रविवार, १ मे, २०२२

दोन प्रसंग

संध्याकाळची गोष्ट. घरून निघाल्यावर जिथे जायचे होते तिथपर्यंत बरेच चौक आणि सिग्नल्स लागले. त्यातल्या दोन चौकातले दोन प्रसंग.

१) नागपूरच्या धंतोली आणि रामदासपेठ या भागांच्या सीमेवर असलेला प्रसिद्ध लोकमत चौक. याच चौकात प्रसिद्ध लोकमत वृत्तपत्राचे कार्यालय आहे. सिग्नलवर वाहने उभी होती. लोक हिरवा दिवा लागण्याची वाट पाहत होते. अगदी समोर असलेल्या दुचाकीचालकाने मान डावीकडे वळवली, थोडी वाकवली अन दोनेक फुटांवर पचकन तोंडातील तोबरा टाकला. मनात तर आले अशांना (अन आत्ता याला) बॉम्ब लावून आकाशात उडवले पाहिजे. पण आपण असे कधीच करीत नसतो. गंमत तेव्हा वाटली जेव्हा त्याच्या मागच्या सीटवर बसलेली त्याची अर्धांगिनी मख्खपणे इकडे तिकडे पाहत होती.

२) दुसरी घटना याच प्रवासात पुढे लागलेल्या, व्हीआयपी रस्ता व उत्तर अंबाझरी मार्ग एकमेकांना छेदतात त्या, नागपूर सेन्ट्रल जवळच्या चौकातली. विशीतल्या तरूण-तरुणीची गाडी सिग्नलवर थांबलेली. लाल आकड्यात ८० दिसत होते. म्हणजे भक्कम वेळ आहे हिरवा दिवा लागायला. त्या तरुण गाडीच्या डाव्या हाताशी चौकात फुललेला पांढरा बोगनवेल. मुलाने सहज डावा हात बोगनवेलला लावला. अन तो पान खुडणार, एवढ्यात मागे बसलेल्या तरुणीने त्याचा हात तिथून काढून घेतला. त्याला अपमानित वाटले असावे. दोन-चार क्षणात त्याने पुन्हा हात बोगनवेलीला लावला. मुलीने काहीच केले नाही. मुलानेही काहीच केले नाही. फक्त पानाला हात लावला अन काढून घेतला. आपण चुकीची गोष्ट करणारच नव्हतो असे कृतीने सांगण्याचा अन त्याचवेळी झालेल्या जखमेची सल कमी करण्याचा प्रयत्न. एकूण परिणाम मात्र चांगला. पान खुडले गेले नाही अन यापुढे कदाचित त्याची सवय मोडेलही.

दोन प्रसंग. दोन स्त्रियांचे दोन व्यवहार. स्त्रीत्व, स्वातंत्र्य, समानता इत्यादी assert करणारा काळ. सगळ्यांची सांगड घालून काय दिसेल? मला दिसतं तेच सगळ्यांना दिसावं असं नाही. पण त्याचा अर्थ ते दिसूच नये असंही नाही.

- श्रीपाद कोठे

२ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा