इंदुरीकर महाराज सध्या गाजताहेत. अगदी आपण करीत असलेले कीर्तन सोडून देऊन शेती करण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर कीर्तन सोडू नका अशा विनंत्याही होत आहेत. चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षांनी सुद्धा त्यांना कीर्तन न सोडण्याची विनंती केली आहे. या विषयावरच्या अनेक बातम्या वा पोस्ट वाचल्यावर सुद्धा वादाचं नेमकं कारण मात्र मला समजू शकलेलं नाही. हां, मुलगा वा मुलगी हवी असल्यास अमुक पद्धत अवलंबावी; हाच एक मुद्दा सर्वत्र आहे. पण त्यात एवढा गोंधळ करण्याचे काय कारण? एखाद्याचे एखादे मत असू शकते. चूक असेल, बरोबर असेल हा वेगळा भाग. पण जणू काही कोणाला मतच असू नये किंवा असलेच तर फक्त आमच्या मताला धरूनच असावे, या हट्टाला काय म्हणावे?
समाजात सध्या पसरलेल्या झोटिंगशाहीचाच हा नमुना आहे. विचार म्हणा वा सगळ्यांच्या भल्याची कामना म्हणा; या चांगल्या गोष्टींनाही आता वर्चस्ववादाची लागण झालेली आहे. माणसाच्या, समाजाच्या, निसर्गाच्या, जगाच्या भल्याची प्रामाणिक तळमळ सुद्धा या वर्चस्ववादाच्या तडाख्यातून सुटत नाहीत. न जाणो वेगळा विचार, वेगळी भावना, वेगळी गोष्ट लोकांनी स्वीकारली तर आपण अलगथलग पडू की काय अशी भीती यापाठी असेल का? जीही कारणे असतील ती असोत, पण आपण आपले विषय, आपले विचार मांडत राहावेत. काय स्वीकारायचे वा नाकारायचे हे लोक ठरवतील. इतकी उदार वृत्ती क्वचितच पाहायला मिळते. अगदी मस्करी वाटावी अशीही मते असू शकतातच आणि ती बाळगण्याचा अधिकारही मान्य केलाच पाहिजे. जोवर कोणाला इजा होत नाही, जोवर कोणाची लुबाडणूक होत नाही, जोवर कोणाच्या जगण्यात अडथळा आणला जात नाही तोवर; सगळ्यांना विचार, व्यवहार, मतांचे स्वातंत्र्य असायलाच हवे. हे स्वातंत्र्य काढून घेणे वा अमान्य करणे म्हणजे मानवी विचारांचा विकास थांबवणेच होय. असे होता कामा नये.
अमुक एखादी गोष्टच सत्य, योग्य, न्याय्य, करणीय वगैरे निश्चित करून; त्या साच्यात सारं काही ओतण्याचा प्रयत्न आणि अट्टाहास ही मानवी दुर्गतीच म्हटली पाहिजे. योग्य काय, चांगलं काय तर मला जे तसं वाटतं ते. ही धटिंगणशाही होईल. मानापमानाच्या कल्पना हा विषय तर हास्यास्पदच्याही पलीकडे गेलेला आहे. एखादी गोष्ट न पटणे वा त्यावर वेगळे मत असणे ही एक गोष्ट पण त्याने लगेच अपमान वगैरे कसा होऊ शकेल? अपत्यसंभव हा आता सार्वजनिक चर्चेचा विषयही झालेला आहे. तो taboo राहिलेला नाही. परंतु तो विशिष्ट भाषेत आणि विशिष्ट लोकांनीच बोलला तर योग्य असं म्हणणं वैचारिक दिवाळखोरी ठरेल. त्या विशिष्टतेच्या चौकटीबाहेर सुद्धा मते, विचार असू शकतात. एचढेच नाही तर ती मांडण्याचा अधिकारही असतोच. परिपक्व समाजाने अशा गोष्टींकडे पाहण्याची, त्यावर चर्चा करण्याची योग्य शैली विकसित केली पाहिजे.
- श्रीपाद कोठे
रविवार, १६ फेब्रुवारी २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा