अन्न व्यवस्थापन ही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित बाब आहे. अन्न ही रोज शिजवण्याची आणि रोज consume करण्याची गोष्ट आहे. त्याचमुळे त्याचे नीट व्यवस्थापन लागते. ते न केल्यास आरोग्यापासून अभावापर्यंत समस्या निर्माण होतात. पदार्थ बिघडणे, आंबणे, नासणे, सांडणे, टाकणे; अशा पुष्कळ गोष्टींचा विचार अन्न व्यवस्थापनात क्रमप्राप्त ठरतो. हा विचार खूप कठीण असतो, त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आवश्यक असते, त्यासाठी वेदमंत्र लागतात, त्यासाठी rocket science लागते; असे काहीही नाही. थोडी सजगता आणि खूपशी समज एवढे पुरते. अन या गोष्टी दुर्मिळ आहेत असेही पुष्कळदा वाटते. काही लोक तर दररोज अन्न फेकतात. रस्त्यावर किंवा कचऱ्यात. निर्लज्ज, मूर्ख, बिनडोक असे अनेक शब्द वापरून कदाचित मन क्षणभर शांत होईल, पण समस्या कशी सुटणार? आपल्याला किती अन्न लागतं याचा अंदाज करता येऊ नये याला काय म्हणायचे? अन्न कमी पडू नये हे योग्यच आहे. पण ते फेकण्याएवढे अधिक व्हावे हे तरी योग्य म्हणता येईल का? रोजच्या रोज तर कोणाचे पोट बिघडत नसणार की त्यामुळे अन्न उरावे. किंवा रोजच्या रोज तर कोणी न सांगता बाहेर जेवत नसेल की ज्यामुळे अन्न उरावे. भरीसभर आपल्या समाजात अन्न याबद्दल एक आदराची, पावित्र्याची भावना आहे. तरीही रोज अन्न फेकणारे आहेत. काय म्हणावे? अन कसे बदलावे हे सारे?
- श्रीपाद कोठे
८ मे २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा