्यांच्या मनाला येईल तेवढी त्याची किंमत. त्यातूनच प्रकाशचित्र वाहिन्या चालणार, बाकी अनेक गोष्टी चालणार, सगळ्यांचे चोचले चालणार आणि आपल्यासारख्या करोडो लोकांचे खिसे सतत गळत राहणार. जाहिराती आणि त्यात काम करणारे यांच्या भावाचे काही नियंत्रण व्हायला नको का? या संपूर्ण उद्योगाचे कॅग ऑडीट का होऊ नये?

- श्रीपाद कोठे

९ जून २०१५

माणूस म्हणजे काय?

समाजासाठी क्षात्र वृत्ती आणि वाणिज्य वृत्ती या दोनच पुरेशा नसतात. खरं तर हे वाक्यही चूक आहे. सत्य हे आहे की, मानव जातीत या दोनच वृत्ती असतात असं नाही. याशिवाय ब्राम्ह वृत्ती असणारी माणसे असतात आणि यातील कोणत्याही वृत्तीचा प्रकर्ष नसलेली माणसेही असतात. या चारही वृत्तींचा उपयोग करून समाज उभा होतो. समाज उभा होतो. समाज उभा केला जाऊ शकत नाही. समाज वाटचाल करतो. समाज चालवता येत नाही.

परंतु वर्तमान समाजविचार, वर्तमान देशविचार, वर्तमान देशभक्ती कल्पना, वर्तमान राज्यविचार, वर्तमान राष्ट्रविचार; फक्त क्षात्रवृत्ती आणि वाणिज्यवृत्ती या दोनच मान्य करतो. मानवजातीचं समूह जीवन आणि माणसाचं व्यक्तीजीवन या दोन्हीची जी ओढाताण सुरू आहे, त्यातील संघर्ष सुरू आहे, त्यातील अशांती आहे, त्याचा व्यापकतेचा प्रवास जो खुंटला आहे, त्याची जी कोंडी झाली आहे; याच्या मुळाशी 'माणूस' म्हणजे काय याचं अपूर्ण, स्वप्नाळू, काल्पनिक आकलन हेच कारण आहे.

'माणूस' म्हणजे काय याचं योग्य आकलन कसं होईल? कसं होतं? कसं होऊ शकतं? ते वर्तमान लोकशाही, वर्तमान गणिती विचार पद्धती, वर्तमान वस्तुकरणात्मक विचार पद्धती; यांनी होऊ शकत नाही. त्यासाठी मानव जातीतील पाचव्या प्रकारच्या लोकांकडे लक्ष द्यावं लागतं. ब्राम्ह, क्षात्र, वाणिज्य आणि यातील कोणत्याही वृत्तीचा प्रकर्ष नसलेले लोक; यांच्याशिवाय काही माणसे असतात. त्यांना या वृत्तींशी, या वृत्तींना अनुसरून चालणाऱ्या जगाशी, जगाच्या व्यवहाराशी काहीही देणेघेणे नसते. ते या जगाच्या सुखाने हुरळून जात नाहीत, तसेच दु:खाने त्यांना विषादही होत नाही. याचा अर्थ ते दगड असतात असे नाही. वरवर पाहता तसे वाटू शकते, पण त्यांना जगाच्या व्यवहाराशी घेणेदेणे नसले तरी तो समजत असतो, त्याची जाण असते आणि त्यातील सार आणि असार यावर त्यांची दृष्टी असते. जगाविषयीच्या उदासीन वृत्तीची त्यांना तमा नसते आणि त्याची किंमत चुकवण्याचेही त्यांना काही वाटत नाही. किंबहुना आपण काही किंमत चुकवता इत्यादी त्यांच्या मनालाही स्पर्श करत नाही. हे लोकच 'माणूस' म्हणजे काय हे सांगतात, सांगू शकतात. सुखाने हुरळणाराच नव्हे, दु:खाने विव्हळणारा सुद्धा 'माणूस' म्हणजे काय सांगू शकत नाही. 'माणूस' म्हणजे काय हे सांगणाऱ्या या लोकांनाच बुद्ध, आदि शंकराचार्य, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामकृष्ण म्हटले जाते. हे लोक बाकीच्या गोष्टीही सांगतात. पण 'माणूस' म्हणजे काय हे त्यांचं सांगणं अधिक मूलभूत आणि महत्वाचं असतं. आजच्या व्यवस्थांनी, विचारांनी मात्र हा मानवातील पाचवा वर्ग जवळजवळ नेस्तनाबूत केला आहे. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' हे आज कोण ऐकून आणि समजून घेणार? समस्त विश्व एक आहे, सगळी मनुष्यजात एक आहे, संपूर्ण पृथ्वी एक आहे, मानव हा विश्वमानव आहे; हे आज कोण ऐकून वा समजून घेणार? युक्तिवाद खूप होतील, शहाणपणाचं प्रमाणपत्र आम्हालाच मिळालेलं आहे अशा थाटात होतील; पण 'माणूस' म्हणजे काय याकडे मात्र कोणी लक्ष देणार नाही.

वर्तमानकाळाची ही विडंबना आहे. ज्यांना हे आकलन असू शकतं तेही यावर मौन असतात. बोलले तरी सांभाळून, जपून, सोयीचं एवढंच बोलतात हे सुखदायक नक्कीच नाही.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, ९ जून २०२०

मंगळवार, ७ जून, २०२२

वागळे आणि आंबेडकर

सध्या वागळे पुराण खूप सुरु आहे. त्यावर काही बोलण्या लिहिण्यासाठी मी फार लहान आहे. फक्त एक किस्सा आठवला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांच्याच सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी) नागपूरचे अध्यक्ष सदानंद फुलझेले होते. आणि मुख्य व्याख्यान झाले दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे. `डॉ. आंबेडकर व मी' असा त्यांचा विषय होता. त्यात त्यांनी सांगितलेला किस्सा-

मामासाहेब म्हणाले- `नागपूरच्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर चंद्रपूरलाही तसाच एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी तरुण भारतचा वार्ताहर म्हणून भाऊसाहेब माडखोलकर यांनी मला पाठवले. कार्यक्रम आटोपल्यावर जेवणाची व्यवस्था होती. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे पंगत होती. बाबासाहेब पंगतीच्या सुरुवातीला खुर्चीवर बसले होते. त्यांना खाली बसण्याचा त्रास होत असल्याने. शेजारी खाली बाकी सगळे. त्यात मीही होतो. वाढणे सुरु झाले तेव्हा बाबासाहेबांनी व्यवस्था पाहणाऱ्या लोकांना आवाज दिला आणि सांगितले की, तो तरुण भारतचा मुलगा बसला आहे ना पलीकडे त्याला मांसाहार वगैरे चालत नाही. तो बामन आहे. त्याला जरा नीट वाढा.'

यावर कुठल्याही टिप्पणीची गरज नाही. मामासाहेबांनी, सदानंद फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार संघाच्या जाहीर कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात तो प्रसिद्धही झाला होता. कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे त्यांचे नाव घेणारा वागळे?

- श्रीपाद कोठे

८ जून २०१५

ए टी एम पिन

बंगळुरूच्या एका न्यायालयाने ए टी एम पिनच्या हस्तांतरणा संदर्भात दिलेला निर्णय, अमानवीय तर आहेच शिवाय भारतीय मूल्य, कुटुंब व्यवस्था, कुटुंब भावना यांना छेद देणारा आहे. कायदा, नियम, तंत्रज्ञान ही काही कारणे होऊ शकत नाहीत. कायदा, नियम, तंत्रज्ञान मानवी जगण्याला साहाय्य करणारे हवेत. तसे होत नसेल तर ते कायदे, नियम, तंत्रज्ञान सोडून द्यायलाच हवे. कायदे, नियम, तंत्रज्ञान मानवासाठी आहे, मानव त्याच्यासाठी नाही. कायदे, नियम, तंत्रज्ञान यांचे पालन हा काही आदर्श मानवाचा एकमेव निकष होऊच शकत नाही. विचारांना तिलांजली देणारे कायदे, नियम, तंत्रज्ञान कचरापेटीतच जायला हवेत.

- श्रीपाद कोठे

८ जून २०१८

सोमवार, ६ जून, २०२२

अपेक्षा अन आव्हाने

५ जून २०१६ रोजी अर्थविश्वातील एक अतिशय आगळी अन महत्वाची घटना घडली. प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठीचा किमान पैसा घरपोच देण्याच्या प्रस्तावावर स्वित्झर्लंडमध्ये देशव्यापी लोकमत चाचणी झाली. अर्थात या प्रस्तावाच्या बाजूने केवळ २२ टक्के मते पडली आणि तो फेटाळला गेला. आजवर जगभरात कुठेही असा प्रस्ताव देशव्यापी मतचाचणीसाठी ठेवण्यात आलेला नव्हता. काही देशांमध्ये असे प्रस्ताव समोर आले आहेत. काही देशांनी यासंबंधात प्रयोगही सुरु केले आहेत. काही देश आगामी काळात यावर विचार करणार आहेत. घरबसल्या किमान पैसा देण्याचे हे प्रस्ताव ज्या देशांमध्ये पुढे आलेले आहेत त्यात सगळेच देश `श्रीमंत देश' आहेत. यातून काही बाबी स्पष्ट होतात-

१) सगळ्या लोकसंख्येला काम (रोजगार) देणे या देशांना शक्य होत नाहीय.

२) सगळ्या कामांना सारखा पैसा देता येत नसल्याने जी सामाजिक व आर्थिक तफावत निर्माण होते, त्यामुळे अनेकांना रोजचे जगणे ओढगस्तीचे होते आणि ते सुकर व्हावे याची चिंता तेथील सरकारे आणि समाज यांना सतावते.

३) काम न करताही लोकांना पैसा देण्याची आज या देशांची क्षमता आहे.

हा प्रस्ताव फेटाळला जाण्यातून सुद्धा काही बाबी स्पष्ट होतात-

१) असा पैसा देण्याने काही वर्षांनी देशाला दारिद्र्याचा सामना करावा लागण्याची भीती.

२) असा पैसा मिळू लागल्याने लोक काम करणे सोडतील. त्यामुळे कोणत्याही कामाला माणसेच मिळणार नाहीत. त्यामुळे निर्माण होणारी अनवस्था.

३) वर्तमान अर्थनीती आणि अर्थ विचारांचे अपुरेपण.

गेल्या वर्षी संपूर्ण ग्रीस देश दिवाळखोरीत निघाला, सध्या ब्राझील त्याच मार्गावर आहे, स्वित्झर्लंड आणि अन्य धनाढ्य देशातील ही नवीन घडामोड, चीनने काही वर्षे दादागिरी केल्यानंतर आता त्याला भेडसावत असणारे प्रश्न; या साऱ्याने अर्थविश्व भांबावले आहे. पण त्याला उपाय सुचत नाही, मार्ग दिसत नाही अशी स्थिती आहे. आज जगात पैशाची कमतरता नाही. जगातील पहिल्या शंभर लोकांजवळ असलेल्या पैशातूनसुद्धा सगळ्या जगाच्या गरजा भागवल्या जाऊ शकतील अशी स्थिती आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैसा पडून आहे. तरीही ही अवस्था आहे. कारण काय तर काम नाही अन असलेल्या कामांना सारखा मोबदला नाही.

खरे तर गेली काही शतके जे गैरसमज उराशी बाळगून जग चाललेलं आहे त्याला परिस्थितीने लगावलेली ही सणसणीत चपराक आहे. प्रत्येकाला रोजगार असलाच पाहिजे, रोजगार हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे; ही धारणाच मुळात चुकीची आहे. रोजगार कशासाठी हवा? जीवनयापनासाठी- हे त्याचे खरे आणि मूळ उत्तर आहे. याऐवजी रोजगार हा हक्क, प्रतिष्ठा, व्यक्तित्व यांच्याशी जोडल्याने गोंधळ निर्माण झाला. बरे, रोजगाराची ही हक्क, प्रतिष्ठा अन व्यक्तित्वाशी सांगड का घातली गेली? जीवनयापन करताना वैचारिक सुसंस्कृतपणा सोडून दिल्याने अनेक संघर्ष निर्माण झाले आणि ही सांगड घातली गेली. म्हणजे नेमके काय? जसे रोजगार कशासाठी? पैसा कमावण्यासाठी. पैसा कशासाठी? कुटुंबाचे अन समाजाचे भरणपोषण करण्यासाठी. पण जेव्हा पैसा माझ्यासाठी असा विचार सुरु झाला, तेव्हा बाकीच्यांच्या जीवनयापनाचा प्रश्न पुढे आला. तो सोडवण्यासाठी परस्परानुकूलता उचलून धरून समन्वयाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येकाने आपापला पैसा कमवावा हे सूत्र पुढे आले. हा खरे तर सांस्कृतिक ऱ्हास होता पण तोच पुढे रेटण्यात आला. त्यातून कुटुंब, कौटुंबिक व्यवसाय इत्यादी कालबाह्य झाले. स्त्रियांनीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा विचार पुढे आला. आता तर सज्ञान होताच मुलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे हा विचार बळावतो आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही सज्ञान मुले ही आईवडिलांची जबाबदारी नाही असा निकाल दिलेला आहे. वर्तमान वैचारिक अपुरेपणातून उद्भवलेली ही स्थिती आहे. यांत्रिकीकरणाचा रेटा, रोजगार मागणाऱ्या हातांची वाढती संख्या, मानवी उपभोगाची मर्यादा, सुप्त सत्ताकांक्षा यांच्या एकत्रित परिणामातून बेरोजगारीची समस्या उद्भवली आहे.

कामाची उपलब्धता, समाजाची गरज, समाजाची धारणा, व्यक्तीचे जगणे, त्याचा वेळ, त्याचा जीवनविकास; अशा पुष्कळ गोष्टींचा विचार करून अर्थतंत्र, रोजगार, पैसा, किमती, मूल्य, मोबदला इत्यादी निश्चित व्हायला हव्यात. प्रत्येकाला पैसा कमावण्याची मुभा असावी, पण त्याचा अर्थ प्रत्येकाने पैसा कमावलाच पाहिजे असा होऊ नये. भारतीय मजदूर संघाने एक छान घोषणा दिली होती- `कमानेवाला खायेगा' याऐवजी `कमानेवाला खिलायेगा'. या घोषणेला अर्थ-सांस्कृतिक महत्व आहे. समाजात जसे कमावणारे राहतील तसेच न कमावणारेही नेहमीच राहतील. बालके, वृद्ध, रोगी, अपंग हे तर नेहमीच समाजावर अवलंबून राहतील. शिवाय सगळ्या गोष्टी, सगळी कामे पैसा निर्माण करणार नाहीत. जसे शिक्षण. शिक्षण पैसा उत्पन्न करीत नाही, उलट पैशाचा उपभोग घेते. ही व्यवस्था कोणी आणि कशी करायची? आज आपण शिक्षणालाही पैसा निर्माण करण्यासाठी जुंपतो आहोत. त्याचे अनिष्ट परिणामही दिसू लागले आहेत. प्रत्येक वस्तूचे मूल्यही सारखे असू शकत नाही. धान्य-भाजीपाला आणि सोनेचांदी यांच्या भावात तफावत राहणारच. ज्या वस्तू बाहेरून आणाव्या लागतात त्यांचे दर तर आपल्या हातात नसतातच. कला-साहित्यासारख्या बाबी व्यासंग, सराव, अभ्यास, वेळ याशिवाय होऊ शकत नाहीत. त्यांचे मूल्य पैशात कसे करायचे? समाज हा असा असतो. काही लोक पैसा कमावतील, काही कमावणार नाहीत. काही लोकांना भरपूर पैसा मिळेल, काही लोकांना कमी पैसा मिळेल. काही कामे पैसा निर्माण करतील, काही पैसा निर्माण करणार नाहीत. अनेक गोष्टी पैशाने होतील, अनेक पैशाने होणार नाहीत. या साऱ्याचा विचार करून एक नवीन अर्थसंस्कृती विकसित होणे गरजेचे आहे.

व्यक्तिमत्वाचा विकास आणि जगणे, प्रतिष्ठा आणि गरजांची पूर्तता, समाजाच्या गरजा आणि सुव्यवस्था, काम आणि मानसिकता, पैशाची निर्मिती आणि नियोजन; या साऱ्याचा संकलित विचार करणे महत्वाचे आहे. व्यक्तीने समाजावर किंवा समाजाने व्यक्तीवर; व्यवहाराने भावनांवर किंवा भावनांनी समाजावर, गरजांनी इच्छांवर किंवा इच्छांनी गरजांवर कुरघोडी करण्यातून काही साध्य होणार नाही. त्याऐवजी परस्पर पूरकता, परस्पर अनुकूलता, समन्वित दृष्टी, दोन पावले पुढे टाकण्याची आणि दोन पावले मागे घेण्याचीही वृत्ती, जगण्याच्या कल्पना या सगळ्यांचा समन्वित विचार करण्याची सवय ही प्रारंभिक बाब आहे. रोज प्रकाशित होणाऱ्या याद्या, आकडेवारी, तुलनात्मक तक्ते, जगण्यापेक्षा जगण्याच्या स्पर्धेला प्रोत्साहित करणाऱ्या श्रीमंतांच्या अन यशवंतांच्या याद्या या सगळ्याला तिलांजली देणे आवश्यक आहे. मोठमोठी नावे अन बिल्ले लावून फिरणाऱ्यांनाही ठणकावून सांगण्याची हिंमत उत्पन्न करावी लागेल. केवळ सरकारचे हे काम नाही. अन सरकारने हे करायचे म्हटले तरीही जनमताचा रेटा असल्याशिवाय ते शक्य नाही. अन हा जनमताचा रेटा केवळ संख्याबळापुरता मर्यादित असून चालणार नाही. तर विचारपूर्ण, काय हवे-नको हे सरकारला dictate करणारा हवा. जगाशी विविध मंचांवर सरकार बोलेल त्यावेळी त्याला जनमताचा अन जनतेतून पुढे येणाऱ्या विचारांचा अन कल्पनांचा आधार हवा. त्याशिवाय जगालाही ठणकावता येणे शक्य नाही.

अशा प्रकारचे जनमत तयार करणे हे जनसंघटनांचे काम आहे. आज सगळ्या विषयांचे प्रवक्तेपण भाजपकडे असल्याचे चित्र आहे. हे बदलायला हवे. भूमिका, धोरण आणि सिद्धांत अशा तीन बाबी असतात. सरकार हे भूमिका आणि काही प्रमाणात धोरण लक्षात घेऊन काम करीत असते. सिद्धांत हा सरकारचा विषय नसतो. तो समाजाचा विषय असतो. आज संघ प्रेरणेतून काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांनी मुख्यत: हे काम करायला हवे. आर्थिक विषयात स्वदेशी जागरण मंच, ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, लघु उद्योग भारती अशा काही संघटना आहेत. त्यांनी समाजाची सैद्धांतिक भूमिका तयार करण्याचे अन बळकट करण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे. `विश्वकल्याणी अर्थायामासाठी' भारताने सिद्ध होण्याची वेळ आलेली आहे. केवळ इमारतीचा ढाचा उभा करून काम होणार नाही. पायवा आणि pillars मजबूत उभे करावे लागतील. वर्तमानाची ही अपेक्षाही आहे अन आव्हानही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ७ जून २०१६

संघावरील टीका

आज प्रणवदा काय बोलणार याची चर्चा, विश्लेषण, तर्कवितर्क सुरू आहेत. सहज आठवलं. नक्की वर्ष नाही आठवत पण २८ ते ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. दसरा उत्सवाला कस्तुरचंद पार्क मैदानावर राजाभाऊ खोब्रागडे अध्यक्ष होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरस हेही होतेच. राजाभाऊंनी सुमारे अर्धा तास राम, हिंदू, दसरा वगैरेवर सडकून टीका केली. सगळे अस्वस्थ होतील एवढी, पण कुठून एक आवाज नाही की काही नाही. हजारो स्वयंसेवक आपल्या श्रद्धांवरील कडक टीका शांतपणे ऐकून घेतात हा अनुभवच अनोखा होता. सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सारे तिथे हात जोडून उभे होते. त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत अध्यक्षांच्या भाषणाची दखल घेऊन आपला विषय मांडला होता.

- श्रीपाद कोठे

७ जून २०१८

वर्धमान नगर के बालो के विजयादशमी पर्व पर नगर सेवक  मेश्राम अतिथि थे उन्होंने प्रभु श्रीराम पर टिका करी एवं कहा कि मेरे बच्चों के नाम रावण व मेघनाद है मैं रावण का सम्मान करता हूं पर कोई हलचल नहीं कार्यक्रम सहजता से पुर्ण हुआ

- दयाशंकर तिवारी

सोन्याचा धूर (जोड)

तुम्ही संपुर्ण राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरण करण्याच्या कार्यक्रमाची गरज दाखविली आहे ...👍

अमेरिकन अर्थतज्ज्ञ Angus Madison यांच्या मते  इ स 1800 पर्यंत भारताचा GDP हा 23 % होता तर चीन चा 24% 

म्हणजे जगाच्या एकूण उत्पादनात 67 % वाटा या दोन देशांचा होता...पण 1947 पर्यंत भारताची जी काही लूट ब्रिटिशांनी केली  त्याचा परिणाम असा झाला की जी डी पी  0.7 टक्के इतका खाली आला....

अजून काही गोष्टी वाढविता येतील:

- प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जगण्याचे शिक्षण होते .. Multi-Skilling होते

- स्थानिक गरजा स्थानिक पातळीवर भागविल्याने - Circular Economy होती

- आधुनिक वैद्यक शास्त्राचा हस्तक्षेप नसल्याने Corrupt DNA असलेली बालके जन्माला येत नव्हती त्यामुळे समाज सुदृढ होता ..

आंतर प्रदेशीय देवघेव ज्ञानाची होती आणि वस्तूंची नव्हती त्यांमुळे रोगांचा प्रसार सीमित होता ..

नैसर्गीक साधन सामुग्रीचे अफाट औद्योगिक दोहन नसल्याने प्रदूषणाच्या समस्या नव्हत्या ..

Milind Kotwal 

पण सर यालाच मार्क्स Stagnant Economy म्हणतो

(मिलिंद कोतवाल, प्रशांत आर्वे)

रविवार, ५ जून, २०२२

दत्तात्रय जी

आजचा प्रसंग. दुपारी १२ ची वेळ. रेशीमबाग परिसरात सुरु असलेल्या रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात भोजनाची पंगत बसली होती. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रयजी होसबळे हेही सगळ्यांसोबत खालीच जेवायला बसले होते. साधं वरण, भात, ढेणसाची भाजी, पोळ्या, ताक, कांदा असा साधाच स्वयंपाक. बाकीचे हजारेक स्वयंसेवक जे आणि जसे जेवत होते, ते आणि तसेच दत्तात्रयजी देखील जेवत होते. भात वाढायला एक विशीतला स्वयंसेवक आला. भात वाढताना चमच्याला भात चिकटतो. असा भात चिकटला की नंतर भात नीट वाढला जात नाही. त्या स्वयंसेवकाचेही तसेच झाले. दत्तात्रयजी त्याला चमचा हातात घेऊन समजावून सांगत होते, भात कसा वाढायचा. चमचा कसा स्वच्छ करायचा वगैरे. वीस दिवसांपूर्वी १६ मे रोजी, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथग्रहण समारंभात निमंत्रितांच्या पहिल्या रांगेत बसलेले दत्तात्रयजी सगळ्या जगाने पाहिले. तेच दत्तात्रयजी यांचे हे रूप. कोणाला हे खरे वाटणार नाही, पण असेच आहे. हेच आहे संघाचं गुपित आणि हीच आहे संघाची शक्ती. संघाचे ४-५ लोक सोडले तर त्या सोहोळ्याला हजर असलेल्या चार-पाच हजार लोकांपैकी अगदी ४-५ लोक तरी अशा तऱ्हेने जगत-वागत असतील का? `अलौकिक नोहावे लोकांप्रती' हे ज्ञानेश्वर माउलीचे वचन जगणारी ही राष्ट्रनिष्ठांची मांदियाळी आहे. अन हे सारे `असे असे वागायचे आहे' अशा भूमिकेतून, ठरवून वगैरे नाही. सहज, स्वाभाविक. सगळं असणंच इतकं साधं, सहज, स्वाभाविक. फुलाला स्वत:च्या सुगंधाचा मागमूसही नसावा इतक्या निर्लीप्तपणे. हे समजून घेणं खरंच खूप कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

६ जून २०१४

शनिवार, ४ जून, २०२२

Freedom

actually, `freedom' in itself can not be a value of life. today's world took it in a wrong sense. hence there starts a cry immediately for freedom of expression. while dealing with such cases; it must also be seen that much deeper & constructive discussions & deliberations should enlighten the society as a whole. `freedom for what?' is the basic & fundamental question, that should be debated. today we take it for granted that freedom, liberty are absolute. it can't be like that. freedom and liberty are tools for outer as well as inner development of an individual and society. moreover society is not monolithic block that is designed and manufactured in a industry. any one thing has it's impact in hundred different ways. problem of freedom must be dealt with taking this into consideration.

- श्रीपाद कोठे

५ जून २०१४

भाज्यांची चव

आज दिवसभर पर्यावरण दिनाची चर्चा होती. मनात एक विचार आला- आपण आजकाल ऐकतो, बोलतो, वाचतो की भाज्यांना चव नाही, फळांमध्ये रस नाही वगैरे. भाज्या, फळे, धान्य वगैरे नि:सत्व होते आहे. शास्त्र सांगते की भाज्या, फळे, धान्य इत्यादीत लोह, कॅल्शियम, प्रथिनं आणि काय काय असते. याची संगती लावताना वाटले, या पदार्थात शरीराला पुष्ट करणारे घटक असतात/ असायला हवेत. आजकाल मात्र त्यांची पोषणक्षमता कमी झाली आहे. आपण जमिनीतून आपल्या गरजांसाठी सगळी खनिजे वगैरे काढून घेतो आहोत, ओरबाडून घेतो आहोत. मग ती झाडांमध्ये आणि त्यातून आपल्या शरीरात पोहोचतील कशी? पर्यावरणाचा विचार करताना आणि दिन पाळताना याही अंगाचा विचार होऊ शकतो/ व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

५ जून २०१५

थोडे कडवट

आजच्या पर्यावरण दिनी दोन गोष्टींची चर्चा झाली.

एक मित्र भेटायला आला. तो सांगत होता एका कार्यक्रमाबद्दल. त्यांच्या संस्थेतर्फे ते नागपूरच्या `ग्रेट नाग रोड'वर ६०० झाडे लावणार आहेत. फारच मोठे काम. त्याचे अभिनंदन केले. तो म्हणाला काही सूचना? मी म्हणालो- तुम्ही करता आहात तेव्हा हे काम होणारच आणि नुसते वृक्ष लावून तुम्ही स्वस्थ बसणार नाही तर ते जगवणे, वाढवणे आणि टिकवणे हेही तुम्ही करणार यात शंका नाही. माझी सूचना म्हणशील तर एक आहे. कसे करता येईल पाहा. झाडे लावताना जमीन (माती) जेवढी मोकळी करता येईल तेवढी करा. कारण आजकाल झाडे लावण्याची जागरुकता तर दिसते. मात्र त्याचवेळी काही गोष्टी सुटून जातात. एक तर मोठ्या प्रमाणावर लावली जाणारी झाडे जमिनीतील पाणी शोषून घेणार. त्यामुळे जमिनीतील पाण्याची उपलब्धता कमी होणार आणि पाण्याची पातळी आणखीन खाली जाणार. त्यामुळे झाडे वाढवताना पाण्याची उपलब्धता वाढेल हे पाहिले पाहिजे. नाही तर काही नवीन समस्या जन्माला येतील. कुंड्यांमध्ये झाडे लावतानाही ही बाब महत्वाची ठरते. कारण कुंडीतील झाडाला आपण पाणी घालतो त्यावेळी त्यातील चार थेंब सुद्धा जमिनीत झिरपत नाहीत. हां कुंडीतील झाडांचे दोन फायदे जरूर आहेत. एक म्हणजे, उष्णता शोषण आणि दुसरे म्हणजे, प्राणवायू उत्सर्जन. पण त्याचवेळी पाणी या घटकाचाही विचार आवश्यक आहे. त्यामुळे कुंडीपेक्षाही जमिनीत झाडे लावण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.

आम्ही बोलत असतानाच, बातम्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण दाखवत होते. एक तृतियांश शालेय विद्यार्थ्यांना फुफ्फुसाचे विकार आहेत, असा त्याचा निष्कर्ष. प्राणवायूचे मास्क लावलेले विद्यार्थी वगैरे सगळं बाकी होतंच. मनात आले, आपला समाज ढोंगी आणि मूर्ख आहे का? आज प्रदूषण हा विषय काही फार नवीन राहिलेला नाही. पण त्याच्या त्याच त्याच चर्चा, तीच तीच सर्वेक्षणे आणि उपाय योजनांची तीच ठराविक वटवट; यापलीकडे आम्ही केव्हा जाणार? जायला हवे हे मात्र नक्की. मोठ्या शहरांचा मोह सोडायला आमची तयारी नाही. वाहनांचा वापर कमी करण्याची आमची तयारी नाही. माती, झाडे, पाणी यापेक्षा आम्हाला सिमेंट आवडते. ही आवड सोडायला आम्ही तयार नाही. एअर कंडिशनर, रसायने, सौंदर्य प्रसाधने यांचा वापर मर्यादित करायला आम्ही तयार नाही. खूप साऱ्या चिंता व्यक्त करतानाच आम्हाला विसर पडतो की रोज कोट्यवधी घरातून कोट्यवधी स्त्री पुरुष जे केस रंगवतात त्याचाही प्रदूषणात किती मोठा वाटा आहे? प्रत्येकाने एक युनिट कमी वीज वापरली तरीही कितीतरी उष्णता आटोक्यात आणता येईल. पण हे होण्यासाठी शहाणपण आणि प्रामाणिकपणा हवा. नुसती सर्वेक्षणे आणि अहवाल उपयोगाचे नाही. या गोष्टी गोड शब्दात वगैरे सांगायची वेळही निघून चालली आहे. थोडे कडवट होणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

५ जून २०१५

पर्यावरण

आज पर्यावरण दिवस आहे. कोरोनाच्या सावटातील हा पर्यावरण दिवस. कोरोनाने तीन लाखाहून अधिक लोकांचे देशभरात बळी घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ तज्ञ डॉक्टरांनी दिलेली एक माहिती आज वाचण्यात आली. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे देशभरात वर्षाला १८ लाख लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे कोरोनाने घेतलेल्या बळींच्या सहापट अधिक. शिवाय हे सतत सुरूच असते. सहज एक विचार आला - आपल्याला पर्यावरणापेक्षा कोरोनाची काळजी अधिक का वाटते? कोरोना संसर्गजन्य असल्याने बहुतेक. आपला तर नंबर लागणार नाही ना ही भीती अधिक असते. ती स्वाभाविक आहेच पण आपल्याला एकूण मानवी जगण्यासमोर उभे असलेल्या संकटाची फारशी काळजी वाटत नाही हेही खरेच आहे. तसे नसते तर पर्यावरण सुरक्षा हा आमच्या काळजीचा विषय नक्कीच झाला असता. आणखीन एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. पर्यावरण संरक्षण म्हणजे झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर बंद करणे, पाणी जपून वापरणे एवढेच नाही. हा विषय खूप मोठा, व्यापक आणि खोल आहे. कृती, धोरण, कार्यक्रम, नियोजन; यासोबतच मानसिकता, विचारपद्धती, तत्त्वज्ञान, स्वप्ने यांच्याशीही त्याचा संबंध आहे. आपल्या स्वप्नांची नाळ मोदी, ममता, सोनिया, पवार, अखिलेश, मायावती, पुतीन, बायडेन, ट्रम्प किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा जाहिराती किंवा प्रसार माध्यमे किंवा अन्य कोणाशीही न जोडण्याची काळजी घेतली तरीही ती पर्यावरणाची मोठी सेवा होईल. बाकी ठराव, चर्चा, निधी इत्यादी तोंडीलावणी आहेतच.

- श्रीपाद कोठे

५ जून २०२१

बुधवार, १ जून, २०२२

मॅगी

मॅगीने खूप मोठ्या शक्यता निर्माण केल्या आहेत. maggi has opened a pandoras box. कंपनी, कंपनीचा माल (तयार केल्या जाणाऱ्या वस्तू, पॅकिंग, सेवा... अशा सगळ्या गोष्टी), कंपनीचे दावे आणि मुख्य म्हणजे कोट्यवधी रुपये खिशात टाकण्याशी मतलब एवढाच विचार करणारे सेलिब्रिटी या सगळ्यावरच गदा येते आहे. फक्त हे मॅगीवर थांबू नये ही अपेक्षा. फेअर अँड लव्हली किंवा तशा प्रकारच्या अनेक वस्तू (सौंदर्य प्रसाधने, साबणा, व्यक्तिगत वा कौटुंबिक वापराच्या वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू अशा असंख्य गोष्टी) यांचेही क्रमांक पाठोपाठ लागायला हरकत नाही. नाही म्हणायला- `आता पैसा कुठे ठेवायचा' ही सेलिब्रिटी, प्रसार माध्यमे आणि कंपन्या यांची चिंता किंचित कमी होऊ शकेल. हेही नसे थोडके.

- श्रीपाद कोठे

२ जून २०१५

शेतकरी

शेतकरी संपाची सध्या चर्चा आहे. त्यावर विविध अंगाने चर्चाही होईल. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यावर वाद होण्याचे कारणच नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान चांगले व्हायला हवेच. तसे न वाटणे ही कृतघ्नताच. पण मुख्य मुद्दा आहे- हे होईल कसे? काही तात्पुरते उपाय करता येतील अन करायलाही हवेत. पण हे एक कधीही न संपणारे दुष्टचक्र आहे. हे भेदले नाही तर कायम असेच सुरु राहील. अन हे भेदण्याचा उपाय आहे - सतत पैसा वाढत नेणारी अर्थव्यवस्था आणि आधुनिक जीवन पद्धती आमूलाग्र बदलणे. त्याशिवाय पर्याय नाही. केवळ जोडतोड, व्यवस्थापन किंवा करुणा याने काहीही साध्य होणार नाही.

- श्रीपाद कोठे

२ जून २०१७