मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

टिळकांचा अग्रलेख

लोकमान्य टिळकांचा ९ एप्रिल १९०७ रोजीचा `स्वराज्य आणि सुराज्य' या शीर्षकाचा अग्रलेख आहे. त्यात लोकमान्यांनी या दोन्ही शब्दांचा विस्ताराने उहापोह केला आहे. स्वराज्य का नकोसे होते आणि सुराज्य का नकोसे होते यावरही लिहिले आहे. स्वराज्याचे `सुव्यवस्थित राज्य' आणि `सुखकारक राज्य' असे दोन भेदही मांडले आहेत. आपल्या देशाचा अन विविध राज्यांचा गेल्या ६७-६८ वर्षातला कारभार पाहताना या गोष्टी वारंवार आठवाव्या लागत नाहीत. आपसूकच त्यांचे स्मरण होते. आजच्या तारखेलाही हे आठवावे अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यातलीच एक आहे हेल्मेटसक्ती. राज्य केवळ `सुव्यवस्थित' असून चालत नाही, ते `सुखकारक'देखील असावे लागते. चांगल्या किंवा हिताच्या गोष्टींसाठी देखील राज्याने किती राबावे, राज्ययंत्रणा किती अन कशी वापरली जावी; याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. प्रबोधनाची जागा कायद्यांनी घेऊ नये. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज एक तरी कायदा रद्द करण्याची चर्चा करीत असताना, कायद्याच्या जंजाळात लोकांना किती जखडायचे यावरही मंथन व्हायला हवे. दारू किंवा सिगारेट हीदेखील वाईट गोष्ट असताना त्याबाबत फक्त प्रबोधन आणि इशारे यावर भागवले जाते. असे का? कारण त्या कंपन्या चालाव्या. हेल्मेट हा विषय मात्र प्रबोधन आणि इशारे एवढा मर्यादित न ठेवता त्याची सक्ती का? याचेही उत्तर त्या कंपन्या चालाव्या असे तर नाही? अन्यथा प्रत्यक्ष सत्ताधारी पक्षांचा विरोध असतानाही सक्ती का केली जावी?

- श्रीपाद कोठे

९ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा