पद्म पुरस्कारांची यादी पाहत होतो. काही पुरस्कार 'अध्यात्म' क्षेत्रासाठीही होते. अध्यात्म हे समाज जीवनाचं क्षेत्र आहे का? त्याला पुरस्कार द्यावेत का? त्याने पुरस्कार घ्यावेत का? हे चर्चाविषय तूर्त बाजूला ठेवू. पण ही यादी पाहताना मनात विचार आला, अध्यात्म यासंबंधीच्या समजांचा. एक मोठा समज, खरं तर गैरसमज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आध्यात्मिक जीवन जगणारे म्हणजे निरुपयोगी, समाजाची बांडगुळे इत्यादी. अध्यात्माचा उपयुक्ततावादी विचार योग्य असतो का? आध्यात्मिक जीवन आणि त्याच्या विकासानुसार त्या त्या व्यक्तीची सक्रियता वा निष्क्रियता; या ठरवून वगैरे करायच्या गोष्टी असतात का? हे मूलभूत प्रश्न किंचित बाजूला ठेवले आणि चर्चेपुरता उपयुक्ततावादी विचार केला तरी काही हाती लागू शकेल का? त्यासाठी काही गोष्टी नीट ध्यानात घ्याव्या लागतील.
ही गोष्ट साधारण सर्वमान्य असते की; साधेपणा, संयम, सद्भाव, सहानुभूती, समजूतदारपणा इत्यादी आध्यात्मिक मूल्ये समाजधारणेसाठी आवश्यक असतात. या आवश्यक मूल्यांची उदाहरणे हवीत की नकोत? जग ओरबाडून घेणाऱ्या आणि सत्ता, संपत्तीच्या राक्षसी स्पर्धेत धावणाऱ्या माणसांमध्ये ही उदाहरणे कशी सापडतील? आध्यात्मिक व्यक्ती समाजासाठी ठरवून वगैरे काही करीत नसेलही कदाचित. पण समाजाला आवश्यक अशा मूल्यांचे उदाहरण समाजासमोर ठेवत असते.
दुसरी बाब म्हणजे; साधनसंपत्ती, सोयीसुविधा इत्यादींवर पडणारा भार; आध्यात्मिक माणसे आपोआप नकळत कमी करत असतात. साधनसंपत्ती, सोयीसुविधा यावर येणारा भार, पडणारा ताण; यांची चर्चा आणि त्यावरील उपाय यांच्यासाठी केवढ्या तरी खटपटी केल्या जातात. त्यातून काय नी किती साध्य होते हा वेगळा भाग पण आध्यात्मिक व्यक्ती सहजपणे, कोणतंही posturing न करता हा भार कमी करत असते.
तिसरी जाणवलेली बाब अतिशय महत्त्वाची आहे. ती वरील दोन बाबींसारखी सहज दाखवता, समजावता येणारी नाही; पण अतिशय महत्त्वाची आहे. या विश्वातील सगळ्या घडामोडी कशा होतात? आपल्याला एखादी गोष्ट समजते ती कशी? एखादी गोष्ट समजत नाही तर का? एकल किंवा सामूहिक प्रयत्नांचं यश किंवा अपयश कसं आकारास येतं? अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांची उत्तरे नाहीत. पण उत्तरे नाहीत म्हणजे त्यामागे काही नसतं असं तर म्हणता येणार नाही. हे जे काही अदृश्य, अगम्य असं काहीतरी; सगळ्या जीवनाचा आधार म्हणून असतं; जसा चित्रपटाचा पडदा चित्रपटाचा आधार असतो तसं असतं; त्या अदृश्य, अगम्य अशा गोष्टीची गुंफण, त्याचं web designing आध्यात्मिक व्यक्तींमुळे होत असतं. ते स्वतः त्या व्यक्तींना समजत असेलच असं नाही, ते लोक जाणीवपूर्वक काही करत असतील असंही नाही. परंतु automatically आपातत: तो अदृश्य पडदा आकारत असतो.
अध्यात्माचा उपयुक्ततावादी विचार योग्य नाहीच. कारण विकासाची ती स्वाभाविक स्थिती आहे. आपल्याला समजणाऱ्या आणि कदाचित तात्पुरती अवस्था असलेल्या समाजासाठी काही अध्यात्माची योजना वगैरे कोणी केलेली नाही. तशी अपेक्षा अयोग्य आणि स्वार्थमूलक म्हणावी लागेल. पण असे असतानाही, नकळत का होईना; ज्या अध्यात्माला आणि आध्यत्मिक व्यक्तींना निरुपयोगी आणि निष्क्रिय समजले जाते; ते प्रत्यक्षात काही न करताही समाजाला बळच पुरवत असतात.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा