आज विजया एकादशी. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा आज जन्मदिवस. संघटना आणि संघटीत समाज यातील भेद समजावून सांगून त्यांनी या विषयाचे विवेचन १९६० साली इंदोर येथे झालेल्या चिंतन बैठकीत केले होते. संघ स्वयंसेवकांनी आपल्या नित्य चिंतनाचा विषय करावा एवढा तर तो महत्वाचा आहेच, पण एक social thought म्हणूनही त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.
गोळवलकर गुरुजी यांनी इंदूर चिंतन बैठकीत ७ मार्च १९६० रोजी दिलेल्या बौद्धिकात या विषयाची सखोल चर्चा केली आहे. रा. स्व. संघाचे संघटन कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची चर्चा करताना `अनुशासन' या शब्दाची चर्चाही त्यांनी केली आहे. उपनिषदातील `अनुशासन' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तोच संघाला अभिप्रेत असल्याचेही ते म्हणाले. याविषयी ते म्हणाले, `विशिष्ट पद्धतीनेच वागले पाहिजे असा आदेश उपनिषदात नाही. विशिष्ट अशी नियमावली सांगितली नाही. बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि या स्वातंत्र्याचा मौलिक अशा सिद्धान्तांशी समन्वय जोडून त्यालाच अनुशासन म्हटले आहे. आपल्याकडे अनुशासन या शब्दात व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे सूत्रबद्ध जीवन आणि समष्टीत तिचे विलीनीकरण या दोहोंचा अंतर्भाव आहे. या दोहोत जो सामंजस्य निर्माण करू शकतो तोच यथार्थतेने हिंदू संघटन करू शकतो. अन्यथा जगात ज्या प्रकारे निरनिराळ्या लोकांनी काही संघटीत स्वरूप उभे केले आणि त्या आधारावर त्यांनी काही काळ शक्तीचा अनुभवही घेतला होता त्याच प्रकारे आपल्याकडेही होऊ शकेल. त्यातून एक हिंदू शक्ती उत्पन्न होईल आणि ती काही काळानंतर नष्ट होईल. अशी शक्ती अल्पजीवी राहील आणि काही काळ सफलता हाती आली तरीही ती शक्ती संपल्यावर शेकडो पटींनी अधिक हानी पोहोचेल. हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यासमोर सांगतो आहे.'
याचेच विवरण करताना ते पुढे म्हणतात, `आपले कार्य हिंदू समाज संघटीत करण्याचे आहे. हिंदू समाजात वेगवेगळ्या संघटीत शक्ती निर्माण करण्याचे नाही. समाजात वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याचे नाही. समाज संघटीत जीवनाच्या विचारांनी ओतप्रोत असावा आणि समाजातील सर्व व्यक्ती नि:शेषपणे त्या विचारांनी परिपूर्ण असाव्यात हे आपले लक्ष्य आहे. समष्टीमध्ये आपले जीवन विलीन करून स्वत:सिद्ध अनुशासनाच्या भावनेत स्वत:ला गुंफून घेण्याचा निश्चय करून लोकांनी येथे यावे. या प्रकारच्या समाज संघटनेचा आमचा विचार आहे आणि संकल्प आहे- एक संघटीत पक्ष निर्माण करण्याचा नाही, हा विवेक करणे उचित ठरेल. यावर कोणी विचारेल की, संघ एका पक्षाप्रमाणे नाही तर मग कसा चालतो? आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी; संपूर्ण समाजाचे संघटीत जीवन निर्माण करण्यासाठी एक मोठे देशव्यापी, निरलस, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी मिळून बनलेले संघटनयंत्र आपल्याला उभे करावे लागेल. पण ते आपले लक्ष्य नव्हे, ते केवळ साधन आहे. समाज सुसंघटीत व्हावा यासाठी कार्यकर्ते निर्माण करणे ही केवळ पहिली पायरी आहे.'
शेक्सपिअरच्या `ज्युलियस सीझर' नाटकाचा संदर्भ देत `मास मुव्हमेंट', `क्लास मुव्हमेंट' याची चर्चाही त्यांनी केली. पुढे अतिशय नि:संदिग्ध शब्दात त्यांनी हा विचार मांडला. ते म्हणतात, `आर्य लोकात कधी दासभाव राहू शकत नाही. दासपण त्याला कधीच चांगले वाटू शकत नाही. मग ते स्वकीयांचे असो वा परकीयांचे असो. आर्यांच्या प्रतिभेचा आणि चैतन्याचा हा असामान्य गुण आहे. आपण आपल्या जीवनात मुक्ती हेच जर सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानलेले आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आणि कुठलीही बंधने नाहीत अशी अवस्था जर श्रेष्ठ मानली आहे तर मग ऐहिक जीवनातही दासतेचा विचार मान्य होऊच शकत नाही. जर कुणाला तो मान्य होत असेल तर आर्यत्वापासून तो ढळला. हा आपला स्वाभाविक गुण आहे आणि त्याचे पोषण करून आपल्याला तो परिपुष्ट बनवायचा आहे. कुणी जबरदस्तीने कुणाचा गुलाम बनत असेल आणि आपली प्रतिभा विकत असेल तर कोणत्याही व्यक्तीचे असे हे पतन आपल्याला सहन होण्यासारखे नाही. आपण हे मान्य करू शकत नाही.'
या बौद्धिकाच्या अखेरीस इशारा देताना गुरुजी म्हणतात, `संघटना करताना, अहिंदू आणि अनार्य संघटना विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याचे भय राहू शकते. परिणामी आपणही एक रिजिड- नॉन इलॅस्टिक; समाजाला गुलाम बनविणारे यंत्र निर्माण करून राष्ट्राचे भोळसटपणामुळे अहित तर करून बसणार नाही, ही खबरदारी घेण्यासाठीच हे मी सांगितले. यावर विचार करणे हे आता आपले काम आहे.'
- श्रीपाद कोठे
२२ फेब्रुवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा