शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

विज्ञान म्हणजे विश्वाची फक्त एक कला

विज्ञानाने निसर्गावर मात केली आहे, विज्ञानाने सगळं जग मुठीत आणलं आहे, विज्ञानाने इतकी निर्मिती केली; इत्यादी वाक्ये अनेकदा कानावर पडत असतात. पण खरेच असे आहे का? वस्तुस्थिती काय आहे? पाणी म्हणजे हायड्रोजनचे दोन अणु आणि प्राणवायूचा एक अणु, हे विज्ञान आम्हाला समजावून देते. परंतु हायड्रोजन आणि प्राणवायू एकत्र आल्यावर पाणीच का? किंवा हायड्रोजन आणि नायट्रोजन एकत्र करून पाणी का नाही? हे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे आहेत. माणसाची श्वासोच्छवास क्रिया म्हणजे, प्राणवायू आत घेणे आणि कर्बाम्ल वायू बाहेर टाकणे हे विज्ञान समजावते, पण ही क्रिया विज्ञानाने उलगडून सांगण्याच्या कोट्यवधी वर्षे आधीपासूनच माणूस त्याच पद्धतीने श्वासोच्छवास करीत होताच की!! गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण घेता येईल. तो या विश्वाच्या प्रारंभापासूनच अस्तित्वात आहे. न्यूटन किंवा अन्य कोणी तो निर्माण केलेला नाही. सोने, चांदी, लोखंड, लाकूड, पारा किंवा यासारख्या असंख्य गोष्टींच्या गुणधर्मांची विज्ञान संगती लावते किंवा त्याची मांडणी करून मानवी बुद्धीची भूक फक्त भागवते. त्या आधारे काही तंत्र विकसित करून मानवी जीवन काही प्रमाणात सुसह्य बनवते. पण फक्त एवढेच. विज्ञान काहीही नवीन निर्माण करीत नाही, जे मुळात अस्तित्वात नाही त्यावर कणभर सुद्धा प्रकाश टाकू शकत नाही. म्हणजेच विज्ञान सर्वोच्च नाही. या विश्वाच्या अनेक कलांपैकी ती एक कला आहे. (कला म्हणजे आर्ट या अर्थाने नव्हे, चंद्राच्या कला असतात त्या अर्थाने.) म्हणूनच आमच्या हाती विज्ञान आहे म्हणून आम्ही काहीही करू शकतो किंवा काहीही करू; हा फक्त माणसाचा दंभ आणि दर्प आहे. स्वाभाविकच त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावेच लागतात आणि भोगावे लागतील. मात्र असे काही बोलू लागलो तर आपण मागासलेले ठरू का? आपल्याला लोक हसतील का? आपल्याला वेड्यात काढतील का? आपल्याला निर्बुद्ध म्हणतील का? यासारख्या अनेक शंकाकुशंकापोटी अशा विषयांपासून चार हात दूर राहण्याचीच सर्वसामान्य वृत्ती असते. ही वृत्ती मोडीत काढून, विज्ञान हीसुद्धा अन्य गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे आणि म्हणूनच त्याचा मूळ रुपात वा उपायोजित तंत्राच्या रुपात होणारा वापर हा नियंत्रितच असायला हवा, अनियंत्रित नको. हे भान राखले गेले नाही तर त्याचा भस्मासुर डोक्यावर बसून सगळ्याची राखरांगोळी करेल, हे नि:संशय.

- श्रीपाद कोठे

६ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा