जेएनयु प्रकरण, कन्हैय्या अटक, राजकीय पक्षांच्या याबाबत भूमिका; या साऱ्यांच्या चर्चेत कायद्याचा उल्लेख वारंवार होतो. सगळ्या गोष्टी कायद्यानुसार व्हायला हव्या, कायदा आपले काम करेल, कायदा सर्वोच्च इत्यादी सतत कानावर आदळते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कायदे राष्ट्र जन्माला घालत नाहीत, राष्ट्र कायद्यांना जन्म देते. कायदे वा घटना राष्ट्र जन्माला घालत नाही, उभं करत नाही, घडवत किंवा बिघडवत नाही. उलट राष्ट्र आपल्या गरजेनुसार प्रकृतीनुसार घटना, कायदे इत्यादीला आकार देत असते. कायदे किंवा घटना नसतानाही राष्ट्र अस्तित्वात असते. अन ते जिवंत आणि सशक्त असले तर त्याचा प्रत्ययही येत असतो. अगदी साधी गोष्ट आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी कुठे कायदे वा घटना होती. अन त्यानंतर १९४७ पर्यंत; तब्बल ९० वर्षे जो लढा चालला तो लढा कोणी दिला? किंवा ९० वर्षे चाललेल्या या संघर्षाला जो प्रतिसाद मिळाला तो कोणी दिला. कशाच्या आधारे, कशाच्या भरवशावर, कशासाठी, अन कोणी हा सारा खटाटोप अन सायास केला? व्यवस्थाशून्य अवस्थेत जिवंत राहून, त्या स्थितीतून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार कोणी केले? हे सारे जी शक्ती, जी भावना घडवून आणते; ते राष्ट्र. ते कायदे, घटनेवर अवलंबून नसते. ते आपल्या गरजा आणि प्रकृतीला अनुसरुन कायदे वा घटना यांना आकार देते अथवा त्यांना निकाली काढून त्या जागी दुसऱ्या व्यवस्था निर्माण करते. जगभरात विविध मानवी समूहात जे बदल वा परिवर्तने होत आली आहेत आणि आजही होत आहेत; ती राष्ट्र भावनेचा परिणाम आहेत. ज्यावेळी नियम, कायदे, घटना वा व्यवस्थांच्या आधारे समाज उभा करण्याचा प्रयत्न होतो, राष्ट्र जन्माला घालण्याचे कृत्रिम प्रयत्न होतात त्यावेळी ते असफल तर होतातच, शिवाय स्वत:ला अन जगाला भारभूतही होतात. इस्लाम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट, समाजवाद, भांडवलशाही यांनी हाच dogmatic approach घेऊन प्रयत्न केलेत अन ते जगाला भार बनलेत. जगभरातील घडामोडींवर नजर टाकली तर आता लोकशाही म्हणून स्वीकारलेल्या व्यवस्थांचा क्रमांक लागल्याचे दिसेल. ब्रिटीश, फ्रेंच, पोर्तुगीज यांना जगभरातून गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सर्वत्र लोकशाहीचे वारे वाहू लागले. कायद्यांची चौकट हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण बनले. त्यातून आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. अन प्रत्येक लहानमोठ्या देशात विविध स्तरांवर, विविध संघर्ष उभे राहत आहेत. याचा अर्थ राज्याची लोकशाही रचना, भांडवल, समाजाबद्दलची करुणा, विविध पंथ- संप्रदायांची गरज या गोष्टी चुकीच्या आहेत वा त्यांची मुळीच आवश्यकता नाही असे नाही. मात्र ही सगळी साधने आहेत. ती मूळ नाहीत, ती अपरिहार्य नाहीत, ती अपरिवर्तनीय नाहीत याचा विसर पडता कामा नये. यांच्या आकारास येणे आणि लय पावणे याच्या मुळाशी, ही उत्पत्ती आणि लय घडवून आणणारी जी बाब आहे ती आहे राष्ट्र. ती नीट समजून घेतली तर सगळ्यांच्याच फायद्याचे ठरू शकते.
- श्रीपाद कोठे
१८ फेब्रुवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा