अमोल पालेकर यांचे भाषण थांबवण्याचे प्रकरण गाजते आहे. त्यांचे भाषण थांबवण्याची गरज नव्हती अन तसे करणे चूक आहे. या प्रकरणी औचित्यभंगाचा मुद्दाही मांडण्यात येतो आहे. तोही अस्थानी आहे. त्यासाठी बारसे अन मर्तिक याचे जे उदाहरण दिले जात आहे तेही न पटणारे. संबंधित कार्यक्रम साहित्य विषयक, कला विषयक होता. दुसरे म्हणजे तो काही शाळा वा महाविद्यालयाचा कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमात चौकटीत, तयार केलेले भाषण म्हणून दाखवणे अपेक्षित नसतेच. पाहुण्यांनी त्यांचे विचार, चिंतन मांडणे हेच अपेक्षित असते. त्यामुळे पालेकर यांनी चूक केली असे म्हणता येणार नाही.
- दुसरा मुद्दा म्हणजे क्षणभर मानू की त्यांचे बोलणे अयोग्य होते. तरीही हेच म्हणावे लागेल की, त्यांना बोलू द्यायला हवे होते. काय झाले असते ते बोलले असते तर? लोकांनी त्याचे मूल्यमापन केले असते ना. आजकाल चर्चेत वर्चस्व सिद्ध करणे यालाच अवास्तव महत्व दिले जाते. चर्चा ज्या लोकांसाठी, समाजासाठी केली जाते त्याला काही समजते याकडे दुर्लक्ष केले जाते. वादात वरचढ ठरलो म्हणजे लोकांना पटले, लोकांनी मान्य केले असे तर नसते ना? तरीही बौद्धिक कुरघोडीचा आटापिटा कशाला? प्रत्येकाने आपापले म्हणणे मांडावे. बाकी लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपवावे. अशा पद्धतीचा परिणाम देखील सखोल, दीर्घ काळ राहतो. पण यासाठी जे चिंतन हवे, जो सायास हवा तो कमी पडतो हे मान्य करणे भाग आहे.
- तिसरा विषय... चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य; यांचे निकष माझे किंवा तुझे असे नसतात. माझे म्हणणे चूक असू शकते, तुझे म्हणणे बरोबर असू शकते किंवा माझे बरोबर असू शकते अन तुझे चूक, किंवा दोघांचेही बरोबर अथवा दोघांचेही चूक. असे काहीही असू शकते. त्यामुळे चर्चा विषयाची, मुद्यांची व्हावी; तू आणि मी ची होऊ नये. तशी ती होत असेल तर त्याला वैचारिक चर्चा म्हणता येणार नाही. शिवाय भारतीय वा हिंदू पद्धती तर विलक्षणच आहे. पूर्ण गीता सांगितल्यावर सुद्धा सांगणारा काय म्हणाला? यथेच्छसि तथा कुरु... त्यामुळे पालेकरांना बोलू देतानाही उघडे पाडणे, कोंडीत पकडणे असे कोणतेही भाव न ठेवता विचारांचे आदानप्रदान हाच हेतू असायला हवा. तुम्ही चूकच किंवा आम्ही बरोबरच हे ठरवून चर्चा, विचार योग्य म्हणता येणार नाहीत. षडदर्शनांचा विकास, अनेकानेक शास्त्रे, रचना, पद्धती, जीवनाची असंख्य उपांगे यांचा विकास कसा झाला असेल वा होतो; याचाही विचार आवश्यक आहे. मानवी जीवन आणि त्याची उपांगे यांच्या संदर्भात अंतिम शब्द बोलून झाला आहे आणि आता फक्त त्यासाठी फौज उभी करणे एवढेच बाकी आहे असे समजण्याचे कारण नाही.
- पालेकर जे काय बोलत होते म्हणून सगळीकडे आलेले आहे ते खरे मानले तर वास्तविक ते हिंदू विचारांचा पूर्वार्ध मांडत होते असेच म्हणावे लागेल. त्यांचेच म्हणणे पुढे नेऊन हिंदुत्वाला जोडणे फारसे कठीण नाही. पण त्यासाठी हिंदुत्वाचे जीवनलक्षी चिंतन आधी समजावे लागते. अनेकांना वाईट वाटेल पण हिंदुत्व सत्तेशी वा सत्ताकारणाशी जोडणे म्हणजे हिंदुत्वाचे नुकसान करणे असते. जीवनातील सत्तेचे केंद्रीय स्थान बाजूस सारावे असे म्हटले की, लक्षावधी इंगळ्या डसल्याची भावना जोवर होते तोवर हिंदुत्व वादग्रस्तच ठरत राहील. हिंदुत्वाचे सैन्य खडे करतानाच हिंदुत्वाचा आशय, गाभा अधिकाधिक स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर हिंदुत्वाच्या नावाने उभा होणारा समाज स्वतः अहिंदू होऊन जाईल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ फेब्रुवारी २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा