बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

साहित्याने आरशासोबत मनही व्हावे

(सध्या वातावरणात सर्वत्र साहित्य संमेलने आहेत. चिंचवड, चंद्रपूर, कल्याण, नागपूर, गोंदिया साहित्य संमेलनांमुळे चर्चेत आहेत. त्या निमित्ताने-)

साहित्याविना समाज ही कल्पनाच अशक्य आहे. मनातील विचार, भावभावना सांगणे किंवा समजून घेणे हे साहित्याचं मूळ आहे. इतिहास डोळे उघडतो तेव्हापासूनच हे सांगणे वा समजून घेणे मानवी सभ्यतेला चिकटलेले आहे. म्हणूनच ती साहित्याची सुरुवातच म्हटली पाहिजे. साहित्याची एक व्याख्या- `सहितस्य भाव:' अशी केली आहे. त्याही अर्थाने मानवी जीवन आणि साहित्य हे परस्परांचे सांगाती आहेत. जीवनासह चालणारे आणि जीवनाला आपल्यासोबत नेणारे असे साहित्याचे स्वरूप आहे. या साहित्याची भाषा वेळोवेळी बदलली आहे अन ती बदलतही असते. मानवी सभ्यतेचा विचार केला तर सुरुवात खाणाखुणांनी होईल. तोंडाने विविध आवाज, त्यांचे चढउतार, त्यांचे वेगळेपण आणि त्यांची सुसंगत रचना यांची जाण येईपर्यंत साहित्याने खाणाखुणांच्या शब्दांचाच आधार घेतला. त्यानंतर त्यातून विकसित झालेली चित्रलिपी साहित्याचा आधार झाली. तोंडाने बोलणे विकसित झाले तो काळ आधुनिक भाषांची सुरुवात म्हणावी लागेल. त्यानंतर मौखिक शब्द हाच प्रदीर्घ काळ साहित्याचा आधार ठरला. हे शब्द साठवून ठेवण्याच्या गरजेतून लेखन विकसित झाले आणि छपाई यंत्राने भाषा आणि साहित्याचे रंगरूप, पोत, उंची, खोली, व्याप्ती सगळेच आमुलाग्र बदलून टाकले. साहित्याचा जन्म मानवी जीवनासोबतच झाला असला तरीही त्याचे आजचे स्वरूप त्या मूळ रुपाहून अधिक ठाशीव, रेखीव, संघटीत आणि आशयघन आहे.

साहित्य हे मानवी जीवनाचा सहप्रवासी असल्याने ते वर्तमानाचे प्रतिबिंब असते, ते वर्तमान घडवीत असते आणि ते वर्तमानाला भविष्याकडे घेऊनही जात असते. साहित्य या तिन्ही भूमिका पार पाडीत असते. या तिन्ही भूमिकातून आज साहित्याकडे पाहिले तर काय दिसते? साहित्य हे वर्तमानाचे प्रतिबिंब असते हा मुद्दा विचारात घेतला तर, आजचे साहित्य तसे आहे हे म्हणावे लागेल. व्यक्तीमनातील व समूहमनातील इच्छाआकांक्षा, अपेक्षा, सफलता, विफलता, प्रकृती, विकृती, संस्कृती, उत्तम आणि अधम भावभावना, विचार आदी साहित्यातून प्रकट होत असते. परंतु मुळातच व्यक्ती आणि समाज हे स्वार्थ, पैसा, वासना, प्रभुत्व यांच्या मागे धावत सुटल्याने साहित्यात त्याचे प्रतिबिंब अधिक दिसून येते. हेवेदावे, हीन वृत्ती, तुच्छता, अहंकार यांची वाढ होत असून; आजवर चांगले समजले गेलेले गुण, सवयी, वृत्ती, विचार यांना दुय्यम स्थान मिळते. दुसऱ्याचा विचार करणे, मनाचा मोठेपणा, उमदेपणा, एखाद्या कार्यासाठी- विचारासाठी- मूल्यासाठी- स्वत:ची इच्छापूर्ती बाजूला ठेवणे इत्यादी बाबी कमी प्रतीच्या अन त्याज्य समजल्या जाऊ लागल्या आहेत. स्वाभाविकच साहित्यात त्याचेच प्रतिबिंब पाहायला मिळते. अगदी विनोददेखील वाह्यात पातळीवर गेलेला आहे किंवा ओरबाडून काढण्यात धन्यता मानताना दिसतो आहे. निखळ, निर्व्याज, सूचक, सकारात्मक संदेश देणारा विनोदही दुर्मिळ होऊ लागला आहे.

वर्तमानाला घडवण्याच्या संदर्भात साहित्याची स्थिती काय आहे? मुळात स्थूल अर्थाने साहित्य ज्याला म्हटले जाते त्या पुस्तके, मासिके, नियतकालिके, दैनिके यांची स्थिती भीषण आहे. इलेक्ट्रोनिक माध्यमे, इंटरनेट, सोशल साईट यामुळे पुस्तकांपासून दैनिकांपर्यंत साऱ्याच साहित्याविषयीची ओढ, आस्था अन प्रेम आटू लागले आहे. वाचन संस्कृती रुजवणे हा एक मोठा प्रश्न होऊन बसला आहे. लोकांनी पाठ फिरवल्याने या सगळ्या साहित्य व्यवहारापुढे अस्तित्वाचे संकट उभे झाले आहे. त्यामुळे साहित्यिक वा लेखकाच्या प्रतिभेची निर्मिती, त्यांचे स्फुरण, त्यांचे चिंतन अडगळीत जाऊन; लोकांना ओढून काय घेऊ शकेल याचा विचार प्राधान्य पावतो आहे. स्वाभाविकच लोकांचे रंजन करणारे, भावना उत्तेजित करणारे, भावना भडकवणारे, उथळ, स्वार्थ आदींना खतपाणी घालणारे लेखन सुरु झाले आहे. त्याचीच मागणी आहे, ती वाढत आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठीचे प्रशिक्षण आदीही सुरु झाले आहे. अर्थप्रधानता इतक्या टोकाला गेली आहे की, समाजाशी बांधिलकी सांगणारे, अव्यावसायिक, सरकारी माध्यम असलेल्या आकाशवाणीवरही अर्ध्या नियोजित कार्यक्रमात कपात करण्याची पाळी येऊ लागली आहे.

मुद्रित माध्यमांचे स्वरूप बदलले आहे हे तर खरेच, पण त्याचा दर्जा अन त्यातून रसिक, प्रेक्षक, श्रोते, दर्शक यांना जे दिले जाते त्याने सुमारपणा आणि हीनत्वाची कमाल पातळी गाठलेली आहे. विविध मनोरंजन वा वृत्त वाहिन्याच आज सामान्य माणसाची मनोरंजन, माहिती, विचार, कथा, कादंबरी, काव्य, आध्यात्म आदींची गरज भागवू लागल्या आहेत. यातून जी भाषा कानावर पडत राहते, जी दृश्य आणि ज्या प्रतिमा दिसत राहतात, ज्या पद्धतीचा व्यवहार पाहायला मिळतो, जी प्रतिमाने मनावर ठसतात ती वर्तमान घडवण्यापेक्षा बिघडवणारीच आहेत. शिवाय सगळ्याच गोष्टींची सर्वजनसुलभता आणि स्वातंत्र्य (???) यामुळे प्रत्येकालाच प्रत्येकच गोष्ट करण्याची मोकळीक मिळाली. समानतेमुळे (???) `आम्हीही काही कमी नाही' अशी भावना निर्माण झाली. अन पुढे जाऊन; श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणारे, चांगले-वाईट ठरवणारे, योग्य-अयोग्य ठरवणारे तुम्ही कोण अशा विचाराने जन्म घेतला. परिणामी श्रेष्ठ-कनिष्ठ, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य निकालात निघाले; अन सार्वत्रिक ऱ्हास आणि सुमारीकरण यांनी बस्तान बसवले. वाहिन्यांसाठी टुकार लेखन करणारे लेखक झाले, त्यांना पैसा मिळू लागला. पैसा मिळतो म्हणून चांगले चांगले लोक या व्यापारात सहभागी झाले. जिथे साहित्यानेच सकस आणि हिणकस हा भेद टाकून दिला तिथे ते साहित्य वर्तमानाला घडवेल ही अपेक्षाच अवास्तव ठरते. याची कोणाला खंत आहे असेही वाटत नाही.

साहित्याने वर्तमानाला भविष्याकडे घेऊन जाणे हे तर कोणाच्या गावी नसल्यासारखेच वाटते. आजचे अधिकांश साहित्य एक तर प्रचारकी, वर्णनात्मक, व्यक्तिगत मनोव्यापार चित्रित करणारे अशाच प्रकारचे आहे. या साहित्यातून वाचणाऱ्याच्या अथवा ऐकणाऱ्याच्या मनात स्फूर्ती, चेतना, विचार, सहवेदना, सहानुभूती, ओजस्विता, धैर्य, दृढता, मांगल्य निर्माण व्हावे अशी जाणीव फार कमी दिसून येते. व्यक्तीला आणि समाजाला अंतर्मुख करेल, विचारोन्मुख करेल असे काही दिसत नाही. मनाला, विचारांना, भावनांना वर उचलून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. मी-मी म्हणणारे सुद्धा याबाबतीत उदासीन आहेत अथवा बेजबाबदार आहेत.

नुकतेच असहिष्णुतेच्या मुद्यावरून एक वादळ येऊन गेले- पुरस्कार परतीचे. त्यावेळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त एका व्यक्तीने आपले मत व्यक्त करण्यास चक्क नकार दिला. या मुद्याचे राजकारण होत आहे, असा तर्क यासाठी त्यांनी दिला. वास्तविक हा समाजाशी संबंधित विषय आहे. समाजात अनावश्यक वैमनस्य, गोंधळ, अराजक निर्माण केले जात असताना अशी भूमिका घेणे याला बेजबाबदारपणा नाही तर दुसरे काय म्हणायचे? घराला आग लागली असताना ती विझवण्याचे सोडून बादल्या कोणाच्या आहेत, पाणी कुठून आणले, आगीवर पाणी कोण मारते आहे याचा काथ्याकूट करणे अशोभनीय ठरते. आत्ताच पार पडलेल्या `व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात'ही ही दांभिकता पाहायला मिळाली. त्याठिकाणी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आले होते. तेथे बोलताना ते म्हणाले- व्यसनासक्त लोकांनी भीमसेनजींचे अभंग ऐकावे, जितेंद्र अभिषेकींचे गाणे ऐकावे, व.पु. काळेंची पुस्तके खिशात ठेवावी. त्यांना आनंद आणि आधार यासाठी अन्य कशाची अन व्यसनांची गरजच भासणार नाही. याचवेळी ते स्वत: काय करतात याविषयी बोलत नाहीत. आज अवधूत गुप्ते अन त्यांच्यासारखे लोक ज्या पद्धतीची गाणी तयार करताहेत, गाताहेत, त्यांचे कार्यक्रम करताहेत; त्यामुळेच भीमसेनजी, जितेंद्रजी आणि व.पु. काळे यांच्यापासून लोक दूर जात आहेत. माणसाचे मन पाण्यासारखे असते. त्याला खाली जायला काहीच लागत नाही. वर खेचण्यासाठी सायास करावे लागतात. अवधूतच्या गाण्यांकडे आकर्षित व्हायला काहीच लागत नाही, पण अवधूत सांगत असलेल्यांकडे आकर्षित होणे व टिकून राहणे याला सायास अन अवकाश लागतो. त्यासाठी निकृष्ट गाण्यांची निर्मिती थांबली पाहिजे. पण याचा विचार कोणी करतंय का? उपदेश देऊन काम होत नाही. अन अशांचे कान धरण्याचे काम साहित्यिक करीत नाहीत.

नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याचे अध्यक्ष संमेलनापूर्वी अन प्रत्यक्ष अध्यक्षीय भाषणात जे काही अन जसे काही बोलले ते साहित्य आणि साहित्य क्षेत्र याविषयी भ्रमनिरास करायला पुरेसे आहे. प्रश्न विचारांचा नाही, प्रश्न मानसिकता अन प्रामाणिकपणा यांचा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी जे काही केले, त्यावर त्यांच्याच एका सहकाऱ्याने जो प्रकाश टाकला तो तर डोळसांनाही अंधत्व आणणारा आहे. याच संमेलनात प्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार हेही होते. त्यांची मुलाखत देखील झाली. दुर्दैवाने अवधूत गुप्तेसारख्या व्यक्तीबद्दल जे लिहिले तेच त्यांनाही लागू होते. ही त्या दोघांची तुलना नाही. अशी तुलना होऊच शकत नाही. पण अतिशय तरल, संवेदनशील असलेले गुलजार `बिडी जलायले, खटीया सरकायले' का लिहित असावेत? अशा लिखाणाचा त्या कवीच्या आंतरिक भावांशी काडीचाही संबंध असू शकतो का? केवळ `मी सारे काही करू शकतो' हे दाखवणे आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेवून चार पैसे गाठीशी जोडणे यासाठीच असे लिहिले जाते. अन्यथा `बिडी जलायले' देऊन आपण अभिरुचीचे स्खलन घडवीत आहोत हे त्यांना समजत नाही असे नाही. समजूनही जेव्हा अशी कृती होते तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे म्हणणे भाग पडते.

`साहित्य हा समाजाचा आरसा असतो' हे वाक्य अलंकारिक आहे आणि म्हणूनच अंशत: सत्य आहे. आपण जसे आहोत तसे आरसा दाखवतो. साहित्यही समाज जसा आहे तसा दाखवतो. मात्र आपण कसे असायला हवे हे आरसा आपल्याला सांगत नाही. ते आपल्याला सांगतं आपलं मन आणि आपली बुद्धी. साहित्याने आरशासोबतच मन आणि बुद्धीही व्हायला हवे. व्यक्ती वा समाज कसा आहे यासोबतच, कसा असायला हवा हेही साहित्यातून अधोरेखित व्हायला हवे आणि त्या दिशेने त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्नही साहित्याने करायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा