रविवार, १ मे, २०२२

एअरलिफ्टच्या निमित्ताने

एअरलिफ्ट नावाचा सिनेमा काल पाहिला. अक्षयकुमारचा हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. इराकने कुवैतवर केलेल्या हल्ल्यात अडकून पडलेल्या सुमारे पावणेदोन लाख भारतीयांची ही कहाणी. चित्रपट, त्याची कलात्मकता, कथा यावर मी बोलणार नाही. असे हजारो चित्रपट, कथा, कहाण्या, कादंबऱ्या, व्यक्ती आणि समूहांचे संघर्ष या पृथ्वीच्या पाठीवर अनादि काळापासून सुरू आहेत.

त्या कथा कहाण्या 'युद्धस्य कथा रम्या:' अशाच असतात. पण मानवी वृत्ती आणि वर्तन यात रमण्याचा माझा काळ कदाचित संपला आहे. आता अशा कोणत्याही गोष्टीचे आकर्षण उरलेले नाही. अन माणसाच्या कथा कहाण्या ऐकताना, वाचताना, पाहताना; त्यातील विचार आणि भावनांची पुनरुक्ती सतत जाणवते. तेच ते वेगवेगळ्या वेष्टनात असल्याची जाणीव होते आणि मन त्यातील गाभ्याकडे, मूलभूत तत्त्वाकडे ओढ घेते. काल एअरलिफ्ट पाहतानाही असेच झाले.

माणूस हा समूह करून राहणारा आहे. याची सुरुवात कधी झाली वगैरे संशोधकांचा विषय आहे. पण माणसाचा इतिहास हा त्याच्या समूहांचाच इतिहास मुख्यतः आहे. यात वर्चस्व गाजवणारे समूह, वर्चस्व गाजवून सगळ्यांचे भले करणारे समूह, वर्चस्व गाजवून स्वतःच्या लहरी पूर्ण करणारे समूह, माणसांना त्रास देणारे वा वेठीला धरणारे समूह, या क्रूर वृत्तींचा मुकाबला करणारे समूह; जगभरात दिसून येतात. भारताने मात्र याशिवाय एक क्षीण असा प्रवाह विकसित केलेला आहे. तो आहे, व्यक्तीला त्याच्या या स्वाभाविक वृत्तींच्या वर उचलण्याचा प्रयत्न करणारा समूह. याचेच वर्णन स्वामी विवेकानंद 'पशूमानवाला देव मानवात परिवर्तित करणे' असे करतात. जग भारताकडे पाहतं असं जेव्हा कधी म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ या क्षीण समूहाकडे जग पाहतं असा होतो. भारताची आध्यात्मिकता असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा याच क्षीण समूहाकडे निर्देश असतो. या क्षीण समूहाचे सातत्य हेच भारताच्या संजीवनीचे रहस्य आहे. हा प्रवाह प्रयत्नपूर्वक टिकवला गेला म्हणणे धाडसाचे होईल. किंवा हा प्रवाह प्रयत्नपूर्वक टिकवता येईल हे म्हणणेही धाडसाचेच होईल.

परंतु ही मानवी जीवनाची आणि सभ्यतेची गरज असते. भूक असते. इतकंच नव्हे तर मानवी जगणे अधिक सुसंवादी होण्यासाठी हा तिसरा समूह वाढणे, सशक्त होणे, त्याची माणसाला गरज वाटणे, माणसांनी त्याकडे वळणे; या गोष्टी आवश्यक आहेत. असे व्हावे.

- श्रीपाद कोठे

२ मे २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा