शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

बावळटपणा थांबावा

संस्कृत भाषेत एक प्रसिद्ध छान सुभाषित आहे-

अश्वम् नैव् गजं नैव्, व्याघ्रं नैव् च् नैव् च्

अजापुत्रं बलिं दद्यात्, देवो दुर्बल घातक:

अर्थ सोपा आहे. एका वाक्यात सांगायचा तर देवसुद्धा दुबळ्याचा बळी स्वीकारतात.

हे आठवण्याचे आजचे कारण आहे हेल्मेट. पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आलेला दिसतो आहे. या संबंधातले कायदे, नियम, धोरणे नुसतेच अयोग्य नाहीत तर निरर्थक आहेत. अन आपल्या एकूण विचारपद्धतीशी ते जुळणारे आहे. एखादी गोष्ट फायद्याची, सोयीची असेल तर ती गोष्ट स्वीकारणे; प्रसंगी त्याच्यामागे पळणे, आवश्यक असल्यास त्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबिणे हा माणसाचा व्यक्ती व समूह म्हणून स्वभाव आहे. मग हेल्मेट वापराच्या बाबतीत असे का होत नसावे? साधे उत्तर आहे की, हेल्मेटचा वापर फायद्याचा वा सोयीचा नाही. मग जे फायद्याचे वा सोयीचे नाही त्यासाठी इरेला पडणे हे शहाणपणाचे लक्षण म्हणायचे की मूर्खपणाचे? सरकारने आणि यंत्रणेने हा मूर्खपणा त्वरित थांबवला पाहिजे. न्यायालयांबद्दल आदर बाळगूनही हे सांगावेसे वाटते की, न्यायालयाने यात पडू नये. एकीकडे दारू वा तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणे हा सरकारचा प्रश्न असल्याचे सांगून न्यायालय हात वर करते. मग हेल्मेटबाबत न्यायालयाने तसे का करू नये?

जीव जाणे हा मुद्दा असल्याने सगळेच फार संवेदनशील वगैरे होतात अन विचारशीलता खुंटीला टांगली जाते. स्वत:च्या जीवाची काळजी स्वत:शिवाय दुसरा कोणीही जास्त करू शकतो का? हे अशक्य आहे. मग लोक विचार करीत नाहीत वा निष्काळजी आहेत हा दावा, तद्दन भिकार याशिवाय दुसरा काय म्हणता येईल. प्रत्येकच जण काळजी घेत असतो, करीत असतो. अन तरीही जेव्हा हेल्मेट वापरायला लोक उत्सुक नसतात तेव्हा त्यावर नीट विचार आवश्यक ठरतो. सरकार व अन्य संबंधित गोष्टी असा विचार करीत नाहीत हे वास्तव आहे. त्यांनी तो करायला हवा.

अपघात होतात हे वास्तव आहे. पण अपघात का होतात? कशामुळे होतात? कोणामुळे होतात? अमाप वेग, अंदाधुंद गाड्या चालवणे, वाहतूक नियम मोडणे, बेफिकिरी, दारू पिऊन वाहने चालविणे, माज, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे; ही काही कारणे. एकूण वाहनचालकांपैकी अशा वाहनचालकांचे प्रमाण किती? खूप थोडे आहे. मग या थोड्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी बाकीच्यांना का वेठीला धरले जावे? अंदाधुंद गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला सरळ सहा महिने कोठडीत टाका, वर्षभर वाहन चालवण्याचा परवाना जप्त करा किंवा वाहन कायम स्वरूपी जप्त करा. अशा चार घटना होऊ द्या, आपोआप सगळे सुरळीत होतील. दारू पिऊन गाडी चालवीत असेल किंवा गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असेल तर जन्मभरासाठी परवाना रद्द करा किंवा गाडी कायमची जप्त करा. असे का होऊ नये? हे करण्याची हिंमत दाखवायची नाही अन पावत्या फाडण्याचा पुरुषार्थ गाजवायचा; हे असभ्य अन अशोभनीय आहे.

रेसिंगच्या गाड्या, वेग मर्यादा जास्त असणाऱ्या किंवा वेगमर्यादा नसणाऱ्या गाड्या यांचे मुळात उत्पादन का थांबवले जात नाही? त्यांची सामान्य, रोजच्या वापरासाठीची विक्री का रोखली जात नाही? विषवृक्षाचं मूळ उपटून टाकण्याचा विचार न करता त्या वृक्षाजवळून का जाता म्हणून पांथस्थांना दंडित करणे याला फक्त गाढवपणा म्हणता येऊ शकेल.

व्यक्ती आणि समाज विचारी, समजूतदार अन सुसंस्कृत होणे ही खरे तर सगळ्याच गोष्टींसाठी प्राथमिक आवश्यकता आहे. त्या बाबतीत चकार शब्दही काढायची आज कोणी तसदी घेत नाही. `अपघात आपल्यामुळे होतात आणि त्यात आपल्यामुळेच लोकांचे बळी जातात. हे तुम्हाला योग्य वाटते का? योग्य वाटत असेल तर खुशाल तसे वागा आणि वाट्टेल तेवढे बळी घ्या' असे मनाला साद घालणारे आवाहन ऐकूही येत नाही. सगळे लोक मूर्ख, दुष्ट, अविचारी असतात असे समजूनच आपण का चालतो? जेव्हा मनाची तार छेडली जाईल, व्यक्ती स्वत: विचार करील तेव्हा बदल होतील. माणूस जसा उर्मट असू शकतो, तसाच तो खजीलही होऊ शकतो.

`परिवर्तन' या गोष्टीचा सर्वांगानी विचार न करता, परिवर्तन म्हणजे सरकार म्हणजे कायदे म्हणजे दंड; अशी जी सवय लागली आहे, ती जेवढ्या लवकर टाकता येईल तेवढे बरे. लोकांचे भले करण्याच्या नावाखाली सगळ्या गोष्टी सरकारच्या दावणीला बांधण्याचा उपद्व्याप करणारे महाभागसुद्धा खूप आहेत. व्यक्तिश: आणि समूहश: ते हे करीत असतात. सरकारनेही अशांना दूर सारायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची तक्रार पालकांकडे घेऊन जाणाऱ्या कुरकुऱ्या, नेभळट मुलांसारखे हे लोक असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. समाजाने स्वत:चा तोल स्वत: सावरायला हवा. हेल्मेटसक्तीचा बावळटपणा कायमचा थांबायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा