शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

फुकट

दिल्लीत आम आदमी पार्टी निवडून आली. एकदाचं गंगेत घोडं न्हालं. आता त्या निवडणुकीचं विश्लेषण सुरू आहे. आम आदमीने 'फुकट'ची लावलेली सवय हाही एक विषय आहे. त्यावर होणारे मतप्रदर्शन आणि त्याचे विश्लेषण हे मात्र फारसे गांभीर्याने होते आहे असे वाटत नाही. लोक तर व्हेनेझुएलाच्या स्थितीपर्यंत तर्क ताणत आहेत. एकूणच माणूस आणि मानव समूह विचारशीलतेकडे जाण्याचा प्रयत्न करीत नसल्याचेच चित्र आहे.

जगताना कसल्याही गोष्टीची किंमत चुकवावी लागू नये, सारं काही फुकट मिळावं; असं म्हणणं, असं वाटणं, अशी धोरणे; हे पूर्णतः चूक आहेच. परंतु प्रत्येक गोष्टीला price tag लावणे हेही अयोग्य आहे. सवलती, अनुदान, फुकट; या गोष्टी जगभरात सर्वत्र आहेत. त्या अपरिहार्य आहेत आणि योग्यही आहेत. प्रश्न एवढाच की; कुठे, कधी, कोणाला, कशा आणि किती? प्रत्येक गोष्टीची price tag, ती सगळ्यांसाठी सारखी आणि ती चुकवल्याशिवाय पर्याय नाही; ही भांडवलशाही वृत्ती योग्य तर नाहीच पण मी मी म्हणणाऱ्या भांडवलशाही समाजात सुद्धा तसे होत नाही, होऊ शकत नाही. मग पर्याय काय?

पर्याय आहे मध्यम मार्ग. ना हे टोक, ना ते टोक. हा मध्यम मार्ग हा नेहमीच आणि सगळ्याच बाबतीत जिकिरीचा असतो. मुख्य म्हणजे त्यासाठी सारासार विचार, विवेकी वृत्ती, समजुतदारीचा विशिष्ट स्तर, परिपक्वता; या गोष्टी आवश्यक असतात. व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या, जगाच्या अर्थकारणाचा विचार करतानाही हे लागू होते/ व्हायला हवे. व्यक्ती आणि व्यक्तीसमूहाच्या गरजा, त्या गरजा भागवण्यासाठीची कामे, ती कामे करण्यासाठी लागणारी कौशल्ये, यातून निर्माण होणारे स्तर, यातील प्राधान्यक्रम, गरजांचे आणि कामांचे पर्याय, परिस्थिती आणि मानसिकता यांची परिवर्तनशीलता, विविध क्षमता; अशा असंख्य बाबींचा विचार करावा लागतो. हा विचार करताना लक्षात येते की, काम (वर्क) आणि किंमत यांची सांगड घालणे शक्य असतेच असे नाही. प्रत्येक कामाचे मूल्य सारखे असते असेही नाही. मुळातच गरजा, कामे, उपलब्धता, सामग्री इत्यादींचा सुयोग्य मेळ घालण्याचा प्रयत्न म्हणजे किंमत किंवा मूल्य. हे सारे लक्षात घेऊन योजना, धोरणे, सिद्धांत, शब्दावली, कार्यक्रम ठरवावे लागतात. मुख्य म्हणजे या सगळ्याची किमान थोडीशी तोंडओळख आणि जाणीव लोकसमूहातील बहुसंख्य लोकांना असायला हवी. ती असेल तरच समाजाचा सहभाग आणि प्रतिसाद योग्य राहू शकेल.

असं झालं तर आणि होईल तेव्हाच न्यायपूर्ण आणि संतोषदायी धोरणे, कार्यक्रम आणि व्यवस्था आकारास येईल. त्यासाठी आवश्यक अशी अर्थनीती आणि अर्थनैतिकता आकार घेईल. तोपर्यंत लोकांना फुकटे म्हणणे, स्वाभाविक मानवी सवयी आणि भावनांचा राजकीय वा अन्य फायद्यासाठी गैरवापर करणे, आपल्याला आवडणाऱ्या पक्षाची धोरणे दुर्लक्षित करून न आवडणाऱ्या पक्षांच्या नावानी बोटे मोडणे; हे सुरूच राहणार.

आपण आपली गंमत पाहावी.

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा