रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

सुहृदाला उत्तर

द्वेष करण्यासाठी माणसं तीन दिवसात तयार करता येतात...!

पण प्रेम करणारी माणसं सहा महिन्याची गोष्ट सोडाच,

एक पूर्ण आयुष्य खर्चूनही तयार करता येत नाहीत...

एकटी व्यक्ती प्रेम करते!

समुदाय द्वेष भिनवण्यासाठीच असतो!

हिंमत दाखवून एकटी व्यक्ती बना!'

एका सुहृदाने श्री. राजू परुळेकर यांची ही पोस्ट मला पाठवली आणि माझे मत विचारले. वर परुळेकर यांची पोस्ट आणि खाली माझे सुहृदाला दिलेले (परुळेकर यांना नव्हे) उत्तर.

परुळेकर मोठे आणि महान आहेत. मी काय बोलू त्यावर? पण तू विचारले म्हणून प्रयोजन. ही पोस्ट सरसंघचालकांच्या वक्तव्यावर बेतली आहे हे न सांगताही कळणारे आहे. त्यांच्या कोणत्याही मताशी मी सहमत नाही. तत्वज्ञाचा आव आणून लिहिणारी, बोलणारी मंडळी अलीकडे अमाप पिकली आहेत. हा त्यातलाच नमूना. या लोकांना स्वत:ला प्रश्न विचारण्याचीसुद्धा गरज वाटत नाही. हे निष्कर्ष आधी काढतात अन मग त्यावर विश्लेषण बेततात. आता एकेक मुद्दा घे.

मुद्दा १ - `द्वेष करण्यासाठी माणसं तीन दिवसात तयार करता येतात...!'

याच्याएवढं बालिश विधान नाही. द्वेष करायला शिकवावं लागतच नाही. अरे साधं फोन घेतला नाही यावरून लोक नाराज होतात ना? आपल्या रोजच्या जगण्यावर नजर टाक. अशी असंख्य उदाहरणे सापडतील. मी तुला व्यक्तिश: अशी शे-दोनशे लोकांची यादी बसल्या बसल्या देऊ शकेन, ज्यावरून माझे म्हणणे सिद्ध होईल. विषय वाढेल म्हणून आवरते घेतो.

मुद्दा २ - `पण प्रेम करणारी माणसं सहा महिन्याची गोष्ट सोडाच,

एक पूर्ण आयुष्य खर्चूनही तयार करता येत नाहीत...'

हे सुद्धा आपल्या स्वत:च्या आयुष्यात आपण तपासून पाहू शकतो. हां, फक्त त्यासाठी दुराग्रह, टोकाचा अहंकार, मी म्हणजे विश्व या व अशा गोष्टी सोडाव्या लागतात. अन हे संघाशी जोडलं तर मग तर बोलायलाच नको. संघस्थानावर घाण (म्हणजे चक्क मानवी विष्ठा) करून ठेवण्याएवढा द्वेष करणारे सुद्धा नंतर संघाचे स्वयंसेवक कसे झाले किंवा चक्क संघ संस्थापकांची समाधी फोडून टाकणारे नंतर संघाचे समर्थक आणि सहानुभूतीदार कसे झाले; हा संघाचा जगजाहीर इतिहास आहे. शाखेत जाताना किंवा मोठ्या उत्सवाला जाताना कसा कसा त्रास होत असे आणि नंतर वातावरण कसे बदलले हे माझ्यासह अनेक लोक स्वत:च्या अनुभवातून सांगू शकतील. ५-१० पोरांना घेऊन सुरु झालेला संघ एवढा वाढला; त्याचा संपूर्ण इतिहासच द्वेषाला प्रेमात परिवर्तीत करण्याचा आहे.

त्यांच्या या आक्षेपाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण सुद्धा करायला हवं. संघ ९३ वर्षांपासून काम करतो आहे. तो कुटुंबवत्सल माणसांचे संघटन आहे आणि त्या माणसांना घेऊनच तो काम करत असतो. हिंसा, द्वेष शिकवून इतकी वर्षे संघटन उभं करता येतं का? सामान्य पापभिरू, कुटुंबवत्सल माणसे वर्षानुवर्षे द्वेष आणि हिंसा करीत राहू शकतात का? जगात ज्यांनी ज्यांनी द्वेषावर आधारित कामे केली त्यांचे आणि त्यांच्या कामाचे आयुष्य किती होते? त्यात किती व कोणती माणसे सामील झाली? साधा विचार आहे- आणिबाणीच्या काळात भूमिगत असलेल्या संघाच्या हजारो लोकांना आणि संघाच्या बैठका आदींना महिला वर्गाने आणि संघाच्या नसलेल्या संघ स्वयंसेवकांच्या शेजाऱ्यापाजार्यानी मदत केली. म्हणून तो संघर्ष यशस्वी झाला. एखादा कार्यकर्ता एखाद्या घरी आलेला असताना अचानक पोलीस टपकले, तर मागच्या वा शेजारच्या घरातून तो कार्यकर्ता सटकून जात असे. अशा प्रकारचं सहकार्य हे द्वेष शिकवल्याने मिळवता येतं का? हा प्रश्न अशा लोकांना पडूच शकत नाही. उलट यावर हे विकृतश्रेष्ठ तर्कट करतील की, बाबा पोलिसांची ब्याद नको म्हणून शेजारी अळीमिळी गुपचिळी राहत असतील. या वाह्यातपणाला अंत नसल्याने उत्तर देण्याची गरजच नाही. अन्य हजारो प्रसंगी संघाचे लोक समाजातून व्यक्ती स्तरावर आणि संस्था स्तरावर जे सहकार्य मिळवतात ते द्वेषाच्या आधारे मिळवता येऊ शकते का? पण विद्वानांनी विचार केलाच पाहिजे असे कोठे आहे?

मुद्दा ३ - `एकटी व्यक्ती प्रेम करते!

समुदाय द्वेष भिनवण्यासाठीच असतो!

हिंमत दाखवून एकटी व्यक्ती बना!'

निव्वळ हास्यास्पद आणि तर्कशून्य सुद्धा. लिहिणाऱ्याने पाच वर्षं एकटी व्यक्ती म्हणून जगून उदाहरण घालून द्यावे. मग यावर बोलता येईल. त्यांनी चलाखीने समुदाय हा शब्द वापरला आहे. पण समाज हा सुद्धा समुदायच आहे. उगाच `बाल की खाल' काढण्याचा इरसालपणा करू नये. मुद्दा आहे एकटे राहण्याचा. त्यांनी समाज सोडून एकटे म्हणजे अगदी एकटे (कुटुंब हा सुद्धा प्राथमिक स्तरावरील समुदायच) कोणत्या तरी बेटावर जगून दाखवावे. मग बोलू.

तुझे समाधान झाले ना? मला फक्त तेवढेच हवे.

- श्रीपाद कोठे

१४ फेब्रुवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा